कोबीवर्गीय भाजीपाला पिकांचे महत्त्व

कोबीवर्गीय भाजीपाला पिकांचे महत्त्व
कोबीवर्गीय भाजीपाला पिकांचे महत्त्व

विविध युरोपीय देशांतील एकूण भाजीपाल्यांच्या खपापैकी २० ते ४० टक्के भाज्या कोबीगटात मोडतात. उष्ण कटिबंधातील देशांतही विशेषतः कोबी व फुलकोबी यांची लागवड बऱ्याच मोठ्या प्रमाणात सर्वत्र होत आहे. उष्ण हवामानातही चांगले उत्पादन देणाऱ्या नवीन जातींमुळे या पिकांच्या लागवडीचा हंगाम फक्त हिवाळ्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रात ही पिके जवळपास वर्षभर घेता येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कोबीसारखी भाजी टिकायला आणि वाहतुकीला चांगली असते.  आहाराच्या दृष्टीने या भाज्या उत्कृष्ट आहेत. शिवाय त्या आंतरपीक म्हणूनही घेतल्या जातात. या भाज्यांमध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे,  फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, कॅल्शियम, सोडियम आणि लोह ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. 

कोबीवर्गीय पिकांतील टिप्स :

  • फुलकोबी थंड आणि आर्द्रता हवामानात चांगले येते. निरनिराळ्या तापमानात येणाऱ्या फुलकोबीच्या जातींची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. फुलकोबीच्या यशस्वी लागवडीसाठी त्या त्या हंगामातील जाती त्या त्या हंगामात लावणे आवश्‍यक आहे. या पिकासाठी मध्यम प्रतीची, कसदार व चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते. सहा ते सात सामूपर्यंतच्या मध्यम ते भारी कसदार जमिनीत ही पिके चांगली येतात. जमिनीत हरळी, लव्हाळ्यासारखी कायम राहणारी तणे असू नयेत. या पिकांना भरपूर सेंद्रिय खते असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या गाळाच्या जमिनी चांगल्या मानवतात. या पिकांचे बी बारीक असल्यामुळे गादीवाफ्यावर रोपे तयार करून त्यांची लागवड करावी. लहान आकाराचे गादीवाफे तयार करून त्यावर ओळीत बी पेरावे, तसेच गादीवाफ्यांवर रोपे असताना त्यांची चांगली काळजी घ्यावी. बी नेहमी खात्रीलायक ठिकाणाहून आणावे. 
  • पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. बी लावल्यापासून ४ ते ५ आठवड्यात रोपे लावडीसाठी तयार होतात.
  • महत्त्वाची काळजी :

  • रोपांची लागवड सरी वरंब्यांवर किंवा सपाट वाफ्यामध्ये करावी. प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे. रोप लावताना शेंडा खुडला जाऊ नये किंवा शेंड्याला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नसावी. चांगल्या जोमदार रोपाची लागवड करावी म्हणजे चांगला गड्डा पोसला जाईल व भरपूर उत्पादन मिळेल.
  • कोबीवर्गीय पिकांना शिफारशित खते द्यावीत, तसेच जमिनीची प्रत, हवामान व सुधारित किंवा संकरित जाती यांचा विचार करावा. त्याप्रमाणे खतांच्या मात्रा कमी अधिक होऊ शकतात. 
  • संपूर्ण शेणखत जमिनीच्या पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. स्फुरद व पालाश खतांची पूर्ण मात्रा व निम्मे नत्र लागवडीच्या वेळेस द्यावे. उरलेले निम्मे नत्र लागवडीनंतर एक महिन्याने बांगडी पद्धतीने वरखताच्या रूपाने देऊन लगेच पाणी द्यावे. या पिकांची मुळे उथळ असल्यामुळे मातीची भर द्यावी म्हणजे गड्ड्याच्या ओझ्याने रोपे कोलमडणार नाहीत. 
  • जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गड्डे तयार झाल्यावर पाणी बेताचे द्यावे; अन्यथा गड्डे फुटण्याची शक्‍यता असते. लागवडीनंतर वेळोवेळी तण काढून व खुरपून जमीन भुसभुशीत राखावी. फार खोलवर मशागत करू नये.
  • कोबीवर्गीय पिकांची काढणी करताना विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. ही पिके जातीपरत्वे व हंगामानुसार अडीच ते तीन महिन्यांत तयार होतात. कोबीचा गड्डा तयार झाला म्हणजे तो अंगठ्याने किंवा तळहातांनी दाबल्यास घट्ट लागतो. असे तयार गड्डेच काढावेत. 
  • गड्ड्याचा आकार, वजन, घट्टपणा या बाबी बियांची जात, गुणवत्ता, हवामान, लागवडीचे अंतर, खत, पाणी व्यवस्थापन, मशागत आदी घटकांवर अवलंबून असतात. लवकर येणाऱ्या जातीचा गड्डा लहान असतो, तर उशिरा येणाऱ्या जातीचा गड्डा मोठा असतो. म्हणून त्या त्या जातीचा गड्डा तयार झाल्यावर वेळीच काढावा. 
  • फुलकोबीचे पूर्ण वाढलेले पांढरे गड्डे ताबडतोब काढावेत. काढणी लांबल्यास गड्ड्यांचा रंग पिवळसर होऊन त्यांचा घट्टपणा व आकर्षकपणा नाहीसा होतो. गड्ड्याच्या पृष्ठभागावर तांदूळ पसरल्यासारखा खडबडीतपणा येतो व त्याची प्रत बिघडते. 
  • गड्ड्यांच्या आकाराप्रमाणे प्रतवारी करावी. विक्रीसाठी व्यवस्थित पॅकिंग करून ते बाजारपेठेत पाठवावेत म्हणजे योग्य दर मिळेल. 
  • नवलकोलची काढणी गड्डा साधारणतः ५ ते ७ सें.मी. व्यासाचा झाल्यावर कोवळा असतानाच करावी. काढणीला एक-दोन दिवस जरी उशीर झाला तरी गड्डा जून होऊन त्यात तंतूमय भाग तयार होतो. त्यामुळे वेळीच काढणी करणे फारच महत्त्वाचे आहे.
  • सर्वसाधारण तापमानात कोबीचे गड्डे चार ते पाच दिवस चांगले राहू शकतात. मात्र, २० अंश सेल्सियस तापमानात व ९० ते ९५ टक्के आर्द्रता राखल्यास कोबीचे गड्डे कित्येक आठवड्यापर्यंत चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतात. 
  • फुलकोबीचे गड्डे सर्वसाधारण तापमानात तीन ते चार दिवस साठवून ठेवता येतात. मात्र, कमी तापमानात गड्डे चांगल्या स्थितीत साठवून ठेवता येतात. नवलकोलचा गड्डा सर्वसाधारण तापमानात दोन ते तीन दिवस चांगला राहतो. कमी तापमानात (शीतगृहात) ते जास्त काळ ठेवता येतात.
  • कोबीवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड
    कोबीवर्गीय भाजीचे नाव  बियाण्याचे प्रमाण (ग्रॅम/हे) लागवडीचे अंतर (सें.मी.) शेणखत (टन/हे.) नत्र (किं/हे.) स्फुरद (कि./हे.) पालाश (कि./हे.) उत्पादन क्विंटल/हे.  सुधारीत जाती
    कोबी 600-750  लवकर येणाऱ्या जाती 45x45 किंवा 45x30 मध्यम किंवा उशिरा येणाऱ्या जाती 60x45 किंवा 75x60 20 160  80 80 लवकर येणाऱ्या जाती 300-350  उशिरा येणाऱ्या जाती 350-450 लवकर येणाऱ्या जाती- गोल्डन एकर, प्राईड ऑफ इंडिया, कोपनहेगन मार्केट, पुसा मुक्ता, पुसा सिंथेटिक उशिरा तयार होणाऱ्या जाती- पूसा ड्रम हेड, सप्टेंबर अर्ली, अर्ली ड्रम हेड, के-1, लेअ लार्ज ड्रम हेड.
    फ्लॉवर 600-750 लवकर येणाऱ्या 45x45 उशिरा येणाऱ्या 60x60 20 150 75 75 लवकर येणाऱ्या जाती 150-200, उशिरा येणाऱ्या जाती 200-240

    लवकर येणाऱ्या (हळव्या) जाती (एप्रिल-मे पेरणीचा हंगाम) - पंजाब कुंवारी, अर्ली कुंवारी, फर्स्ट क्रॉप, पूसा दिपाली, अर्ली मार्केट

     मध्यम हंगाम (जून-जुलै) इंप्रुड जापनीज, पंत शुभ्रा, पटना मिडासेशन,  मुख्य हंगाम ( ऑगस्ट- सप्टेंबर) ः पुसा सिंथेटिकपुसा शुभ्रा, हिसार-1  उशिरा येणाऱ्या (गरव्या) जाती (नोव्हेंबर- डिसेंबर)- पुसा स्नोबॉल-1 व 2, के-1, स्नॉबॉल 16.

    नवलकोल 1000-1500 30x20 किंवा 60x20 15 100 50 80 लवकर येणाऱ्या जाती - 200-250  उशिरा येणाऱ्या जाती - 300-400 सुधारीत जाती : लवकर येणाऱ्या जाती- ऑलीव्हाइट व व्हाइट व्हिएन्ना,  उशिरा येणाऱ्या जाती- पर्पल टॉप, पर्पल व्हिएन्ना.
    ब्रोकोली 500 60x45 20 130 20 30 65 ते 70 गणेश ब्रोकोली (ऑक्‍टोबर-नोव्हेंबर)

    पीकसंरक्षण : 

    अ) सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उणिवा वा शरीरदोषांमुळे होणाऱ्या विकृती 

  • व्हिपटेल : फुलकोबीच्या पानाच्या पात्याची नेहमीसारखी वाढ न होता ती अरुंद व खुरटलेली दिसतात. झाडाचा शेंडा खुरटलेला राहतो व गड्डा भरत नाही. मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हा दोष उद्‌भवतो. विशेषतः आम्लीय जमिनीत जिची आम्ल-विम्लता ४.५ पेक्षा कमी आहे तेथे ही विकृती दिसून येते.
  • उपाय : अशा जमिनीत चुना टाकून आम्लता कमी केल्यास रोग आढळत नाही. हेक्‍टरी १.२ किलो अमोनियम किंवा सोडीयम मॉलिब्डेट जमिनीत मिसळल्यास हा दोष आटोक्‍यात येऊ शकतो.
  • ब्राउनिंग (ब्राउन रॉट) :  बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हा दोष होतो. खोडावर व प्लॉवरच्या गड्ड्यावर कुजकट व भुरकट रंगाचे डाग दिसतात.
  • उपाय ः बोरॅक्‍स पावडर (सोडीयम टेट्रा बोरेट) हेक्‍टरी १० ते १५ किलो जमिनीत पसरून दिल्यास हा दोष आटोक्‍यात येतो.
  • बटनिंग : फुलकोबीमध्ये नेहमीसारखा गड्डा न धरता बटणासारखा अगदी छोटा गड्डा तयार होतो. पानांची वाढही खुंटलेली दिसते. हा दोष मुख्यतः नत्राच्या कमतरतेमुळे होतो, तसेच लवकर येणाऱ्या जाती उशिरा लावल्यामुळे गड्डा न भरता लहान राहतो.
  • उपाय ः नत्रयुक्त खतांचा योग्य पुरवठा करणे आणि हंगामाप्रमाणे योग्य जातींची लागवड करणे.
  • रायसीनेस :  हा दोष फुलकोबीचा गड्डा वेळीच न काढल्यामुळे दिसून येतो. काही प्रमाणात हा आनुवांशिक दोष समजला जातो. फुलकोबीचा पृष्ठभाग एकसमान न दिसता खडबडीत आणि सुटा दिसतो. तापमानात एकदम होणाऱ्या चढ-उतारामुळेही हा दोष उद्‌भवतो.
  • उपाय :  काढणी वेळेवर करावी. शुद्ध व खात्रीलायक बियाणे वापरावे. प्रतिकारक जाती (उदा. पुसा शुभ्रा) लावाव्यात.
  • कोबीवर्गीय भाज्यांवर आढळणारे रोग व उपाययोजना :

  • रोपे कोलमडणे : या रोगामुळे रोपे जमिनीलगतच्या भागात कुजून अचानक कोलमडतात. हा रोग बुरशीमुळे होतो. हा रोग आटोक्‍यात आणण्यासाठी वाफ्यातून कॅप्टन बुरशीनाशकाचे ०.१ टक्के द्रावण झारीने शिंपडावे. पेरणीपूर्वी बियांना थायरम किंवा कॅप्टन तीन ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम एक ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियांना चोळावे.
  • घाण्या रोग (ब्लॅक रॉट) :  या रोगामुळे पाने पिवळी पडतात आणि पानांच्या शिरा काळ्या होतात. खोडाचा आतील भाग काळपट पडतो. रोगाचा प्रसार रोगग्रस्त बी आणि जमिनीद्वारे होतो.
  • रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बी ५० सेल्सियस तपामानाच्या कोमट पाण्यात ३० मिनिटे बुडवून घ्यावे व सुकवावे. त्यानंतर ते रोपवाटिकेत पेरावे. रोगप्रतिकारक जाती लावाव्यात. रोगाची लक्षणे दिसताच झाडाच्या खालील पाने काढून नष्ट करावीत. कॉपर ऑक्‍झीक्‍लोराइड ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन एक ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून दर १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
  • पानावरील ठिपके आणि करपा : हे रोगही कोबीवर्गीय पिकावर येतात. यांच्या नियंत्रणासाठी शक्‍यतो पिकाची फेरपालट करावी. एकच पीक त्याच त्याच जमिनीत घेऊ नये. रोगप्रतिकारक जाती लावाव्यात. पेरणीपूर्वी  बीजप्रक्रिया करावी (कोमट पाण्यात बी बुडवून काढून लावणे किंवा बियांना शिफारस केलेले रसायन चोळणे) किंवा थायरम अडीच ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे. रोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच मॅंकोझेब किंवा कॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड किंवा क्‍लोरोथॅलोनील २५ ग्रॅम अधिक स्टिकर १० मिली प्रति १० लि. पाण्यातून फवारावे.
  • किडी व उपाययोजना : 

    कोबीवर्गीय पिंकावर प्रामुख्याने खालील किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. काळी माशी किंवा मस्टर्ड सॉ फ्लाय- ही एक प्रकारची माशी असून ती पानांच्या पेशीत अंडी घालते. अंड्यातून निघालेली काळ्या रंगाची अळी, कोवळ्या रोपांची पाने खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पाने खाऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. 

    नियंत्रण- दर पंधरा दिवसाच्या अंतराने मॅलॅथिऑन (५० ईसी) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किडीच्या तीव्रतेनुसार फवारणीचे अंतर कमी जास्त होऊ शकते.

    मावा : हिरव्या किंवा काळ्या रंगाचे हे बारीक किडे कोवळ्या पानांतील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात. नियंत्रण :   मॅलॅथिऑन (५० इसी) २० मि.ली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास ही कीड आटोक्‍यात येते. दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

    चौकोनी ठिपक्‍याचा पतंग (डायमंड बॅक मॉथ) :  या किडीची अळी पानाच्या खालच्या बाजूस राहून पानाला छिद्रे पाडून पानातील हरितद्रव्य खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास ही कीड पाने खाऊन त्यांची चाळण करते. पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात. ही कीड सप्टेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत कार्यक्षम असते. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मीक नियंत्रण व्यवस्थापन करावे लागते. ते असे. 

  • लागवडीपूर्वी मुख्य पिकात आणि कडेने मोहरी पेरावी. मुख्य पिकाच्या २५ ओळींनंतर दोन ओळी मोहरी पेरावी.
  • शेतात पक्षांना बसण्यासाठी काठीचे मचाण लावावेत.
  • एकरी पाच फेरोमोन सापळे लावावेत.
  • मोहरीवर अळ्या दिसू लागताच डायक्‍लोरव्हॉस १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून पहिली फवारणी करावी.
  • कोबी वा फुलकोबी पिकावर दोन अळ्या प्रतिरोप दिसू लागताच पहिली फवारणी बॅसेलिस थुरींनजिऐंसीस जीवाणूवर आधारित कीटकनाशकाची (बीटी) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळी करावी. 
  • ट्रायकोग्रामा बॅक्‍ट्री मित्रकीटक प्रति हेक्‍टरी एक लाख या प्रमाणात सोडावेत.
  • दुसरी फवारणी निंबोळी अर्क ४ टक्के या प्रमाणात करावी.
  • तिसरी फवारणी इंडोक्‍झाकार्ब १० मिली किंवा स्पिनोसॅड (२.५ एससी) १० मिली प्रति १० लिटर पाण्यातून करावी. 
  • चौथी फवारणी निंबोळी अर्क ४ टक्के या प्रमाणात करावी.
  • - डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. कैलास शिंदे,  डॉ. मधुकर भालेकर, डॉ. भरत पाटील संपर्क : ०२४२६- २४३३४२

    (लेखक उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com