वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती

सध्याच्या दुष्काळात लीकचे उत्पादन घेतले जात आहे.
सध्याच्या दुष्काळात लीकचे उत्पादन घेतले जात आहे.

वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील सुनील प्रल्हाद काटवटे यांनी आपल्या केवळ दोनच एकरांत संपूर्ण परदेशी भाजीपाला (एक्सॉटिक) शेती फुलवली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पाच ते पंधरा गुंठे क्षेत्र निवडून वर्षभरात सुमारे सात ते आठ प्रकारचा भाजीपाला घेण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले आहे.    सातारा जिल्ह्यातील नागठाणे गाव आले पिकासाठी प्रसिद्ध आहे. ऊस व भाजीपाला शेतीसाठीही गावातील शेतकरी ओळखले जातात. उरमोडी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असल्याने नदीस बारमाही पाणी अडवले आहे. साहजिकच बागायती शेतीला भरपूर वाव मिळाला आहे.  शेतीचा अनुभव  आले, ऊस या नगदी पिकांपेक्षा गावातील सुनील काटवटे यांनी परदेशी अर्थात एक्सॉटिक भाजीपाला शेतीची कास धरली आहे. सुमारे तीन वर्षांपासून त्यात सातत्य ठेवण्याबरोबर चांगले अर्थार्जनही करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्वी सुनील रोजंदारीच्या कामावर जायचे. मुंबई येथे वर्तमानपत्र पुरवठा व्यवसायाही त्यांनी केला. मुंबई येथे शेअर ट्रेडिंगशी संबंधित त्यांचा व्यवसायदेखील आहे. मिळत असलेल्या उत्पन्नातून शिल्लक टाकून दोन एकर जमीन त्यांनी खरेदी केली. शेतीचीच आवड असल्याने व्यवसाय भाडेतत्त्वावर देत २००७ च्या सुमारास ते गावाकडे आले.  आले पिकापासून सुरवात  मुंबई येथील व्यवसाय अडचणीत आल्यानंतर तोटा सहन करावा लागला होता. मात्र खचून न जाता शेतीवरच भर देण्यास सुरवात केली. सुरवातीला आले पिकाची १५ गुंठे क्षेत्रात लागवड केली. त्यातून १५ गाड्या (प्रतिगाडी ५०० किलो) उत्पादन मिळाले. दरही चांगला मिळून उत्पन्नही चांगले मिळाले. पहिला अनुभव समाधानकारक वाटल्यानंतर उत्साह वाढला. त्यानंतर काही वर्षे आले, ऊस ही पिके सुरू ठेवली. नावीन्याचा ध्यास असल्याने महामार्गालगत शेती भाडेतत्त्वावर घेऊन नर्सरी सुरू केली. यामध्ये फळझाडे, शोभिवंत व भाजीपाला रोपांची निर्मिती सुरू केली. यामध्येच झुकीनी, चेरी टोमॅटो, ब्रोकोली, लाल कोबी, कांदा आदी प्रकारच्या परदेशी भाजीपाल्याची ओळख झाली. या भाज्यांचा कालावधी, अर्थशास्त्र, मार्केट यांची माहिती मिळवली. त्यातून आपणही हा प्रयोग करून पाहावा असे वाटू लागले.  परदेशी भाजीपाला प्रयोग  २०१५ मध्ये हिरवी व पिवळी झुकिनीची सुमारे १७ गुंठ्यांत लागवड केली. अनुभव नसल्यामुळे लागवड थोडी दाट झाली. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाला. मात्र उपाय म्हणून दोन्ही सरींमध्ये आडवी नेट बांधून नियंत्रण मिळवले. या अडचणीतूनही साडेसहा ते सात टन उत्पादन मिळाले. किलोला सरासरी ४० ते ५० रुपये दर मिळाला. खर्च वगळता सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.  या प्रयोगातून अन्य परदेशी भाज्यांच्या प्रयोगाविषयी आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर तीन वर्षांपासून परदेशी भाजीपाला सातत्याने घेतला जात आहे. यामध्ये झुकिनी, चेरी टोमॅटो, ब्रोकोली, लाल कोबी, कांदा, लोलो, लीक आदी भाज्यांचे उत्पादन घेण्यात येत आहे. सध्या दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने केवळ चेरी टोमॅटो, लाल कोबी व लीक ही पिके शेतात उभी आहेत.  काटवटे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 

  • वर्षभरात सुमारे सात परदेशी भाज्यांचे प्रकार, प्रत्येकासाठी क्षेत्र ५ गुंठ्यांपासून १५ ते २० गुंठे 
  • सर्व क्षेत्रावर ठिबक सिंचन, रेन पाइप, मल्चिंग पेपरचा वापर 
  • प्रतवारी, पॅकिंग करून मुंबई व गोवा या प्रमुख ठिकाणी माल पाठवला जातो. तेथील व्यापारी वा पुरवठादार यांच्याशी सतत संपर्क ठेवत मागणीचा अंदाज घेतला जातो. त्यानुसारच पुढील हंगामात भाजीची निवड 
  • भाज्यांचे ‘रोटेशन’ ठेवले जाते. 
  • वर्षाकाठी एकरी सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 
  • यंदाच्या जानेवारीत दहा गुंठे क्षेत्रात सात लाख रुपये खर्च करून शेडनेटची उभारणी, कृषी विभागाकडून २५ टक्के अनुदान, सध्या त्यात चेरी टोमॅटो, देशी हिरवी मिरची 
  •  एक विहीर, दोन कूपनलिका. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत असताना रेन पाइप, ठिबक यांचा वापर 
  • पत्नी सौ. शोभा, मुलगा ध्ययेश, मुलगी अनुजा यांची मोठी मदत शेतीत होते. 
  • गोठा बांधला असून, देशी गोपालन व शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जाणार आहे. 
  • कृषी साहायक अकुंश सोनावले तसेच ॲग्रोवन दैनिकाचे मोठे मार्गदर्शन मिळते. 
  •  संपर्क- सुनील काटवटे - ७०६६५५२५०६ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com