'मिनरल फाउंडेशन'ने दिली ग्राम, शेती विकासाची दिशा

एसआरआय पद्धतीने भात रोपांची लागवड करताना शेतकरी.
एसआरआय पद्धतीने भात रोपांची लागवड करताना शेतकरी.

गोवा राज्यातील ‘मिनरल फाउंडेशन आॅफ गोवा’ ही संस्था शाश्वत शेती विकास, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. शेतकरी आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून संस्थेने शेती आणि ग्राम विकासाला चांगली चालना दिली आहे. 

गोवा राज्यात कार्यरत असलेल्या खाण कंपन्यांनी डिसेंबर २००० मध्ये ‘मिनरल फाउंडेशन आॅफ गोवा’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. सध्या सेसा गोवा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर कुमार हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. खाणकाम पट्ट्यातील ७९ गावांमध्ये शेती सुधारणा, सामाजिक विकास आणि शैक्षणिक उपक्रम राबविणे हा संस्था स्थापन करण्याचा मुख्य उद्देश आहे. संस्था प्रामुख्याने सत्तरी, डिचोली, धारबांदोडा, सांगे, केपे, बार्देश तालुक्यांतील काही भाग आणि फोंडा तालुक्यातील उजगाव पंचायतीमध्ये विविध उपक्रम राबविते. या उपक्रमांना लोकांचे चांगले सहकार्य मिळत आहे.

गटातून होतोय शेती विकास  शेती विकास उपक्रमाबाबत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन तेंडुलकर म्हणाले, की गेली १७ वर्षे संस्था ग्राम आणि शेती विकासामध्ये कार्यरत आहे. खाणकाम होत असलेल्या गाव परिसरांतील शेतकऱ्यांना विविध पिकातील सुधारित तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देतो. आम्ही दहा शेतकरी गट तयार केले आहेत. हे गट विविध शेती उपक्रम राबवितात. जल-मृद संधारणाच्या कामांची देखभाल करतात. जमिनीची सुपीकता, सुधारित तंत्रज्ञानावर आम्ही भर दिला आहे. गोवा फलोद्यान विकास मंडळाच्या सहकार्याने आम्ही पंधरा गावांत भाजीपाला लागवडीला चालना दिली. उत्पादित भाजीपाला सरकार हमीभावाने खरेदी करते. मंडळातर्फे शेतकऱ्यांना हंगामनिहाय भाजीपाला बियाणे आणि निविष्ठा पुरविल्या जातात. प्रामुख्याने  भेंडी, वांगी, मिरची, गवार, दुधीभोपळा लागवडीवर भर दिला. संस्था शेतकरी गटांना पीक लागवड ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करते. लागवडीसाठी शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान मिळते. संस्थेने नाबार्डच्या सहकार्याने पंधरा गावांत गांडूळखत प्रकल्पांची उभारणी केली. यामुळे भाजीपाला, मसाला पिके, फळपिकांना जास्तीत जास्त गांडूळखताचा वापर केला जातो. काही महिला बचत गट भाजीपाल्याचे चांगले उत्पादन घेत आहेत. भात उत्पादनवाढीसाठी संस्थेने नाबार्डच्या सहकार्याने तीन वर्षे १२० हेक्टर क्षेत्रावर ५५० शेतकऱ्यांच्या सहकार्याने एसआरआय तंत्रज्ञानाचा प्रसार केला. यास कृषी विभागाचे सहकार्य मिळाले. या शेतकऱ्यांना संस्थेने तांत्रिक मार्गदर्शन केले. या प्रकल्पामुळे भात उत्पादनात एकरी १० क्विंटल वरून १६ क्विंटलपर्यंत वाढ झाली. मोकाट जनावरांकडून शेतीचे संरक्षण होण्यासाठी शेतकरी गटाच्या माध्यमातून सामूहिक कुंपणाचा उपक्रम राबविला. यास राज्य शासनाच्या योजनेची जोड दिली.

जलसंधारणावर भर    संस्थेने सन २००६ पासून दहा गावांतील काजू बागायतीमध्ये जल, मृद संधारणाची कामे सुरू केली. परिसराच्या गरजेनुसार सलग समतल चर, गॅबियन बंधारे, शेततळी, नालाबांध अशी कामे केल्यामुळे भूजलपातळी वाढली. बागांचे योग्य व्यवस्थापन झाल्याने १० ते १५ टक्के काजू उत्पादनात वाढ मिळाली. संस्थेने काजू बागेत मधमाशीपालनाला चालना दिली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी संस्थेच्या मार्गदर्शनानुसार फळबाग रोपवाटिका उभारल्या आहेत. संस्थेच्या उपक्रमासाठी बॅंक, राज्य शासन आणि गोवा शिपयार्डची मदत मिळते.

महिला बचत गटांना चालना   संस्थेने ३० गावांत १८० महिला बचत गटांची उभारणी केली. यातून दोन हजार महिला जोडल्या गेल्या. संस्थेने महिला गटांचे फेडरेशन केले. या गटांनी मेणबत्ती, रेक्झिन बॅगनिर्मिती, बांबू कलाकुसर, विविध प्रकारच्या मसालानिर्मितीस सुरवात केली आहे. संस्थेने मसालानिर्मिती करणाऱ्या महिला गटाचा ‘निर्मिती’ ब्रॅंड तयार केला. केशव सेवा साधना आणि लोक विश्वास प्रतिष्ठानच्या माध्यमातून विशेष मुलांना संस्था पत्रावळी आणि हॅंडमेड पेपरनिर्मितीचे प्रशिक्षण देते.

शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुरवात  संस्थेने कार्यक्षेत्रात दोन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली. सध्या धारबांदोडा शेतमाल उत्पादक कंपनीमध्ये सध्या ५४ शेतकरी सभासद आहेत. ही सभासद संख्या एक हजारापर्यंत नेण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. सेंद्रिय पद्धतीने काळ्या मिरीचे उत्पादन, प्रमाणीकरण, फणस प्रक्रिया, गांडूळखत निर्मिती आणि विक्रीवर कंपनीने भर दिला आहे. 

शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम   संस्थेने ग्रामीण भागातील शाळांमध्ये वाचनालय, प्रयोगशाळा आणि वर्ग बांधून दिले आहेत. विद्यार्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, बाक, स्वच्छतागृहांची उभारणी केली. कुंदापूर (कर्नाटक राज्य) परिसरातील अंगणवाड्यांचे बांधकाम पाहून संस्थेने गोवा राज्यातदेखील वैशिष्ट्यपूर्ण अंगणवाड्यांचे बांधकाम केले. यामध्ये पुरेसा उजेड, मुलांसाठी खेळण्यासाठी जागा, शैक्षणिक खेळणी, स्वयंपाक घर, साठवण खोली आणि स्वच्छतागृहांची सोय आहे. शाळेतील भिंती मुलांना चित्रे काढणे, रंगवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. शाळेच्या भिंतीवर अक्षर ओळख, परिसरात आढळणारे पक्षी, फुले, वनस्पतींची चित्रे रंगवलेली आहेत. संस्थेने १८३ अंगणवाड्यांतील शिक्षिका आणि मदतनीस यांच्यासाठी विशेष उपक्रम राबविला. याचा चांगला फायदा मुलांची उपस्थिती आणि शैक्षणिक प्रगतीमध्ये दिसून येत आहे. या अंगणवाडी पॅटर्नची गोवा सरकारने दखल घेतली आहे. खाण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु चांगली गुणवत्ता असलेल्या १० वी, १२ वी तसेच पदवी अभ्यासक्रमासाठी संस्था दरवर्षी १५ ते ३० विद्यार्थांना शिष्यवृत्ती देते. यातून शिक्षण, रोजगार, व्यवसायाच्या चांगल्या संधी तयार झाल्या आहेत.  

फिरत्या दवाखान्याची सोय   संस्थेतर्फे विविध गावे आणि शाळांमध्ये दरवर्षी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. ‘हेल्प एज इंडिया’च्या सहयोगाने संस्थेने सोळा गावांतील वृद्धांसाठी फिरत्या दवाखान्याची सोय केली. गेल्या पाच वर्षांत संस्थेने ५६ शाळेतील अठरा हजार मुलांची रक्तगट तपासणी केली. आजारी मुलांसाठी औषधोपचाराची सोय करून दिली.

ग्राम, कृषी पर्यटनाला चालना   कृषी पर्यटन उपक्रमाबाबत संस्थेतील प्रकल्प व्यवस्थापक पराग रांगणेकर म्हणाले, की संस्थेच्या पुढाकारातून वेर्ले (जि. दक्षिण गोवा) या निसर्गरम्य गावात तीन वर्षांपासून ग्राम व कृषी पर्यटन उपक्रम सुरू झाला. गावातील पाच घरांच्यामध्ये पर्यटकांच्या रहाण्याची सोय आहे. गावकऱ्यांनी वेर्ले कृषी पर्यटन ही सोसायटी स्थापन केली. कृषी आणि ग्राम पर्यटन उपक्रमाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण,वृक्षारोपणासारखे  उपक्रम राबविले जातात. काही गावांच्यामध्ये लोक सहभागातून संस्थेने जैवविविधता रजिस्टर केले. येत्या काळात संस्था गोवा राज्यातील खाण भाग असलेल्या गावांचे जैविविधतेचे रजिस्टर तयार करणार आहे.  संपर्क-  ​डॉ. सचिन तेंडुलकर - ०८३२- २२३२४१४, ६६४१५०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com