महिला बचत गटाने सुरू केली शेतकरी कंपनी

शिक्रापूर (जि. पुणे) ः डाळींचे पॅकिंग करताना कृषी कन्या गटातील महिला.
शिक्रापूर (जि. पुणे) ः डाळींचे पॅकिंग करताना कृषी कन्या गटातील महिला.

बचत गटाच्या माध्यमातून शिक्रापूर (जि. पुणे) गावातील महिला एकत्र आल्या. या गटाने पीक उत्पादन वाढ आणि प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने प्रशिक्षणही घेतले. यावरच न थांबता महिलांनी कृषी कन्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली.  पीक उत्पादनाच्याबरोबरीने पुणे, नाशिक शहरातील ग्राहक तसेच दुकानदारांना हा महिला गट थेट शेतमालाची विक्री करत आहे. 

पुणे नगर मार्गावर शिक्रापूर (ता. शिरूर, जि. पुणे) परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला, फुलशेतीवर भर आहे. याचबरोबरीने काही शेतकरी तूर, मूग, उडीद, हरभरा लागवड करतात. या पिकांच्या व्यवस्थापनाचा वाढता खर्च, मिळणारे कमी उत्पन्न यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. उत्पन्नवाढीसाठी कुटुंबातील महिलांचा पीक व्यवस्थापन तसेच धान्य विक्रीमध्ये सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत सेंद्रिय गटांची संकल्पना राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याचा लाभ शिक्रापूरमधील शेतकऱ्यांना होण्यासाठी आत्माच्या अधिकाऱ्यांनी या गावात जनजागृतीस सुरवात केली. महिला गटाची स्थापना  गावातील शंभर महिलांना एकत्र आणून गट स्थापन करण्यासाठी प्रतिभा खेडकर, नंदा भुजबळ यांनी पुढाकार घेतला. पहिल्या टप्प्यात गटामध्ये २९ महिला सहभागी झाल्या. गटाला कृषीकन्या महिला सेंद्रिय गट असे नाव देण्यात आले. आत्माअंतर्गत या गटाची २०१६ मध्ये नोंदणी झाली. गटाच्या अध्यक्ष म्हणून प्रतिभा खेडकर यांची निवड करण्यात आली. या गटाच्या २९ महिला सदस्या आहेत. आत्माअंतर्गत कृषिकन्या सेंद्रिय महिला बचत गटाच्या नावाने बँकेत खाते उघडण्यात आले. त्यामुळे  थेट खात्यामध्ये शासकीय अनुदान जमा होते.  गटाला मिळाला योजनांचा लाभ  आत्माअंतर्गत योजनेच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना पीक लागवडीच्या प्रशिक्षणाच्या बरोबरीने जैविक खते, ताग बियाणे, मका, हरभरा, बाजरी इत्यादी बियाणे मोफत मिळाले. गटातील महिलांना सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापनाचे प्रशिक्षणदेखील मिळाले. यामध्ये जीवामृत निर्मिती, गांडूळ खत निर्मिती, हिरवळीच्या पिकांची लागवड याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गटाचा बंगळूर तसेच इंदापूर येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. सेंद्रिय पद्धतीने उत्पादीत शेतमालाला चांगला दर मिळत असल्याने गटातील महिलांनी उत्पादीत शेतमालाची विक्री स्वतः करण्याचा निर्णय घेतला. विक्रीसाठी ब्रॅंड तयार करण्याचे ठरले आहे.    डाळी निर्मितीवर भर  गटातील बहुतांशी महिला भाजीपाला, कडधान्य, जवस, तीळ, कारळे यांचे पारंपरिक सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतात. प्रशिक्षणामुळे पीक उत्पादनात वाढ मिळत आहेत. तसेच उत्पादनाचा दर्जाही सुधारला आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन उत्पादित कडधान्याची डाळ करून विक्री करण्याचा महिलांनी निर्णय घेतला. सुरवातीला खासगी मिलमधून डाळ तयार करून घेतली जाते. तयार डाळ स्वच्छ करून अर्धा किलो, एक किलोमध्ये पॅकिंग केले जाते. याचबरोबरीने गटातर्फे चवळी, हुलगा, जवस, तीळ, सोयाबीन, राजमा, कारळ्याचीही विक्री केली जाते. गटातील काही महिला भेंडी, काकडी, वांगी, टोमॅटो, भाजीपाल्याचे उत्पादन तसेच विक्रीही करतात.  विक्रीचे नियोजन  उत्पादीत शेतीमालाला चांगला दर मिळावा यासाठी गटातील महिला पुणे शहरातील भीमथडी जत्रा, तांदूळ महोत्सव अशा प्रदर्शनाच्या ठिकाणी शेतमालाची विक्री करतात. धान्य तसेच भाजीपाला विक्रीसाठी पुणे, नाशिक शहरातील विक्रेत्यांशी करार करण्यात आलेला आहे. त्यामुळे शाश्वत बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. पुण्यातील काही सोसायटींनादेखील धान्य आणि भाजीपाल्याचा पुरवठा गटामार्फत केला जातो.    महिला गट प्रामुख्याने मूग, उडीद, हरभरा, मटकी, तूर, हुलगा, राजमा, तीळ , जवस याचे उत्पादन घेतात. तसेच विक्रीदेखील करतात. याचबरोबरीने गटातर्फे मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, हरभरा डाळीचे उत्पादन आणि विक्री केली जाते. सरासरी प्रतिनुसार ८० ते १३० रुपये किलो या दराने डाळीची विक्री होते. दरवर्षी उत्पादन आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार दरामध्ये बदल होतो.  गेल्या पावणे दोन वर्षामध्ये गटाने सुमारे दोन टन डाळीची विक्री केली. या विक्रीतून गटाला दोन लाख दहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता गटाला एक लाख ६० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला.

शेतकरी कंपनीकडे वाटचाल  महिला गटाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने हळूहळू हा गट कंपनीकडे वाटचाल करीत आहे. गेल्या जुलैमध्ये कृषीकन्या महिला गटासह परिसरातील १९ महिला शेतकरी गटांनी एकत्रित येऊन कृषी कन्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची  स्थापना केली. सध्या या कंपनीमध्ये ३९३ महिला सदस्य आहेत. या कंपनीच्या माध्यमातून शेतमाल प्रतवारी युनिट उभारण्यात येत आहे. यासाठी कंपनीत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलाकडून बाराशे रुपये प्रमाणे साडे तीन लाख रुपयांचे शेअर्स जमा करण्यात आले. कंपनीने शिक्रापूरजवळ गणेगाव येथे प्रक्रिया युनिट उभारले आहे. या ठिकाणी प्लोअर मील, डाळ मील, धान्य प्रतवारी यंत्र बसविण्यात येणार आहे. सध्या कंपनीतर्फे डाळीची स्वच्छता आणि प्रतवारी केली जाते. या युनिटसाठी आत्माअंतर्गत कंपनीला शासनाकडून १४ लाख रुपयांचे अनुदान मिळाले. गटातील महिलांना धान्य उत्पादन, व्यवस्थापन, प्रतवारी आणि विक्री कशी करायची याची माहिती देण्यासाठी दर महिन्याला बैठक घेतली जाते. 

महिलांना मिळाले प्रोत्साहन   शिक्रापूर गावशिवारात औद्योगिकरणामुळे शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे गावात शेतकऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. परंतु, काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, ऊस अशी विविध पिके घेतात. या गावात जनजागृतीच्या दरम्यान आत्माच्या अधिकाऱ्यांनी पुरुष शेतकऱ्यांएेवजी महिला शेतकऱ्यांचा गट स्थापन करण्याची संकल्पना मांडली. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. प्रशिक्षणामुळे महिलांचा चांगला गट तयार झाला. या भागातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने पिकांची लागवड करतात. त्यामुळे प्रकल्प व्यवस्थापक सुनील बोरकर आणि तालुका व्यवस्थापक अविनाश निर्मळ यांनी महिलांना पीक उत्पादन वाढ तसेच प्रक्रियेबाबत प्रशिक्षण दिले. 

गटाचा उद्देश 

  •  सेंद्रिय पद्धतीने पीक नियोजनावर भर.
  •  ग्रामीण भागातील महिलांचे गटांच्या माध्यमातून       सक्षमीकरण. ग्राहकांना दर्जेदार अन्नधान्याची उपलब्धता.
  •  गावामध्येच महिलांना रोजगाराची उपलब्धता.
  •  शेतमालाला चांगला बाजारभाव. 
  • संपर्क -  नंदा भुजबळ, ९६५७१४५०३५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com