शाश्वत शेती, पूरक व्यवसायातून गावांना मिळाली नवी दिशा

महिला शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन.
महिला शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन.

जल, जमीन, जंगल आणि जननी या चार घटकांमुळे मानव समाज निर्माण झाला. त्यांच्यामुळेच तो टिकून आहे. त्यांचे संवर्धन हेच प्रमुख ध्येय ठेवून महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ (एमपीएसएम) ही संस्था १९६४ पासून नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागात कार्यरत आहे. शाश्‍वत शेती, पूरक व्यवसाय, जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि अनौपचारिक कृषी शिक्षणातून संस्थेने गावांमध्ये आश्वासक बदल आणला आहे.  

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर या तालुक्‍यातील आदिवासी शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचं राहणीमान उंचवावे या ध्यासाने महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ (एमपीएसएम) संस्था मागील पन्नास वर्षांपासून शाश्वत ग्राम विकासाच्या कार्यात कार्यरत आहे. महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ संस्थेचे संचालक फादर गॉडफ्रे डिलिमा संस्थेच्या कार्याबाबत म्हणाले की, नाशिक मध्ये १९६४ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक फादर बोरॅंको यांनी या संस्थेची स्थापना केली. साठच्या दशकात नाशिक भागातील आदिवासी शेतकऱ्यांची परिस्थिती आव्हानात्मक होती. आदिवासी भागातील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी सातत्याने स्थलांतर करावे लागत होते. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून त्यांच्या सोबत प्रत्यक्ष काम करायला सुरवात केली. नाशिक व ठाणे जिल्ह्यात काम सुरू झाले. जमिनीचे सपाटीकरण करून ती लागवडीखाली आणणे, सिंचनाची सोय करण्यासाठी मदत करणे यावर सुरवातीला भर दिला. निफाड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी प्रारंभापासूनच चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर या तालुक्‍यात काम वाढत गेले.

  शाश्‍वत शेती विकासावर भर

संस्थेचे प्रकल्प समन्वयक व वरिष्ठ विस्तार अधिकारी पांडुरंग पाटील म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. मात्र उन्हाळ्यात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नसते. या स्थितीत येथील शेतकरी केवळ भाताचे पीक घेतो. उर्वरित काळात तो मजुरीसाठी शहरात स्थलांतर करतो. हे स्थलांतर थांबविण्यासाठी शेती शाश्‍वत उत्पन्न देणारी कशी होईल यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या. नैसर्गिक, सेंद्रिय घटकांचा वापर करून जागेवरच खत तयार करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. यातून शेतकऱ्यांचा खर्च आणि अडवणूक कमी झाली. संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी सीड (सस्टेनेबल एन्व्हायर्नमेंट ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट) हा कार्यक्रम या परिसरात प्रभावीपणे राबविला. बियाणे, खते, उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षणाबरोबरच या परिसरात फळझाडांची लागवड करून त्याचा शेतकऱ्यांना लाभ करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. या अंतर्गत आंबा, काजू, जांभूळ, ऍपल बोर यासारखी फळझाडे आणि कुंपणासाठी साग, बांबू, ग्लिरिसिडीया ही वनशेतीतील झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. नैसर्गिक, सेंद्रिय शेती करण्यासाठी कडुनिंबाचा पाला, दशपर्णी अर्क, जीवामृत यांच्या वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले. मागील काही वर्षात शेतकऱ्यांना स्थानिक भागात रोजगार उपलब्ध होण्यासाठी आम्ही अनेक उपक्रम घेतले आहेत. त्यातून शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर  कमी होऊ लागले आहे.

  आधुनिक शेतीसाठी सर्वतोपरी साह्य

आदिवासी शेतकऱ्यांकडे आधुनिक शेतीसाठी लागणारं भांडवल उपलब्ध नव्हते. या स्थितीत संस्थेने पीक कर्ज वाटपाचा पर्याय शोधून काढला. एक वर्षाच्या मुदतीचे पीक कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. हे कर्ज थेट रकमेच्या स्वरूपात न देता शेतीसाठी लागणारी खते, बियाणे, संयंत्रे आदी घटकांच्या स्वरूपात दिल्याने त्याचा प्रत्यक्ष शेतीसाठी उपयोग झाला. संस्थेने टोमॅटोच्या दर्जेदार जातींचे बियाणे बंगळूर येथून मागवून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. ‘ना नफा ना तोटा' या तत्त्वावर संस्थेने साह्य केले. याशिवाय विहीर खोदाई, पाइपलाइन करणे, वीजपंप घेणे, बैलगाडी, बैल, शेळ्या, गाईंची खरेदी यासाठीही संस्थेने गरजू व जिद्दी शेतकऱ्यांना मदत केली आहे. शेतमालाच्या विक्री व मार्केटिंगसाठी नुकतीच पेठ तालुक्‍यातील ननाशी येथे ‘हिमाई शेतकरी उत्पादक कंपनी' स्थापन करण्यात आली.                    

  स्ट्रॉबेरीमुळे बदलले चित्र

संस्थेतर्फे सुरवातीपासून सुरगाणा, पेठ, दिंडोरी या तालुक्‍यात आदिवासी शेतकऱ्यांना पीक बदलाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तुलनेने अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या प्रयत्नांतून १९९५ मध्ये सुरगाणा तालुक्‍यातील घोडांबे येथील पारीबाई काशिराम चौधरी या महिला शेतकऱ्याने पहिल्यांदा स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकाकडे वळले. आजमितीस सुमारे १०० हेक्‍टरपर्यंत स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. सुरत सह बंगळूर, हैदराबाद येथील बाजारात येथील स्ट्रॉबेरी विक्रीस जात असून सातत्याने मागणी वाढत आहे.

  पाणीवापर संस्थांचे जाळे

दिंडोरी तालुक्‍यातील खोरीपाडा येथे १९८२ मध्ये पहिला लिफ्ट इरिगेशनचा प्रयोग करण्यात आला. संस्था, शेतकरी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा प्रयोग यशस्वी झाला. फक्त खरीपच होणाऱ्या गावांमध्ये रब्बी पिके घेणे शक्‍य झाले. २००४ मध्ये दिंडोरी तालुक्‍यातील इंदोरे येथे जय मल्हार पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आली. प्रति लिटर प्रति सेकंद या परिमाणाने मोजून शेतकरी पाणी घेतात. शेतकऱ्यांच्या सहभागातून सुरू झालेला हा प्रकल्प दीर्घकाळ शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपयोगाचा ठरला आहे. ११५ शेतकरी या पाणी वापर संस्थेत सहभागी असून या पाण्याचा वर्षभर लाभ घेत आहेत.

  जलसंधारण, पाणलोट विकासावर भर    पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी संस्थेने विविध प्रयोग केले. यामध्ये कंटुरबंड, सीसीटी, सीएसटी बंधारे, गली बांध, छोटे बंधारे, वळण बंधाऱ्यावर भर देण्यात आला आहे. इंडो जर्मन पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत १९९२ मध्ये दिंडोरी तालुक्‍यातील विळवंडी, सुरगाणा तालुक्‍यात हट्टीपाडा, पेठ तालुक्‍यात मसगण, वागदोड, रोकडपाडा या भागात चांगली कामे झाली आहेत. केमच्या डोंगरातून गिरणा, नारपार यासारख्या सात नद्या उगम पावतात. या नद्यांच्या जलधारण क्षेत्रात छोटे बंधारे बांधून  पाणी अडविण्यात आले. कोहोर गाव शिवारात मोठे काम झाल्यामुळे १२७० हेक्‍टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली आले. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्यास सुरवात केली.

गाव स्वयंपूर्ण करणारा वाडी प्रकल्प महाराष्ट्र प्रबोधन सेवा मंडळ आणि नाबार्ड यांच्यामार्फत २०१० पासून दिंडोरी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील २४ गावांमध्ये वाडी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातून एक हजार निवडक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. या अंतर्गत आंबा, काजू  लागवडीबरोबरच शेळीपालन, किराणा दुकान, बोंबील विक्री, पीठ गिरणी, मसाला कांडप आदी व्यवसायांसाठी अर्थसाह्य करण्यात येते. २०१७ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. एकूण लाभार्थ्यांपैकी ७० टक्के लाभार्थ्यांनी याचा चांगला उपयोग करून घेतला असून प्रत्येकाला सरासरी सोळा हजार रुपये वार्षिक उत्पन्न सुरू झाले आहे. ‘अफार्म' च्या माध्यमातून  आणि इंडिगोच्या सहकार्याने ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.  सुरगाणा तालुक्‍यातील अंबाटा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुलींचे वसतिगृह चालविण्यात येते. प्रशिक्षित कार्यकर्त्यांतर्फे शेती, ग्रामविकास यावर अनौपचारिक शिक्षणाचे वर्ग घेतले जातात.

-  कार्यालय,  ०२५३-२३१६०६२   -  पांडुरंग पाटील, ९४२१५०८५०७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com