सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान

सुर्यफुल लागवड तंत्रज्ञान
सुर्यफुल लागवड तंत्रज्ञान

हवामान : 

  • तीनही हंगामात लागवड शक्‍य.
  • बी उगवण ही कमीत कमी तापमान ८ ते १० अंश सेल्सिअस, तर जास्तीत जास्त तापमान ४० अंश सेल्सिअस असेल तरी चांगल्याप्रकारे होते.
  • चांगल्या वाढीसाठी तसेच तेल प्रमाण वाढीसाठी रात्रीचे तापमान १८ ते २० अंश सेल्सिअस, तर दिवसाचे २४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान योग्य असते.
  •  पीक फुलावर असताना जास्त उष्णतामान (३६ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त) किंवा जास्त थंडी (८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी) किंवा मोठ्या प्रमाणावर धुके असले तर दाणे भरण्यावर अनिष्ट परिणाम होतो.
  • जमीन

  • पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत लागवड करावी.
  • पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास पिकाची योग्य वाढ होत नाही. पिकावर केवडा रोग येण्याची शक्‍यता. 
  • कोकणातील जांभा दगडापासून तयार झालेल्या किंवा पाणथळ जमिनीत पीक चांगले येत  नाही. फार भारी जमिनीत उंच वाढून लोळण्याची शक्‍यता असते. चोपण जमिनीत हे पीक चांगले येत नाही.
  • सर्वसाधारणपणे ३० सें.मी.पेक्षा जास्त खोल कसदार जमीन लागवडीस निवडावी.
  • जमीन आम्लधर्मीय, क्षारयुक्त असली तरी तिचा सामू ६.५ ते ८.५ अशा दरम्यान असावा. 
  • सूर्यफुलाचे सुधारित वाण व त्यांची संक्षिप्त वैशिष्ट्ये मॉर्डन -  उत्पादन (क्विं./हे.) : 800-1500 कालावधी (दिवस) : 80-85 तेल (टक्के) : 34-35  क्षेत्र : संपूर्ण भारत  गुणवैशिष्ट्ये : बुटकी व लवकर येणारी जात

    एस.एस. 56 -  उत्पादन (क्विं./हे.): 800-1400  कालावधी (दिवस) : 82-88  तेल (टक्के): 34-36  क्षेत्र : महाराष्ट्र  गुणवैशिष्ट्ये : लवकर येणारी जात

    टी.एन.ए.यू. एस.यू.एफ.-7 :  उत्पादन (क्विं./हे.) : 1000-1700  कालावधी (दिवस) : 85-90  तेल (टक्के) : 38-41  क्षेत्र : संपूर्ण भारत गुणवैशिष्ट्ये : लवकर येणारी जात

    डी.आर.एस.एफ. 108 :   उत्पादन (क्विं./हे.) 900-1800  कालावधी (दिवस): 95-100 तेल (टक्के): 36-39  क्षेत्र : संपूर्ण भारत गुणवैशिष्ट्ये : अधिक तेल प्रमाण

    एल.एस.एफ.-8 :  उत्पादन (क्विं./हे.): 1000-1400  कालावधी (दिवस): 90-95 तेल (टक्के): 36-39  क्षेत्र : महाराष्ट्र  गुणवैशिष्ट्ये : केवडा, ठिपके व तांबेरा रोगास प्रतिकारक

    भानू (एस.एस. 2038) :  उत्पादन (क्विं./हे.) : 1000-1400 कालावधी (दिवस):85-90  तेल (टक्के): 34-36 क्षेत्र : महाराष्ट्र  गुणवैशिष्ट्ये : अधिक उत्पादन

    डी.आर.एस.एफ.-113 :   उत्पादन (क्विं./हे.) : 1000-1500 कालावधी (दिवस) : 90-98  तेल (टक्के) : 36-39 क्षेत्र : संपूर्ण भारत गुणवैशिष्ट्ये : अधिक उत्पादन सूर्यफुलाचे संकरित वाण व त्यांची गुणवैंशिष्टये : 

    बी.एस.एच.-1  उत्पादन (क्विं./हे.) : 900  कालावधी (दिवस) : 85  तेल (टक्के): 41  क्षेत्र :संपूर्ण भारत  गुणवैशिष्ट्ये : अधिक उत्पादन, तांबेरा व केवडा रोगास प्रतिकारक

    एल.एस.एच.-3  उत्पादन (क्विं./हे.) : 1200  कालावधी (दिवस) : 95  तेल (टक्के): 39  क्षेत्र : महाराष्ट्र  गुणवैशिष्ट्ये : केवडा रोगास प्रतिकारक

    के.बी.एस.एच.-1  उत्पादन (क्विं./हे.) :1400  कालावधी (दिवस) : 90  तेल (टक्के): 43  क्षेत्र : संपूर्ण भारत  गुणवैशिष्ट्ये : अधिक उत्पादन

    पी.के.व्ही.एस.एच.-27  उत्पादन (क्विं./हे.) :1300-1400  कालावधी (दिवस) :85-90  तेल (टक्के): 39  क्षेत्र : विदर्भ  गुणवैशिष्ट्ये : केवडा रोगास मध्यम प्रतिकारक

    के.बी.एस.एच.-44  उत्पादन (क्विं./हे.) : 1400-1600  कालावधी (दिवस) :95-98  तेल (टक्के): 36-38  क्षेत्र : संपूर्ण भारत  गुणवैशिष्ट्ये : केवडा रोगास प्रतिकारक

    एल.एस.एफ.एच. 35 (मारुती)  उत्पादन (क्विं./हे.) :1400-1500  कालावधी (दिवस) : मध्यम  तेल (टक्के): 39-41  क्षेत्र : महाराष्ट्र  गुणवैशिष्ट्ये : केवडा रोगास प्रतिकारक

    डी.आर.एस.एच.-1  उत्पादन (क्विं./हे.) : 1300-1600  कालावधी (दिवस) : 92-98  तेल (टक्के): 42-44  क्षेत्र : संपूर्ण भारत  गुणवैशिष्ट्ये : अधिक तेलप्रमाण

    फुले रविराज  उत्पादन (क्विं./हे.) : 1200-1700  कालावधी (दिवस) : 90-95  तेल (टक्के): 34  क्षेत्र : पश्‍चिम महाराष्ट्र  गुणवैशिष्ट्ये : नेक्रॉसिस, ठिपका या रोगास प्रतिकारक

    एल.एस.एफ.एच. 171  उत्पादन (क्विं./हे.) : 1400-1800  कालावधी (दिवस) : 90-95  तेल (टक्के): 37-39  क्षेत्र : महाराष्ट्र  गुणवैशिष्ट्ये : केवडा रोगास प्रतिकारक  

    लागवडीचा हंगाम : 

  • हे पीक प्रकाश असंवेदनशील असल्यामुळे तीनही हंगामात घेतले जाते.
  • रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये चांगले उत्पादन मिळते. कारण या हंगामामध्ये पिकास चांगला सूर्यप्रकाश मिळतो. रोग, किडीचे प्रमाण कमी असते.
  • खरीप पेरणी ः जुलैचा पहिला पंधरवडा.
  • रब्बी पेरणी ः ऑक्‍टोबरचा पहिला पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा.
  • उन्हाळा पेरणी ः फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा.
  • सूर्यफूल मध्य हंगाम दुरुस्तीसाठी चांगले पीक.
  • खरीप जमिनीसाठी (45 सें.मी. खोल) मध्य हंगाम दुरुस्ती
    पावसाचे आगमन  पिके
    जून दुसरा पंधरवडा  सर्व खरिपाची पिके
    जुलै पहिला पंधरवडा  आंतरपीक बाजरी + तूर (2ः1), सूर्यफूल + तूर (2ः1), गवार + तूर (2ः1), एरंडी + गवार (1ः2)
    जुलै दुसरा पंधरवडा  सूर्यफूल, तूर, हुलगा, राळा एरंडी आंतरपीक, सूर्यफूल तूर (2ः1), तूर + गवार
    ऑगस्ट पहिला  पंधरवडा सूर्यफूल, तूर, एरंडी, हुलगा, सूर्यफूल + तूर (2ः1)
    ऑगस्ट दुसरा पंधरवडा सूर्यफूल, तूर, एरंडी, सूर्यफूल + तूर (2ः1)

    पूर्वमशागत : 

  • पिकाचे मूळ ६० सें.मी.पर्यंत खोलवर जात असल्यामुळे २० ते ३० सें.मी. खोलवर पहिली नांगरट करावी. दुसरी नांगरट उथळ करावी. त्यानंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
  • जमिनीत हुमणीचा प्रादुर्भाव असल्यास नांगरताना शिफारस केलेल्या रासायनिक उपायांचा वापर करावा.
  •  कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देण्याच्या वेळेस शेवटच्या पाळीपूर्वी हेक्‍टरी २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
  • जिरायती भागात पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर लगेच सारे पाडावेत. सारे पाडून ठेवल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरून जास्त काळ ओलावा टिकून राहतो.
  • लागवड अंतर : 

    लागवड अंतर
    माती आणि वाणाचा प्रकार  अंतर (सें.मी.) रोपांची संख्या (प्रतिहेक्‍टरी) 
    मध्यम ते खोल जमिन , सुधारित वाण   45 X 30  74,000 
    भारी जमिन   60X30  55,000
     संकरित वाण : 60 X 30 55,000

    हेक्‍टरी बियाणे : 

  • सुधारित जाती - ८ ते १० किलो प्रतिहेक्‍टरी
  • संकरित जाती - ५ ते ६ किलो प्रतिहेक्‍टरी
  • पेरणीची पद्धत : 

  • दोन चाड्याच्या पाभरीने पेरणी करावी. त्यामुळे रासायनिक खते व बी एकाच वेळी पेरता येतात.
  • टोकण पद्धतीने लागवड केल्यास बियाण्यात बचत होते.
  • विरळणी : 

  • पेरणीनंतर १० ते १५ दिवसांनी विरळणी करावी.
  • विरळणी केलेल्या क्षेत्रामध्ये बिगर विरळणी क्षेत्रापेक्षा १८ ते २३ टक्के अधिक उत्पादन मिळते. 
  • नांगे भरणे : 

    पेरणीनंतर ज्या ठिकाणी रोप उगवणी झाली नसेल, बाल्यावस्थेतच रोपे कोमेजली असतील अशा ठिकाणी पेरणीनंतर सात दिवसांनी त्याच जातीचे बियाणे १० तासाकरीता १ः१ या प्रमाणात पाण्यात भिजवून,त्यानंतर सावलीमध्ये सुकवून या बियाणापासून नांगे भरावेत. यामुळे हेक्‍टरी रोपांची अपेक्षित संख्या राखली जाऊन प्रतिहेक्‍टरी जास्तीत जास्त उत्पादन मिळते.

    तण नियंत्रण : 

  • पीक सुमारे २० दिवसांचे असताना एक आणि ३० ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी.
  • तणाचे प्रमाण जास्त असल्यास एखादी खुरपणी करावी. आंतरमशागतीमुळे जमिनीत हवा खेळती राहून पिकाची वाढ जोमाने होते.
  • तणनाशकांचा वापर : 

  • पेरणीनंतरच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेस, पेंडीमिथॅलीनची शिफारसीनुसार फवारणी करावी.
  • फवारणी करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा.
  • तणनाशकांच्या एका फवारणीनंतर किंवा पेरणीनंतर ३५ दिवसांनी कोळपणी केल्यास तण नियंत्रण होते.
  • फुटी काढणे :  

  • ताणसदृश्‍य कालावधीमध्ये बगला फुटून एकापेक्षा जास्त फुले येतात. अशावेळी फुटी काढून वरील फक्त एकच मुख्य फुल ठेवावे. त्यामुळे एकाच फुलातील दाणे भरण्याचे प्रमाण वाढून, उत्पादनात वाढ होते. 
  • एकापेक्षा जास्त खोड किंवा फांद्या येतात अशावेळी इतर सर्व फांद्या काढून फक्त एकच मुख्य खोड ठेवावे.
  • पूरक परागीकरण : 

  • हे पीक परपरागसिंिचत आहे. परागकण जड असल्यामुळे वाऱ्यापासून परपरागीकरण अतिशय कमी प्रमाणात होते. 
  • मधमाश्‍यांद्वारे सर्वात जास्त परागीकरण होते, परंतु जर नैसर्गिक मधमाश्‍या कमी आढळल्यास कृत्रिमरीत्या परागीकरण घडवून आणल्यास उत्पादनात २० ते ४० टक्के वाढ होते. 
  • मधमाश्‍या परागीकरण :  मधमाश्‍या मध गोळा करीत असताना त्यांचे पाय, अंगाला परागकण चिकटून एका फुलावरून दुसऱ्या फुलावर टाकले जाते. त्यामुळे परागीकरणास मदत होऊन बीजधारणा प्रमाण वाढते. प्रतिहेक्‍टरी किमान पाच मधमाश्‍यांच्या पेट्या पुरेशा ठरतात.

    हस्त परागीकरण : 

  • ज्या ठिकाणी मधमाश्‍यांचे प्रमाण कमी असते तसेच मधमाश्‍या पाळणे शक्‍य नसते, अशा ठिकाणी हस्त परागीकरण करावे.
  • हाताला तलम व मऊ कापड गुंडाळून फुलांवरून हलकासा हात फिरवावा. यामुळे एका फुलावरील परागकण दुसऱ्या फुलावर पडून परागीकरण होते.
  • पीक फुलोऱ्यात असताना सकाळी ८ ते ११ या वेळेत एका आड एक दिवशी हस्त परागीकरण करावे.
  • संजीवकाचा वापर : 

  • फुले उमलण्याच्यावेळी पेरणीपासून ४५ ते ५५ दिवसांनी २० पी.पी.एम. प्रमाणात नॅप्थील ॲसेटीक ॲसीड (एन.ए.ए.) या संजीवकाची फवारणी केली असता दाणे भरण्याचे प्रमाण वाढते, उत्पादनात वाढ होते.
  • ०.२ टक्के प्रमाणात बोरॉनची फवारणी पीक फुलोऱ्यात असताना केल्यास परागकणांची कार्यक्षमता सुधारून परागीभवनास त्याचा फायदा होतो. फुलातील दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
  • पाणी व्यवस्थापन : 

  • कळी धरणे (३० ते ४० दिवस), फुल उमलणे (५५ ते ६५ दिवस) आणि दाणे भरणे (६५ ते ७५ दिवस) या पीक वाढीच्या संवेदनशील काळात  पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.
  • जमिनीनुसार तसेच हंगामानुसार काळ्या व भारी जमिनीमध्ये २० ते २५ दिवसांच्या अंतराने तर मध्यम व हलक्‍या जमिनीमध्ये ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
  • जर पाणी उपलब्ध नसेल व केवळ एका पाळीकरीता पाणी उपलब्ध असेल तर, पीक फुलोरा या प्रमुख संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी द्यावे.
  •  दोन पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास, फुलकळी अवस्था व पीक फुलोरा या संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी द्यावे.
  • चार पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असल्यास, रोपावस्था, फुलकळी अवस्था, पीक फुलोऱ्यावर असताना, दाणे भरण्याची अवस्था या चार संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी द्यावे.
  • ====
  • जमीन व हंगामनिहाय पाण्याच्या पाळ्या
    हंगाम  पाण्याच्या पाळ्या (दिवसांचे अंतर)   पाण्याच्या पाळ्या (दिवसांचे अंतर)   पाण्याच्या पाळ्या (दिवसांचे अंतर) 
      हलकी जमीन  मध्यम जमीन  भारी जमीन
    खरीप 3 ते 4  2 ते 3  1 ते 2
    रब्बी   4 ते 6  3 ते 4  2 ते 3  
    उन्हाळी  6 ते 8  4 ते 5  3 ते 4
    संवेदनशील अवस्थेनूसार पाणी व्यवस्थापन
    संवेदनशील अवस्था  पेरणीनंतर दिवस   पेरणीनंतर दिवस 
      कमी कालावधीच्या जाती : जास्त कालावधीच्या जाती : 
    कळी बाहेर पडण्याची अवस्था 30 ते 35  35 ते 40 
    फुले उमलण्याची अवस्था  45 ते 50  55 ते 65 
    दाणे भरण्याची अवस्था 55 ते 80  65 ते 90 

    खत व्यवस्थापन : 

  • एक टन सूर्यफुलाचे पीक जमिनीमधून ६३ किलो नत्र, २४ किलो स्फुरद, ११० किलो पालाश, ११ किलो सल्फर, ६० किलो कॅल्शियम, २६ किलो मॅग्नेशियम, बोरॉन ११३ ग्रॅम व ९९ ग्रॅम झिंकचे शोषण करते.
  • पेरणीपूर्वी दोन आठवडे अगोदर जमिनीमध्ये आठ टन प्रतिहेक्‍टरी चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
  • माती परीक्षण अहवालानुसार शिफारस मात्रेत बदल करून रासायनिक खताची मात्रा द्यावी.
  •  सायनिक खताच्या कार्यक्षम उपयोगासाठी पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. पेरणी करताना वरच्या छिद्रातून बियाणे तर  खालच्या छिद्रातून रासायनिक खते पेरावेत.
  • पिकास नत्राची मात्रा अमोनियम सल्फेटमधून आणि स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटमधून दिल्यास या खतामधून गंधक व कॅल्शियम या दुय्यम पोषण द्रव्याचा पुरवठा होऊन तेल व दाण्याचे उत्पादन अधिक मिळते.
  • पेरणी करतेवळी ५० टक्के नत्र, पूर्ण स्फुरद व पूर्ण पालाश जमिनीत मिसळावे. उरलेले ५० टक्के नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी कोळपणीनंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना मिसळावे.
  • बागायती क्षेत्राकरिता उरलेला नत्राचा हप्ता पेरणीनंतर ३० दिवसांनी व ६० दिवसांनी असा दोन वेळा विभागून द्यावा.
  • रासायनिक खत मात्रा (प्रतिहेक्टरी )
     क्षेत्र  नत्र  किलो  स्फुरद किलो  पालाश किलो
    जिरायती  50  25 25 
    बागायती  60 30 30

    सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन : 

  • गंधक हे वनस्पतीमध्ये तेलनिर्मिती करणारे अन्नद्रव्य आहे. राज्यातील बऱ्याचशा जमिनीमध्ये गंधकाची कमतरता आहे. 
  • विदर्भामध्ये असे आढळले आहे की, २० किलो प्रति हेक्‍टरी गंधकाचे प्रमाण अमोनियम सल्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट खतामधून दिल्यास  पिकाचे अधिक उत्पादन मिळते. 
  • पुरेशी गंधकाची मात्रा पिकास दिल्यास १० ते ४५ टक्‍यांपर्यंत अतिरिक्त उत्पादनात वाढ दिसते.
  • फुलोरा अवस्थेमध्ये पाकळ्या बाहेर पडल्यानंतर ०.२ टक्के बोरॉनची फवारणी (दोन ग्रॅम बोरॉन प्रति लिटर पाणी) केली असता  फुलातील दाणे भरण्याचे प्रमाण, तेल प्रमाण व उत्पादन वाढते.
  •  संपर्क : ०२१७- २३७३२०९

      (लेखक अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू  शेती संशोधन प्रकल्प, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com