जिरायती भागात यंदा चांगला मॉन्सून

यंदाच्या  वर्षी राज्यात  झालेला माॅन्सूनचा जिल्ह्यानिहाय नकाशा
यंदाच्या वर्षी राज्यात झालेला माॅन्सूनचा जिल्ह्यानिहाय नकाशा

यावर्षीच्या मॉन्सूनचे वैशिष्ट्य म्हणजे जिरायती भागात चांगला पाऊस झाला. पुणे व सातारा जिल्ह्यांचा पूर्वभाग, सोलापूर, नगर, लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत सरासरीच्या अधिक पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणीपातळी वाढली. याचा फायदा रब्बी हंगामास होणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र  विभागाने दिनांक १ ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्रातील जिल्हावार जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या पावसाची आकडेवारी जाहीर केली. महाराष्ट्राच्या जिल्हानिहाय नकाशामध्ये त्या-त्या जिल्ह्याचे सरासरीनुसार पाऊस उणे (-) किंवा अधिक (+) अशा प्रकारे दिली आहे. 

अ) सरासरीपेक्षा अधिक झालेला जिल्हावार पाऊस  १) पालघर + २६, २) ठाणे + ३४, ३) मुंबई + १०, ४) रायगड + १७, ५) रत्नागिरी + ४,  (६) पुणे + ५४, ७) नगर + ५९, ८) सोलापूर + २१, ९) उस्मानाबाद + २८, १०) नाशिक + २३, ११) सातारा + १४, १२) लातूर + ३, १३) बीड + १५, १४) बुलढाणा + ३. वरील सर्व आकड्यांची बेरीज केली असता, ती अधिक एकूण ३६० येते. त्यास १४ ने भागल्यास सरासरी अधिक + २५ टक्के येते.

ब) सरासरी एवढा झालेला पाऊस ः धुळे जिल्हा. क) सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे  १) नागपूर - ३, २) जालना - ३, ३) सिंधुदुर्ग - ५, ४) औरंगाबाद - ५, ५) नंदूरबार - १०, ६) वर्धा - १३, ७) जळगाव - १३, ८) कोल्हापूर - १७, ९) सांगली - १८, १०) परभणी - २०, ११) अकोला - २१, १२) नांदेड - २१, १३) भंडारा - २७, १४) गडचिरोली - २३, १५) हिंगोली - २७, १६) वाशीम - २८, १७) अमरावती - २९, १८) चंद्रपूर - ३२, १९) यवतमाळ - ३३, २०) गोंदिया - ३७. वरील सर्व आकडेवारीची बेरीज केली असता, ती उणे - ३६० येते आणि या सर्व २० जिल्ह्यांची सरासरी उणे - १८ येते.  वरील माहितीवरून हे समीकरण तयार होते की + २७ - १८ = ७ टक्के अधिक म्हणजेच महाराष्ट्रात सरासरीच्या १०७ टक्के पाऊस झाला. महाराष्ट्रातील एकूण १४ जिल्ह्यांत त्या जिल्ह्यातील सरासरीपेक्षा ३ ते ५९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. एका जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला.  दहा जिल्ह्यांत संबंधित जिल्ह्यांच्या सरासरीपेक्षा - ३ ते - २० टक्के इतका कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या दंड मापानुसार ज्या जिल्ह्यांत त्या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा - २० टक्केपर्यंत पाऊस कमी झाला आहे, ते जिल्हे सरासरीचे जवळपास धरावेत, असे संकेत आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांची स्थिती आभ्यासली असता, १४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक तर १३ जिल्ह्यांत सरासरीचे जवळपास पाऊस झाला.  प्रामुख्याने उत्तर कोकण, पुणे, नाशिक व नगर भागांत सरासरीपेक्षा २५ ते ५९ टक्के अधिक पाऊस झाला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुणे, नाशिक, मराठवाडा, अमरावती व नागपूर विभागांतील धरणे तसेच उजनी धरणासह सर्व धरणे भरली. जायकवाडी धरण ९ वर्षांनंतर पुन्हा भरून त्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागला. हे या वर्षीचे मॉन्सून पावसाचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.   गेले दोन वर्षे महाराष्ट्र शासन राबवीत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाद्वारे तयार केलेले तलाव, तळी, बंधारे पूर्णपणे भरले. त्यामुळे एकूण जलसाठ्यात चांगली वाढ झाली असून, भूगर्भाची पाणीपातळी वाढण्यातही मदत झाली.  यावर्षीच्या मॉन्सूनचे वैशिष्ट्य म्हणजे कोरडवाहू भागात चांगला पाऊस झाला. पुणे व सातारा जिल्ह्यांचा पूर्वभाग, सोलापूर, नगर, लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत तेथील सरासरीच्या अधिक पाऊस झाल्याने भूगर्भाची पाणी पातळी वाढली. विहिरी व कूपनलिकेमध्ये पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात पिण्याच्या पाण्याच्या समस्या कमी प्रमाणात भेडसावेल.

विदर्भ, मराठवाड्यात काही जिल्ह्यांत पावसाची कमतरता   विदर्भातील अमरावती, वाशीम, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या सात जिल्ह्यांत तसेच मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातही पाऊस तुलनेने कमी झाला. याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागराकडून या भागास पाऊस देणारी शाखा या वेळी कमकुवत राहिली. बंगालच्या उपसागरात जूनमध्ये १, जुलैमध्ये २, ऑगस्ट महिन्यात २ आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीने दोन वादळे निर्माण होतात. त्या वादळांचा प्रभाव या भागावर होऊन या भागात अधिक पाऊस मिळतो. मात्र या वर्षी जी छोटी-मोठी वादळे बंगालच्या उपसागरात तयार झाली, ती उत्तर दिशेने आसाम, बिहारच्या दिशेस गेली आणि तेथे अतिवृष्टी झाली. मात्र, त्या वादळाचा प्रभाव या भागात न झाल्याने विदर्भ व पूर्व मराठवाड्याच्या काही भागात पाऊस तुलनेने कमी झाला.        याच प्रकारची काहीशी स्थिती अक्कलकोट तालुक्‍यातील काही भाग, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका आणि सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला तरी दुष्काळी पट्ट्यातील काही तालुके दुष्काळाच्या कमी-अधिक छायेत आहेत. या भागात पावसातील मोठे खंड सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्यास कारणीभूत ठरले. पीक स्थिती 

  •  जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोठे खंड पडले. त्याचा परिणाम खरीप पिकांवर झाला. भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, मटकी, उडीद, चवळी, हुलगा, तूर या पिकांना पुरेसा पाऊस न झाल्याने हलक्‍या जमिनीवरील पिके सुकून वाळली. मध्यम व भारी जमिनीवर असलेली आणि उशिरा पेरणीची पिके वाचली. मात्र त्यांचे एकूण उत्पादन २० ते ३० टक्के कमी होईल असा अंदाज आहे. 
  •  कपाशी पिकाची वाढ ही खुंटली, जिरायती कपाशीस २ ते ३ बोंड लागली. मात्र नंतर झालेल्या पावसाने पुढे वाढ झाली. मात्र कपाशीचे एकूण उत्पादनात २० टक्के घटीची शक्‍यता आहे.
  •  खरीप ज्वारी, बाजरी, मका या पिकांनाही पावसातील खंडाच्या काळात पाण्याचा ताण बसल्याने  उत्पादन १५ ते २० टक्‍क्‍याने घटू शकते.
  •  उसाचे १० ते १५ टक्के कमी उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. हळद, आले या पिकांचे  एकूण उत्पादन १० ते १२ टक्के कमी होईल. कांदा पिकाची उत्पादकता २० टक्के कमी होईल. 
  •  यावर्षी धरणातील पाणीसाठा व भूगर्भातील पाणीपातळी तसेच परतीचा मॉन्सून पाऊस चांगला झाला असल्याने रब्बी ज्वारी, करडई, हरभरा, जवस या पिकांचे क्षेत्रात वाढ होऊन उत्पादकता व उत्पादन वाढेल.  रब्बी कांदा व गव्हाचा हंगाम चांगला राहील.
  • पावसाचा अंदाज

     जून व जुलै महिन्यात पावसात खंड पडतील आणि मराठवाडा - विदर्भात मोठे थंड पडतील हा दिलेला अंदाजही बरोबर आला.  मुंबईतील पावसाबाबत २६ ऑगस्ट व १६ सप्टेंबर रोजी ॲग्रोवनमधून दिलेला अंदाज तंतोतंत खरे ठरले. मुंबईमध्ये २९ ऑगस्ट आणि १९, २० सप्टेंबरला अतिवृष्टी झाली.  २७ मे रोजी दिलेल्या अंदाजानुसार कोकण, नाशिक, पुणे भागांत सरासरीहून अधिक पाऊस होईल, महाराष्ट्रातील बहुतांशी धरणे ऑगस्टअखेरीस भरतील, हा अंदाजही बरोबर आला.  महाराष्ट्रात सरासरीच्या १०२ टक्के पाऊस होईल, हा अंदाज १०७ टक्के पाऊस झाल्याने खरा ठरला आहे. - डॉ. रामचंद्र साबळे (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com