नियतीला हरवणाऱ्या जिद्दी ज्योतीताईंना सलाम !

नियतीला हरवणाऱ्या जिद्दी ज्योतीताईंना सलाम !
नियतीला हरवणाऱ्या जिद्दी ज्योतीताईंना सलाम !

कुटुंबातल्या तीन कर्त्या पुरुषांनी जीवनयात्रा संपवावी, हे दुःख खरं तर आभाळाएवढं. पण ते पचवून श्रीमती ज्योती संतोष देशमुख (कट्यार, ता. जि. अकोला) हिंमतीने उभ्या राहिल्या. शेतीची आणि संसाराची विस्कटलेली घडी सावरली. ज्योतीताईंनी दिलेली झुंज प्रेरणादायी आहे.  कट्यार (ता. जि. कोला) येथे देशमुख कुटुंबाची २९ एकर वडिलोपार्जित शेती. एकत्र कुटुंब. ज्योतीताईंचे सासरे पुरुषोत्तम देशमुख हे कुटुंबप्रमुख. दोन मुलं, सुना, नातवंडं असं भरल्या गोकुळासारखं घर होतं. परंतु नापिकी, शेतमालाचे कोसळलेले दर, शेतीतला तोटा याला कंटाळून पुरुषोत्तम देशमुख यांनी २००१ मध्ये आत्महत्या केली. पुढे तीन वर्षांनी दीर सुनील यांनीही हाच मार्ग पत्करला. ज्योतीताईंचे पती संतोष यांनी परिस्थिती सावरण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण अखेर त्यांनीही हार मानत २००७ मध्ये आत्महत्या केली. घर अक्षरशः कोलमडून गेलं. पुढे काय, हा प्रश्न या दोघी जावा आणि त्यांची दोन कच्ची-बच्ची यांच्यापुढे फणा काढून उभा राहिला. ज्योतीताईंवर सगळी जबाबदारी येऊन पडली. २९ एकराचा शेतीचा पसारा एकट्या बाईने सावरायचा तरी कसा, हा प्रश्न अवघड होता. पती हयात असताना त्या फारशा कधी शेतात गेलेल्या नव्हत्या. शेतीतल्या कामाचा काहीच अनुभव नव्हता. पण ज्योतीताई डगमगल्या नाहीत. त्यांनी शून्यातून सुरवात केली. अनेक कटू प्रसंग आले. अडथळ्यांना तोंड द्यावं लागलं. त्यावर मात करत त्या एकेक पाऊल पुढं टाकत गेल्या. मजुरांकडूनच शेतीची कामं शिकल्या.  ज्योतीताईंची बहुतांश शेती पाणथळ आहे. पाऊस जास्त झाला की शेतात पाणी साचतं. खारपाण पट्ट्यातली जमीन अाहे. त्यामुळे बागायती शेतीला मर्यादा आहेत आणि कोरडवाहू शेतीत तर उत्पन्न मिळत नाही. हा गुंता सोडवायचा तर पाण्याची चांगली सोय करायला पाहिजे. म्हणून त्यांनी शेततळं खोदलं. नंतर कूपनलिका घेतली. त्याला बऱ्यापैकी गोडं पाणी लागलं. शेतात वीजजोडणीही घेतली. पाइपलाइन केली. त्यामुळं आता २२ एकराला संरक्षित पाण्याची सोय झाली. शेतीतल्या कामांसाठी ट्रॅक्टरही घेतलाय. खरिपात कापूस, सोयाबीन, तूर आणि रब्बीत हरभरा ही पिकं घेतात. या भागात नवीनच असलेल्या कांदा लागवडीचा यशस्वी प्रयोग केला.  ज्योतीताई आता शेतीत चांगल्या रमल्यात. आधुनिक पद्धतीने शेती करतात. नवनवीन प्रयोग करताना मागे हटत नाहीत. बी-बियाणं, खतं, कीटकनाशके स्वतः आणतात. मजुरांकडून शेतीची कामं करून घेतात. स्वतःही मशागतीची बरीच कामं करतात. शेतमाल घेऊन स्वतः बाजार समितीत जातात. बॅंकेचे सगळे व्यवहार बघतात. दररोज सकाळी टू व्हीलरने शेतात जातात. दुपारपर्यंत शेतीतली कामं उरकतात. दुपारनंतर अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यशस्वी शेतकरी म्हणून ज्योतीताईंचा विशेष गौरव केला आहे. कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणा यांनीही त्यांच्या शेतीतल्या प्रगतीची दखल घेतली. ज्योतीताईंच्या कष्टाला फळ मिळू लागलं. परिस्थिती पालटू लागली. देणेकऱ्यांचे पैसे चुकवले. सगळं कर्ज फेडून टाकलं. पूर्वी कौलारू घर होतं. आता दोन खोल्यांचं पक्कं घर बांधलंय. ज्योतीताईंनी मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत अजिबात तडजोड केली नाही. त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. त्यांची धडपड वाया गेली नाही. मुलगा इंजिनियर होऊन आज पुण्यात एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला लागलाय. दिराची मुलगी दहावी पहिल्या वर्गात पास झाली. तिच्या पुढच्या शिक्षणासाठी अकोल्यात सगळी व्यवस्था केली. ती विज्ञान शाखेत शिकतेय. नियतीला हरवणाऱ्या जिद्दी ज्योतीताईंना सलाम ! नियोजनातून उत्पादनवाढ सध्याची पीक परिस्थिती आणि नियोजनाबाबत ज्योती देशमुख म्हणाल्या, की गेल्या दोन हंगामांपासून कमी पाऊस, वाढलेला खंड यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होत अाहे. या वर्षी सर्वाधिक फटका बसला. सोयाबीन एकरी पाच क्विंटल झाले. बोंडअळीमुळे कापूस पिकाला फटका बसला; पण थांबायचे नाही हे मनात ठाम अाहे. सोयाबीननंतर १४ एकरांत हरभरा लागवड केली. या पिकातून खरिपातील तूट भरून निघेल. कर्जाऊ घेतलेल्या ट्रॅक्टरचा सहा महिन्यांतून एकदा हप्ता भरावा लागतो. यावरच अधिक खर्च होत अाहे. ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. अाता हरभरा व इतर पिकांची ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने कापणी, मळणी होईल, अशा यंत्राची चाचपणी करीत अाहे.   ज्योती देशमुख यांची संपूर्ण शेती ही खारपाण पट्ट्यात मोडते. पीक उत्पादन घेताना असंख्य अडचणी येतात. उत्पादन खर्च वाढत असताना त्या तुलनेत उत्पन्न मिळत नाही. ही तूट दूर करण्यासाठी, उत्पादनवाढीसाठी सेंद्रिय पद्धतीचा काही प्रमाणात अवलंब करण्याचा प्रयत्न अाहे. दरवर्षी टप्प्याटप्प्याने शेतात शेणखताचा वापर केला जातो. दरवर्षी दहा ट्रॉली शेणखत शेतात मिसळले जाते. या वर्षी हे प्रमाण तिप्पट करण्याचे त्यांचे नियोजन आहे. खारपाण पट्ट्यातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अाधारित अाहे. पाऊस पुरेसा झाला तर पिके येतात. ज्योती देशमुख यांनी या अडचणीवर मात देण्यासाठी एक कूपनलिका अापल्या शेतात यापूर्वी खोदली. त्याला बऱ्यापैकी पाणीही अाहे. परंतु बारमाही सिंचन करण्यासारखी ही जमीन नसल्याने एक-दोन पाणी देऊन त्या पिके घेतात. भविष्यात या शेतापासून काही अंतरावर असलेल्या पूर्णा नदीपात्रातून पाणीपुरवठा योजना करण्याचे नियोजन आहे.  देशमुख यांनी यंदा १४ एकरांत हरभरा पेरला अाहे. अडीच एकरांत तुरीचे पीक उभे अाहे. दुसरीकडे साडेतीन एकरांत सोयाबीनमध्ये अांतरपीक घेतलेली तूर बहरलेली अाहे. तुरीचा हंगाम लवकरच सुरू होईल. सध्या पीक चांगले असून उत्पादन बऱ्यापैकी येण्याची आशा वाटते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com