तंत्र कांदा साठवणुकीचे...

कांदा साठवणूक तंत्रज्ञान
कांदा साठवणूक तंत्रज्ञान

जून ते ऑक्‍टोबर या काळात कांद्याची काढणी होत नसते. खरिपाचा नवीन कांदा ऑक्‍टोबरनंतर बाजारात येऊ लागतो. खरी साठवण ही रब्बी कांद्याची करावी लागते. ही साठवण फायदेशीर ठरते. स्थानिक बाजारपेठेत दराची  स्थिरता आणि निर्यातीसाठी कांद्याची उपलब्धता वाढविण्यासाठी साठवण आवश्‍यक आहे.

साठवणुकीसाठी काढणीपूर्वी नियोजन :  जातीची निवड :

  • खरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही. रब्बी हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे पाच महिने साठवणीत टिकतात. त्यातही जातीपरत्वे बराच फरक पडतो.
  • एन २-४-१, ॲग्रिफाऊंड लाइर्ट रेड किंवा अर्का निकेतन या जाती सहा महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात. भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जातीदेखील साठवणीत चांगल्या टिकतात.
  • खते आणि पाणी नियोजन : 

  • खतांची मात्रा, प्रकार तसेच पाणी नियोजन यांचा साठवणीवर परिणाम होतो.
  • शक्‍य होईल तितके नत्र सेंद्रिय खतामधून द्यावे. सर्व नत्र लागवडीनंतर ६० दिवसांच्या आत द्यावे. उशिरा नत्र दिले तर माना जाड होतात, कांदा टिकत नाही.
  • पालाशमुळे साठवण क्षमता वाढते. रब्बी कांद्यासाठी पालाशची मात्रा वाढवावी.
  • गंधकासाठी अमोनियम सल्फेट ऑफ पोटॅश किंवा सुपर फॉस्फेटचा वापर केला तर गंधकाची गरज आपोआप पूर्ण केली जाते; परंतु अलीकडे संयुक्त दाणेदार खतांचा वापर होत असल्यामुळे त्यातून फक्त नत्र, स्फुरद व पालाश हीच अन्नद्रव्ये मिळतात, तेव्हा गंधकासाठी गंधकयुक्त खत लागवडीपूर्वी देणे साठवण चांगली होण्याची आवश्‍यक आहे.
  • पाणी देण्याची पद्धत, पाण्याचे प्रमाण याचा परिणाम साठवणीवर होत असतो. दोन्ही पिकांना पाणी कमी; परंतु नियमित लागते. कंद पोसत असताना एकाच वेळी भरपूर पाणी दिले तर माना जाड होतात. जोड कांद्याचे प्रमाण वाढते.
  • काढणीअगोदर २ ते ३ आठवडे पाणी बंद करावे. कांदा साठवणीत चांगले टिकण्यासाठी काढणीपूर्वी सल्यानुसार योग्य उपाययोजना करावी.  
  • कांद्याच्या ५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी.
  • साठवणुकीसाठीचे नियोजन : 

    कांदा सुकवणे : 

  • काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात, की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पाल्याने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. 
  • त्यानंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी. चिंगळी, जोड कांदा व डेंगळे आलेले कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो. 
  • बऱ्याच वेळा शेतकरी कांदा काढला की कापून लगेच ढीग लावतात. ओल्या पानांनी ढीग झाकतात. मात्र कांदा काढून तो पानासहित वाळवला तर पानातील ॲबसेसिक ॲसिड पानातून कांद्यामध्ये उतरते, त्यामुळे कांद्यास सुप्तावस्था प्राप्त होते. त्यामुळे कांदे चांगले टिकतात.
  • साठवणगृहातील वातावरण  : 

  • चांगल्या साठवणीसाठी साठवणगृहात ६५ ते ७० टक्के आर्द्रता, तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असावे लागते. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून साठवणगृहाची रचना केली तर तापमान व आर्द्रता काही अंशी मर्यादित ठेवून साठवणीतील नुकसान कमी करता येते.
  • साठवणगृहाची रचना  : 

  • साठवणगृहाचे दोन प्रकार असतात. नैसर्गिक वायुविजनाचा वापर करून उभारलेले साठवणगृह आणि विद्युत ऊर्जेचा वापर करून बनवलेली शीतगृहे.
  • नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळ ही एक पाखी आणि दोन पाखी या दोन प्रकारची असतात. एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर करावी. दोन पाखी चाळीची उभारणी पूर्व-पश्‍चिम करावी.
  • चाळीची लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. तळाशी हवा खेळती असावी, तसेच बाजूच्या भिंतीदेखील लाकडाच्या किंवा बांबूच्या असाव्यात. त्यास फटी असाव्यात.
  • चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीभोवतीची जागा स्वच्छ असावी. तळाशी मुरूम, वाळूचा थर द्यावा. त्यानंतर चाळीची उभारणी करावी. तळाशी एक फुटाची मोकळी जागा ठेवावी.
  • चाळीचे छप्पर शक्‍यतो उसाच्या पाचटाने झाकावे. कौल महाग पडतात. चाळीचा खर्च वाढतो. सिमेंट किंवा पन्हाळी पत्र्यांनी चाळीत उष्णता वाढते. सिमेंट पत्रे व त्यावर उसाच्या पाचटाचे आच्छादन केले तर तापमान कमी राहण्यास मदत होते.
  • चाळीचे छप्पर उतरते असावे. ते उभ्या भिंतीच्या तीन फूट पुढे असावे, त्यामुळे पावसाचे ओसाडे कांद्यापर्यंत पोचत नाहीत, कांदा खराब होणार नाही.
  • साठवलेल्या कांद्याची उंची व रुंदी : 

  • चाळीतील कांद्याची उंची ४ ते ५ फुटांपेक्षा जास्त असू नये. उंची वाढल्यामुळे तळातील कांद्यावर वजन वाढते. हवा खेळती राहत नाही.
  • पाखीची रुंदीदेखील ४ ते ४.५ फुटांपेक्षा जास्त असू नये. रुंदी वाढवली तर वायुविजन नीट होत नाही. थरातील मध्यावरील कांदे सडतात.
  • चाळीची उभारणी :  तळाशी हवा खेळती राहणारी दोन पाखी चाळ : 

  • या चाळीची रचना पूर्व-पश्‍चिम करावी. चाळीची लांबी ३० ते ५० फूट असावी. लांबी ५० फुटांपेक्षा जास्त असू नये. लांबी वाढवली तर कांदा सडण्याचे प्रमाण वाढते. चाळ दोन पाखी असावे.
  • एका पाखीची रुंदी चार फूट असावी. दोन पाख्यांमध्ये वावरण्यासाठी चार फूट मोकळी जागा असावी म्हणजेच चाळीची रुंदी १२ फूट असावी.
  • तळ अधांतरी असावा. जमिनीपासून अधांतरी तळाची उंची एक फूट असावी. तळ व बाजू लाकडी पट्ट्याने किंवा बांबूने बनवलेल्या असाव्यात.
  • अधांतरी तळासाठी लोखंडी पाइप किंवा सिमेंट पट्ट्यांचा वापर करू नये. दोन पट्ट्यांमध्ये एक ते १.५ इंच फट असावी. लहान आकाराचे कांदे पडणार नाहीत इतपत फट असावी, त्यामुळे वायुविजन चांगले होते.
  • चाळीचे छप्पर ॲसबेस्टॉसचे असावे. लोखंडी पत्रे वापरल्यास साठवणगृहात तापमान वाढते. छपराचे पत्रे बाजूच्या भिंतीच्या २ ते २.५ फूट पुढे आलेले असावेत, त्याला पाख्या असे म्हणतात.
  • पाख्या लांब ठेवल्यामुळे पावसाचे ओसाडे लागून कांदा भिजत नाही, सड कमी होते. 
  • चाळीची मध्यावरील उंची अधांतरी तळापासून आठ फूट असावी, तर बाजूची उंची सहा फूट असावी.
  • प्रत्येक पाखीमध्ये दहा फुटांचे कप्पे असावेत. प्रत्येक कप्प्यासाठी कांदा भरण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी झडपा असाव्यात. झडपा किंवा छोटे दरवाजे स्थानिक सुतार किंवा कारागिराच्या अनुभवातून सोईनुसार तयार करावेत.
  • पाखीमध्ये कांदा भरल्यानंतर त्याच्यावर कमीत कमी दोन फुटांची मोकळी जागा राहील याची काळजी घ्यावी.
  • साठणवगृहाच्या दरवाजाकडील व त्याच्या मागच्या बाजूवरील त्रिकोणी भागातून पाऊस आत जाणार नाही म्हणून पत्र्याचा भाग पुढे वाढवून घ्यावा किंवा त्या भागावर नायलॉनची ६० टक्के सच्छिद्र जाळी बसवावी.
  • तळाशी हवा खेळती राहणारी एक पाखी चाळ : 

  • तळाशी हवा खेळती राहणाऱ्या व पाख्यांची लांबी जास्त असणाऱ्या चाळीची रचना केली आहे. 
  • एक किंवा दोन एकर कांदा उत्पादन करणाऱ्या लहान शेतकऱ्यांना एक पाखी चाळी उपयुक्त आहे. 
  • एक पाखी चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. पूर्व-पश्‍चिम रचना केली तर वायुविजन व्यवस्थित होत नाही, सड वाढते.
  • चाळीची आतील रुंदी चार फूट असावी. लांबी गरजेनुसार २० ते ३० फूट असावी. तळाशी एक फूट मोकळी जागा ठेवून अधांतरी तळाची योजना असावी. चाळीची मध्यावरील उंची ६.५ फूट, तर बाजूची उंची पाच फूट असावी.
  • छप्पर कौलारू, ॲसबेस्टॉस पत्रे किंवा उसाच्या पाचटाने शाकारलेले असावे. बाजू व तळाशी लाकडी पट्ट्या किंवा बांबूचा वापर करावा.
  • उसाच्या पाचटाचे छप्पर वापरल्यामुळे खर्च खूपच कमी होतो. छप्पराची दुरुस्ती किंवा बदली दर तीन वर्षांनी करावी.
  • उसाच्या पाचटाने शाकारलेल्या चाळीत तापमान कमी राहते, तसेच आर्द्रता कमी राहते, त्यामुळे सर्वांत कमी सड होते.
  • तळाशी मर्यादित हवा खेळती राहणारी  आणि छपराजवळ झरोके असणारी चाळ : 

  • प्रचलित शिफारस केलेल्या दोन्ही प्रकारच्या चाळीमुळे कांदा वजनातील घट कमी करण्यास मदत होते; परंतु जुलै ते सप्टेंबरपर्यंत सतत पडणाऱ्या पावसामुळे किंवा ढगाळ वातावरणामुळे वाढत जाणारी आर्द्रता चाळीतदेखील वाढत जाते. जेवढी आर्द्रता बाहेर असते जवळपास तेवढीच आर्द्रता चाळीमध्ये असते, त्यामुळे सड होते, तसेच कोंब फुटण्याचे प्रमाण वाढते. 
  • आर्द्रता कमी करण्यासाठी ही चाळ दोन पाखी आहे. त्याची सर्व रचना तळाशी हवा खेळती राहणाऱ्या दोन पाखी चाळीप्रमाणे आहे; परंतु याची उभारणी दक्षिण-उत्तर केली जाते. तळाशी मोकळी जागा असते; परंतु दक्षिण-उत्तर व पूर्व बाजू बंद केलेल्या असतात. पश्‍चिम बाजूवर झडपा असतात. पूर्वच्या बाजूवर छताच्या खाली जाळीदार खिडक्‍या असतात.
  • पश्‍चिमेकडील वाऱ्याच्या झोतासोबत हवा तळाशी मोकळ्या जागेत घुसते. तिला तिन्ही बाजूंनी प्रतिबंध केल्यामुळे ती अधांतरी तळातील फटीमधून साठवलेल्या कांद्यामधून पूर्वेच्या बाजूवरील खिडक्‍यामधून बाहेर पडते, त्यामुळे हवा खेळती राहते.
  • पावसाळ्यात हवेत दमटपणा वाढल्यानंतर पश्‍चिम बाजूच्या झडपा बंद केल्यानंतर साठवणगृहातील आर्द्रता कमी करता येते, तसेच आतील तापमान वाढवता येते. साठवणगृहात २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ७५ टक्के आर्द्रता राखता येते. 
  • ज्या भागात सतत आर्द्रता जास्त असते अशा भागात अशा प्रकारची चाळ अधिक उपयुक्त ठरू शकेल.
  • या चाळीत सध्या शिफारस केलेल्या चाळीपेक्षा कांदा अधिक चांगला टिकतो.
  • शीतगृह :

  • शीतगृहामध्ये (+ -)  ० ते २ अंश सेल्सिअस तापमान व ६५ टक्के आर्द्रता राखली जाते. अशा वातावरणात कांदे ८ ते १० महिने चांगले राहू शकतात. वजनात अजिबात घट होत नाही, तसेच सडदेखील होत नाही; परंतु शीतगृहाच्या बाहेर काढल्यानंतर त्यांना लगेच कोंब येतात.
  • शीतगृह व विकिरण प्रक्रिया केंद्र यांची साखळी निर्माण करणे आवश्‍यक आहे. भाभा अणू ऊर्जा संशोधन केंद्राने कांद्यावर विकिरणांचा प्रयोग करून कांदे कोंब न येता बराच काळ टिकविता येतात याबाबत संशोधन केले आहे.
  • कांदा व लसूण संशोधन केंद्राने भाभा अणू ऊर्जा संशोधन केंद्राच्या मदतीने कांद्यावर विकिरणांचा वापर करून ते शीतगृह व नैसर्गिक वायुविजनावर आधारित चाळीत ठेवून प्रयोग केले.
  • विकिरण प्रक्रिया केल्यामुळे कांद्याला कोंब फुटले नाहीत. शीतगृहातून बाहेर काढल्यानंतरदेखील त्यांना कोंब फुटले नाहीत. त्यांच्या वजनात जरासुद्धा घट झाली नाही.
  • शीतगृहातील साठवणीचा खर्च जास्त येतो. निर्यातीसाठी किंवा बियाण्यासाठी लागणाऱ्या कांद्याची साठवण शीतगृहात करणे परवडू शकेल.
  • - डॉ. विजय महाजन संपर्क : ०२१३५ - २२२०२६ (लेखक राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com