जनावरांतील जखमांवर वेळेवर उपचार महत्त्वाचे...

जनावरांचे आजार
जनावरांचे आजार

जनावरांना काही कारणास्तव जखमा होतात. या जखमांमुळे जनावर अस्वस्थ, अशक्त होते. त्यातून रक्तस्त्राव होतो. या जखमांमुळे उत्पादन व शरीरवाढीवर परिणाम होतो. मुका मार : जनावरांच्या कातडीला कुठेही खंड पडत नाही, मात्र कातडी खालील आवरणांना इजा पोहचते. बंद जखम : या प्रकारात कातडीखालील रक्तवाहिन्या फुटून रक्त साठते. त्यामुळे त्या भागाला लालसर काळा रंग येतो. पेशीपासून काही वेळेस निरुपद्रवी गाठ तयार होते. शरीराच्या कुठल्याही पोकळीमध्ये रक्त जमा होते यास ‘हार्मोटोमा’ म्हणतात. साधारणपणे बाह्य आवरणामधून जाणाऱ्या रक्तवाहिनीस इजा पोचल्यास ही परिस्थिती दिसते. उघड्या पडलेल्या जखमा : कापलेल्या जखमा, जखमेची टोके, फाटलेली जखम, भेदक जखम, खरचटणे, दोन्ही बाजूने छिद्र पडणे, जंतूंचा शिरकाव झालेली जखम, जखमेमुळे भाग वेगळा होणे, जंतू विरहीत जखम, दूषित जखम, विद्युत संपर्कामुळे होणाऱ्या जखमा, किरणोत्सर्गामुळे होणाऱ्या जखमा, सर्पदंशामुळे होणाऱ्या जखमा, जास्त काळ एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे होणाऱ्या जखमा, भाजल्यामुळे होणाऱ्या जखमा आदींचा समावेश होतो. या जखमांवर लवकरात लवकर पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत. सर्पदंशामुळे होणाऱ्या जखमा : या जखमा सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विषामुळे होतात. प्रामुख्याने शरीराच्या खालच्या भागांवर, तोंडावर व पायांवर आढळून येतात. जखमांची घ्यावयाची काळजी :  जखम स्वच्छ करणे :

  • जखमेभोवतीचे केस कात्रीने काढून घ्यावेत. जखम जंतूनाशक द्रावणाने स्वच्छ करावी. 
  • जंतूनाशक द्रावण तयार करण्यासाठी पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर करावा. पशूतज्ज्ञांकडून  जखमेवर टाके घालावेत. परंतु दूषित किंवा जंतूंचा शिरकाव असलेल्या जखमेत टाके घालू नयेत.
  • पाय किंवा खुरांच्या जखमा असल्यास जनावरे फॉरमॅलिनच्या द्रावणात (१० टक्के) अर्धा ते पाऊण तास उभी करावीत.
  • रक्तस्त्राव नियंत्रित करणे :

  • जखमेच्या वरील भागावर बँडेज किंवा रिबीनने घट्ट बांधावे. त्यामुळे जखमेकडील रक्तस्त्राव कमी होऊन थांबतो.
  • पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जखमेवर टिंक्चर बेन्झोएट किंवा पोटेशियम परमॅंग्नेटचे खडे ठेवून बँडेज पट्टी बांधावी.
  • जखमेतून अतिरक्तस्त्राव झाल्यास जीवनसत्त्व ‘के’चे इंजेक्शन पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावे.
  • साकळलेल्या रक्ताचे प्रमाण असेल तर कालांतराने ते शोषले जाते. परंतु हेच प्रमाण जर जास्त असेल तर त्या ठिकाणी चिरा देऊन साकळलेले रक्त काढावे.
  • शस्त्रक्रिया करण्यासाठी केलेली जखम अथवा धारदार शस्त्रामुळे झालेली जखम ताजी असेल तर जखमेला ताबडतोब टाके घालावेत. त्यामुळे जखम त्वरित भरते.
  • जंतू प्रादुर्भाव नियंत्रित करणे : जखम स्वच्छ केल्यानंतर जंतूनाशक द्रावण किंवा भुकटीचे पेड जखमेवर ठेवून बँडेज करावे. त्यामुळे जंतू संसर्ग कमी करण्यास मदत होते. जखमेवर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जंतूनाशक मलम लावावे. तीव्र प्रकारचे जंतूनाशक द्रावण किंवा मलम वापरणे शक्यतो टाळावे, कारण त्यामुळे जखम भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा येऊन अधिक कालावधी लागतो. जर लहान छिद्र असलेली जखम आत खोल असल्यास वरील छिद्र मोठे करणे आवश्यक असते. त्यामुळे जखमेतील स्त्राव बाहेर पडण्यास मदत होते. अति खोलवर असलेल्या जखमेमध्ये खालच्या बाजूला चिरा देऊन दूषित स्त्राव बाहेर पाडण्याकरीता छिद्र करावे. मोठ्या जखमांच्या बाबतीत टाके न घातल्यास जखम भरून येण्यास बराच कालावधी लागतो. त्या ठिकाणी अनावश्यक पेशी समूहांची वाढ होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी वेळेवर उपचार करावेत. बॅंडेज बांधावे. ४८ तासानंतर बँडेज काढावे. अशा प्रकारे २-३ वेळा बँडेज केल्यास अतिरिक्त पेशी नष्ट होऊन जखम लवकर भरण्यास मदत होते. खूर किंवा शिंग निखळणे :

  • खूर किंवा शिंग निखळल्यावर रक्तस्त्राव जास्त होत असेल तर वरच्या भागावर बँडेज पट्टी किंवा रिबीन घट्ट बांधावी. त्यामुळे रक्तस्त्राव नियंत्रित होतो.
  • जखम निर्जंतुक द्रावणाने स्वच्छ करावी. त्यावर शिफारशीत जंतूनाशक मलम लावावे.
  • एक दिवसाआड मलमपट्टी बदलत राहिल्यास काही दिवसांनी तोंडावर, खुराचे किंवा शिंगांचे समूह दिसू लागतात. त्यानंतर या जखमेवर संरक्षित थर देताना  काळजी घ्यावी. 
  • अनेक वेळा जखमेमध्ये पेशीसमूहांची हानी झालेली असते. त्याकरिता जखमेच्या बाजूस आणि त्या खालचा थर काढून टाकणे उपयुक्त असते. त्यामुळे जखम ताजी होते आणि लगेचच टाके घालण्यास सोपे जाते. त्वरित जखम भरण्यास सुरवात होते.
  • संपर्क : अजय गवळी - ८००७४४१७०२, डॉ. विशाल केदारी - ९५६१३०७२३१.

    (अजय गवळी, के. के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक येथे तर डॉ. विशाल केदारी हे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी, जि. नगर येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com