सुधारित पद्धतीमुळे मका पिकात फायदा फायद्याची

मका पीक
मका पीक

शेतकरी नियोजन

रब्बीतील विविध पिकांमध्ये योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक असते. राज्यातील विविध भागांतील अनेक शेतकरी अशा सातत्यपूर्ण चांगल्या व्यवस्थापनातून उत्पादन व दर्जामध्ये चांगली वाढ मिळवत आहेत. अशा शेतकऱ्यांचे अनुभव अन्य शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात.

नाव : विनोद भाउसाहेब पिंपळे,         काळेगाव, ता. जाफराबाद, जि. जालना

विनोद पिंपळे हे प्रगतिशील मका उत्पादक शेतकरी. ‘‘कसेल त्याची शेती फायद्याची ’’या तत्त्वानुसार शेतीत सातत्याने आधुनिक तंत्राचा वापर करतात. आधुनिकतेच्या जोरावर वडिलांची सोळा एकर शेती त्यांनी ३३ एकरांपर्यंत वाढविली आहे. पारंपरिक पद्धतीने अधिक उत्पादन मिळत नसल्याचे दिसताच त्यांनी जोडओळ पद्धतीने लागवडीवर भर दिला. बियाण्यात बचत व उत्पादकताही वाढल्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यांचे आगामी नियोजन त्यांच्याच शब्दात... मी २०१५-१६ मध्ये पारंपरिक पद्धतीने मका लागवड केली. त्यासाठी ३.५ x २.५ फूट अंतरावर लागवड केली. एकरी २५ क्विंटल उत्पादन मिळाले. मात्र पुढील वर्षी त्यात बदल केला. जोडओळ पद्धतीत दोन एकरांवर पाच x दोन फूट अंतरावर तर पाच एकरांवर चार x एक फूट अंतरावर लागवड केली. त्यामुळे एकरी १६ हजार दाणे (साधारण ४.५ किलो) पडले. त्यापैकी १३ ते १४ हजार दाण्यांची उगवण झाली. योग्य पीकसंख्या राखली गेल्याने एकरी ५६ क्‍विंटलपर्यंत उत्पादन गेले. यंदाही रब्बी हंगामात सात एकर क्षेत्रावर मका लागवड करणार आहे.  सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर ऑक्‍टोबर महिन्यात लागवड करणार आहे. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करताना एकवेळा नांगरट व दोन वेळा कोळपणी करणार आहे. त्यानंतर पाच फूट (दोन एकर) अंतरावर व चार फूट अंतरावर (५ एकर) ठिबक अंथरणार आहे. लागवड करताना एकरी ६० किलो १०-२६-२६ व झिंक सल्फेट ५ ते १० किलो देणार आहे. लागवडीनंतर १५ दिवसांनी व ३० दिवसांनी एकरी १५ किलो युरिया देणार आहे.  लागवडीनंतर ४५ दिवसांनी (साधारणत: पिकाची उंची चार फूट झाल्यानंतर) विद्राव्य खत १२:६१:०० एकरी ३ किलो आठवड्याच्या अंतराने दोन वेळा देणार आहे. त्यानंतर पुन्हा एकरी १५ किलो युरिया ठिबकमधून देणार आहे. त्यानंतर १५ दिवसांनी एकरी ३ किलो ०:५२:३४ आठवड्याच्या अंतराने दोन वेळा देणार आहे. त्यानंतर १५ दिवसांनी ३ किलो ०:०:५० दोन वेळा आठवड्याच्या अंतराने देणार आहे. लागवडीपासून ४५ दिवसांनी विद्राव्य सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण एकरी २ लिटर व पुन्हा पीक ७५ दिवसांचे असताना अशीच मात्रा देणार आहे. वरील सर्वपद्धतीने काढणीसह मला एकरी २२ हजार रुपये खर्च येतो. उत्पादन साधारणपणे ५०-५६ क्विंटल मिळते. 

संपर्क :: विनोद पिंपळे, ९५४५९५९०९६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com