विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे मार्ग 

टोमॅटोला कोबीची दिलेली साथ.
टोमॅटोला कोबीची दिलेली साथ.

यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या माने बंधूंनी पारंपरिक शेतीच्या मागे न लागता उत्पन्नाच्या वेगळ्या वाटा शोधल्या आहेत. हळद प्रक्रिया यंत्रे भाडेतत्त्वावर देत त्यातून रोजगार शोधला आहे. विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्याबरोबरच ‘नर्सरी’ तयार करून रोपविक्री व्यवसायातून उत्पन्नाला हातभार लावला आहे.    यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अंबोडा गावात महेश व दीपक या युवा तायडे बंधूंची शेती आहे. कुटुंबाची सुमारे आठ एकर शेती आहे. पूर्वी हे कुटुंब पारंपरिक पिकांचीच शेती करायचे. मात्र, युवा पिढी नव्या कल्पना घेऊन चालणारी आहे. त्याचे प्रतिबिंब निश्‍चित शेतीत दिसून येते. आपल्या भागातील पिकांची बाजारपेठ क्षमता लक्षात घेऊन तायडे बंधूंनी भाजीपाला शेतीची प्रामुख्याने निवड केली. यातही प्रत्येकी २० गुंठ्यांवरील लागवडीचे नियोजन असते.  कृषी शिक्षणावर दिला भर  कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मुक्‍त विद्यापीठाच्या माध्यमातून बीएस्सी (कृषी)चे शिक्षण महेश घेत आहे. या शिक्षणातून मिळत असलेल्या तांत्रिक ज्ञानाचा अंतर्भाव दैनंदिन शेती व्यवस्थापनात करण्यावर भर देत असल्याचे त्याने सांगितले.  ऊस, केळीची सोडली साथ  शेतात पाण्यासाठी बोअरवेल आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार केळी व ऊस लागवड दोन वर्षे केली. त्यानंतरच्या काळात पाण्याची टंचाई भासू लागली. परिणामी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा शोध सुरू केला. गावातील काही शेतकऱ्यांद्वारे टोमॅटो उत्पादन गेल्या काही वर्षांपासून घेतले जाते. त्यांच्यासोबत  झालेल्या चर्चेनंतर अर्थशास्त्र जाणून घेतल्यानंतर या पिकाकडे तायडे बंधू वळले.  कोबी, मिरची, वांगी, टोमॅटो, शेवगा आदींची विक्री सुरवातीच्या काळात थेट करण्यात आली. महागाव, माहूर यासह परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारांची त्यासाठी उपलब्धता होती. आता व्यापाऱ्यांनाच माल देण्यावर भर असतो. अंबोड्यापासून पुसद, माहूर, उमरखेड, महागाव या बाजारपेठा काही किलोमीटरवर आहेत. सुमारे २० गुंठ्यांत टोमॅटोचे ८०० क्रेटपर्यंत उत्पादन मिळते, तर सरासरी २०० ते २५० रुपये प्रतिक्रेट दर मिळतो.  शेवगा आहे साथीला  सध्या शेवग्याची २०० झाडे आहेत. पूर्वी बांधावर झाडे होती. आता शेतातही त्यांची लागवड केली आहे. शेवग्याचे दर अनेकवेळा घसरतात. मात्र, किलोला कमाल ४० ते ५० रुपयांपर्यंतही दर मिळवण्यात तायडे यशस्वी झाले आहेत.  सिंचन कालव्यातून मिळते पाणी  अधरपूस प्रकल्पाच्या कालव्यातून अंबोडा गावाला पाणी मिळते, त्यामुळे बारमाही सिंचनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचा गावातील शेतकऱ्यांना मोठा आधार झाला आहे.  हळद प्रक्रिया यंत्रांद्वारे रोजगार  महागाव तालुक्‍यात हळद लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. साहजिकच हळद बॉयलिंग, पॉलिश अशा कामांसाठी यंत्रांची गरज शेतकऱ्यांना भासते. मात्र, या यंत्रांची किंमतही जास्त असल्याने अनेक शेतकऱ्यांना ती परवडत नाही. नेमकी हीच संधी तायडे यांनी शोधली. त्यांनी अर्धापूर (नांदेड) येथून प्रति नग दीड लाख रुपये किमतीची दोन बॉयलर यंत्रे, तसेच एक पॉलिशर यंत्र एक लाख २० हजार रुपयांना खरेदी केले. भाडेतत्त्वावर हळद उत्पादकांना ही यंत्रे उपलब्ध करून दिली जातात. बॉयलिंगसाठी ५० रुपये, तर पॉलिशिंगसाठी १५० रुपये प्रतिक्विंटल दर त्यासाठी आकारले जातात. हा हंगाम साधारण दोन महिन्यांचा असतो. मात्र तेवढ्या काळात किमान एक लाख रुपये व त्याहून अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न तायडे बंधूंचा राहतो. सुमारे ५० ते ६० शेतकरी ही सेवा सध्या घेत आहेत. शेतकऱ्यांकडून आगाऊ नोंदणीवर भर राहतो. दिवसाला सुमारे ३० ते ३५ क्‍विंटल हळदीचे ‘पॉलिशिंग’ होते, तर हंगामात १२०० ते १४०० क्‍विंटल हळदीवर प्रक्रिया केली जात असल्याचे महेश यांनी सांगितले.  रोप विक्रीची संधी शोधली  उत्पन्नाचे स्रोत बळकट करण्यासाठी सरसावलेल्या तायडे बंधूंनी वेगवेगळ्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित केले आहे. महेश म्हणाले, की या भागात अनेक भाजीपाला उत्पादक आहेत. त्यांना रोपे आणण्यासाठी दूर अंतरावर जावे लागते, त्यामुळे परिसरातच त्यांना खात्रीशीर रोपांचा स्रोत उपलब्ध व्हावा यासाठी स्वतःच रोपवाटिका व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यातून आमचेही उत्पन्न वाढण्याची संधी होती. सद्यःस्थितीत तरी इमारतीच्या गच्चीपुरती रोपवाटिका आहे. टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, शेवगा, पपई, शेवंती आदी रोपांचे उत्पादन तेथे घेतले जाते. रोपांना मागणी असल्याने लवकरच व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांना अन्य रोपवाटिकांच्या तुलनेत स्वस्त व दर्जेदार रोपे पुरवणार असल्याचे महेश यांनी सांगितले. यंत्रेपुरवठा, भाजीपाला, ऊसशेती अशा प्रत्येक प्रयत्नातून वर्षाला किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न जोडले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.  काही ठळक बाबी 

  • आठ एकरांपैकी तीन एकर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली. 
  • दोन गावरान गायींचे संगोपन. 
  • उपलब्ध शेणखताचा शेतीत वापर. 
  • गोमूत्राचा ठिबकद्वारे पुरवठा 
  • संपर्क- महेश तायडे - ७२६४९८७३९०  प्रशांत तायडे - ८८०५५३१०२० 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com