तरुणाने जोपासली अभ्यासपूर्ण एकात्मिक शेती

महेश इंगळे यांनी हंगामी पिकांना केळी या दीर्घ पिकाची जोड दिली आहे.
महेश इंगळे यांनी हंगामी पिकांना केळी या दीर्घ पिकाची जोड दिली आहे.

तरुणाने जोपासली अभ्यासपूर्ण एकात्मिक शेती शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी बहुविध पीक पद्धती, सेंद्रिय अधिक रासायनिक पद्धतीचा अंगीकार, शून्य नांगरणी तंत्रातील काही बाबींचा अवलंब, शास्त्रीय ज्ञानाची पक्की बैठक. परभणी येथील तरुण शेतकरी महेश इंगळे यांनी याच वैशिष्ट्यांवर आधारित आपली शेती प्रयोगशील केली आहे.  सातत्याने नवे शिकण्याची वृत्ती जोपासत शेतीतील उत्साह त्यांनी कायम ठेवला आहे. परभणी येथे वसमत रोडवर घर असलेले युवा शेतकरी महेश उत्तमराव इंगळे आपल्या ३० एकर शेतीची जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांचे मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील उमरी भाटेगाव (ता. हदगाव) आहे. महेश यांचे वडील डाॅ. उत्तमराव इंगळे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून विस्तार शिक्षण संचालक पदावरून १९९९ मध्ये सेवानिवृत्त झाले. खरे तर नोकरीमुळेच इंगळे कुटुंबीय परभणी येथे स्थायिक झाले. महेश यांची शेती इंगळे कुटुंबाने परभणी शहराजवळील ब्राह्मणगाव शिवारातील अनेक वर्षे पडीक असलेली ३० एकर जमीन खरेदी केली. अनावश्यक झुडपे तोडून, मशागत करून ती लागवडयोग्य केली. हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन असल्याने सुरवातीची काही वर्षे जेमतेम उत्पादन मिळाले. महेश यांनी २००३ पासून शेतीची जबाबदारी हाती घेतली. शेतीचे व्यवस्थापन

  • पाणी व्यवस्थापन- तीन विहिरींची सुविधा. एक विहिर परभणी शहराजवळून वाहणाऱ्या शेतापासून चार- पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंगळगड नाल्याकाठी आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता चांगली. मात्र पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा तसेच जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली यावे यासाठी सुमारे २५ एकर शेती ठिबक सिंचनाखाली आणली आहे.
  • तुरीतही ठिबकचा वापर केल्याने दर्जेदार उत्पादन येण्यास जोड मिळाली आहे.
  • वडील डॉ. उत्तमराव कृषितज्ज्ञ असल्याने त्यांच्या शास्त्रीय व तांत्रिक ज्ञानाचे पाठबळ महेश सातत्याने घेतात.
  • एक बैलजोडी, दोन लाल कंधारी, चार संकरित गाई असे पशुधन. सुसज्ज गोठा. वैरणीसाठी यशवंत गवत, मका. यंत्राद्वारे कुट्टी करून चारा दिला जातो. जनावरांना उभे राहून व्यवस्थितरीत्या चारा खाता यावा यासाठी सिमेंटच्या पक्या गव्हाणी. संपूर्ण गोठ्यात सिमेंट काॅंक्रिटची गच्ची.
  • गोठ्यातील गोमूत्र वाहून नेण्यासाठी नाली. संकलित केलेले गोमूत्र वस्त्रगाळ करून एका टाकीत घेतले जाते. तेथून ते व्हेंच्युरीद्वारे पिकांना दिले जाते. फवारणीसाठीही गोमूत्राचा वापर होतो.
  • दुध विक्रीतून उत्पन्नाचा स्रोत वाढवला आहे. दुग्धव्यवसायासाठी भाऊजी डाॅ. दीपक शिंदे यांनी नगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील बाजारातून गाई घेऊन दिल्या. दररोज २० लिटरपर्यंत दूध मिळते.
  • परभणी शहरात एका मिठाई दुकानाला ते पुरवले जाते.
  • उत्पादकता (एकरी) हळद- सेलम जात- बेड पद्धतीने लागवड - वाळवलेल्या हळदीचे एकरी ३० ते ३५ क्विंटल   सोयाबीन........८ ते १० क्विं. कपाशी..........२० ते २२ क्विं. तूर...............१० क्विं. अॅग्रोवनमुळे ज्ञानाचा व्यासंग महेश म्हणाले, की अॅग्रोवनमधून दररोज भरपूर ज्ञान मिळत असल्याने व्यासंग वाढून शेतीत प्रगती करणे शक्य झाले आहे. अॅग्रोवनमधील यशकथेत पेरू पिकात तुरीचा प्रयोग वाचून तसे अनुकरणही केल्याचे महेश यांनी सांगितले. शेतीची खास वैशिष्ट्ये

  • चिपळूणकर तंत्राचा वापर- शून्य मशागत तंत्राचे अभ्यासक व प्रयोगशील शेतकरी प्र. र. चिपळूणकर (कोल्हापूर) यांना महेश आदर्श मानतात. त्यातूनच पीकअवशेष जाळून न टाकता ते जमिनीत गाडून टाकण्याची पध्दत महेश वापरतात. यात हळद, केळीची पाने, ज्वारी, तुरीची धसकटे, कपाशीच्या पऱ्हाट्या यांचे यंत्राद्वारे तुकडे करून ते जमिनीत गाडून टाकले जातात. जमिनीचा पोत सुधारण्यास त्यामुळे मदत होते.
  • जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी शेणखताच्या वापरावर भर. घरच्या जनावरांपासून सुमारे १००  गाड्या शेणखत मिळते. पंधरा ते २० ट्रॅाली शेणखत विकत घेतले जाते. यामुळे जमिनीतील ह्युमस व सेंद्रिय कर्बाची उपलब्धता वाढते.
  • आर्थिक नुकसान पातळी ओलांडली तरच रासायनिक किटकनाशकांच्या शिफारशीनुसार फवारण्या.
  • गोमूत्राची फवारणी. शेतात तसेच बांधावर कडूलिंबाच्या झाडांचे कुंपण. त्यांचा पालाही शेतात पडतो. तो फायदेशीर ठरतो.
  • बांधावर आपटा, चिंच, पिंपळ, बकुळ, जांभूळ, आवळा आदी विविध झाडे. त्यामुळे नैसर्गिक पक्षिथांबे तयार झाले. त्यामुळे किडींचे नैसर्गिक नियंत्रण होते. यंदा कपाशीवर बोंडअळी अन्यत्र लवकर आली असता इंगळे यांच्या शेतात मात्र उशिरा आल्याचे आढळले आहे.
  • नवीन फळबाग लागवड- परभणीचे आमदार डाॅ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून तालुक्यातील झरी येथे मोठ्या क्षमतेच्या फळप्रक्रिया उद्योगाची उभारणी होत आहे. त्यासाठी शेतमाल पुरवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी पेरु, सिताफळाची लागवड केली आहे. महेश यांनीही लखनौ ४९ आणि रत्नदीप या पेरुवाणांची लागवड एकूण सहा एकरांत केली आहे. तर सहा एकरांवर सीताफळाचे बालानगर वाण आहे.
  • केवळ एकच एक शेती पद्धतीवर भर न देता एकात्मिक म्हणजेच सेंद्रिय व रासायनिक पद्धतीचा अंगीकार केला आहे.
  • पीकपद्धती

  • खरिपात कापूस, सोयाबीन, तूर, रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा
  • या हंगामी पिकांव्यतिरिक्त- वार्षिक पिके- अडीच एकर केळी, दोन ते तीन एकर हळद
  • परभणी शहराची बाजारपेठ जवळच असल्याचा फायदा. व्यापारी केळी थेट शेतातून खरेदी करतात. साहजिकच ब्राह्मणगाव शिवारातील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी घेतात.
  • महेश म्हणतात की कपाशीतून समाधानकारक उत्पन्न न मिळाल्यास केळीतून किंवा केळी नुकसानीत गेली तर हळदीतून ते भरून काढण्याची संधी असते.
  • संपर्क ः महेश इंगळे, ९९२३३६२४७५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com