केसर आंबा सल्ला

आंबा मोहोरावरील भुरी रोगाचा प्रादुर्भाव
आंबा मोहोरावरील भुरी रोगाचा प्रादुर्भाव

मोहोर जोपासना :

  • आंबा पिकात मोहोर येण्यासाठी काडीची परिपक्वता, अन्नघटकांची उपलब्धता, संजीवकांची पातळी हे घटक महत्त्वाचे असतात. मात्र मोहोरनिर्मितीस चालना देण्यासाठी झाडांना शारीरिक ताण आवश्‍यक असतो; म्हणून सद्यःस्थितीत बागेस फुलोरा येऊन फळे बाजरीच्या आकाराची होईपर्यंत पाणी देऊ नये.
  • केसर आंबा उत्पादनामध्ये पालवीचे नियोजन ही महत्त्वाची गोष्ट आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान होते. आंबा झाडास पालवी आल्यावर ती पक्व होऊन मोहोर काडी तयार होणे आवश्‍यक असते.
  • आंबा पिकास मार्च-एप्रिल, जून-जुलै व ऑगस्ट-सप्टेंबर तर काही वेळा जानेवारी-फेब्रुवारीत पालवी येऊन ती १०-११ महिन्यांनी पक्व होऊन मोहोर येण्यासाठी तयार होते. काडीची पक्वता वाढविण्यासाठी पालवीच्या अवस्थेनुसार पोटॅशियम नायट्रेटची १ ते २ टक्का (१० ते २० ग्रॅम प्रतिलिटर पाणी) या प्रमाणात फवारणी फायदेशीर ठरते.
  • सद्यःस्थितीत थंडीची तीव्रता कमी असल्यामुळे आंबा झाडे मोहरण्यास उशीर लागण्याची शक्‍यता आहे. ज्या बागांमध्ये पालवी पोपटी रंगाची असेल, तिच्या पक्वतेसाठी वरीलप्रमाणेच पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी.  
  • या वर्षी पाऊस लांबल्याने पालवी ऑगस्टमध्ये न येता, ऑक्‍टोबरमध्ये वाढलेल्या तापमानामुळे नोव्हेंबर महिन्यात दिसून येत आहे. तिची पक्वता उशिरा होणार असल्याने मोहोर लांबणीवर पडू शकतो.
  • मोहोरावरील कीड-रोग नियंत्रण : 

  • ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात आलेल्या नवीन फुटीवर शेंडा पोखरणारी अळी व मिजमाशी यांचा उपद्रव होऊ शकतो. त्यांचे नियंत्रण करावे. 
  • काही बागांमध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अद्याप मोहोर फुललेला नाही, अशा ठिकाणी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याचे नियंत्रण करावे. 
  • नुकत्याच फुटण्याच्या स्थितीत असणाऱ्या मोहोरावर बोंग्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही अळी मोहरणाऱ्या बोंग्यातील रस शोषून घेते. परिणामी झाड मोहरत नाही म्हणून या अळीचे नियंत्रण करावे. 
  • बऱ्याच वेळा केसर आंबा मोहरत असताना अवकाळी पाऊस होऊन मोहोरावर करपा येऊ शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. 
  • मोहोर फुलण्यापूर्वी किडीचे नियंत्रण करीत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भुरी या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. 
  • पीक संरक्षण :   शेंडा पोखरणारी अळी व मिजमाशी :   नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर - लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. किंवा ब्युप्रोफेझीन (१५ टक्के प्रवाही) २ मि.लि.  मोहोरावरील तुडतुडे :  फवारणी प्रतिलिटर - इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मि.लि.  मोहोरावरील बोंग्या अळी :  फवारणी प्रतिलिटर - क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मि.लि.  मोहोरावरील करपा :  फवारणी प्रतिलिटर - कार्बेन्डाझिम (५० टक्के) १ ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल (७० टक्के) १ ग्रॅम  मोहोरावरील भुरी :  फवारणी प्रतिलिटर - हेक्‍झॉकोनेझोल ०. ५ मि.लि. किंवा विद्राव्य गंधक २ ग्रॅम संपर्क : डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४ (केसर आंबा गुणवत्ता केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com