आले लागवड तंत्रज्ञान

आले पीेक लागवड
आले पीेक लागवड

हवामान : 

  • उष्ण व दमट हवामान, ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी उष्ण आणि कोरड्या हवामानातही आल्याची लागवड करता येते.
  • लागवडीचा कालावधी : एप्रिल ते मे, या काळात ३० अंश ते ३५ अंश सेल्सिअस तापमान फुटवे फुटून उगवण चांगली होते.
  • वाढीसाठी सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची आवश्‍यकता.
  • साधारणतः २५ टक्के सावलीच्या ठिकाणी पीक चांगले येते.
  • जमीन :

  • चांगली निचरा होणारी, मध्यम प्रतीची, भुसभुशीत कसदार जमीन लागवडीस योग्य.
  • नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढवण्याच्या दृष्टीने योग्य.
  • हलक्‍या जमिनीत भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा.
  • जमिनीची खोली कमीत कमी ३० सें.मी. असावी.
  • लागवडीसाठी आम्लधर्मी, खारवट, चोपण जमिनी शक्‍यतो टाळाव्यात.
  • कोकणातील जांभ्या जमिनीत, तसेच तांबड्या पोयट्याच्या जमिनीत चांगले उत्पादन.
  • जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.
  • चुनखडी असलेल्या जमिनीत पीक येते. परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. उत्पादनात घट येते.
  • जाती : 

  • ज्या भागात हे पीक घेतले जाते, त्या भागाच्या नावावरून जात ओळखली जाते. उदा. कालिकत, कोचीन, आसाम, भारत, उदयपुरी, औरंगाबादी, गोध्रा इ.राज्यात माहिम जातीची लागवड केली जाते.
  • काही जाती बाहेरच्या देशातून आयात केल्या आहेत. त्यामध्ये रिओ-डी-जानरो, चायना, मारन जमेका या जातींचा समावेश आहे.
  • वरदा : 

  • कालावधी : २०० दिवस., तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० टक्के.
  • सरासरी ९ ते १० फुटवे,  रोग व किडीस सहनशील.
  • सुंठेचे प्रमाण २०.०७ टक्के,  उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २२.३ टन. 
  • महिमा : 

  • कालावधी : २०० दिवस,  तंतूचे प्रमाण : ३.२६ टक्के
  • सरासरी १२ ते १३ फुटवे, सूत्रकृमीस प्रतिकारक
  • सुंठेचे प्रमाण :१९ टक्के, उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २३.२ टन
  • रीजाथा : 

  • कालावधी : २०० दिवस , तंतूचे प्रमाण : ४ टक्के
  • सुगंधी द्रव्याचे प्रमाण : २.३६ टक्के, सरासरी ८ ते ९ फुटवे
  • सुंठेचे प्रमाण : १८.७ टक्के,सरासरी उत्पादन :प्रतिहेक्‍टरी २२.४ टन
  • माहीम : 

  • महाराष्ट्रामध्ये प्रचलित जात, कालावधी : २१० दिवस
  • मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात, ६ ते १२ फुटवे
  • सुंठेचे प्रमाण : १८.७ टक्के, उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २० टन
  • पूर्वमशागत :

  • लागवडीपूर्वी जमिनीची एक फुटापर्यंत खोल उभी, आडवी नांगरट करावी.
  • १ ते २ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. हे पीक जमिनीत १८ महिन्यांपर्यंत राहत असल्यामुळे जमिनीची चांगली पूर्वमशागत करावी.
  • जमिनीतील बहुवार्षिक तणांचे कंद, काश्‍या वेचून गोळा कराव्यात. मोठे दगड-गोटे वेचून काढावेत.
  • शेवटच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्‍टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.  स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा.
  • लागवडीच्या पद्धती :  सपाट वाफे पद्धत :

  • पठारावरील सपाट जमिनीवर जेथे पोयटा किंवा वाळूमिश्रीत जमीन आहे अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी.
  • जमिनीच्या उतारानुसार २ x १ मीटर किंवा २ x ३ मीटरचे सपाट वाफे करावेत.
  • सपाट वाफ्यामध्ये लागवड २० x २० सें.मी. किंवा २२.५ x २२.५ सें.मी. अंतरावर करावी.
  • सरी वरंबा पद्धत :

  • मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने आल्याची लागवड करावी.
  • लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सें.मी. वरती सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून दोन इंच खोल लागवड करावी.
  • दोन रोपांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.
  • रुंद वरंबा किंवा गादी वाफा पद्धत :

  • काळ्या जमिनी, तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा जेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी.. या पद्धतीमध्ये १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते.
  • जमिनीच्या उतारानुसार रुंद वरंब्याची (गादी वाफ्याची) लांबी ठेवावी.
  • १२० सें.मी. वरती सरी पाडून घ्यावी म्हणजे मधील वरंबा ६० सें.मी. रुंदीचा होईल.
  • दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ६० सें.मी. सोडावी.
  • या रुंद वरंब्याची उंची २० ते २५ सें.मी. ठेवून त्यावरती २२.५ सें.मी. x २२.५ सें.मी. अंतराने लागवड करावी.
  • लागवडीचा हंगाम आणि लागवड :

  • लागवड १५ एप्रिलपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. यानंतर लागवड केल्यास कंदमाशी व कंदकूज यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
  • लागवडीसाठी निरोगी बियाण्याची निवड करावी.
  • मातृकंदापासून बियाण्याचे तुकडे वेगळे करावेत.
  • बियाणे निवडताना कंदाचे वजन २५ ते ५५ ग्रॅमच्या दरम्यान असावे. लांबी २.५ ते ५ सें.मी. असावी. बियाणे सुप्तावस्था संपलेले २ ते ३ डोळे फुगलेले निवडावे.
  • हेक्‍टरी २५ क्विंटल बियाणे लागते. 
  • लागवड करताना कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावा. लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूस असल्यास त्या डोळ्यापासून निपजणारा कोंब मजबूत असतो, त्याची चांगली वाढ होते.
  • जर डोळा खाली आणि आतल्या बाजूला राहिल्यास डोळा लहान आणि कमकुवत राहतो. लागवडीच्या वेळी कंद पूर्ण झाकले जातील याची काळजी घ्यावी.
  • बीजप्रक्रिया : 

  • बीजप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक कीडनाशकाची बीजप्रक्रिया करावी. यासाठी  क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि. किंवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मि.लि. या कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशक आणि कार्बेन्डाझिम (५० टक्के) १५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. २० मिनिटानंतर बियाणे सावलीत सुकवून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  • बियाणे सावलीत सुकविल्यानंतर लागवडीच्या अगोदर ॲझोस्पिरिलम २५ ग्रॅम, तसेच पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून १० ते १५ मिनिटे बियाणे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी.
  • बियाणे प्रक्रियेसाठी १० लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बियाण्यास वापरावे.
  • तणनाशकाचा वापर : 

  • लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी जमीन ओलसर असताना ४ ते ५ ग्रॅम ॲट्राझीन प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • लागवडीनंतर १२ ते १५ दिवसांनी ४ ते ५ मि.लि. ग्लायफोसेट प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
  • उगवण सुरू झाली की, कोणत्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर शक्‍यतो टाळावा.
  • खत व्यवस्थापन : 

  • या पिकासाठी एकूण १६ अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात आवश्‍यकता असते.
  • संतुलित आणि योग्यवेळी प्रमाणशीर खते वापरावीत.
  • हेक्‍टरी १२० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्रा जमीन तयार करतेवेळी द्यावी.
  • नत्र खताचा निम्मा हप्ता आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक महिन्यांनी द्यावा. राहिलेला अर्धा नत्र उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावा. त्या वेळी हेक्‍टरी १.५ ते २ टन करंज पेंड किंवा निंबोळी पेंड द्यावी. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने हेक्‍टरी ३७.५ किलो पालाश दोन वेळा मिसळावे.
  • पाणी व्यवस्थापन :

  • लागवड जास्त पावसाच्या प्रदेशात जिरायती पद्धतीने केली जाते. तर कमी पावसाच्या प्रदेशात पाणी देऊन केली जाते.
  • सुरवातीच्या काळात या पिकास पाणी देणे गरजेचे असते. कारण मुळांना स्थिरता प्राप्त होण्यासाठी आणि चांगला तग धरून राहण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असतो.
  • लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुरानुसार तिसऱ्या-चौथ्या दिवशी लगेच द्यावे.
  • पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • पावसामध्ये १० ते १२ दिवस खंड पडल्यास या पिकास पाणी द्यावे.
  • हिवाळ्यात १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • पाणी व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतींचा वापर करावा.
  • गादीवाफा पद्धतीने लागवड करावी.
  • एका गादीवाफ्यावर एक ठिबक सिंचनाची नळी टाकून दोन लिटर तास पाणी देणाऱ्या तोट्या बसवाव्यात.
  • जमिनीच्या मगदुरानुसार ठिबक सिंचन संच सुरवातीस अर्धा ते पाऊण तास सकाळ-संध्याकाळ आणि त्यानंतर एक ते दीड तास चालवावा.
  • आंतरमशागत :

  • तणनाशकांचा वापर केला नसल्यास वेळच्या वेळी खुरपणी करावी.
  • उटाळणी पीक २.५ ते ३ महिन्याचे असताना करावी. यासाठी लांब दांड्यांच्या खुरप्याने माती हलवली जाते. यामुळे मुळ्या तुटून त्याठिकाणी नवीन तंतूमय मुळे फुटतात. 
  • पिकास पाचव्या ते सहाव्या महिन्यात फुले येतात. त्यास हुरडे बांड असे म्हणतात.
  • उशिरात उशिरा उटाळणी हुरडे बांड येण्यापूर्वी करावी. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या पानांची वाढ थांबून फण्यांची वाढ होण्यास सुरवात होते. उटाळणी केली नाही, तर उत्पादनामध्ये १० ते १५ टक्के घट येते.
  • उटाळणीनंतर पाण्याचा हलका ताण द्यावा, म्हणजे फुटवे चांगले फुटतात.
  • आंतरपिके : 

  • पीक २५ टक्के सावलीच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणात वाढते. हे पीक नारळ, सुपारी, कॉफी इत्यादीच्या बागेमध्ये घेतल्यास उत्पादनात वाढ होते.
  • आल्यामध्ये आंतरपीक म्हणून कोथिंबीर, झेंडू, मिरची, तूर, गवार यांसारखी पिके घेतात. आंतरपिकाची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  • संजीवकांचा वापर : 

  • उत्पादनात वाढ होण्यासाठी आणि तंतूचे प्रमाण कमी करण्यासाठी युरिया व नॅप्थील ॲसेटिक ॲसिडचा वापर ६० आणि ७५ व्या दिवशी शिफारसीप्रमाणे करावा फवारावे.
  • फुटव्याच्या संख्या वाढविण्यासाठी २०० पी.पी.एम. प्रमाणात इथेफॉनच्या ७५ व्या दिवसांपासून १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.
  • कीड नियंत्रण कंदमाशी :

  • माशी डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. अळ्या उघड्या गड्ड्यांमध्ये शिरून त्याच्यावर उपजिविका करतात.
  • नियंत्रण : 

  • क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि.किंवा डायमिथोएट १५ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून जुलै ते ऑगस्टदरम्यान आलटून-पालटून १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.
  • फोरेट (१० टक्के दाणेदार) प्रति  हेक्‍टरी २५ किलो या प्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती पसरावे. पाऊस न पडल्यास लगेच उथळ पाणी द्यावे.
  • याच कीटकनाशकाचे पुढील दोन हप्ते एक महिन्याच्या अंतराने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये द्यावेत.
  • अर्धवट कुजके, सडके बियाणे लागवडीस वापरू नये.
  • जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून द्यावेत.
  • पाने गुंडाळणारी अळी :

  • ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबर दुसऱ्या आठवड्यापर्यंत किडींचा प्रादुर्भाव दिसतो.किडीची अळी हिरवट रंगाची असून, ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या शरीराभोवती पान गुंडाळून घेते. आत राहून पाने खाते.
  • नियंत्रण :

  • गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. डायक्‍लोरव्हाॅस १० मि.लि. किंवा कार्बारील ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • खोड पोखरणारी अळी :

  • जुलै ते ऑक्‍टोबरमध्ये आढळते. अळी छोट्या खोडाला छिद्र करून उपजीविका करते, त्यामुळे खोड पिवळे पडून वाळण्यास सुरवात होते. अळीने पडलेल्या छिद्रावर जाळीदार भाग दिसतो.
  • एक महिन्याच्या अंतराने १० मि.लि. मॅलेथिऑन प्रति लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.
  • सूत्रकृमी :

  • मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात. यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशींचा सहज प्रादुर्भाव होतो.
  • लागवडीच्या वेळी प्रति हेक्‍टरी पाच किलो ट्रायकोडर्मा प्लस शेणखत मिसळून द्यावे.
  • प्रति हेक्‍टरी फोरेट (१० जी) २५ किलो याप्रमाणात जमिनीत मिसळून द्यावे किंवा १८ ते २० क्विंटल निंबोळी पेंड जमिनीत मिसळून द्यावी.
  • रोगनियंत्रण 

    कंदकूज (गड्डे कुजव्या) :

  • हा रोग ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये दिसतो.
  • प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात.
  • खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो.
  • हा रोग प्रामुख्याने सूत्रकृमी किंवा खुरपणी, आंतरमशागत करताना कंदास इजा झाल्यास त्यातून पिथियम, फ्युजेरियम यासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये प्रादुर्भाव होऊन कंद कुजण्यास सुरवात होते.
  • लागवड करताना निरोगी बियाण्याचा वापर करावा. हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. पावसाळ्यात शेतामध्ये चर घेऊन पाण्याचा निचरा करावा.
  • मेटॅलॅक्‍झिल (८ टक्के) + मॅन्कोझेब (६४ टक्के)  हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रतिलिटर किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) एक ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बीजप्रक्रिया करावी.
  • शेतामध्ये हा रोग आढळून आल्यास याच बुरशीनाशकांची आलटून - पालटून फवारणी करावी. लागवडीच्यावेळी प्रतिहेक्‍टरी पाच किलो ट्रायकोडर्मा प्लस शेणखतातून मिसळून द्यावे.
  • पानावरील ठिपके :

  • रोगाची सुरवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानांवर पसरतो. पानावर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात.
  • २५ ते ३० ग्रॅम मॅंन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा एक टक्का बोर्डो मिश्रण तयार करून फवारणी करावी.  हवामान परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.
  • काढणी आणि उत्पादन :

  • पीक ७५ टक्के परिपक्व झाल्यानंतर काढणी करता येते.
  • हिरवे आले म्हणून वापरावयाचे असल्यास पिकाची काढणी सहा महिन्यांनी करावी.
  • विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागवडीनंतर आठ महिन्यांनंतर पुढे काढणी करावी.
  • शक्‍यतो बाजारातील मागणीप्रमाणे काढणी करावी.
  • गड्डे बाहेर काढताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पाला कापून गड्डे, बोटे (नवीन आले) काढणीनंतर वेगळे करावीत.
  • काढणीनंतर कंद स्वच्छ धुवून मातीपासून वेगळे करावेत. त्यानंतर बाजारात पाठवावेत.  
  • उत्पादन :   प्रतिहेक्‍टरी ओल्या आल्याचे सरासरी उत्पादन १५ ते २३ टन.
  • द्विहंगामी पीक : 

  • उत्तम निचऱ्याची जमीन असेल, तर आले १४ ते १६ महिने जमिनीमध्ये ठेवून  द्विहंगामी पीक घेता येते.
  • याचे उत्पादन पहिल्या वर्षीपेक्षा दीडपट ते दुप्पट मिळते. पाने सुकल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पिकास पाणी द्यावे.
  • साधारणतः अडीच ते तीन महिन्यांनंतर पुन्हा नवीन फुटवे फुटू लागतात.
  • बियाण्यांची साठवण :

  • काढणीनंतर असणाऱ्या जाड मुळ्या तोडून सावलीत हवेशीर ठिकाणी बियाणे रचून साठवण करावी.
  • काढणीनंतर निवडलेल्या गड्डे बियाणे २० मि.लि. क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) आणि १५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्यात १० ते १५ मिनिटे बुडवावे. त्यानंतर ते सावलीत सुकवावे.
  • प्रक्रिया केलेल्या बियाण्याची साठवण चर खणून किंवा खड्ड्यात केली असता उगवण क्षमता चांगली राहते.
  • बियाण्याच्या गरजेनुसार सावलीत आवश्‍यक तेवढ्या लांबी-रूंदीचा व एक मीटर खोलीचा खड्डा काढावा.
  • खड्डा खोदताना त्या जमिनीतील पाण्याची पातळी एक मीटरपेक्षा खोल आहे याची खात्री करावी.
  • खड्ड्याच्या तळाला एक इंच जाडीचा वाळूचा थर टाकावा.
  • खड्ड्याच्या तळाला व कडेला लाकडाचा भुसा, पालापाचोळा, वाळलेले गवत टाकावे. अशा खड्ड्यामध्ये बियाण्यांची साठवण करावी.
  • खड्ड्याच्या तोंडावर लाकडी फळीचे झाकण ठेवावे. त्यास हवेसाठी छिद्र ठेवावे.
  • खड्ड्यातील आले व फळी यामध्ये थोडे अंतर सोडावे. त्यामुळे खड्ड्यात हवा खेळती राहते. अशा प्रकारे साठविलेल्या बियाण्यांची उगवणक्षमता चांगली राहते.
  • पत्रा, सिमेंट अगर कौलारू छप्पर असलेली बंद खोली बियाणे साठवण्यासाठी वापरू नये. अडीच ते तीन महिन्यांत आल्याच्या कंदाचे डोळे फुगून बारीक कोंब येतात. असे कोंब असलेले आले बियाण्यांसाठी वापरावे.
  • बियाण्यांच्या वजनामध्ये २५ ते ३० टक्के घट येते.
  • वाळलेले आले, सुंठ आणि पावडर : 

  • वाळलेले आले किंवा सुंठ तयार करण्यासाठी वापरावयाचे आले हे पीक परिपक्व झाल्यानंतरच काढणी करावी. ते पूर्ण वाढलेले निरोगी असावे. कुजके, सडलेले, अपरिपक्व आले सुंठीसाठी वापरू नये. आले अधिक तंतूमय असू नये.
  • सुंठ तयार करण्यासाठी जमेका, चायना, रिओ-डी-जानेरो, माहीम यांसारख्या कमी तंतूमय असणाऱ्या जातींचा वापर करावा.
  • वाळलेले आले प्रथम आले चांगले स्वच्छ धुवून घ्यावे. ते मूळविरहीत असावे.
  • स्वच्छ पाण्यामध्ये एक रात्रभर भिजवून ठेवावे.
  • दुसऱ्या दिवशी त्याच्यावरील साल बांबूच्या टोकदार कडाने चिवट्याने खरडून काढावी.
  • स्वच्छ पाण्यात आले धुवून काढावे. साल काढलेले आले ७ ते ८ दिवस उन्हात चांगले वाळवावे. वाळवताना एक ते दीड इंचापेक्षा जाड थर देऊ नये.
  • आले सुकविण्यासाठी स्वच्छ प्लॅस्टिकचा किंवा ताडपत्रीचा वापर करावा.
  • वाळविताना वरचेवर आल्यामध्ये हात फिरवावा.
  • सायंकाळी पसरलेले आले गोळा न करता ताडपत्रीने झाकून घ्यावे, म्हणजे धुक्‍याने काळपट पडत नाही.
  • पाण्याचा अंश आठ ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत कमी आल्यानंतर आले पूर्ण वाळले असे समजावे. पूर्ण वाळल्यानंतर आले परत एकदा हाताने चोळून घ्यावे. अशा पद्धतीने तयार केलेल्या आल्यास वाळवलेले आले किंवा चुन्याची प्रक्रिया न केलेले आले असे म्हणतात. वाळलेले आले थंड आणि कोरड्या जागेत साठवावे.
  • वाळलेल्या आल्याचे उत्पादन ओल्या आल्याच्या २० ते २५ टक्के इतके असते. हे उत्पादन आल्याच्या वाणानुसार बदलते.
  • सुंठ  :  सुंठ तयार करण्याची मलबार पद्धती : 

  • प्रथम आले स्वच्छ निवडून ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवावे.
  • त्यानंतर त्याची साल काढून घ्यावी. साल काढलेले आले दोन टक्के चुन्याच्या द्रावणात  ६ ते ७ तास भिजत ठेवावे.
  • हे आले छोट्या बंद खोलीत पसरून ठेवून आल्याच्या कंदाला १२ तास गंधकाची धुरी द्यावी. (एक किलो कंदाला ६ ते १० ग्रॅम या प्रमाणात गंधकाची धुरी द्यावी.)
  • कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवावेत. परत १२ तास गंधकाची धुरी द्यावी.  अशा प्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी. त्यामुळे आल्याच्या कंदास पांढराशुभ्र रंग येतो.
  • प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये पाण्याचा अंश ८ ते १० टक्के राहेपर्यंत वाळवावे. गोणपाटामध्ये घालून स्वच्छ करावे.
  • हे आले सुंठ म्हणून बाजारात विकले जाते.
  • सुंठ तयार करण्याची सोडा खार मिश्रण पद्धती : 

  • सर्वप्रथम स्वच्छ आले निवडून ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढावी.
  • त्यानंतर हाताने उचलेल इतक्‍या क्षमतेच्या १.५ × २ फूट आकाराचा गॅल्व्हनाईज जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे.
  • तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडियम हायड्रॉक्‍साइड याची २० टक्के, २५ टक्के आणि ५० टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणामध्ये कंदाने भरलेला पिंजरा २० टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, २५ टक्के द्रावणामध्ये एक मिनिट आणि ५० टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनिट धरावा.
  • त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ॲसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. त्यानंतर आले चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळवावे.
  • चांगले वाळविल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते.
  • पद्धतीने तयार केलेल्या सुंठेला परदेशात चांगली मागणी आहे.
  • पावडर : 

  • चांगले वाळलेल्या आल्याची बारीक पावडर तयार करावी.
  • ही पावडर ५० ते ६० मेशच्या चाळणीमधून चाळावी. त्यानंतर पावडर हवाबंद प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरावी.
  • पावडरीचा उपयोग ओलिओरेझिन, तसेच तिखट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.
  • आले पिकाचा आढावा : 

  • जगाच्या २२ टक्के उत्पादन भारतात, ७८ टक्के इतर देशांमध्ये उत्पादन.
  • चीन, नेपाळ, इंडोनेशिया, जमैका, नायजेरिया, सीरिया, थायलंड, जपानमध्ये आले लागवडीचे क्षेत्र.
  • देशातील ८० टक्के आले लागवड क्षेत्र दक्षिणेकडील राज्यात.
  • देशातील उत्पादनाच्या १२ टक्के निर्यात. ८८ टक्के उत्पादनाचा वापर देशामध्ये.
  • राज्यात आले लागवडीखालील क्षेत्र अत्यंत कमी; परंतु अनुकूल हवामान आणि जमीन पाहता लागवडीस मोठा वाव.
  • देशाच्या उत्पादकतेपेक्षा राज्याची उत्पादकता कमी, त्यामुळे उत्पादकता वाढवण्यास वाव.
  • सातारा, औरंगाबाद, पुणे, रायगड जिल्ह्यांमध्ये लागवड.
  • - डॉ. जितेंद्र कदम  संपर्क : ०२३३-२४३७२७५,२४३७२८८ (लेखक हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज,                 जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी आहेत)                    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com