हरभरा कीड - रोग नियंत्रण

हरभरा कीड - रोग नियंत्रण
हरभरा कीड - रोग नियंत्रण

घाटेअळी :

  • ही अळी अमेरीकन बोंड अळी, हिरवी बोंड अळी, हरभऱ्यावरील घाटे अळी व तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी अशा विविध नावांनी ओळखली जाते.
  • पूर्ण विकसित घाटे अळी पोपटी रंगाची (यात विविध रंगछटा सुद्धा आढळतात) व शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात.
  • नुकसान : लहान अळ्या सुरवातीस पानावरील आवरण खरडून खातात. अशी पाने काही अंशी जाळीदार व भुरकट पांढरी पडलेली दिसतात. विकसित घाटे अळी कळ्या व फुले कुरतडून खातात. पूर्ण वाढ झालेली अवस्था तोंडाकडील भाग घाट्यात घालून आतील दाणे फस्त करते. 

    घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण :  

  • उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी करावी. त्यामुळे किडींचे कोष पक्षी वेचून खातात, तसेच उन्हामुळे मरतात.
  • वाणनिहाय शिफारशीत अंतरावर पेरणी करावी.
  • घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये ल्युरचा वापर करावा. शेतात हेक्‍टरी ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी.
  • शेतात दरहेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. पक्ष्यांमुळे अळ्यांची संख्या कमी होण्यास मदत होते.
  • घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी.
  • वनस्पतिजन्य कीटकनाशके :

  • सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे.
  • जैविक व्यवस्थापन : 

  • घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. 
  • रासायनिक नियंत्रण :

  • हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनासाठी क्लोरअँट्रानिलीप्रोल (२० एससी) २.५ मिली किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
  • गोनोसेफॅलम भुंगा :

  • भुंग्याचा रंग काळपट, भुरकट असतो. किडीची मादी जमिनीत अंडी घालते. अळी अवस्था जमिनीत राहते. प्रौढ जमिनीच्या वरच्या थरात फटीत राहतात. भुंगे दिवसा सहसासहजी दिसत नाहीत. 
  • प्रौढ भुंगे जमिनीत राहून बियांचा अंकुर खातात. उगवण झालेली रोपे जमिनीलगत कापून पडल्याप्रमाणे दिसतात. 
  • नियंत्रण : 

  • प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रॅम क्‍लोथियानिडीन (५० डब्ल्यूडीजी) प्रक्रिया करावी.
  • पेरणीच्या वेळी फोरेट (१० जी) १० किलो प्रतिहेक्‍टरी जमिनीत मिसळावे. 
  • पीक उगवणीनंतर २० दिवसांनी क्‍लोरपायरिफॉस (२० इसी) २० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • लष्करी अळी (स्पोडोप्टेरा) : 

  • प्रौढ पतंग मध्यम आकाराचा असतो. अंडी फिकट रंगाची गोलाकार असतात. अंडी पानावर किंवा फांदीवर सरासरी १५० च्या समूहामध्ये दिली जातात. 
  • अळी पानावर आणि घाट्यावर प्रादुर्भाव करते.
  • नियंत्रण :

    रोप कुरतडणारी अळी (कटवर्म) : 

  • अळी दिवसा जमिनीत लपते. रात्रीच्या वेळी लहान रोप जमिनीलगत कापते.
  • पाने पोखरणारी अळी :

  • प्रौढ पतंग चकाकणारे, गडद रंगाचे असतात. मादी पानावर अंडी घालते.  अळी पिवळ्या रंगाची असते.
  • अळी पानामध्ये शिरून आतील हरितद्रव्य खाते. यामुळे पानाच्या वरच्या बाजूस नागमोडी आकाराच्या रेषा दिसतात.
  • प्रादुर्भाव दिसताच डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • मावा :

  • प्रौढावस्था ही चमकदार काळ्या रंगाची असते. बऱ्याच वेळा पंखधारी असते.
  • फांद्या, फुले शेंगावर कीड वसाहत करून राहते. 
  • प्रादुर्भाव झालेल्या रोपाची पाने आकसतात. अशावेळी पाण्याचा ताण पडल्यास रोपे वाळतात. हरभऱ्यावरील स्टंट रोगाचा प्रसार या किडीमुळे होतो. 
  • रोग नियंत्रण : 

    मर :  हा रोग फ्युजारियम ऑक्‍सिस्पोरम बुरशीमुळे होतो. प्रादुर्भावग्रस्त रोपांची कोवळी पाने आणि फांद्या सुकतात. शेवटी संपूर्ण झाड वाळते. नियंत्रण :

  • मर रोग प्रतिकारक जातीची लागवड करावी. (उदा ः जॅकी-९२१८, विजय, आयसीसीव्ही-१०, विशाल, विराट).  ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
  • कोरडी मूळकूज : 

  • रोगाचा प्रादुर्भाव रायझोक्‍टोनिया बटाटीकोला बुरशीमुळे होतो. रोगग्रस्त रोपांची वरील पाने व देठ पिवळा पडून झुकतात. त्यानंतर पाने गवती रंगाची होतात. मुळे सडतात. रोपे उपटली असता सहज निघून येतात. 
  • ओली मूळकूज : 

  • रोगाचा प्रादुर्भाव फ्युजेरियम सोलेनी बुरशीमुळे होतो. रोपे बुटकी होतात. पाने पिवळी पडून वाढ खुंटते. रोप उपटून पाहिल्यास मुळे कुजलेली दिसतात. सालीवर बुरशीची काळसर वाढ दिसून येते. 
  • थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. रोगग्रस्त झाडांचे अवशेष नष्ट करावेत.
  • संपर्क : डॉ. राहुल वडस्कर : ९९२२९३४९४९            लेखक कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,                 अकोला येथे कार्यरत आहेत

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com