agriculture story in marathi, agrowon, agricultural festival, sarankheda, shahada, nandurbar | Agrowon

जातिवंत अश्‍व, शेती साहित्यासाठी  प्रसिद्ध सारंगखेडचा बाजार 
चंद्रकांत जाधव 
बुधवार, 2 जानेवारी 2019

सारंगखेडा यात्रा- आश्‍वासक उलाढाल  
यात्रेत मागील वर्षी सुमारे दोन हजार अश्‍व दाखल झाले. दीड हजारांची विक्री झाली. शेतीपयोगी साहित्यासह घोड्यांच्या विक्रीतून मागील वर्षी दहा कोटी रुपयांची उलाढाल झाली. यंदा तीन हजार अश्‍व दाखल झाले असून, २७ डिसेंबरपर्यंत १३०० घोड्यांची विक्री झाली. यातून अंदाजे तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली. यंदा एकूण सुमारे १२ कोटी रूपयांची उलाढाल होण्याचा अंदाज यात्रा संयोजकांनी व्यक्त केला. 
 

अश्‍वबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील एकमुखी दत्त यांची यात्रा सर्वत्र प्रसिद्ध आहे. विविध राज्यांतील उमदे, देखणे घोडे हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते. या व्यतिरिक्त शेतीपयोगी विविध साहित्याची देखील मोठी रेलचेल पाहण्यास मिळते. जोडीला कृषिप्रदर्शनासही मोठा प्रतिसाद लाभतो. महत्त्वाचे हिवाळी पर्यटनस्थळ म्हणून सारंगखेडा पुढे येत आहे. ग्रामीण कला, संस्कृती आणि शेती अर्थव्यवस्थेला चालना देणारा उत्सव म्हणून या यात्रेकडे पाहिले जाऊ लागले आहे. 

सारंगखेडा हे गाव धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर वसले आहे. तापी नदीकाठी वसलेल्या व सुमारे १२ हजार लोकसंख्या असलेल्या या गावाची शेतीप्रधान अशीच ओळख आहे. कापूस, पपई व हंगामी पिके शिवारात दिसतात. तापी नदीआधारे सिंचनाचे भक्कम स्रोत असल्याने बऱ्यापैकी सुबत्ताही आहे. 

यात्रेची परंपरा 
सारंगखेडची एकमुखी दत्त यात्रा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. मागील दोन वर्षे यात्रेत पर्यटन विभागाचा सहभाग वाढला आहे. दत्तजयंतीच्या पाच ते १० दिवसांपूर्वीच सुरुवात होणारी ही यात्रा दत्त जयंतीनंतर सुमारे १५ दिवस चालते. यंदा सात जानेवारीपर्यंत ती सुरू राहील. सन १८३२ मध्ये भरवाडे (ता. शिरपूर, जि. धुळे) येथील नंदाराम मक्कन पाटील यांनी एकमुखी दत्त यांचे मंदिर बांधले. तेव्हापासून यात्रेला सुमारे ३५० वर्षांची परंपरा आहे. 

अश्‍व हेच यात्रेचे आकर्षण 
यात्रेच्या अनुषंगाने अश्‍वबाजार आयोजित करण्याची परंपरा कायम आहे. पूर्वी आखाती देश, अगदी अफगणिस्तान, पाकिस्तानातील घोडे पूर्वी विक्रीसाठी यायचे. यंदा दक्षिण महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ आदी राज्यांमधील घोडे दाखल झाले आहेत. सुमारे दीडशे व्यापारी दाखल झाले आहेत. घोड्यांसाठी मंडपाची मोफत व्यवस्था आहे. त्यानजीक पाच एकरांत अश्‍वबाजार भरतो. तेथे अश्‍वांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. त्यांची किंमत १० हजार रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंत असते. 

कोटीच्या पुढील किमतीचा घोडा 
यंदा उज्जैन (मध्य प्रदेश) येथील मानसिंग राजपूत यांचा नुकरा जातीचा सुलतान हा पांढराशुभ्र, देखणा, उंच घोडा यात्रेत चर्चेत आहे. त्याची एक कोटी ११ लाख रुपये किंमत घोडेमालकाने निश्‍चित केली आहे. त्याला रोज पाच लिटर दूध, काजू, बदाम, अंडी असा खुराक खाऊ घातला जातो. पाच हजार रुपये दररोज त्याच्या खुराकसाठी खर्च होतात. त्याचे वय साडेचार वर्षे असून उंची ६५ इंच आहे. 
उत्तर प्रदेशातील हुकुमसिंग अंजना यांचा चेतक नामक घोडा देशभरात विविध ठिकाणच्या अश्‍वदौड स्पर्धांमध्ये सहा वेळेस विजयी ठरला आहे. तो मारवार जातीचा असून रंग काळा आहे. त्याचे चारही पाय खुरानजीक पांढरे शुभ्र आहेत. 

शेतीपयोगी साहित्याचेही आकर्षण 
टिकाव, कुदळ, फावडे, विळा, हातोडा, वखर, नांगर, लोखंडी बैलगाडे आदींचेही या यात्रेत वेगळे आकर्षण असते. सुमारे सात एकरात हा शेतीपयोगी साहित्यासह भांडी विक्रीचा बाजार भरतो. पितळी, तांब्याची विविध भांडी, बैल यांच्या सजावटीचे साहित्यही विक्रीस असते. खानदेशातील अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, नंदुरबार, तळोदा, शिरपूर, धुळे यासोबत मध्य प्रदेशातील मिळून दोन हजारांपेक्षा अधिक विक्रेते यात्रेत दाखल झाले आहेत. 

अवजारांची विविधता 
यात्रेत बैलजोडी चलित नांगर २००० रुपये, कोळपे वजनानुसार ८०० रूपये, वखर १८०० रुपयांपर्यंत, टिकाव ३०० रु., विळा १५० रु. असे दर आहेत. सुमारे २०० ते ५०० रुपयांचे विविध वजन व आकारातील हातोडे उपलब्ध आहेत. बैलजोडीचलित बहुउद्देशीय अवजार ३५०० रुपयांना उपलब्ध आहे. सारंगखेडातील स्थानिक कारागीर लोखंडी बैलगाड्यांची निर्मिती करतात. त्यांच्या किमती २० हजार रुपयांपासून पुढे आहेत. बैलांच्या सजावटीसाठीच्या झूल, घुंगरू, पैंजण, कमरपट्टा, मणिमाळ सोबत कासारा, गेठे तसेच घोड्यांच्या सजावटीसाठी साहित्य ठेवण्यात आले आहेत. 

सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांची भेट 
कृषी व ‘आत्मा’ विभागातर्फे दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन भरविले जाते. यंदा प्रदर्शन गावात बसस्थानकानजीक भरवले आहे. केळी, पपई, कापूस, ऊस, कमी पाण्याची पिके, उडीद, मूग, तूर याव्यतिरिक्त पीक अवशेषांचे महत्त्व, नैसर्गिक शेती, खते, पाणी व्यवस्थापन, बियाणे आदी सविस्तर माहिती या वेळी दिली जाते. कृषी विभागाचे कर्मचारी त्यासाठी नियुक्त केले आहेत. मागील वर्षी सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली होती. यंदाही तेवढेच शेतकरी तंत्रज्ञानाचा लाभ घेतील असा अंदाज आहे. जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे नाव, पत्ता व संपर्क क्रमांकही उपलब्ध करण्यात आले आहेत. 

चेतक फेस्टिव्हल 
यात्रेत ‘चेतक फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात येते. सारंगखेडा येथील जयपालसिंह रावल यासंबंधीच्या समितीचे प्रमुख आहेत. सारंगखेडा हे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे आजोळ असून, त्यांनी यात विशेष लक्ष घातले आहे. ‘फेस्टिव्हल’मध्ये अश्‍व पोस्टर स्पर्धा, अश्‍व नृत्य व दौड, हास्य कविसंमेलन, कबड्डी, शरीरसौष्ठव, सौंदर्य, लावणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. परदेशातील पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता तापी नदीकाठी आठ एकरात ‘टेंट हाउस’ उभारले आहे. त्यात एकूण ६० टेंट आहेत. यातील ३० वातानुकूलित असून पंचतारांकीत सेवा देण्यात आली आहे. 

संपर्क- रवींद्रभाई पाटील- ९४२३२६१६३० 
उपाध्यक्ष, श्री दत्त मंदिर ट्रस्ट, सारंगखेडा 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
अवीट  गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
शेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोडजारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा...
निवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील...भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झालेले ओमप्रकाश...
काळ्या द्राक्षांच्या शेतीत तोडकरांचा...सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील तोडकर बंधूंनी...
दर्जेदार ‘अर्ली’ द्राक्ष उत्पादनात...नाशिक जिल्ह्यात देवळा, सटाणा भाग ‘अर्ली’ (आगाप)...
संरक्षित शेतीने आर्थिक पाया केला भक्कमदुष्काळाशी तोंड देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील...
आधुनिक तंत्र, बारमाही भाजीपाला शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन, शेतीत...
काळानुसार नवी पिके हेच गमक यशाचे दुष्काळ, पाणीटंचाई, बाजारपेठेतील विविध शेतमालांना...
यांत्रिकीकरणातून यशस्वी भातशेतीभाताचे कोठार असलेल्या मावळ तालुक्यात यंदा पावसाने...
स्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही...कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती...
महिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...
दुष्काळात कामी आले बहुविध पीक पद्धतीतील... नगर जिल्ह्यातील दिघी (ता. कर्जत) येथील शेतकरी...