क्षार समस्या टाळण्यासाठी ठिबक सिंचन ठरेल उपयुक्त

उसासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर
उसासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर

ऊस क्षेत्रातील क्षाराची समस्या कमी करण्यासाठी पाण्यातून जमिनीमध्ये जाणारे क्षार व त्याचा निचरा याविषयी माहिती घेऊ. जमिनीमध्ये क्षाराचे प्रमाण कमी राखण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती उपयुक्त ठरू शकते.   राज्यात ऊस पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनी खराब झाल्याचे दिसून येते. जमिनीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढत जाते. अतिक्षारामुळे पिकांचे उत्पादन कमी होत जाते. पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनी कशा खराब होतात, हे आपणास लेखातील माहितीवरून दिसून येईल.

ऊस पिकास जादा पाणी दिल्याने जमिनीत वाढणारे क्षार :  तक्त्यामध्ये ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पाट पद्धतीने शास्त्रीयदृष्ट्या लागणाऱ्या पाण्याच्या ५० टक्के व सब-सरफेस ठिबक सिंचनामध्ये ६५ टक्के बचत होते. संशोधनाच्या या निष्कर्षांचा वापर करण्यात आला आहे.  पाण्याची विद्युत वाहकता एक डेसि सिमेन्स/मीटर (मिलीमोहज / से.मी.) असेल तर ६४० पीपीएम (०.०६४ टक्के) क्षार असतात. म्हणजेच एक लाख लिटर पाण्यामध्ये ६४ किलो क्षार, तसेच अर्धा (०.५) डेसि सिमेन्स/मीटर असेल तर ३२ किलो क्षार येतात.  थोडक्यात पाटपाणी पद्धतीने ०.५ डेसिसिमेन्स/मीटर विद्युत वाहकता असलेले पाणी वापरल्यास उसाचे पीक घेण्यासाठी केलेल्या सिंचनातून जमिनीत सुमारे ८ ते ११.२० मे. टन क्षार मिसळले जातात.यापैकी काही क्षार पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे जमिनीतून निचरा होऊन जातात. याविषयी फारशी आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, एफ.ए.ओ. १९८८, खारवट चोपण जमिनीची निचरा व्यवस्था व्यवस्थापन यांच्या संदर्भानुसार मिळालेली आकडेवारी धक्कादायक आहे. सध्या उसाचे पीक हे २५० ते ७०० मि.मी. पर्जन्यमानाच्या प्रदेशात घेतले जाते. त्यातील कमी पावसाच्या (अवर्षणप्रवण क्षेत्र) प्रदेशात पाटपाण्याचा वापर केल्यास जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते. जमिनी खारवट, खारवट-चोपण व चोपण होत असून, नापीक झाल्या आहेत. ऊस उत्पादनात सातत्याने घट होत आहे. याउलट ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास लागवड हंगामानुसार एकरी फक्त ५० ते ७० लाख लिटर पाणी वापरले जाते. एवढ्या पाण्यातून जमिनीत मिसळले जाणारे क्षार संपूर्ण निचरा होण्यासाठी ८३-२६९ मि.मी. पाऊस पुरेसा होतो. त्यामुळे पाटपाण्यावर असणारी ऊस शेती ठिबक सिंचनावर आणल्यास फायदा होऊ शकतो. साधारणपणे ३ ते ४ वर्षात जमिनीत साचलेल्या क्षारांचा निचरा होऊ शकेल. 

महत्त्वाचे निरीक्षण :  २५० ते ५०० मि.मी. पाऊस पडणाऱ्या व कॅनॉलच्या पाण्यावर उसपीक घेतल्या जाणाऱ्या पुणे, सोलापूर, सातारा, नगर, सांगली, नाशिक जिल्ह्यांतील अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये पाण्याच्या अतिवापराने जमिनी खारवट, खारवट-चोपण व चोपण होण्याचे प्रमाण अधिक दिसते. याउलट ज्या ठिकाणी ७०० ते  १२०० मि. मी. पाऊस पडतो, अशा भागातील जमिनी खराब झालेल्या नाहीत.  

ऊसपिकास जादा पाणी दिल्याने जमिनीत वाढणारे / जाणारे क्षार
ऊस लागण हंगाम व पीक तयार होण्याचा कालावधी     तपशील    पाण्याचा वापर हे.से.मी.     एकरी लाख लिटर पाणी      क्षार, मे. टन /एकर/ हंगाम / पाण्याची विद्युतवाहकता डेसिमीमध्ये क्षार, मे. टन /एकर/ हंगाम / पाण्याची विद्युतवाहकता डेसिमीमध्ये क्षार, मे. टन /एकर/ हंगाम / पाण्याची विद्युतवाहकता डेसिमीमध्ये
देण्यात येणाऱ्या पाण्याची विद्युत वाहकता (डेसीसिमीन प्रति मीटर)   देण्यात येणाऱ्या पाण्याची विद्युत वाहकता (डेसीसिमीन प्रति मीटर)           ०.५०   ०.७५ १.००
आडसाली (१६ते १७) महिने     शास्त्रीयदृष्ट्या पाणीवापर   ३५०   १४० ४.४८      ६.७२     ८.९६
आडसाली (१६ते १७) महिने       ठिबक सिंचन   १७५    ७० २.२४     ३.३६   ४.४८  
आडसाली (१६ते १७) महिने       सब-सरफेस ठिबक सिंचन      १२२.५     ४९     १.५७     २.३५   ३.१४
आडसाली (१६ते १७) महिने       पाटपाणी (मोकाट वापर)     ८७५     ३५०     ११.२०     १६.८०     २२.४०
पूर्वहंगामी (१४ ते १५) महिने    शास्त्रीयदृष्ट्या पाणीवापर   ३००     १२०  ३.८४   ५.७६   ७.६८
पूर्वहंगामी (१४ ते १५) महिने       ठिबक सिंचन      १५०      ६०    १.९२     २.८८     ३.८४
पूर्वहंगामी (१४ ते १५) महिने    सब-सरफेस ठिबक सिंचन  १०५     ४२      १.३४   २.०२  २.६९
पूर्वहंगामी (१४ ते १५) महिने    पाटपाणी (मोकाट वापर)     ८१२.५    ३००       ९.६०    १४.४०     १९.२०
सुरू/खोडवा (१२ ते १३) महिने    शास्त्रीयदृष्ट्या पाणीवापर  २५०   १००  ३.२०   ४.८०   ६.४०
सुरू/खोडवा (१२ ते १३) महिने   ठिबक सिंचन   १२५   ५०     १.६०   २.४०   ३.२०
सुरू/खोडवा (१२ ते १३) महिने      सब सरफेस ठिबक सिंचन   ८७.५ ३५   १.१२   १.६८  २.२४
सुरू/खोडवा (१२ ते १३) महिने       पाटपाणी (मोकाट वापर)    ६२५   २५०    ८.००  १२.००  १६.००

  संपर्क : विजय माळी, ९४०३७७०६४९ (वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com