उपयोग मधमाश्‍यांच्या मेणाचा...

व्यावसायिक मधमाशीपालन
व्यावसायिक मधमाशीपालन

मधमाश्‍यांच्या मेणाचा वापर ग्रामीण भागातील महिला कपाळावर कुंकू लावण्यासाठी तसेच तेल बनवण्यासाठी करतात. आजच्या पिढीला मधमाशीच्या पोळ्यातील मेणाचे उपयोग फार कमी प्रमाणात माहिती आहेत. मधमाश्‍या आणि मध हे सगळ्यांना माहित आहेच. मधमाश्‍यांपासून मिळणाऱ्या पदार्थांचा जर पिरॅमिड केला तर त्याचा तळाला मधमाश्‍यांपासून मिळणारा मध असेल, आणि त्याची किंमत ही समजा एक रुपया असेल तर पिरॅमिडच्या सगळ्यात वरती असणाऱ्या टोकाच्या पदार्थाची किंमत एक लाख असेल. याचा अर्थ असा, की मधमाश्‍यांपासून फक्त मधच नाही तर मधापेक्षा अनेक गुणांनी संपन्न आणि मानवी शरीरासाठी उपयुक्त असे पदार्थ मिळतात. याच पदार्थांची ओळख आपण पुढील भागातून करून घेणार आहोत. 

मेणाची निर्मिती : मेण हा मधमाश्‍यांपासून मिळणारा महत्त्वाचा पदार्थ. मधापेक्षा या मेणाला बाजारात खूप मागणी आहे. हे मेण मधमाशा तयार करतात. ऐकून अचंबित झालात ना. पण हे खरे आहे, मधमाश्‍याच त्यांच्या पोळ्याचे मेण स्वतः तयार करतात. मधमाश्‍यांच्या पोटाखाली शरीरावर मेण ग्रंथी असतात. विशिष्ट वयाच्या मधमाशा या मेणग्रंथीपासून मेणाची निर्मिती करतात. शास्त्रीयदृष्ट्या मेण हा मधाचं शरीरक्रियांसाठी अन्नरुपाने पचन झाल्यावर मागे उरणारा टाकाऊ पदार्थ होय. मधमाश्‍यांनी कष्टपूर्वक संकलित करून खाल्लेल्या १० किलो मधापासून एक किलो मेणाचे उत्सर्जन होते. यावरून आपल्याला एक किलो मेणाच्या किमतीचा अंदाज येईल. \

मेणनिर्मिती हा पूरक उद्योग : ग्रामीण भागात पूरक उद्योग म्हणून मधमाशीपालन अत्यंत उपयुक्त ठरते. भारतात आता पाळीव मधमाशीपालन करणारे मधमाशीपालक मधासोबतच मेण निर्मितीचा व्यवसाय देखील योजनापूर्वक करत आहेत. आदिवासी बांधव देखील आग्या मधमाशी, फुलोरी मधमाशी यांच्यापासून मध संकलन करतात. मधासोबत त्यांना मेणापासून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत आहे. बाजारात विकले जाणारे मेण आणि मध यांचा प्रमुख स्रोत हा भटक्‍या जातीच्या मधमाश्‍यांपासूनच आहे. हे मध आणि मेणावर प्रक्रिया करून शास्त्रशुद्ध तंत्र वापरून त्यांना बाजारात विकण्यासाठी उत्पादन तयार करता येते.

मेण संकलन करण्याच्या पद्धती :

  • आदिवासी लोक मध संकलन करताना पारंपरिक पद्धती आजही वापरत आहेत. या पद्धतीमध्ये मध संकलन करताना मधमाश्‍यांच्या पोळ्याचे समजा तीन तुकडे केले तर एका भागात मध असतो आणि दोन भागांत मधमाश्‍यांची अंडी आणि मध तयार करण्यासाठी कच्चा माल संकलन करून ठेवलेला असतो. मध संकलनानंतर हा भाग ते काढून फेकून देतात. या भागातले मेण संकलित करता येऊ शकते. जंगलात फिरताना बऱ्याच वेळा रिकामी पोळी आपणास दिसतात. अशा पोळ्यांपासून आपण मेण संकलन करू शकतो. 
  • मधपाळ जे मधाच्या व्यवसायासाठी मधमाशांच्या पेट्या सांभाळतात, त्यात देखील ठराविक वेळा नंतर पेट्यांच्या निरीक्षणात बहुतेक वेळा जुनी आणि कीडग्रस्त टाकाऊ पोळी आढळतात. अशा वेळी मधाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता असते. मधपाळ अशा पोळ्यांना काढून टाकतात. अशा जुन्या पोळ्यांपासून देखील शुद्ध मेणाची प्राप्ती करता येते. 
  • वर सांगितलेल्या सर्व प्रकारातून जुन्या पोळ्यांतील मेण संकलन करता येते. यावर योग्य प्रक्रिया करून आपणास शुद्ध मेणाची निर्मिती करता येते. मधमाश्‍यांची जुनी पोळी विशिष्ट प्रकारे उकळत्या पाण्यात टाकावीत. वस्त्रगाळ कापडाने त्यावरील तरंगणारा कचरा काढावा.
  • शुद्ध मेणाचे संकलन करण्याकरिता विशिष्ट दाबयंत्राचा वापर करता येतो. शुद्ध मेणाच्या गुळाच्या ढेपेसारख्या ढेपा वा विटा बनविता येतात. त्यासाठी मेणाला उष्णतेवर पाण्याच्या भांड्यात वितळवून योग्य प्रमाणे साच्यात ओतून घ्यावे लागते. म्हणजे विशिष्ट आकार आपणास मिळतो. 
  • मेणातील पराग वा अन्य घटकांमुळे मेणाला रंग छटा प्राप्त होते. मध संकलनासाठी सूर्याच्या उष्णतेचा वापर करता येतो, यासाठी विशिष्ट यंत्र उपलब्ध आहे.
  • मेणाचा उपयोग :

  • प्राचीन काळापासून भारतात मेणाचा वापर आयुर्वेद तसेच सौंदर्य प्रसाधनांसाठी होत आहे. 
  • जगात सौंदर्य प्रसाधनांच्या निर्मितीमध्ये मेणाचा वापर ७० टक्के होतो. 
  • औषधांचे गोळ्यांचे आवरण बनविताना किंवा पावडर सांधण्यासाठी मेणाचा एक रासायनिक उदासीन घटक म्हणून वापर करतात.
  • रंग, पॉलिश, शाई, वीजविरोधक, पाणी प्रतिकारक, पुतळे निर्मिती, कृत्रिम कवळ्या बनविण्याचे साचे, वस्त्र छपाईसाठी, काडतुसांच्या टोकाचे आवरण अशा अनेक कामांसाठी मेणाचा उपयोग होतो. 
  • मधमाश्‍यांपासून मध संकलन करण्याच्या व्यवसायात मोहळातील नवीन पोळी जलद गतीने मधमाश्‍यांना बांधता यावीत यासाठी मेणपत्रे बनविण्यासाठी मेणाचा उपयोग होतो. यामुळे मधमाश्‍यांचे कष्ट वाचतात, वेळ वाचतो. मधमाश्‍यांच्या संगोपन काळात व मधसंकलन हंगामात कृत्रिम पोळ्यांची निर्मिती उत्पादन वाढीसाठी आवश्‍यक ठरते.
  • मेणाचे गुणधर्म :

  • घनता ०.९ एवढी असते. विलयन बिंदू ६४ अंश सेल्सिअस असतो.
  • मेण बेंझिन, क्‍लोरोफॉर्म अशा रसायनात पूर्णतः विरघळते. 
  • मंद गतीने जळते. मेणबत्त्यांमध्ये उपयुक्त आहे. 
  • मेणात आम्ले, अल्कोहोल व त्यांचे संयुक्त घटक असतात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com