शिवणकलेने दाखविला आर्थिक प्रगतीचा मार्ग

शिवणकलेने दाखविला  आर्थिक प्रगतीचा मार्ग
शिवणकलेने दाखविला आर्थिक प्रगतीचा मार्ग

परभणी शहरात शिवणकाम करणाऱ्या महिलांनी एकत्र येत सत्यमेव जयते स्वयंसाह्यता महिला बचत गट सुरू केला. गटाच्या माध्यमातून तयार कपड्यांची निर्मिती आणि शिवणकला वर्गाची सुरवात केली. शिवणकलेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत मिळाला आहे. परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील आयेशा शेख या कापड विक्रीचा व्यवसाय करतात. रशिदा शेख शिवणकाम आणि राबिया खातून साड्यांवर एम्ब्रॉडरी करतात. या तिघी पूर्वी स्वतंत्रपणे कापड विक्री, शिवणकाम व्यवसाय करीत असत. परंतु, बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन या तिघींनी पुढाकार घेत महिला स्वयंसहायता गट स्थापन केला. गटाच्या माध्यमातून तयार ड्रेस निर्मिती करण्याचे ठरविले. यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गंत अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचा त्यांना फायदा झाला. या अंतर्गत नई रोशनी लोकसंचालित साधन केंद्राने परिसरातील दहा महिलांना एकत्रित केले.  महिला गटाची उभारणी  जानेवारी, २०१५ मध्ये सत्यमेव जयते महिला स्वंयसहायता बचत गटाची स्थापना केली. गटातील महिलांनी सुरवातीच्या काळात दरमहा शंभर रुपये बचत करण्यास सुरवात केली. त्यासाठी सेंट्रल बॅंकेमध्ये खाते उघडले. गटांतर्गंत देवाण-घेवाणीचे व्यवहार सुरू झाले. त्यानंतर गटातील सदस्यांनी दरमहा दोनशे रुपये बचतीस सुरवात केली. गटातील सर्व सदस्यांना तयार ड्रेस निर्मितीचे पायाभूत प्रशिक्षण देण्यात आले. याचबरोबरीने देगलूर (जि. नांदेड) येथील महिला बचत गटाने सुरू केलेल्या रेडिमेड गारमेंट सेंटरला गटातील सदस्यांनी भेट देऊन गारमेंट व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेतली. या भेटीमुळे महिलांना प्रेरणा मिळाली.

तयार कपडे निर्मितीस सुरवात  बचत गटांचे १५ हजार रुपये आणि खासगी बॅंकेकडून ५६ हजार रुपये कर्ज गटातील सदस्यांनी व्यवसाय उभारणीसाठी घेतले. सदस्यांनी परिसरात एका ठिकाणी भाडेतत्त्वावर जागा घेतली. गटाने सुरवातीला पाच शिलाई यंत्रे घेतली. घागरा, फ्राॅक, साड्या तसेच त्यावर नक्षी कामासाठी लागणारे साहित्य खरेदी करुन बचत गटाने तयार कपडे निर्मितीत सुरवात केली. महिला आर्थिक विकास महामंडाळाच्या महाव्यवस्थापक कुसूम बाळसराफ यांच्या हस्ते नोव्हेंबर,२०१६ मध्ये सत्यमेव जयते रेडिमेड गारमेंटचे उद्घाटन झाले. सुरवातीस गुंतवणूक केलेल्या ५० हजार रुपये भांडवलातून गटाने तयार केलेल्या गारमेंटच्या विक्रीतून खर्च वजा जाता २५ हजार रुपये नफा मिळाला. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला.
मागणीनुसार निर्मिती  महिला बचत गटाने तयार कपड्यांच्या निर्मितीस सुरवात केल्यानंतर त्यांना विविध शाळांच्याकडून गणवेश शिवून देण्याचे काम मिळू लागले. चांगले शिवण काम, आकर्षक रंगसंगतीमुळे परभणी शहरातील कापडाचे व्यापारीदेखील बचत गटाकडे तयार ड्रेसची मागणी नोंदवीत आहेत. गटातील सदस्या आता मागणीनुसार शाळेचे गणवेश, पोषाख तयार करून देतात. 
ड्रेस तयार करण्यासाठी गटातील सदस्यांनी कामे वाटून घेतली आहेत. काही महिला कापड कापून देतात. काही महिला शिवण काम करतात. ही कामे काही दिवसांनी आलटून पालटून केली जातात. त्यामुळे प्रत्येक महिलेला कापड कापण्यापासून ते ड्रेसनिर्मितीचे काम करता येते.  
गटातील चार महिला सदस्या साडीवर चांगल्याप्रकारे नक्षीकाम करतात. एका सहावारी साडीवर नक्षीकामासाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. गटाच्या व्यवसायाचे ठिकाण तसेच विविध प्रदर्शनातून तयार कपड्याची विक्री होते. बचत गटाचे तयार पोषाख, कुंदन वर्क, स्टोन वर्क,एम्ब्रॉडरी आदी कलाकुसरीच्या साड्या महिलांच्या पसंतीस उतरल्या असल्यामुळे मागणी वाढत आहे. आत्तापर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत घरकाम करुन त्यानंतर पाच वाजेपर्यंत शिवणकाम करणाऱ्या महिलांना आता मागणीमुळे जास्त वेळ शिवणकामासाठी द्यावा लागत आहे.
दूध डेअरीस सुरवात  सत्यमेव जयते महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा आयेशा शेख यांनी त्यांच्या घरी दूध डेअरी सुरू केली आहे. दररोज ५५ रुपये लिटर दराने २० लिटर दूध खरेदी करुन त्याची ६० रुपये लिटर प्रमाणे परिसरात विक्री केली जाते.दर महिन्याला तीन ते चार किलो तूप तयार करून त्याची विक्री होते. यातून आयेशा शेख यांना उत्पन्नाचा वेगळा पर्याय मिळाला आहे.
शिवणकला वर्गास सुरवात  तयार ड्रेस निर्मितीसोबत बचत गटाने शिवण कला वर्ग सुरू केला. सुरवातीला प्रत्येक सदस्याने स्वतःच्या घरातील मुलींना शिवणकलेचे प्रशिक्षण दिले. सध्या परिसरातील महिला, मुलींना शिवणकाम, नक्षीकामाचे प्रशिक्षण दिले जाते. ब्लाऊज, पंजाबी ड्रेस आदी कपडे शिवण्याच्या बेसिक कोर्ससाठी ३५० रुपये प्रति महिना आणि नक्षीकाम शिकण्यासाठी २०० रुपये महिना शुल्क घेतले जाते.
व्यवसायाचा विस्तार  गटाने जून, २०१७ मध्ये  खासगी बँकेकडून १ लाख १० हजार रुपये कर्ज घेतले. या भांडवलातून शिलाई यंत्रे, पिको-फाॅल यंत्र आणि शिवण कामासाठी कच्चा माल, कापड, साड्या आदी साहित्य  खरेदी केले. गटाकडे सध्या दहा शिवण यंत्रे आहेत. गटातर्फे बॅंकेच्या कर्जाचा ९ हजार ९०० रुपयांचा हप्ता नियमित भरला जातो. कर्जाचा हप्ता भरून उरलेला नफा सर्व सदस्यांमध्ये वाटून घेतला जातो. गटातील प्रत्येक महिलेस सध्या दर महा सरासरी २,००० ते ३,५०० रुपये मिळतात.
शहरी तसेच ग्रामीण बाजारपेठेमध्ये तयार कपड्यांना मागणी वाढली आहे.त्यामुळे गटाने ड्रेस निर्मिती आणि विक्री नियोजनावर भर दिला आहे. बचत गटाच्या स्थापनेपासून महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मन्सूर पटेल, सीएमआरसीच्या जयश्री टेहरे, सहयोगीनी निलोफर शेख यांचे मार्गदर्शन मिळते, असे आयेशा शेख आणि रशिदा बेगम सांगतात.
 संपर्क -  रशिदा शेख, ८६२४८३१६२९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com