करडई लागवड तंत्रज्ञान

करडई लागवड तंत्रज्ञान
करडई लागवड तंत्रज्ञान

करडईचे महत्त्व :  महाराष्ट्र राज्याचे विशेषतः रब्बी हंगामातील करडई हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. रब्बीत पाण्याचा ताण पडला, तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते. कारण या पिकाच्या मुळ्या जमिनीत १४० ते १५० सेंटिमीटर खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात. करडईच्या तेलात संपृक्त स्निग्ध आम्लांचे प्रमाण इतर तेलांपेक्षा बरेच कमी असते. त्यामुळे हृदयरोग्यांना हे तेल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. शरीरात रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा प्रमाणाबाहेर वाढू नये, म्हणून इतर तेलांबरोबर या तेलाचा उपयोग करणे फायदेशीर आहे. म्हणूनच करडईच्या तेलाची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.

लागवड तंत्रज्ञान :  जमीन :  पिकास मध्यम ते भारी खोल जमीन वापरावी. साठ सेंटिमीटरपेक्षा जास्त खोल जमिनीत करडईचे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी असावी. पाणी साचून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड्या फार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शकते.

पूर्वमशागत :  पिकाची मुळे खोल जात असल्यामुळे खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३-४ पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामात ६ × ६ मीटर अथवा १० × १० मीटर आकाराचे सपाट वाफे किंवा सरी- वरंबे तयार करून मूलस्थानी जलसंधारण करावे. शेवटच्या पाळीअगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्‍टरी ६.२५ टन (१२ ते १३ गाड्या) मिसळून पाळी द्यावी.

पेरणीचा काळ :  लवकर पेरणी (सप्टेंबरचा पहिला पंधरवडा) केल्यास पिकाचे पानांवरील ठिपके या बुरशीजन्य रोगामुळे फार नुकसान होते आणि पर्यायाने उत्पादनात घट येते. याउलट उशिरा पेरणी केल्यास (ऑक्‍टोबरचा दुसरा पंधरवडा) पीक थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादनात घट येते. त्यासाठी करडईची पेरणी सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करावी. 

करडईचे सुधारित व संकरित वाण

अ.क्र.  सरळ वाण  तयार होण्याचा कालावधी (दिवस)  उत्पादन (क्विं./हे.) विशेष गुणधर्म 
1 भीमा  120-130    12-14  कोरडवाहू क्षेत्रास योग्य, अवर्षणास प्रतिकारक्षम, मावा व पानावरील ठिपके रोगास मध्यम प्रतिकारक, महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस  
2 फुले कुसुमा 125-140  

जिरायती 12-15,

बागायती 20-22 

कोरडवाहू तसेच संरक्षित पाण्याच्या ठिकाणी योग्य. अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस  
3 एस.एस.एफ. 658  115-120   11-13  बिगर काटेरी वाण, पाकळ्यासाठी योग्य, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस
4 एस.एस.एफ. 708   115-120  जिरायती 13-16, बागायती 20-24  कोरडवाहू आणि बागायतीसाठी उपयुक्त, माव्यास मध्यम प्रतिकारक, महाराष्ट्र राज्यासाठी लागवडीसाठी
5 फुले करडई एस.एस.एफ.-733  120-125  13-16  अधिक उत्पादनासाठी पांढऱ्या फुलांचा काटेरी वाण, माव्यास मध्यम प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस
6 परभणी कुसुम  135-137     12-15  मावा किडीस सहनशील, मराठवाड्यासाठी अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस  
7 पी.बी.एन.एस.-40   118-128 12-13 बिगर काटेरी पाकळ्यासाठी अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस
8 ए.के.एस.-207   125-135  12-14   विदर्भासाठी, माव्यास मध्यम प्रतिकारक
9 नारी-6  130-135   10-12  बिगर काटेरी, पाकळ्यासाठी संरक्षित पाण्याखालील लागवडीस. अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस
10 फुले चंद्रभागा (एस.एस.एफ.-748)  125-140   जिरायती 13-16, बागायती 20-25  कोरडवाहू आणि बागायतीसाठी, उत्तम काटेरी वाण, माव्यास मध्यम प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस  
संकरित वाण _ _ _ _
1 नारी एन.एच.-1  130-135  12-14 संकरित बिगर काटेरी वाण, पाकळ्यासाठी संरक्षित पाण्याखाली. अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस
2 नारी एन.एच.-15  130-135  20-23 माव्यास सहनशील, बागायतीसाठी. अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस
3 डी.सी.एच.-185  130-140   जिरायती 14-16 बागायती 20-25   मावा किडीस मध्यम प्रतिकारक, मर रोगास प्रतिकारक, अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी शिफारस

बियाणे दर व बीजप्रक्रिया :  पेरणीसाठी १० किलो बी प्रतिहेक्‍टरी वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास २ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्‍टर या जिवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. ॲझोटोबॅक्‍टर वा ॲझोस्पिरिलम हे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बियाण्याला लावल्यास हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते. 

पेरणीचे अंतर :  दोन ओळींमधील अंतर ४५ सें.मी. आणि दोन रोपांमधील अंतर २० सें.मी. ठेवावे.

खतांच्या मात्रा  :  करडई पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. जिरायती पिकास ५० किलो नत्र (११० किलो युरिया) आणि २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रतिहेक्‍टरी देणे आवश्‍यक आहे. काही प्रमाणात पाण्याची सोय असलेल्या पिकास ७५ किलो नत्र (१६३ किलो युरिया) व ३७.५० किलो स्फुरद (२३५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) प्रतिहेक्‍टरी द्यावे.

विरळणी व आंतरमशागत :  करडई पीक जमिनीतील ओलाव्यावर वाढत असल्यामुळे पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी दोन जोमदार रोपांतील अंतर २० सें.मी. ठेवून विरळणी करणे अत्यंत गरजेचे आहे. गरजेनुसार खुरपणी, कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेरणीपासून तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, पाचव्या आठवड्यात पूर्ण फासेच्या कोळप्याने व आठव्या आठवड्यात दातेरी सायकल कोळप्याने कोळपणी करावी.

पाणी व्यवस्थापन :  करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस पाणी कमी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही. पाणी देण्याची सोय असेल, तर पेरणीनंतर ३५ ते ४० दिवसांनी किंवा जमिनीस तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी देणे अधिक चांगले. दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे. करडईची फुले उमलण्यास सुरवात होताच क्‍लोरमेक्वाट क्‍लोराईड या वाढ नियंत्रकाची १००० पीपीएम तीव्रतेच्या (१००० मि.लि. प्रति ५०० लिटर पाण्यात) द्रावणाची प्रतिहेक्‍टरी फवारणी करावी. 

पीक संरक्षण :  करडईचे माव्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अवर्षणप्रवण विभागात पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास या किडीची तीव्रता बरीच कमी होते. नियंत्रण मावा :  डायमेथोएट १५ मि.लि. किंवा थायामेथोक्‍झाम वा ॲसिटामिप्रीड ३ ते ४ ग्रॅम किंवा ॲसिफेट १६ ग्रॅम किंवा क्‍लोथीयानिडीन १ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  पानांवरील ठिपके (अल्टरनेरिया) :  २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोगाची तीव्रता कमी झाली नाही, तर १०-१५ दिवसांनी वरीलप्रमाणे दुसरी फवारणी कीडनाशक बदलून करावी. पिकाची फेरपालट करावी, म्हणजे रोगाचे नियंत्रण होते.

काढणी :  पीक १३०-१३५ दिवसांत काढणीस तयार होते. बोंडे व पाने पिवळी पडल्यानंतर व सकाळच्या वेळेस काढावीत. सकाळी आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे काटे टोचत नाहीत. करडई चांगली वाळल्यानंतर बडवणी करावी.

उत्पादन :  सुधारित तंत्राचा वापर केल्यास मध्यम जमिनीत प्रतिहेक्‍टरी १२ ते १४ क्विंटल, तर भारी जमिनीत १४ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. तसेच बागायती करडईपासून २० ते २२ क्विंटल प्रतिहेक्‍टरी उत्पादन मिळते. 

यांत्रिकीकरण : एकात्मिक काढणी व मळणी यंत्र पीककाढणीसाठी उपयुक्त आहे. या यंत्राद्वारे कमी वेळेत व कमी खर्चात करडईची काढणी करता येते. यंत्राद्वारे स्वच्छ धान्य बाहेर येते. कोणतीही प्रक्रिया न करता माल विक्रीसाठी नेता येतो. करडई पिकास काटे असल्यामुळे मजूर काढणी करण्यासाठी तयार होत नाहीत. त्यासाठी एकत्रित काढणी व मळणी यंत्र वरदान ठरू शकते. 

उत्पादन कमी येण्याची कारणे :

  • सुधारित जातीच्या बियाण्यांचा अभाव.
  • हे पीक मोठ्या प्रमाणात अवर्षणप्रवण आणि जिरायती क्षेत्रात घेतले जाते.
  • बऱ्याच वेळेला हे पीक दुष्काळात सापडते. त्यामुळे ओलाव्याचा ताण पडतो. काही विभागात हे पीक आंतरपीक वा मिश्रपीक म्हणून घेतले जाते. त्यामुळे पीक संरक्षणाकडे दुर्लक्ष होते.
  • जिरायती विभागात विरळणी न केल्यामुळे जास्तीच्या झाडांमध्ये अन्न व पाण्यासाठी स्पर्धा होऊन पीक जोमदार येत नाही.
  • संवेदनशील अवस्थेत गरजेच्या वेळेस पाण्याचा अभाव.
  • खतांचा असंतुलित वापर.
  • दुबार पिकाच्या वेळेस खरीप पिकानंतर उशिरा पेरणीमुळे मावा किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव.
  • जलसंधारण तंत्राचा अभाव.
  • बाजारपेठेची समस्या.
  • हलक्‍या किंवा कमी प्रतीच्या जमिनीत लागवड.
  • काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धन : 

    करडईचा उपयोग प्रामुख्याने तेल मिळविण्यासाठी केला जातो. बैलचलित, तसेच विद्युत मोटारीवर चालणारे घाणे तेल काढण्यासाठी वापरतात. या पद्धतीत बियांपासून पूर्णपणे तेल निघत नाही. करडई पेंडीमध्ये ३-५ टक्‍क्‍यांपर्यंत तेल राहते. परंतु खेड्यात ते सर्रास वापरले जाते.

  • बिया :  बियांचा वापर परदेशांत प्रामुख्याने पाळीव, तसेच जंगली पक्ष्यांच्या खाद्यासाठी करतात. भारतात बियांचा उपयोग प्रामुख्याने तेलासाठी करतात. बियांमध्ये २८-३५ टक्के तेल असते. करडईच्या तेलात लिनोलीक या असंपृक्त घटकाचे प्रमाण ७८ टक्के असते. करडईच्या तेलाच्या वापराने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांसाठी हे तेल उपयुक्त आहे. याशिवाय करडई तेलाचा उपयोग रंग, तसेच रेक्‍झीन तयार करणे, जलरोधक कपड्यांच्या उद्योगात कातडी कमावण्यासाठी, लहान मुलांचे अन्न तयार करण्यासाठी केला जातो.
  • करडई पेंड :  जनावरांना पौष्टिक खाद्य म्हणून उपयोगी.
  • करडई बियांची टरफले सेल्युलेज व इन्सुलेशन तयार करण्यासाठी उपयोगात आणतात.
  • भाजी :  लहान अवस्थेतील करडई भाजीसाठी वापरली जाते. करडईच्या पानांमध्ये ‘अ’ जीवनसत्व, लोह, स्फुरद आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. हिरवा पाला जनावरांना चाऱ्यासाठी वापरला जातो. हिरव्या झाडापासून मूरघास तयार करता येतो.
  • झाडे :  खोडाचा उपयोग पार्टिकल बोर्ड पेपरनिर्मितीसाठी लगदा तयार करण्यासाठी वापरतात. एकत्रित काढणी व मळणी यंत्राद्वारे काढणी केली असता झाडाच्या फांद्या, खोडाचे तुकडे, पाने आदी शेतात विखुरली जातात. कुजल्यानंतर त्यांचा सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो.
  • करडई पाकळ्यांचे गुणधर्म :  सुकलेल्या पाकळ्यांवर आधारित औषधामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्तपुरवठा, तसेच प्राणवायू मिसळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्यांत गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. हानीकारक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मासिक पाळीतील अनियमितता, सांधेदुखी, वंध्यत्व, पोटाचे विकार, शरीरातील खाज आदी विकार कमी होतात. चीनमध्ये पाकळ्याचा उपयोग प्रामुख्याने औषधनिर्मिती, रंगनिर्मिती व सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. पाकळ्यांपासून उत्तम प्रकारचा चहा तयार होतो.
  • नवे संशोधन :  करडईचा फुले चंद्रभागा हा वाण अखिल भारतीय स्तरावर जिरायती, तसेच बागायती लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. करडईवरील मावा, तसेच पानावरील ठिपके रोगाचा हवामानावर आधारित अंदाज वर्तविण्यासंबंधी सूत्र तयार करण्यात आले आहे. करडईचा डी.एस.एच.- १८५ हा संकरित वाण अखिल भारतीय स्तरावर जिरायती, तसेच बागायती क्षेत्रात लागवडीसाठी तेलबिया संचालनालय, हैदराबाद येथून प्रसारित करण्यात आला आहे. करडई पिकास जास्त पाणी सहन होत नाही. त्यासाठी ठिबक सिंचन अधिक फायदेशीर असून, त्याचा वापर करावा.

    करडई क्षेत्र दृष्टिक्षेपात : 

  • भारतामध्ये एकूण करडई लागवडीपैकी ९० टक्के लागवड महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात होते. 
  • जागतिक स्तरावर चीन, कझाकिस्तान, मेक्‍सिको, अमेरिका, आशियाई देशांत करडई पिकवली जाते. युरोपीय देशांत थंड हवामान असल्यामुळे या पिकाचा कालावधी ६-७ महिने असतो. मोठ्या प्रमाणात बागायती लागवड होते. त्यामुळे उत्पादकता जास्त आहे. चीनची उत्पादकता सर्वांत जास्त म्हणजे २५०० किलो प्रतिहेक्‍टर आहे
  • संपर्कः डॉ. एस. के. शिंदे , ०२१७ - २३७२४०८. (लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्पांतर्गत सोलापूर येथे करडई पैदासकार आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com