Jawar Rabbi Cultivation : रब्बी ज्वारी वाण आणि लागवड तंत्रज्ञान

रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान
रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानAgrowon

रब्बी ज्वारी वाण

मध्यम ते भारी जमीन आणि मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण

रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान
रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानAgrowon
रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान
रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानAgrowon

रब्बी ज्वारी वाण आणि लागवड तंत्रज्ञान जमिनीची निवड व ओलावा साठवण :

पाण्याचा योग्य निचरा होणारी व पाणी साठवून ठेवणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. खरीपातील मूग व उडिदाचे पीक काढल्यानंतर वखराच्या साहाय्याने उतारास आडवी मशागत केल्यास सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी ओलाव्याच्या रूपात जमिनीत साठविले जाईल.

ज्यांना सोयाबीन पिकानंतर रब्बी ज्वारी लागवड करावयाची असल्यास मशागत करू नये. मशागतीनंतर ज्वारीची पेरणी केल्यास ओलाव्याच्या अभावामुळे ज्वारीची उगवण कमी होते. त्यामुळे सोयाबीन नंतर शून्य मशागतीवर (झीरो टिलेज) रब्बी ज्वारीची पेरणी केल्यास ज्वारीची उगवण व उत्पादकता वाढण्यास मदत होते. सोयाबीननंतर कमी पाण्यामध्ये (दोन पाण्यामध्ये रब्बी ज्वारी दुप्पट उत्पादन मिळू शकते.)

पेरणीचा कालावधी : महाराष्ट्रात पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप ज्वारीची लागवड होत नाही. गोकुळाष्टमीनंतर १ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत पावसाच्या ओलीवर ५ सें.मी. खोल रब्बी ज्वारीची लागवड करतात. या उलट मराठवाड्यात दोन्ही हंगामांत ज्वारीचे पीक घेतले जाते. रब्बी ज्वारीसाठी ऑक्‍टोबर महिन्याचा पहिला पंधरवाडा (१ ते १५ ऑक्‍टोबर) हा कालावधी सर्वांत चांगला असून, या काळात पेरणी केल्यास रब्बी ज्वारीचे उत्पादन चांगले मिळते. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव वाढतो. उशिरा पेरणी केल्यास जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे बियाणांची उगवण कमी होऊन ताटांची योग्य संख्या राखता येत नाही.

बियाणांचे प्रमाण आणि बीजप्रक्रिया : हेक्‍टरी १० किलो बियाणांची शिफारस आहे. घरचे बियाणे वापरताना काणी रोगाच्या प्रतिबंधासाठी ३०० मेश गंधक ४ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात आणि पेरणी उशिरा झाल्यास खोडमाशीच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्‍झाम (७० टक्के) ३ ग्रॅम प्रतिकिलो अशी बीजप्रक्रिया करावी. चाऱ्यासाठी ज्वारी लागवड करताना एकरी १६ किलो बियाणे दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवून दाट पेरावे.

ताटांची योग्य संख्या आणि रुंद पेरणी :

जिरायती रब्बी ज्वारी जमिनीतील ओलाव्यावरच वाढते. या ओलाव्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. (१८ इंच) आणि हेक्‍टरी १० किलो प्रमाणे बियाणे वापरून पेरणी करावी. उगवणीनंतर तीन आठवड्यांनी दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवून विरळणी करून, हेक्‍टरी ताटांची संख्या १,३५,००० ठेवावी.

ताटांची संख्या ही १,३५,००० पेक्षा अधिक ठेवल्यास ओलाव्यासाठी स्पर्धा होते, तसेच कमी अंतरावरील पेरणीमुळे आंतरमशागत करता येत नाही. कणसे बाहेर न पडणे, कणसामध्ये दाणे न भरणे यामुळे उत्पादन कमी मिळते.

ओलिताखाली रब्बी ज्वार लागवडीसाठी ताटांची संख्या १,८०,००० पर्यंत राखता येते.

सरी काढून त्यात पेरणी करणे : मध्यम ते भारी (४५ सेमी खोल) जमिनीवर बळीराम नांगराने दोन ओळींतील अंतर ४५ सेमी. किंवा सुधारित वखराने ४५ सेमी. अंतर ठेवून पेरणी पूर्वी १५ दिवस अगोदर सऱ्या काढाव्या. आणि तिफणीच्या साहाय्याने पेरणी करावी. सरीमध्ये पेरणी केल्यानंतर रासणी करू नये.

रासायनिक खताचा वापर :

जिरायती रब्बी ज्वारीसाठी हेक्‍टरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद पेरणी बरोबरच तर ओलिताखालील रब्बी ज्वारीसाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० पालाश वापरावे. त्यातील अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळेस व अर्धेनत्र ३५ ते ४० दिवसांनी पाण्याच्या पाळीबरोबर द्यावे.

खत आणि बियाणे खोल १२ सेंमीपर्यंत पेरून दिल्यास ओलाव्याचा कार्यक्षम वापर होतो.

पेरणीपूर्वी ७५० किलो शेणखत अधिक २० किलो नत्र हेक्‍टरी दिल्यास सुद्धा चांगला फायदा होतो.

आंतर मशागत आणि पाण्याचे व्यवस्थापन :

रुंद पद्धतीने ४५ सेमी. अंतरावर ज्वारीची पेरणी केल्यास पिकांमध्ये कोळप्याच्या सहायाने दोन वेळेस मशागत करता येते. आंतर मशागतीमुळे चिकणमातीच्या काळ्या जमिनीत पडलेल्या भेगा मातीने बुजल्याने ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होते. आंतरमशागतीमुळे (२ कोळपण्या) निंदणीचा खर्च कमी होतो.

पेरणी केल्यानंतर ३ आठवड्यांनी दोन ओळींत सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन (मूग, उडीद इत्यादी काड) केल्यासही उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे.

रुंद आणि खोल पेरणीसाठी सुधारित तिफणीचा वापर करावा. रब्बी ज्वारीच्या पेरणी नंतर ६५ आणि ७५ दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होईल.

रब्बी ज्वारीसाठी पहिले पाणी जोमदार वाढीच्या अवस्थेत म्हणजे पेरणी नंतर २५-३० दिवसांनी द्यावे. अर्धे राहिलेले नत्र या पाण्याबरोबर देता येते.

दुसरे पाणी ज्वारी पोटरीत असताना म्हणजेच पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी द्यावे. ज्वारीची वाढ शेवटच्या पानापर्यंत झालेली असते. यामुळे अन्नद्रव्य कणसात जाण्यास मदत होते.

तिसरे पाणी ज्वारी फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर ७०-७५ दिवसांनी द्यावे. या पाण्यामुळे कणसात दाणे भरण्यास मदत होते. कणीस वजनदार व मोठे होते.

चौथे पाणी कणसात दाणे भरताना म्हणजे पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी द्यावे. या पाण्यामुळे दाण्याचा आकार मोठा होवून उत्पादनात वाढ होते.

रब्बी ज्वारीस एकच पाणी देणे शक्‍य असल्यास, ते पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांत अगर जमिनीत ओल असल्यास ४० ते ५० दिवसांत द्यावे. दोन पाणी उपलब्ध असतील तर पहिले पाणी २५ ते ३० दिवसांनी आणि दुसरे पाणी ५० ते ५५ दिवसांनी द्यावे. हे संरक्षित पाणी तुषार सिंचन पद्धतीने दिल्यास अधिक फायदा होतो. पाणी दिल्यानंतर आच्छादनाचा वापर करावा.

आंतरपीक : वातावरणातील थंडीचे प्रमाण वाढल्यास रब्बी ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट होते. याउलट अधिक थंडीमुळे करडईचे चांगले उत्पादन होते. वातावरणातील या समतोलपणाचा विचार केला तर रब्बी ज्वारी अधिक करडई यांचे ४ :४ किंवा ६ : ३ या प्रमाणाच अंतर पीक द्यावे.

वरील सर्व तंत्रज्ञान कमी खर्चाचे असून त्याचा वापर केल्यास उत्पादनात ३०-४० टक्के वाढ होऊन हेक्‍टरी १५ ते १८ क्विं. धान्य आणि ३५ ते ४० क्विं. कडबा उत्पादन मिळते.

संपर्क : ०२४५२-२२११४८ (लेखक ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी य़ेथे कार्यरत आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com