अवीट  गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला आधार  

प्रफुल्ल व सौ. कुसुम या पाटील दाम्पत्याला मेहरूणी बोरांचा मोठा आधार झाला आहे. बाजार समितीत बोरांची आवकही चांगली आहे
प्रफुल्ल व सौ. कुसुम या पाटील दाम्पत्याला मेहरूणी बोरांचा मोठा आधार झाला आहे. बाजार समितीत बोरांची आवकही चांगली आहे

खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्याला मागणीही खूप असते. त्यामुळेच त्यांचे दर सुरुवातीपासून अखेरपर्यंत टिकून राहतात. अनेक शेतकरी हे पीक बांधावरचे म्हणूनच घेतात. वेचणी, मजुरी, वाहतुकीव्यतिरिक्त फारसा खर्च या पिकाला येत नाही. त्यामुळे आर्थिक बळ देणारे महत्त्वाचे कोरडवाहू पीक म्हणून मेहरुणी बोरांकडे पाहिले जाते.  जळगावची मेहरुणी बोरे सर्वत्र प्रसिद्ध आहेत. सध्या त्यांचा विक्री हंगाम सुरू आहे. ही बोरे आकाराने लहान, रसाळ व अवीट गोडीची म्हणून प्रसिद्ध आहेत. जळगाव शहरानजीकच्या मेहरुण शिवारात त्यांची शेती पूर्वी केली जायची. हा भाग जळगाव शहरात समाविष्ट झाला, तशी तिथली शेती कमी होत गेली. मात्र, जळगाव तालुक्‍यातील विविध भागांत म्हणजे म्हसावद, बोरनार, जळगाव खुर्द, बेळी, कानळादा, नांद्रा, आव्हाणे, खेडी खुर्द व वडनगरी आदी गावांपर्यंत या बोरांचा प्रसार झाला. या गावांतील शेतांच्या बांधावर त्याची झाडे दिसून येतात. काही शेतकऱ्यांनी २५ ते ३० वर्षांपासून त्यांचे चांगले जतन केले असून, ते दर वर्षी उत्पादन घेतात. मेहरुणी बोरांची आवक 

आवक व दर 

  • मागील १५ ते २० दिवसांत प्रतिदिन सरासरी आवक- १२ क्विंटल 
  • मिळालेले दर- किमान १५, तर कमाल २५ रु. प्रतिकिलो 
  • मागील वर्षीही डिसेंबर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक टिकून. दर १२ ते २० रुपयांदरम्यान 
  • दिवाळी सण आटोपला की बोरांची आवक सुरू 
  • जळगाव बाजार समितीत सर्वाधिक आवक 
  • बाजार समितीमधील अडतदार बोर उत्पादकांकडे आगाऊ नोंदणी करतात 
  • बोरांचे ग्राहक  काही शेतकरी दररोज १० ते १५ किलो बोरे घेऊन जळगाव शहरात व उपनगरांत हातविक्री करतात. त्यास प्रतिकिलो ३० ते ४० रुपये दर मिळत आहे. मोठ्या आकाराच्या संकरीत बोरांच्या तुलनेत मेहरुणी बोरांचे ग्राहक जळगाव, धुळे भागात अधिक आहेत. ज्यांचा नातेवाइक, व्यवसाय, नोकरी आदी कारणांनी जळगाव शहराशी संपर्क असतो. काही जळगावकर मंडळी आपल्या नातेवाइकांना पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई, बंगळुरू, नागपूर आदी भागांत पाठविण्यासाठी ही बोरे आवर्जून घेतात. त्यामुळेच  बाजार समिती किंवा किरकोळ बाजारात त्यांना चांगला उठाव आहे आणि दरही टिकून असतो. जानेवारीच्या मध्यानंतर आवक कमी होईल. वीस जानेवारीच्या आसपास हंगाम संपेल.  कोरडवाहू, आश्‍वासक पीक  शेतकऱ्यांचे अनुभव  बेळी (ता. जळगाव) येथील सुरेश चौधरी म्हणाले, की बांधावर बोराची चार ते दहा वर्षे वयाची १० झाडे आहेत. वेगळ्या सिंचनाची गरज पडत नाही. खते, कीडनाशके फवारण्या घेत नाही. बोरांना वर्षभर तसा फारसा खर्च नाही. फक्त उन्हाळ्यात मे किंवा जूनमध्ये छाटणी होते. जोमात फुटवे येतात. वेचणी स्वतः करतो. मजुरी लागत नाही. सध्या दोन दिवसाआड ५० ते ६० किलो दर्जेदार बोरे मिळतात. बाजार समितीत सुरवातीला १२ ते २२ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. सध्या २५ रुपये दर सुरू आहे. प्रतिझाडापासून तीन ते चार हजार रुपये उत्पन्न मिळते. वाहतूक खर्च मात्र येतो.  कानळदा (ता. जि. जळगाव) येथील प्रफुल्ल भाऊराव पाटील (गांधलीकर) वीस वर्षांपासून बोरांची शेती करतात. त्यांची सुमारे २५ झाडे आहेत. पत्नी कुसुमबाई यांची मोठी साथ मिळते. शेती तीव्र उताराची, हलकी आहे. त्यात अन्य कोरडवाहू पिके घेणे शक्‍य नाही. जमीन गिरणा नदी काठावर आहे. दिवाळीनंतर बोरांचा हंगाम सुरू होतो. तो मकरसंक्रांतीपर्यंत सुरू असतो. सिंचनाची सोय नाही. बोर हेच त्यांचे प्रमुख पीक. तीन दिवसाआड वेचणीतून सुमारे अडीच ते पावणेतीन क्विंटल माल मिळतो. वेचणीसाठी दोन मजुरांची मदत घेतली जाते. जळगावच्या बाजारात बोरे नेण्यासाठी सुमारे ५०० रुपये खर्च लागतो. दर आठवड्याला दीड ते दोन हजार रुपये उत्पन्न हाती पडते.  प्रफुल्ल पाटील-९७६४३८७६९८  कानळदा (ता. जळगाव) येथील सुपडू गबा भदाणे २१ वर्षांपासून मेहरुणी बोरांच्या सुमारे ६५ झाडांचे संगोपन करतात. काही शेताच्या मध्यभागी, तर काही बांधावर आहेत. तीन एकर जमीन गिरणा नदीकाठी असून, ती हलकी, वाळूमिश्रित आहे. त्यात कोरडवाहू हंगाम हवा तसा येत नाही. सिंचनाची सोय नाही. ज्वारी, तूर व रब्बीत दादर ज्वारी पेरतात. मुलगा अरुण, सुना व पत्नी यांच्या मदतीने सुपडू शेतीचे व्यवस्थापन करतात. गारपीट, अधिक दिवस ढगाळ वातावरण यामुळे बोरांची प्रत घसरते, अन्यथा कोरड्या व थंड वातावरणात हंगाम जोमात असतो. खते, फवारणी किंवा काढणीपश्‍चात असा खर्चही फार नाही. मागील वर्षी २० ते ३० रुपये, तर तर यंदा ३० ते ४० रुपये दर प्रतिकिलो मिळतो आहे.  दररोज दीड क्विंटल उत्पादन मिळते. काही वेळेस हातविक्रीतून अधिक नफा मिळवला जातो.  वाळविलेल्या बोरांना प्रति क्विंटल १५०० रुपयांपर्यंत दर मिळतो. दर वर्षी सुमारे ६० ते ६५ हजार रुपये या पिकातून मिळतात.  सुपडू भदाणे- ९०४९२४३७३४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com