करडई पिकात विरळणी महत्त्वाची

करडई पीक लागवड
करडई पीक लागवडagrowon

यंदा रब्बी हंगामासाठी उपयुक्त पाऊस उशिराच झाला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी करडई पिकाची पेरणी ऑक्‍टोबरअखेरीस करण्यात आली. येत्या काही दिवसांत पिकाची विरळणी, आंतरमशागत आदी कामे केल्यास उत्पादनवाढीसाठी ते उपयोगी पडणार आहे.  विरळणी : करडई पीक हे जमिनीत साठवलेल्या ओलाव्यावर घेतले जाते. ओलाव्याचा कार्यक्षम वापर होण्याच्या दृष्टीने पिकाची विरळणी करून हेक्‍टरी १ लाख ११ हजार १११ झाडांची संख्या ठेवावी. जास्त रोपे असतील तर जमिनीत साठवलेला ओलावा व अन्नद्रव्यासाठी रोपांमध्ये स्पर्धा होते. वाढीसाठी ओलावा कमी पडतो. म्हणून पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी पिकाची विरळणी करावी. विरळणी करताना दोन झाडांतील अंतर २० सें.मी. ठेवून रोगट, लहान रोपे काढावीत.

खुरपणी : तणाच्या प्रादुर्भावानुसार एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. वाढीच्या पहिल्या ३०-४५ दिवसांपर्यंत पीक तणविरहित ठेवावे.

आंतरमशागत : करडई पिकास वाढीच्या अवस्थेत ओलाव्याची जास्त आवश्‍यकता असते. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी पेरणीनंतर पहिली कोळपणी २५ ते ३० दिवसांनी करावी. त्यामुळे पिकातील तण निघून जाते, तसेच मातीचे आच्छादन पडून जमिनीतून बाष्पीभवनाद्वारे उडून जाणाऱ्या ओलाव्यास अडथळा निर्माण होतो. दुसरी कोळपणी पेरणीनंतर ४०-४५ दिवसांनी दातेरी कोळप्याने करावी. या कोळपणीमुळे जमिनीस पडलेल्या भेगा बुजल्या जातात. त्यामुळे भेगाद्वारे ओलाव्याचे होणारे बाष्पीभवन कमी होते. तो ओलावा पीकवाढ आणि दाणे भरण्यासाठी उपयोगी पडतो. करडई पिकास एक कोळपणी करणे म्हणजे अर्धे पाणी दिल्यासारखे आहे. 

पाणी व्यवस्थापन :  करडई पीक हे अवर्षणास प्रतिकारक असल्यामुळे या पिकास कमी पाणी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज नाही. पाणी उपलब्ध असेल तर पिकास पाण्याचा ताण पडण्यापूर्वी तसेच जमिनीस भेगा पडण्यापूर्वी पाणी द्यावे. करडई पिकास जास्त पाणी सहन होत नाही, त्यामुळे हलके सिंचन करावे. भेगा पडल्यानंतर पाणी दिल्यास भेगांमध्ये जास्त प्रमाणात पाणी साचून राहते. पिकाच्या मुळाभोवती जास्त काळ पाणी राहिले व तापमान जास्त असेल तर पीक मोठ्या प्रमाणावर मर रोगास बळी पडते. करडई पिकास पहिले पाणी ३० ते ३५ दिवसांनी द्यावे व त्यानंतर दुसरे पाणी ५५-६० दिवसांनी द्यावे. पिकास फुले येण्यास सुरवात झाल्यावर सायकोसिल या वाढरोधकाची १ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. त्यानंतर ८-१० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. सायकोसिल फवारणीमुळे झाडांची अनावश्‍यक वाढ थांबून उपलब्ध अन्नद्रव्ये व ओलाव्याचा दाणे भरण्यास फायदा होतो. 

संपर्क : डॉ. एस. के. शिंदे, ९६८९६१७०६६ (अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com