उस लागवड तंत्रज्ञान

उस लागवड तंत्रज्ञान
उस लागवड तंत्रज्ञान

आजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस पिकाखालील क्षेत्र वाढीला मर्यादा आहे. त्याऐवजी हेक्‍टरी उत्पादकता वाढविण्याला प्राधान्य दिले पाहिजे. 

  • उसाची लागवड सुरू, पूर्व हंगामी व आडसाली या तीन हंगामात केली जाते. आडसाली हंगामातील (जुलै-ऑगस्ट) पीक हे अनुकूल हवामानामुळे जोमदार वाढते. तसेच आडसालीच्या पीक वाढीच्या १६-१८ महिन्याच्या कालावधीत दोन पावसाळी हंगामाचा फायदा मिळाल्याने सुरू हंगामाच्या दीडपट उत्पादन मिळते. पूर्वहंगामी ऊससुद्धा १४-१५ महिन्यांचा असल्याने त्याचे उत्पादनही चांगले मिळते. 
  • सन १९८०-८१ मध्ये उसाची उत्पादकता हेक्‍टरी ९० टनापेक्षा जास्त होती. परंतु, अनेक कारणामुळे ती घटत जाऊन २०११-१२ मध्ये हेक्‍टरी ७७ टनांपर्यंत खाली आली आहे. ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब व कारखानास्तरावरील नियोजन या बाबी समन्वयाने करणे आवश्‍यक आहे.
  • अधिक साखर उताऱ्यासाठी... महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्याने उसाचे उत्पादन आणि साखर उतारा वाढविण्यासाठी एकूण गळित क्षेत्राच्या १५ ते २० टक्के क्षेत्रावर आडसाली ऊस, ३०-३५ टक्के क्षेत्रावर पूर्व हंगामी ऊस आणि १५-२० टक्के क्षेत्रावर सुरू ऊसलागवड करून घेणे आवश्‍यक आहे. उर्वरित ३० ते ४० टक्के क्षेत्रावर खोडवा ऊस ठेवून उसाच्या पक्वतेनुसार गाळपाचे वेळेवर नियोजन करावे.

    यामुळे होते उत्पादकता कमी :

  • हंगामनिहाय क्षेत्र व पक्वतेनुसार ऊस तोडणीचा अभाव.
  • शुद्ध व निरोगी ऊस बेण्यासाठी त्रिस्तरीय बेणेमळ्याचा अभाव.
  • पाण्याचा, रासायनिक खतांचा असंतुलीत वापर.
  • योग्य पिकांद्वारे फेरपालटीचा अभाव. अयोग्य आंतरपीक पद्धती.
  • एकात्मिक कीड, रोग व तण नियंत्रणाचा अभाव.
  • खोडवा पिकांकडे दुर्लक्ष. 
  • सुधारित शेती औजारांचा कमी वापर.
  • आकस्मित नैसर्गिक आपत्ती. 
  • उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्र
  • जमीन व पूर्वमशागत  :

  • मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. किंवा त्याहून खोल) आणि उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. 
  • जमिनीची उन्हाळ्यात उभी व आडवी खोल नांगरटीनंतर जमीन तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कुळवाच्या उभ्या- आडव्या पाळ्यानंतर सपाटीकरण करावे. 
  • रिजरच्या सहायाने भारी जमिनीत १२० सें.मी. व मध्यम जमिनीत १०० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. 
  • पट्टा पद्धतीसाठी २.५-५ किंवा ३-६ फूट अशा जोड ओळ पद्धतीने लागवड करावी. 
  • यांत्रिक पद्धतीचा (पॉवर टिलर) वापर करावयाचा असल्यास दोन सरीतील अंतर १२० सें.मी. (चार फूट) ठेवावे. ऊस तोडणी यंत्राच्या सहायाने करणार असल्यास दोन ओळीतील अंतर १५० सें.मी. ठेवावे. यामुळे आंतरमशागत ट्रॅक्‍टरने व ऊस तोडणी यंत्राचा वापर सुलभ होतो.
  • लागवडीचे हंगाम :

  • आडसाली  :१५ जुलै ते १५ ऑगस्ट.
  • पूर्वहंगामी  : १५ ऑक्‍टोबर ते १५ नोव्हेंबर.
  • सुरू हंगाम  : १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी.
  • सुधारित जाती : आडसाली हंगाम  : फुले २६५, को ८६०३२ आणि को व्हीएसआय ९८०५. पूर्व हंगाम   : फुले २६५, को ८६०३२, को ९४०१२, को सी ६७१, को व्हीएसआ     ९८०५ आणि व्हीएसआय ४३४. सुरू हंगाम  : फुले २६५, को ८६०३२, को ९४०१२, को ९२००५, को ८०१४, को सी ६७१ को व्हीएसआय ९८०५ आणि व्हीएसआय ४३४.

    लागवड : 

  • लागवडीसाठी मळ्यातील बेणे लागवडीसाठी वापरावे. तीन ते चार वर्षांनी बेणे बदलावे. उसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी. 
  • आडसाली उसाची लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. शक्‍यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. 
  • दोन डोळ्यांची टिपरी वापरताना, दोन टिपरीमधील अंतर १५ ते ३० सें.मी. ठेवावे. ओल्या पद्धतीने लागण चालेल. मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लागणीसाठी हेक्‍टरी एक डोळ्याची ३०,००० तर दोन डोळ्यांची २५,००० टिपरी लागतील. 
  • एकडोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करताना, ४ फूट अंतरावर सऱ्या काढून दोन रोपांमधील अंतर २ फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्‍टरी १३.५ ते १४ हजार रोपे लागतील.
  • बेणे प्रक्रिया :

  • काणी, जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोग, तसेच कांडीवरील खवले कीड व पिठ्या ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी ः १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम व ३०० मि.लि. मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात टिपऱ्या १०० मिनिटे बुडवाव्यात. 
  • या प्रक्रियेनंतर ॲसिटोबॅक्‍टर जिवाणू खत १० किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत १.२५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपऱ्या ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. या प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद खतांची बचत होते. 
  • ठिबक सिंचनातून नत्रयुक्त खते :  युरिया हे संपूर्ण पाण्यात विरघळणारे उत्तम नत्रयुक्त खत आहे. लागणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान २० हप्त्यांत किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान १० हप्त्यांत नत्रखताची मात्रा विभागून ठिबकद्वारे दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते. पारंपरिक स्फुरदयुक्त व पालाशयुक्त खते नेहमीप्रमाणे दोन समान हप्त्यांत ऊस लागवणीचे वेळी व मोठ्या बाधणीचे वेळी जमिनीतून द्यावीत. (ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा वापर ही चौकट पान ४८ वर पहावी.)

    सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर :

  • शेणखत/ कंपोस्ट खत (दुसऱ्या नांगरटीपूर्वी जमिनीत मिसळावे)  आडसाली हंगाम :  ३० टन (५० ते ६० बैलगाड्या)  पूर्व हंगामी : २५ टन (४० ते ५० बैलगाड्या) प्रमाण प्रति हेक्टर  सुरू हंगाम :  २० टन (३० ते ४० बैलगाड्या)
  • शेणखत अगर कंपोस्ट खत उपलब्ध नसल्यास, ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैंचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन ४५ ते ५० दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना जमिनीत गाडावे.
  • रासायनिक खतांचे व्यवस्थापन करताना स्फुरद व पालाशयुक्त खते पेरून द्यावीत. नत्रयुक्त खते मुळाच्या सानिध्यात द्यावीत. युरियाबरोबर निंबोळी पेंडीचा १ः६ या प्रमाणात वापर करावा. 
  • हंगामनिहाय रासायनिक खत व्यवस्थापन (प्रमाण- किलो प्रती हेक्‍टर)
    अ. न.     खते देण्याची  वेळ     आडसाली     आडसाली           आडसाली    पूर्व हंगामी     पूर्व हंगामी     पूर्व हंगामी     सुरू सुरू सुरू
    लावणीच्या वेळी नत्र (युरिया) स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट) पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश)     नत्र (युरिया) स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट) पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश)     नत्र (युरिया) स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट) पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश)    
    2 लावणीच्या वेळी 40 (87) 85 (531) 85 (141) 34 (74) 85 (531) 85 (141) 25 (54) 57 (356) 57 (95)
    3 लावणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी 160 (347) -- - 136 (295) -- -- 100        
    4 लावणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी40 40 (87) ---- ---- 34 (74) ---- ---- 25 (54    ) --- ---
    5 बांधणीचे वेळी   160 (347) 85 (531) 85 (141) 136 (295) 85 (531) 85 (141) 100 (217) 58 (363) 58(96)
    6 एकूण 400(868) 170(1062) 170(282) 340(738) 170(1062) 250(542) 115(719) 115(191)  

    टीप : को ८६०३२ ही जात रासायनिक खतांच्या वाढीव मात्रेस प्रतिसाद देते. नत्र, स्फुरद व पालाश या खतांची हेक्‍टरी २५ टक्के जादा मात्रा द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणाऱ्या जमिनीसाठी गरजेनुसार हेक्‍टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मॅंगेनीज सल्फेट व ५ किलो बोरॅक्‍स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे.

    ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा वापर

    अ. क्र. आठवडे नत्र (किलो/हेक्टर) स्फूरद (किलो/हेक्टर) पालाश (किलो/हेक्टर)
    १ ते ४ ३०
    ५ ते ९ ७० ३२ १४
    १० ते १२ १०० ५१ ३२
    २१ ते २६ - - ३७
      एकूण २०० ९२ ९२

    आंतरपिके :

  • आडसाली ऊस : खरीप हंगामातील भुईमूग, चवळी, सोयाबीन, भाजीपाला इ. आंतरपिके घेता येतात. भुईमूग हे आंतरपीक घेताना फुले प्रगती, एस. बी. ११, फुले व्यास, फुले उनप, टॅग-२४, टी.जी-२६ या जाती वापराव्यात. सोयाबीन आंतरपीक घेतल्यास जे.एस.-३३५ किंवा फुले कल्याणी या जातींचा वापर करावा.
  • पूर्व हंगामी ऊस : रब्बी हंगामातील बटाटा, कांदा, लसूण, पानकोबी, फुलकोबी, वाटाणा, टोमॅटो किंवा हरभऱ्यासारखी आंतरपिके घेता येतात. नेहमीच्या ऊस लागवडीत वरंब्याच्या एका बाजूस तळापासून २-३ अंतर सोडून किंवा पट्टा अथवा जोड ओळ पद्धतीत उसाच्या लागणीनंतर ६-७ दिवसांनी म्हणजेच आंबवणीचे पाणी देण्यापूर्वी आंतरपिकाची टोकण अथवा लागण करावी. हरभरा लागवड करताना वरंब्याच्या माथ्यावर एकाच ओळीत टोकण करावी. आंतरपिकांना एकाचवेळी जास्त पाणी मानवत नसल्याने काटेकोर पाणी व्यवस्थापन करावे. 
  • सुरू ऊस : लागवड डिसेंबर महिन्यात केल्यास फ्लॉवर, कोबी, नवलकोल, गवार तसेच मुळा ही भाजीपाला पिके घेता येतात. कोथिंबीर अथवा मेथीसुद्धा घेण्यास हरकत नाही. जानेवारी महिन्यात उसाची लागण करावयाची असल्यास भुईमुगाची एस. बी ११, टॅग-२४ किंवा टी.जी.-२६ या जातींचा वापर करावा. या महिन्यात भेंडी, कांदा, चाऱ्यासाठी चवळी, सोयाबीन, कलिंगड व टरबूज ही पिके घेता येतात.
  • लागण पट्टा पद्धतीने (२.५-५ किंवा ३-६ फूट) असल्यास आंतरपीक चांगल्या प्रकारे घेता येते. आंतरपिकासाठी व्यापलेल्या क्षेत्रानुसार त्या पिकाची शिफारशीत खत मात्रा वेगळी द्यावी. 
  • उसामध्ये कांद्याच्या रोपांची लागण सरीच्या दोन्ही बाजूला १०-१५ सें.मी. अंतरावर दुसऱ्या पाण्याच्या वेळी करावी. या पिकाला मुख्य पिकाच्या खतमात्रेव्यतिरिक्त हेक्‍टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथील प्रयोगामध्ये, पूर्वहंगामी उसात बटाटा किंवा कांदा ही आंतरपिके फायदेशीर आढळली आहेत. 
  • जमिनीच्या सुपिकतेसाठी ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो. बाळबांधणीच्या वेळी ही पिके सरीमध्ये गाडून बाळबांधणी करता येते.
  • आंतरमशागत व तणनियंत्रण :

  • लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांनी जमीन वाफश्‍यावर असताना, हेक्‍टरी ५ किलो ॲट्राझीन किंवा मेट्रीब्युझिन हेक्‍टरी १.२५ किलो प्रति १००० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी. आंतरपिके असल्यास शिफारशीप्रमाणे तणनाशके फवारावीत.
  • ऊस उगवणीनंतर हरळी किंवा लव्हाळा या तणांचा प्रादुर्भाव आढळल्यास, १० लिटर पाण्यात ८० मि.लि. ग्लायफोसेट या तणनाशकाची जमिनीलगत फवारणी करावी. उसावर तणनाशक पडू नये, यासाठी प्लॅस्टिक हुडचा वापर करावा. 
  • उगवणीनंतर ६०-७० दिवसांनी २, ४-डी (क्षार स्वरुपातील) १.२५ किलो प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून तणावर फवारणी करावी. 
  • तसेच आवश्‍यकतेनुसार कृषीराजसारख्या औजारे किंवा खुरपणीद्वारे तणनियंत्रण करावे. 
  • बांधणी :

  • लागणीनंतर दोन-तीन महिन्यांनी बाळ बांधणी करावी.
  • लागवडीनंतर ४.५ ते ५ महिन्यांनी पहारीच्या औजाराने वरंबे फोडून व नंतर सायन     कुळव चालवून आंतरमशागत करावी. खतांची मात्रा देऊन रिजरच्या सहायाने मोठी बांधणी करावी. सिंचनासाठी सऱ्या, वरंबे सावरून घ्यावेत.
  • पाणी व्यवस्थापन :

  • लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या ८ सें.मी. खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर १० सें.मी. खोलीच्या पाणी पाळ्या द्याव्यात. 
  • हंगामानुसार उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात १४ ते १५ दिवसांनी व हिवाळ्यात १८ ते २० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करू नये. अधिक उत्पादन व जमिनीच्या सुपीकतेसाठी सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा अवलंब करावा, यासाठी पट्टा पद्धत किंवा रुंद सरी पद्धतीचा अवलंब करावा.
  • तोडणी व उत्पादन :  

  • आडसाली हंगाम : तोडणी १४ ते १६ महिन्यांनंतर करावी. प्रचलित फुले २६५ आणि को ८६०३२ या जातींचे हेक्‍टरी २००-२५० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळते.
  • पूर्व हंगामी : तोडणी १३ ते १५ महिन्यांनंतर करावी. प्रचलित फुले २६५ आणि को ८६०३२ या जातींचे हेक्‍टरी १५०-२०० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळते.
  • सुरू हंगाम : तोडणी १२ ते १३ महिन्यांनंतर करावी. प्रचलित फुले २६५ आणि को ८६०३२ या जातींचा वापर केल्यास हेक्‍टरी १२०-१५० टनांपर्यंत ऊस उत्पादन मिळते.
  • खोडवा व्यवस्थापन : 

  • गाळपासाठी पक्व ऊस पिकाची जमिनीलगत तोडणी करावी. बुडखे मोकळे करून पाचट सरीत लोटावे.
  • वरती राहिलेले बुडखे धारदार कोयत्याने छाटावेत. छाटलेल्या बुडख्यावर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणे फवारणी करावी. 
  • सरीत लोटलेल्या पाचटावर ८ किलो युरिया, १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १ किलो पाचट कुजविणारे जिवाणू प्रतिटन पाचटासाठी वापरावे व खोडवा पिकास पाणी द्यावे. 
  • वाफसा आल्यानंतर ५० टक्के रासायनिक मात्रा (सूक्ष्म अन्नद्रव्यांसह) पहारीच्या सहायाने बेटापासून अर्धा फूट अंतरावर, अर्धा फूट खोलीवर द्याव्यात. दोन खड्ड्यांमधील अंतर १ फूट ठेवावे. ही मात्रा सरीच्या बाजूने ऊस तुटल्यावर १५ दिवसांचे आत द्यावी. उर्वरित ५० टक्के मात्रा याच पद्धतीने, परंतु सरीच्या विरुद्ध बाजूने १३५ दिवसांनी द्यावी.
  • आपत्कालीन व्यवस्थापन :   ऊस हे उष्ण कटिबंधातील पीक असल्यामुळे त्यास उष्ण हवामान, २० ते ३० सें. तापमान, ८०-९० टक्के आर्द्रता, प्रखर सूर्यप्रकाश, पुरेसे पाणी पोषक असते. तथापि कडक उन्हाळा, तसेच कमी पाऊसमान याचा पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. आपत्कालीन परिस्थितीत उसावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना :

  • को ८६०३२ व कोएम ०२६५ हे वाण अन्य जातीपेक्षा पाण्याचा ताण सहन करतात. त्यांना प्राधान्य द्यावे.
  • पाणी उपलब्धता कमी असल्यास, एक आड एक सरीतून पाणी द्यावे.
  • पाण्याचा ताण पडत असल्यास, उभ्या उसाची खालील पक्व तसेच वाळलेली पाने काढून सरीत आच्छादन करावे. 
  • ताण अवस्थेत लागणीनंतर ६०, १२० आणि १८० दिवसांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व २ टक्के युरिया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी.
  • बाष्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ टक्के केओलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
  • ठिबक जलसिंचन पद्धतीचा वापर करावा.
  • ऊस पिके हे तणविरहीत ठेवावे.
  • शेताच्या सभोवती उंच जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
  • लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडव्याच्या पिकास हेक्‍टरी ५ ते ६ टन पाचटाचे आच्छादन करावे. प्रतिटन पाचटासाठी ८ किलो युरिया, १० किलो सुपर फॉस्फेट व १ किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.  
  • - डॉ. सुरेश पवार, संदेश देशमुख, दिपक पोतदार संपर्क : ०२१६९- २६५२३३ (लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com