ज्वारी पीक संरक्षण
ज्वारी पीक संरक्षण

Jawar Crop Protection : ज्वारी पीक संरक्षण

किडींचा एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून बंदोबस्त केल्यास    कमीत कमी उत्पादन खर्चात ज्वारीच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ आढळून येते.

  • शेतीची स्वच्छता:  पिकाची काढणी झाल्यावर लगेच पालापाचोळा, ज्वारीचे राहिलेले अवशेष व बांधावरील अन्य झाडे उपटून जाळून नष्ट करावीत.

  • पिकाची फेरपालट:  ज्वारी बरोबर मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांची फेरपालट करावी.

  • वाणांची निवड:  कमीत कमी कालावधीत येणारे ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उगवण शक्ती असणारे, खोडमाशी, खोडकिडा यांना प्रतिकारक्षम वाण निवडावे. उदा. खरीप हंगामाकरिता सी एस एच १६, परभणी साईनाथ, पी व्ही के ८०९, परभणी श्‍वेता तर रब्बी हंगामासाठी आर एस व्ही १००६ परभणी मोती, फुले चित्रा, अकोला क्रांती, मालदांडी.

  • पेरणीची वेळ:  खरीपातील पेरणी समाधानकारक पावसानंतर एका आठवड्याच्या आत करावी. बीजप्रक्रिया करावी.

  • मित्रकिटकांचे जतन करणे:  ज्वारीवर प्रामुख्याने ढालकिडा व क्रायसोपर्ला हे परभक्षी कीटक आढळून येतात. ट्रायकोग्रामा हे परोपरीवी कीटक किडींच्या नियंत्रणात मोलाची भूमिका बजावतात. अशा कीटकांचे जतन करावे.  यासाठी ज्वारी पिकाच्या प्रत्येक १० ओळी नंतर किंवा पिकाच्या सभोवताली मका व चवळीच्या काही ओळी पेराव्यात.

  • कीटकनाशकाचा वापर:  कीटकनाशकांचा वापर किडी आर्थिक नुकसान पातळीवर वर असताना करावा.

Jawar Crop Protection
Jawar Crop ProtectionAgrowon
Jawar Crop Protection
Jawar Crop ProtectionAgrowon

टीप :  कीडनाशकांच्या वरील वेळापत्रकात निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन या कीडनाशकाचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. कीडनाशकाचे वरील प्रमाण नॅपसॅक पंपासाठीचे आहे.

 रोगांची ओळख : 

 दाण्यावरील बुरशी (ग्रेन मोल्ड) : 

 रोगाची लक्षणे :  या रोगात बुरशी संक्रमणामुळे दाणे पांढरट किंवा गुलाबी होतात. रोगाला कारणीभूत बुरशीमुळे त्यास काळा रंग योतो.     रोगामुळे होणारे नुकसान :  ज्वारी फुलोरा अवस्थेत अथवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना सतत पाऊस असल्यास खरीप हंगामात दाण्यावरील बुरशी रोगांचा प्रादुर्भाव उदभवतो. यामुळे ज्वारीच्या दाण्याचा रंग बदलतो (पांढऱ्या व करड्या रंगाचा) व जास्त प्रमाणात संसर्ग झाल्यास दाणे काळे पडतात. त्यामुळे दाण्याचे वजन घटते. दाण्याचा आकार लहान होतो. व उत्पादनात १०० टक्‍क्‍यापर्यंत घट होऊ शकते. तसेच दाण्याची उगवणशक्ती कमी होते. बुरशी रोगाची लागण झालेली ज्वारी खाल्ल्यास जनावरांना विषबाधा होते.  

 रोगाचे नियंत्रण :

  1. हमखास पाऊस येण्याच्या काळात परिपक्व होणारे ज्वारीचे वाण पेरणीसाठी वापरू नये.

  2. पीक पावसात सापडून नुकसान होवू नये म्हणून शारीरिकदृष्ट्या पक्वतेच्या १२-१५ दिवस कापणी करावी.

  3. पीक फुलोराअवस्था सुरू असताना कॅप्टन किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. गरजेनुसार १० दिवसांच्या अंतराने पुढील फवारणी करावी.

कणसावरील चिकटा : 

 रोगाची लक्षणे :

  1. कणसाच्या फुलाच्या गुच्छातून मधासारखा चिकट द्रव स्रवून संपूर्ण कणीस काळे पडते. या चिकट द्रव्यामध्ये या रोगाची असंख्य बिजे असतात. या रोगास साखऱ्या असेही म्हणतात.

  2. परागीकरण न केलेले मादी वाण संपूर्णपणे या रोगास बळी पडून दाणे भरण्यावर विपरीत परिणाम होतो.

 रोगाचे नियंत्रण : 

  1. या रोगाच्या नियंत्रणासाठी बांधावरील दुय्यम पोशिंद्या वनस्पती (उदा. बहुवार्षिक गवत) नष्ट कराव्यात.

  2. रोगाचा प्रसार बियाण्यामार्फत होतो. रोगग्रस्त शेतातील बी वापरण्यापूर्वी ३० टक्के मिठाच्या द्रावणातून काढावे (१० लिटर पाणी अधिक ३ किलो मीठ). पाण्यावर तरंगणारे हलके व पोचट, बियाणे काढून टाकावे. नंतर बियाणे स्वच्छ पाण्यात धुऊन, वाळवून पेरणीसाठी वापरावे. किंवा बियाण्यास थायरम (७५ टक्के) या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रीया करावी.

  3. रासायनिक नियंत्रण :  पीक ५० टक्के फुलोरावस्था सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसांच्या अंतराने थायरम २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवाराले. पुढील फवारणी गरजेनुसार करावी.

काणी/ काजळी :

  •  दाणे काणी :  ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याऐवजी तेथे काणीयुक्त दाणे तयार होतात. हे काणीयुक्त पांढरे दाणे टोकास निमुळते असून फोडले असता त्यातून काळी भुकटी पडते. हे बिजाणू बियांवर चिटकून शेतात पोचतात. ज्वारीच्या मुळावाटे  ताटात प्रवेश करतात. 

  •  मोकळी काणी :  यामुळे रोगग्रस्त ताटांमध्ये लवकरच फुलोरावस्था येते. त्यात अनेक फुटवे येतात. कणीस अतिशय मोकळे असून सर्व बीजांडात हा संसर्ग होतो.

  •  लाँग स्मट :  हा कणसावरील फुलकळी अवस्थेस प्रतिबंध करतो. याचा प्रसार मुख्यतः हवेद्वारे होतो. संसर्गित बीजुकाशय पुंज हे मोकळी काणी पेक्षा मोठे आणि रुंद असतात.

  •  हेड स्मट :  यात कणीस अशंतः वा पूर्णतः मोठ्या पांढरट पापुद्य्राने वेष्टीलेले असते. या रोगामुळे ज्वारीचे कणसात दाणे भरण्याऐवजी कणसाचा आकार बदलतो. त्या ठिकाणी काळ्या केसांचा गुच्छ तयार होतो. म्हणून याला शेतकरी ‘काळा गोसावी’ म्हणतात.

रोगाचे नियंत्रण :

पेरणीपूर्वी शिफारसीनुसार बिजप्रक्रिया करावी. किंवा गंधकाची ५ ग्रॅम प्रतिकिलो बिजप्रक्रिया केल्यास हा रोग टाळता येतो.

 खडखड्या रोग :

हा रोग बुरशीमुळे होतो. हलक्‍या जमिनीवरील कोरडवाहू रब्बी ज्वारीचे पीक या रोगास मोठ्या प्रमाणावर बळी पडते. या रोगाची लागण पीक फुलोराअवस्थेत असताना किंवा त्या नंतरच्या काळात ताटाच्या जमिनीलगतच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या कांड्याला होते. रोगग्रस्त कांडे आतून पोकळ होतात. अशा कांड्यांचा उभा छेद घेतला असतामध्ये फक्त काळे धागे आढळून येतात. अशी रोगग्रस्त झाडे वाऱ्यासोबत हलताना ‘खडखड’ असा आवाज करतात, म्हणून या रोगास ‘खडखड्या’ रोग असे म्हणतात. अशा झाडांच्या कणसात दाणे बरोबर भरत नाहीत.  रोगग्रस्त झाडे जनावरांनी खाल्ल्यास त्यांच्या आरोग्यास धोका संभवतो. या रोगामुळे धान्य उत्पादनात तर घट होतेच त्याचबरोबर कडब्याची प्रतसुद्धा खराब होते.   

रोगाचे नियंत्रण: 

  1. पिकांची फेरपालट करावी.

  2. हलक्‍या जमिनीवर जिरायती रब्बी ज्वारी पेरणी करताना खडखड्या रोगास प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा.

  3. पीक फुलोरा अवस्थेत असताना शक्‍य असल्यास पाण्याची एक पाळी घ्यावी.

  4. खताची योग्य मात्रा दिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो.

  5. हमखास खडखड्या रोगाचा प्रादुर्भाव होणाऱ्या भागात स्युडोमोनास क्‍लोरोरॅफिस या जीवाणूजन्य घटकाची बीजप्रक्रिया करावी.

तांबेरा :

  • प्रथमतः चमकणारा जांभळट तांबड्या रंगाचा ठिपका दिसतो. तीव्रता वाढल्यावर पानाचा मोठा भाग व्यापला जातो. तांबेरा रोगास बळी पडणाऱ्या वाणामध्ये पानांच्या खालच्या बाजूवर लहान पुटकुळ्या येतात. त्यामुळे संपूर्ण पानाच्या उती (पेशी) नष्ट होऊन पूर्ण पान नष्ट होऊ शकते.    रोगाचे नियंत्रण : 

  • बुरशीरहित बियाणे वापरावे. पिकाची फेरपालट करावी. पूर्वी या रोगाला बळी पडलेल्या वाणांचे अवशेष नष्ट करावे.

  • पेरणीनंतर एक महिन्याने दहा दिवसांच्या अंतराने मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणे फवारणी करावी.

केवडा रोग/गोसावी :

  • हा बुरशीजन्य रोग असून, या रोगाची बीजे जमिनीवर पडतात व योग्य हवामान असल्यावर ज्वारीच्या रोपाशी संपर्क होऊन रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो.

  • ज्वारीच्या लहान रोपावरच पहिल्यांदा रोग दिसून येतो. अशी रोपे फिक्कट पिवळी पडतात. त्यांची पाने अरुंद असून त्यावर बुरशीच्या थरांचे आच्छादन असते. पानाच्या खालच्या बाजूवर दिसणारी ही पांढरी बुरशी या रोगाची प्रथमावस्था म्हणता येईल. नंतर हंगामाच्या काळात रोपांची वाढ होताना रोगाची तीव्रता वाढते व पानांवर दोन्ही बाजूवर चट्टे दिसू लागतात. रोगाच्या या उत्तरावस्थेत पानाच्या चट्टे

  • पडलेले भागामध्ये चिरण्या पडू लागतात. त्या पुढे काळ्या पडतात. ज्वारीच्या केवडा रोगास हे प्रमुख लक्षण मानले जाते.

  • या वेळीपूर्वीच्या पांढऱ्या चट्ट्यांचा रंग बदलून तपकिरी, गहिरा तांबूस झालेला असतो ही या रोगाची द्वितीयावस्था होय. या अवस्थेस संयुक्त बिजस्थिती असेही म्हणता येईल. ही संयुक्त बीजे पानांच्या शिरांमधील भागात ओळीने बसलेली असतात.

  • या रोगाचा परिणाम झाल्यामुळे ज्वारीची ताटे ठेंगणी होऊन कणसात दाणे भरत नाहीत. अगदी क्वचितच काही वेळा कणसाचे रूपांतर लांब झिपऱ्या असलेला विकृत रूपात होते.

रोगाचे नियंत्रण : 

  1. केवडा प्रतिबंधक ज्वारीच्या वाणांची निवड करावी.

  2. मेटॅलॅक्झील (३५ एसडी) १ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. किंवा पीक उगवणीपासून ७ दिवसांच्या अंतराने, मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी घ्यावी. पुढील फवारणी गरजेनुसार घ्यावी.

 संपर्क : डॉ. हि. वि. काळपांडे, ०२४५२-२२११४८    (लेखक ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक    मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी य़ेथे कार्यरत आहेत)   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com