थेट भाजीपाला विक्रीतून साधली आर्थिक प्रगती

भाजीपाला वाहतुकीसाठी सपकाळे बंधुंनी तयार केलेली मिनी ट्रॉली. विविध गावांत थांबून भाजीपाल्याची हातविक्री केली जाते.
भाजीपाला वाहतुकीसाठी सपकाळे बंधुंनी तयार केलेली मिनी ट्रॉली. विविध गावांत थांबून भाजीपाल्याची हातविक्री केली जाते.

करंज (जि. जळगाव) येथील सपकाळे कुटुंबीय गेल्या आठ वर्षांपासून बाजारपेठ आणि नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून भाजीपाला पिकांची वर्षभर लागवड करतात. पंचक्रोशीतील आठवडी बाजारात स्वतः भाजीपाला विक्री करून आर्थिक नफा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सेंद्रिय खते, कीडनाशकांचा वापर करत निविष्ठा खर्चात त्यांनी बचत साधली आहे.  जळगाव शहरापासून सुमारे २५ किलोमीटरवर करंज हे गाव आहे. गावशिवारात तापी नदी असल्याने शाश्वत पाणीपुरवठ्यामुळे ७० टक्के क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. या गावातील चैत्राम दौलत सपकाळे हे ६५ वर्षीय शेतकरी. सपकाळे कुटुंबीयांची तीन एकर शेती आहे. परिसरातील बाजारपेठांचा अभ्यास करत गेल्या आठ वर्षांपासून वर्षभर एक एकरावर विविध भाजीपाला पिकांच्या लागवडीचे गणित त्यांनी बसविले आहे.  पीक लागवड, व्यवस्थापन आणि विक्रीची जबाबदारी देवीदास आणि रोहिदास या दोन्ही मुलांनी चांगल्या प्रकारे सांभाळली आहे.  बाजारपेठेनुसार पीक नियोजन  पीक नियोजनाबाबत देवीदास सपकाळे म्हणाले, की आम्ही परिसरातील बाजारपेठांतील मागणीचा विचार दरवर्षी एक एकर क्षेत्रावर विविध भाजीपाला लागवड करतो. आॅगस्टमध्ये अर्धा एकर आणि मार्चमध्ये एक एकर क्षेत्रावर भेंडी लागवड असते. भेंडी लागवड करताना दोन ओळीत दीड फूट अंतर ठेवतो. भेंडी वाढीच्या टप्प्यात कोथिंबीर, पोकळा, मुळा, मेथीची आंतरपीक म्हणून लागवड करतो. सध्या अर्धा एकरातील भेंडीचे उत्पादन सुरू झाले आहे. दररोज बाजारपेठेच्या गरजेनुसार १५ ते २० किलो भेंडी तोडतो. विविध गावांतील आठवडी बाजारात थेट ग्राहकांना विक्री केल्याने ३० रुपये किलो दर मिळतो. बाजार समितीपेक्षा किमान दुप्पट दर थेट विक्रीत मिळतो. भेंडीतील आंतरपिकांमुळे मला दहा हजार रुपये मिळाले.

दरवर्षी सप्टेंबरमध्ये एक एकरावर काकडी लागवड करतो. अडीच फूट रुंदीचा गादीवाफा तयार करून एकरी एक ट्रॉली बायोडायनॅमिक खत, गांडूळखत, ५० किलो डीएपी आणि ५० किलो पोटॅश खत गादीवाफ्यातील मातीत मिसळतो. गादीवाफ्यावर ठिबक लॅटरल अंथरतो. लॅटरल अंथरल्यानंतर त्यावर प्लॅस्टिक आच्छादन करतो. सव्वा फूट अंतरावर प्लॅस्टिक आच्छादनाला छिद्र पाडून काकडीचे बी टोकले जाते. लागवडीनंतर सव्वा महिन्यात काकडी येण्यास सुरू होते. पुढे दोन महिने उत्पादन मिळत राहते. दर तीन दिवसांनी एक तोडा होतो. एका तोड्यात ४०० किलो उत्पादन मिळते. त्यातील काही काकडी बाजार समितीमध्ये तर काही काकडीची स्वतः आठवडे बाजारात विक्री करतो. बाजार समितीमध्ये १५ ते २० रुपये किलो तर थेटविक्री करताना प्रति किलो ३० रुपये दर मिळतो. नेहमीपेक्षा काकडीची थोडी आगाप लागवड केली जाते, त्यामुळे दर बऱ्यापैकी सापडतात. पीक व्यवस्थापनाबाबत देवीदास सपकाळे म्हणाले, की आम्ही सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करतो. कीड नियंत्रणासाठी दर दहा दिवसांनी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्काची फवारणी करतो. हे अर्क आम्ही स्वतः तयार करतो. जास्तीत जास्त सेंद्रिय खते आणि सेंद्रिय कीडनाशकांचा वापर करतो. त्यामुळे जमिनीची सुपीकता सुधारली. दर्जेदार पीक उत्पादन मिळते. थेट विक्रीवर भर   देवीदास आणि रोहिदास हे दोघे बंधू भाजीपाल्याची विक्री बाजार समितीत न करता करंज गावपरिसरातील विविध गावांतील आठवडे बाजारात करतात. दर मंगळवारी विदगाव, बुधवारी भोकर, गुरुवारी नांद्रा बुद्रुक, शनिवारी गाढोदा व रविवारी भादली बुद्रुक या जळगाव तालुक्‍यातील आठवडे बाजार तसेच गावानजीकच्या कठोरा, सावखेडा, फुपणी (ता. जळगाव) या गावांमध्येही भाजीपाला विक्री केला जातो. भाजीपाला योग्य दरात मिळत असल्याने विविध गावांतील ग्राहक जोडले गेले आहेत. 

एकत्र कुटुंब करतेय शेतीचे नियोजन  

देवीदास व त्यांची पत्नी वंदना आणि रोहिदास व त्यांची पत्नी सुलोचना हे आईवडिलांसह एकत्र राहतात. करंज गावात त्यांचे टुमदार घर आहे. परिवारातील सर्व सदस्य दररोज शेतीमध्ये राबतात. कुटुंबातील सदस्य पीक लागवड, प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन, फवारणी, आंतरमशागत, पिकांची तोडणी याचबरोबरीने स्वतः पंचक्रोशीतील बाजारपेठेत भाजीपाल्याची विक्रीदेखील करतात. त्यामुळे सपकाळे यांच्या शेतीमध्ये मजूर किंवा सालगडी नाही. त्यामुळे मजुरीवरचा मोठा खर्च वाचतो.  आंतर पिकातून नफ्यात वाढ   सपकाळे यांनी यंदा दोन एकरावर पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली आहे. त्यापैकी एक एकरात कपाशीमध्ये कारल्याचे आंतरपीक घेतले. पाच फुटांच्या पट्ट्यात कपाशीच्या झाडापासून फूटभर अंतरावर जूनमध्ये कारल्याच्या बियाण्यांची दोन फूट अंतराने टोकण केली. कारल्याच्या वेलीस कपाशीच्या झाडाचा आधार मिळाला. सध्या कारल्यांची काढणी सुरू आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार दररोज २० किलो कारल्याची तोडणी होते. अजून एक महिना कारल्याचे उत्पादन मिळत राहील. सध्या कारल्याला आठवडी बाजारात ३० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. या आंतरपिकातून त्यांना किमान १० ते १२ हजाराचे उत्पन्न होईल.

दुसऱ्या एक एकरातील कपाशीमधील काही ओळीत जूनमध्ये सपकाळे यांनी मिरची रोपांची लागवड केली. मिरचीचे उत्पादन सुरू झाले असून, आठवड्यातून दोनदा हिरव्या मिरच्यांची तोडणी होते. आठवडी बाजारात २० किलो मिरची विकली जाते. सध्या मिरचीला २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. भाजीपाला लागवडीतून दरवर्षी चांगला नफा मिळतो. परंतु कष्टही तेवढेच आहेत. विशेषतः भेंडी तोडण्याचे काम मजूर त्रासदायक मानतात, पण सपकाळे यांच्या कुटुंबातील सर्वजण भेंडी तसेच इतर भाजीपाला पिकाची तोडणी करतात. त्यामुळे भाजीपाला पिकासाठी त्यांना मजुरांवर अवलंबून राहावे लागत नाही.

पशुपालनाची मिळाली साथ   सध्या सपकाळे यांच्याकडे  दोन गायी व चार म्हशी आहेत. दररोज किमान १५ लिटर दूध डेअरीला दिले जाते. गाई, म्हशींमुळे पुरेसे शेणखत, गांडूळखत, गोमूत्र शेतीला उपलब्ध होते.

बायोडायनॅमिक आणि गांडूळखतनिर्मिती  रोहिदास आणि देवीदास यांनी कृषी विभागातर्फे आयोजित सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रमात बायोडायनॅमिक खतनिर्मितीचे प्रशिक्षण घेतले. ते दरवर्षी एक ट्रॉली बायोडायनॅमिक खत तयार करतात. कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्थेंतर्गत (आत्मा) सेंद्रिय शेती प्रोत्साहन कार्यक्रमातून गांडूळखत निर्मितीसाठी त्यांनी दोन टाक्या बांधल्या आहेत. गांडूळखत निर्मितीसाठी भाजीपाल्याचे अवशेष, पालापाचोळा, शेण यांचा वापर केला जातो. दर अडीच महिन्यांनी दोनशे किलो गांडूळखताची निर्मिती होते. करंजमध्ये सेंद्रिय शेती व इतर शेती विकास उपक्रमांसाठी स्थापन केलेल्या अहिल्याबाई होळकर कृषी विकास गटाचे चैत्राम सपकाळे सदस्य आहेत. 

भाजीपाला वाहतुकीसाठी मिनी ट्रॉली परिसरातील गावांमध्ये आठवडे बाजारात भाजीपाला वाहतूक तसेच शेतात आवश्‍यक सामग्री, साहित्य नेण्यासाठी सपकाळे यांनी दुचाकीला जोडता येईल अशी मिनी ट्रॉली तयार केली. या ट्रॉलीची संकल्पना त्यांना मिनी ट्रॅक्‍टरचलित ट्रॉलीवरून सुचली. ही ट्रॉली त्यांनी एका संस्थेकडून तयार करून घेतली. ट्रॉलीला लहान आकाराची दोन चाके आहेत. पंचक्रोशीतील बाजारात काही वेळेस भाजीपाला उरला तर तो घरी परत न आणता रस्त्यात येणाऱ्या गावांतील चौकात काही वेळ गाडी थांबवून हात विक्री केली जाते. सर्व भाजीपाल्याची विक्री करूनच सपकाळे बंधू घरी परततात. काही दिवसांपूर्वी त्यांनी चारचाकी लहान टेंपो भाजीपाला वाहतुकीसाठी घेतला आहे.

संपर्क - देवीदास सपकाळे ः ९६५७२९८९९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com