तूर पीक संरक्षण सल्ला 

तूर शेंगा पोखरणारी अळी
तूर शेंगा पोखरणारी अळी

तूर पिकावर सुमारे २०० किडींच्या प्रादुर्भावाची नोंद असली, तरी प्रामुख्याने कळ्या व फुलोरा अवस्थेतील किडीपासून जास्त प्रमाणात नुकसान होते. यांच्या नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.

तूर पिकावरील महत्त्वाच्या किडीची माहिती जाणून घ्या व उत्पादनातील घट टाळा.

शेंगा पोखरणारी अळी : शास्त्रीय नाव : हेलीकोव्हर्पा आर्मिजेरा. किडीच्या चार अवस्थांपैकी अळी अवस्था ही अधिक हानिकारक आहे. या किडीचा पतंग शरीराने दणकट असून, पिवळसर रंगाचा असतो व पुढील तपकिरी पंखजोडीवर काळे ठिपके असतात. मादी पतंग फुलोरा अवस्थेत आल्यावर अंडी घालण्यासाठी आकर्षित होतात. सदर अळी ८० टक्के कळी, फुले व शेंगावर अंडी घालतात. अंडी अवस्था ३ ते ४ दिवसांची असते. पूर्ण विकसित अळी पोपटी रंगाची असते. शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळतात. अळी अवस्था १७ ते २३ दिवस असते.  नुकसानाचा प्रकार : 

  • प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या तुरीची कोवळी पाने व कळ्या यांचे नुकसान करतात. शेंगांना अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून अर्धी आत व अर्धी बाहेर राहून शेंगातील दाणे खातात. एक अळी साधारणतः २० ते २५ शेंगांचे नुकसान करते. 
  • ही अळी नोव्हेंबर ते मार्चपर्यंत क्रियाशील असते. 
  • प्रति झाड एक अळी असल्यास हेक्टरी १३८ किलो घट व एका झाडावर तीन अळ्या असल्यास ३०८ किलो प्रति हेक्टरी घट आढळते.
  • पिसारी पतंग : शास्त्रीय नाव : एक्झेलास्टीस इटिओमोसा 

  • किडीचा पतंग नाजूक निमुळता करड्या व भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख लांब दुभंगलेले असून त्यांच्या कडावर नाजूक केसांची दाट लव असते, त्यामुळे त्यांना पिसारी पतंग म्हणतात. या किडींचे पाय लांब व बारीक असतात. 
  • अळी हिरव्या रंगाची साधारणपणे १५ मिमी लांबीची मध्ये फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती असते. पाठीवर काटेरी लव असते. अंड्यातून बाहेत निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना छिद्र पाडून खाते, पूर्ण वाढ झालेली अळी प्रथम शेंगांचा पृष्ठभाग खरडून खाते. नंतर शेंगांना, शेंगांच्या बाहेर राहून खाते. ही अळी शेंगांच्या आत कधीच शिरत नाही. 
  • अळी अवस्था ११ ते १६ दिवसांची असते.
  • ही अळी पावसाळा संपल्यावर तुरीवर मोठ्या प्रमाणात येते.
  • शेंगमाशी :

  • हेलिकोव्हर्पा अळीनंतर शेंगमाशी पिकांचे सर्वांत जास्त नुकसान करते. शेंगमाशी आकाराने लहान १.५ मिमी लांब असून, माशीचा रंग हिरवट असतो. अळी बारीक, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तिच्या तोंडाकडील भाग निमुळता असतो. अळी शेंगेतच कोष अवस्थेत जाते. सुरवातीला या किडीचे कुठलेही लक्षण शेंगेंवर दिसत नाही. 
  • अंडे घालण्याचा कालावधी डिसेंबर ते जानेवारी असते. ही अळी शेंगेत शिरून दाणे अर्धवट कुरतडून खाते, त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजतात. उत्पादनात १० ते ५० टक्के घट आढळून येते.
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन : 

  • पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना आठवड्यातून किमान १ वेळा हेक्टरी १२ ते २४ झाडाचे निरीक्षण करावे.  
  • शेतात प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे पिकाच्या १ फूट उंचीवर लावावेत. 
  • ३ ते ५ फूट लांबीचे १० ते ५० पक्षिथांबे प्रति हेक्टरी उभारावेत. 
  • आर्थिक नुकसान पातळी :

  • कामगंध सापळ्यात सतत ३ दिवस ८ ते १० नर पतंग सापडल्यास, किंवा 
  • १ अळी प्रति झाड किंवा 
  • ५ टक्के कीडग्रस्त शेंगा दिसल्यास.  
  • वनस्पतिजन्य कीटकनाशके : फुलोऱ्याच्या सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५  मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

    रासायनिक नियंत्रण : आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास खालील प्रकारे फवारणीचे नियोजन करावे.  फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी पहिली फवारणी : पीक ५० टक्के फुलोऱ्यावर- क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २ मिलि किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ ईसी) ०.७ मिलि  दुसरी फवारणी : पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी - इमामेक्टीन बेन्झोइट (५ टक्के एस.जी.) ०.४४ ग्रॅम किंवा  क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस. सी.) ०.२५ मिलि  संपर्क : ०७२४ -२५५८४६२ (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com