जनावरांच्या कोठीपोटातील आम्लीय अपचन

जनावरांच्या आहारात अचानक बदल करू नये.
जनावरांच्या आहारात अचानक बदल करू नये.

बऱ्याचदा जनावरांमध्ये अन्नपचनाच्या समस्या आढळून येतात. त्यामध्ये आम्लीय अपचन (अॅसिडॉसीस) ही एक समस्या प्रामुख्याने आढळते. अपचनाचे नेमके कारण शोधून त्यानुसार खबरदारी घ्यावी व उपचार करावेत. दुग्धव्यवसायामध्ये साधारणत: ७० टक्के खर्च जनावरांच्या आहारावर होत असतो. आहारातील घटक, त्यांचे प्रमाण, आहार देण्याची पद्धत, आहारातील घटकांचे पचन व त्यांची शरीरास उपलब्धता यावर त्या जनावराचे दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता, पैदास, शारीरिक वाढ व रोगप्रतिकारक शक्ती या गोष्टी अवलंबून असतात. यामध्ये बदल झाल्यानंतर कोठीपोटात आम्लीय अपचन होते. कारणे पुढीलपैकी एक किंवा अनेक कारणामुळे कोठीपोटात आम्लीय अपचन होते.

  • जनावराच्या खाण्यात जास्त प्रमाणात धान्य आल्यास उदा. तांदूळ, गहू, ओट, बाजरी, मका, ज्वारी. जनावराच्या खाण्यात जास्त प्रमाणात बटाटे, शुगरबीट, ऊस, इ. आल्यास.
  • जनावरास भरडलेले धान्य जास्त प्रमाणात खाऊ घातल्यास. धान्याचे पीठ अधिक प्रमाणात खाऊ घातल्यास. धान्यापासून बनविलेले पदार्थ उदा. लापशी, शिरा, भात, भाकरी, चपाती, पुऱ्या, ब्रेड, इ. अधिक प्रमाणात खाऊ घातल्यास.
  • सडलेला मुरघास खाऊ घातल्यास. हॉटेलमधील किंवा कार्यक्रमात उरलेले अन्न खाऊ घातल्यास.
  • जास्त प्रमाणात पशुखाद्य खाऊ घातल्यास.
  • पशुखाद्यात अचानक बदल केल्यास. अधिक प्रमाणात कोवळा चारा खाऊ घातल्यास.
  • आहारात वाळलेली वैरण कमी असल्यास. जास्त बारिक केलेली कुट्टी खाऊ घातल्यास.
  • सतत वैरण खाऊ घातल्यास व रवंथ पुरेसे न झाल्यास.
  • पशुखाद्द्य पाण्यात भिजवून दिल्यास.
  • लक्षणे

  • या आजाराचे तीव्र व सौम्य असे दोन प्रकार आढळतात. तीव्र प्रकारात आहारात बदल झाल्यानंतर ८ तासांच्या आत लक्षणे दिसू लागतात.
  • सुरवातीस जनावर शांत व मलूल दिसते. कानाची व शेपटीची हालचाल मंदावते. जनावर काळवंडते. कोठीपोटातील सामू कमी होतो.
  • सुरवातीस कोठीपोटाची हालचाल मंदावते व नंतर बंद होते. डावी कुस गच्च होते व फुगते. सुरवातीच्या अवस्थेत भूक कमी होते व नंतर बंद होते.
  • रवंथ क्रिया कमी किंवा बंद होते. पोटफुगी व पोटदुखी होते. श्वास घेण्यास त्रास होतो. नाकातोंडातून रक्त व चारट येते. हगवण लागते.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. लघवीचे प्रमाण कमी होते. लघवीचा रंग पिवळा होतो. डोळे खोल जातात. मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम होऊन जनावर उत्तेजित होते, थरथर कापते, चालताना अडखळते, एखाद्या वस्तूला डोकं दाबून धरते, आंधळेपणा येतो, झटके येतात, जनावर बेशुद्ध पडते.
  • वेळेत योग्य उपचार न झाल्यास ८ ते १० तासांत जनावर दगावते.
  • सौम्य प्रकारात लक्षणे अधिक दिवस टिकून असतात. जनावर वारंवार शेण टाकते. शेण पातळ येते. शेणात न पचलेल्या वैरणीचे किंवा धान्याचे तुकडे आढळतात. कधी कधी शेणात बुडबुडे आढळतात.
  • जनावर दात करकर वाजवते. दूध उत्पादन घटते.
  • दुधाची गुणवत्ता (फॅट व एसएनएफ) कमी होते. अशक्तपणा येतो.
  • शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते.
  • काही गायी वारंवार उलटतात.
  • काही गायी माजावर येत नाहीत.
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
  • वासराची वाढ समाधानकारक होत नाही.
  • खुरांना जखमा होतात. खुराच्या सांध्यांना सूज येते. खुरे वेडीवाकडी वाढतात. खुराचा रंग बदलतो. जनावर लंगडते. पाठीला बाक येतो.
  • जनावर डोकं खाली करून एका जागेवर उभे राहणे पसंत करते. कोठीपोटाच्या आतल्या थरास ईजा होते. यकृतात जंतुसंसर्ग होतो.
  • फुफ्फुसाचा दाह होतो. नाकातून चिकट व पू युक्त स्त्राव येतो.
  • उपचार

  • तीव्र स्वरूपाच्या आजारात पशुवैद्यकाकडून सोडियम बायकार्बोनेटचे सलाईन द्यावे व प्रतिजैविके चारावी.
  • खायचा सोडा ३०० ते ४०० ग्रॅम पाजावा. पचनास सुलभ आहार द्यावा.
  • स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी पुरेशा प्रमाणात पाजावे.
  • दुसऱ्या निरोगी जनावराचे चारट मिळवून त्याचे ४ ते ८ लिटर पाणी पाजावे.
  • सौम्य प्रकारच्या आजारात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी पुरेशा प्रमाणात पाजावे.
  • दररोज २०० ग्रॅम खायचा सोडा तीन दिवस पाजावा.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार यीस्ट कल्चर व खनिज मिश्रण द्यावे.
  • टीप ः वरिल सर्व उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावेत.
  • प्रतिबंध

  • जनावरास संतुलित आहार द्यावा. आहारात अचानक बदल करू नये. एका वेळी २.५ किलोपेक्षा जास्त पशुखाद्य देऊ नये. पशुखाद्य कोरडे द्यावे.
  • सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळेस कुट्टी केलेली वैरण पुरेशा प्रमाणात द्यावी.
  • रोज ५ - ६ किलो वाळलेली वैरण द्यावी.
  • वैरणीसाठी ऊसाऐवजी पौष्टिक व आधुनिक चारापिकांचा वापर करावा. घरातील किंवा हॉटेलमधील उरलेले अन्नपदार्थ जनावरास चारू नयेत.
  • जनावराच्या आहारात धान्य व धान्याचे पदार्थ यांचा समावेश करण्यापूर्वी पशुआहारतज्ञाचा सल्ला घ्यावा. गोठामुक्त संचार पद्धतीचा असावा.
  • संपर्क : डॉ. भाऊसाहेब गुंड, ९८२२२७०७६१ (प्रशिक्षण केंद्र प्रमुख, प्रभात डेअरी प्रा. लि.)    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com