अर्थसंकल्प समजून घेताना..

अर्थसंकल्प समजून घेताना..
अर्थसंकल्प समजून घेताना..

अर्थसंकल्प म्हणजे सरकारने आगामी आर्थिक वर्षातील अंदाजित एकूण महसूल आणि खर्च यांची तपशीलवार माहिती देणारे विवरणपत्र. येत्‍या ९ मार्च रोजी राज्‍याचे अर्थमंत्री अर्थसंकल्‍प सादर करणार आहेत. त्‍या निमित्ताने अर्थसंकल्‍पाची ही ओळख...

अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत Budget हा शब्द प्रचलित आहे. Budget हा शब्द bougette (पर्स) या फ्रेंच शब्दापासून तयार झाला. भारतीय राज्यघटनेत मात्र ‘अर्थसंकल्प’ या शब्दाऐवजी वार्षिक वित्तीय विवरण (Annual Financial Statement) असा उल्लेख केला जातो. घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून वेळोवेळी जी आर्थिक आणि सामाजिक विकासाची लक्ष्ये निर्धारित केली जातात, ती प्राप्त करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात.

  •  अर्थसंकल्प म्हणजे सरकारने आगामी आर्थिक वर्षातील अंदाजित एकूण महसूल आणि खर्च यांची तपशिलवार माहिती देणारे विवरणपत्र. सरकारचे आर्थिक धोरण कसे असावे, याबाबत भारतीय राज्यघटनेतील ३९, ३९, ४१, ४५, १६ व ४७ नवी कलमे मार्गदर्शन करतात. 
  •  सरकारी उत्पन्न खर्चाचा ताळेबंद दर्शविणारा अर्थसंकल्प राज्यघटनेच्या कलम ११२ नुसार तयार करून संसदेला सादर करण्याची केंद्र शासनाची जबाबदारी असते.
  •  कोणत्याही वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारी जमा-खर्चाच्या तीन वर्षाचे आकडे दिलेले असतात.यामध्ये गेल्या वित्तीय वर्षाचे प्रत्यक्ष आकडे, चालू वित्तीय वर्षाचे अर्थसंकल्पीय व संशोधित अंदाज, पुढील वित्तीय वर्षाचा अर्थसंकल्पीय अंदाज दिलेला असतो.
  •  अर्थसंकल्पाच्या निर्मितीत अर्थमंत्रालय, विविध प्रशासकीय कार्यालये, नियोजन मंडळ, महालेखापाल या प्रमुख घटकांचा सहभाग असतो. अर्थसंकल्पाचे काम वित्तमंत्रालयाकडे असते. वित्त मंत्रालयाचा  महसूल विभाग, खर्च विभाग, आर्थिक व्यवहार विभाग हे तीन विभाग यामध्ये सहभागी असतात. आर्थिक व्यवहार विभागातील ‘अर्थसंकल्प विभाग’ हा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम करतो.
  • अर्थसंकल्पातील विशिष्ट बाबी 

  • रोख तत्त्व (Cash Basis) ः अर्थसंकल्प रोख तत्त्वावर तयार केला जातो. आर्थिक संकल्पीय वर्षात जमा तसेच खर्च होऊ शकणाऱ्या प्रत्यक्ष रकमांचे आराखडे बांधले जातात.
  • व्यपगत तत्त्व ( Rule of Lapse) ः मंजूर असलेला खर्च आर्थिक वर्ष संपण्याच्या आतच करावा लागतो. ३१ मार्चनंतर खर्च न झालेला निधी व्यपगत म्हणजेच वाया गेला असे समजले जाते. यातली एकही रक्कम पुढील वर्षातल्या खर्चासाठी वापरता येत नाही.
  • वास्तविक अंदाज (Realistic Estimation) ः मंत्रालये व सरकारी विभागांनी नेमका किती खर्च होणे अंदाजित आहे ते मांडावे लागते. अंदाज हे ढोबळ वास्तविक असावे लागतात. कारण एखाद्या विभागाने जास्तीचा अर्थव्यवहार्य अंदाज मांडणे म्हणजे दुसऱ्या विभागांचा खर्च हिसकावून घेण्यासारखा आहे.
  • ढोबळ व निव्वळ तत्त्व ( Gross and Net Basis) ः विविध मंत्रालये व विभागांच्या जमा व खर्चाचे आकडे हे ढोबळ व निव्वळ अशा दोन्ही पद्धतींनी मांडलेले असतात.
  • अंदाज प्रपत्रे व लेख्यांची समान रचना  ः जमाखर्च, लेखे व लेखापरीक्षण सुलभ होण्यासाठी रचनेप्रमाणेच संसदीय अर्थसंकल्प अंदाजप्रपत्रांची रचना ठेवली जाते.
  • विभागवार खर्च अंदाज (Estimates to be on Departmental Basis) ः खर्चाचे अंदाज प्रत्येक विभाग व मंत्रालयागणिक स्वतंत्र तयार केले जातात. कारण अर्थसंकल्प मंजूर करून घेताना विभागवार अनुदानांची मागणी मांडावी लागते. ही प्रक्रिया सुलभ होण्यासाठी विभागवार खर्च अंदाज स्वतंत्र तयार केले जातात.
  • ठळक बाबी 

  • आर्थिक वर्षात शासनाकडे जमा होणाऱ्या रकमेला अर्थसंकल्पीय जमा आणि खर्चाला अर्थसंकल्पीय खर्च असे म्हणतात.
  • अर्थसंकल्पीय जमा (Budgetary Receipt) ः वार्षिक वित्तीय विवरणात जी जमा दाखविलेली असते तिचे स्वतंत्र स्पष्टीकरण ‘जमेचा अर्थसंकल्प (Receipt Budget) म्हणून केलेले असते. या स्पष्टीकरणात महसुली जमा, भांडवली जमा, त्यातील बदलता प्रवाह आणि परकीय मदत यांचा समावेश असतो.
  • जमेच्या अर्थसंकल्पाचे  भाग ः

  •  महसुली जमा ( Revenue Receipt) ः कर व करेत्तर उत्पन्न.
  •  भांडवली जमा ( Capital Reciept) ः  यामध्ये शासनाने उभारलेली कर्जे, परकीय कर्जे, लघुबचत, भविष्यनिर्वाह निधी, राज्यांना व इतर देशांना दिलेल्या कर्जाची परतफेड इत्यादी बाबींचा समावेश असतो.
  •  अर्थसंकल्पीय खर्च ( Budgetary Expenditure) ः वार्षिक वित्तीय विवरणात जो खर्च दाखविलेला असतो, त्याचे स्वतंत्र स्पष्टीकरण (खर्च अर्थसंकल्प) म्हणून केलेले असते. याचे दोन भाग पडतात.
  •  महसुली खर्च ः प्रशासकीय खर्च, सामाजिक सेवांवरील खर्च, वित्तीय सेवांवरील खर्च, संरक्षण खर्च, पेन्शन, अनुदाने.
  •  भांडवली खर्च ः संरक्षणासाठी लागणारी साधनसामग्री दिलेली कर्जे, परकीय देशांना दिलेली कर्जे, सार्वजनिक उद्योगांमधील गुंतवणूक.
  •  शासनाच्या महसुली जमा व महसुली खर्चातील  फरकास महसुली तूट असे म्हणतात. जमेपेक्षा खर्च जास्त असल्यास तूट निर्माण होते, तर खर्चापेक्षा जमा जास्त असल्यास अधिक्‍य निर्माण होते.
  • महसुली तूट = महसुली खर्च - महसुली जमा
  • शासनाच्या भांडवली जमा व भांडवली खर्चातील फरकास  भांडवली तूट असे म्हणतात.
  • भांडवली तूट = भांडवली खर्च - भांडवली जमा
  • महसुली तूट आणि भांडवली तूट एकत्र केल्यास आपल्याला अर्थसंकल्पीय तूट मिळते.
  • अर्थसंकल्पीय तूट = महसुली तूट + भांडवली तूट
  •  राजकोशीय तूट= अर्थसंकल्पीय तूट + कर्ज
  •       १९९६-९७ पासून अर्थसंकल्पीय तूट शून्य दाखवत असल्यामुळे राजकोशीय तूट = कर्ज असे म्हणता येते. म्हणून राजकोशीय तुटीला कर्ज निर्माण करणारी जमा असे म्हणतात.

    संपर्क  ः ०२४२६-२३३२३६ (कृषी अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,  राहुरी, जि. नगर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com