दुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती पद्धतीचा दिलासा 

भानुदास चोपडे यांनी दुष्काळात फुलवलेले डाळिंब व अन्य पिके
भानुदास चोपडे यांनी दुष्काळात फुलवलेले डाळिंब व अन्य पिके

शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसविताना शेतकऱ्यांची घालमेल होत आहे. दुष्काळी परिस्थितीचे चक्रही मागे लागले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तालखेड येथील भानुदास प्रल्हाद चोपडे यांनी रासायनिक निविष्ठांचा वापर व त्यावरील खर्च कमी करून नैसर्गिक शेतीवर भर दिला आहे.    बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील तालखेड भाग पूर्वीपासून सधन समजला जातो. जसजसा काळ बदलत गेला आणि पावसाचे प्रमाण कमी होत गेले तशी त्याची झळ इथल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचली. तालखेड येथील भानुदास चोपडे यांची आठ एकर शेती आहे. त्याचबरोबर ते पाच एकर शेती भाडेतत्त्वावर करतात. त्यांचे चार भावांचे एकत्रित कुटुंब असून, पारंपरिक पिकांसोबत फळबाग, भाजीपाल्याची शेती केली जाते.  पाण्याची टंचाई झाली भीषण  पूर्वी सिंचनासाठी पुरेसे पाणी होते. अलीकडील तीन-चार वर्षांत या भागातील पाण्याची स्थिती बिकट झाली. दिवसभरात तास ते दीड तासच मोटरपंप चालेल इतके संकट भीषण झाले आहे. अलीकडील काळात तर दिवाळीचा हंगाम संपला की पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. लागवड केलेल्या फळबागा, उभी पिके डोळ्यांसमोर सुकताना पाहण्याची वेळ येते.  निविष्ठांवरील खर्च केला कमी  चोपडे कटुंबदेखील दुष्काळाच्या झळा सोसते आहे. साहजिकच शेतीतून उत्पन्न समाधानकारक नाही. पण त्यातील उत्पादन खर्च तर कमी करता येईल का याचा विचार त्यांनी केला. यंदाच्या हंगामात रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर पूर्ण टाळण्याचे ठरवले. नैसर्गिक शेतीवर भर दिला. यामुळे १३ एकरांत किमान तीन लाख रुपयांचा खर्च वाचल्याचे समाधान ते व्यक्त करतात. रासायनिक निविष्ठांच्या ऐवजी जीवामृत, दशपर्णी अर्क, सप्तधान्यांकूर अर्क या तुलनेने कमी खर्चिक पध्दतींचा वापर केला.  दुष्काळातही समाधान  यंदा ऑगस्टनंतर पाऊसतच झाला नाही. त्यामुळे खरीप व रब्बीत आव्हानच उभे ठाकले होते. तीन एकरात मॉन्सूनपूर्व कापूस लागवड केली होती. या कापसने दिलासा दिला. एकरी १३ क्विंटलप्रमाणे उत्पादन मिळाले. या कपाशीत मिश्र असलेल्या पिकांनाही थोडा फार हातभार लावला. दोन क्विंटल उडीद, ६० किलो तूर, २० किलो बाजरी असे उत्पादन हाती आले. कपाशीला पूर्वी रासायनिक निविष्ठांसाठी लागणारा ८ ते १० हजारांपर्यंतचा खर्च निम्म्याने तरी खाली आला. खरे तर मागील तीन- चार वर्षांत तालखेड भागात सातत्याने दुष्काळ पडत आहे. अनेकांना उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. भानुदास यांनीही उशिरा लागवड केलेल्या कापसाचे एकरी सात क्विंटलपर्यंतच उत्पादन मिळाले.  असेच सोयाबीनबाबतही झाले. या पिकातही पूर्वी किमान आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत खर्च करून एकरी नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. यंदा दुष्काळी परिस्थितीत हेच उत्पादन सहा ते सात क्विंटलपर्यंत मिळाले. प्रमुख पिकांतील खर्च वाचवून तोटा कमी करण्यात यश मिळाल्याचे भानुदास यांनी सांगितले.  डाळिंब बागेवरील खर्च कमी केला  २०१३ मध्ये चोपडे यांनी तीन एकरांत डाळिंब लावले आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच छाटणी, बहर व्यवस्थापन ते करीत आले आहेत. दुष्काळी परिस्थितीत मोठा खर्च करूनही डाळिंबाला दर मिळत नाही. साहजिकच हा खर्च आता झेपण्यापलीकडे गेल्याचे ते म्हणाले. त्यातच आता पाणी कमी झाल्याचा फटका डाळिंब बागेला बसत आहे. सद्यःस्थितीत दोन दिवसांत केवळ तास ते दोन तासच पाणी मिळू शकते. विहिरीतून एक दिवसाआड तास पाणी मिळते. अशा स्थितीत ही बाग वाचविण्यासाठी पारंपरिक पद्धतींचा अवलंब सुरू केला आहे. बागेला काडीकचरा, गवत यांचे आच्छादन जमिनीत ओलावा टिकवण्याची धडपड सुरू आहे. रासायनिक खतांचा वापरही त्यांनी थांबवला आहे. नैसर्गिक पद्धतीचा वापर आता सुरू झाला आहे. बागेला घनजीवामृत तसेच कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, सप्तधान्यांकूर अर्क यांचा वापर सुरू झाला आहे. पूर्वी एकरी ५० ते ६० हजार रुपये येणारा खर्च यंदा तरी निम्म्याने कमी झाल्याचे समाधान चोपडे यांना आहे. मागील वर्षी डाळिंबाचे एकरी साडेचार ते पाच टनांपर्यंत उत्पादन मिळाले होते. यंदा ते सहा ते सात टनांपर्यंत मिळेल अशी आशा आहे.  जनावरांचा सांभाळ  या शेतीसाठी जनावरांचा मोठा फायदा होत आहे. दोन देशी गायी, दोन म्हशी व एक बैलजोडी  आहे. त्यांच्यापासून शेण-मूत्र मिळते. त्याचा वापर शेतीसाठी केला जातो. 

संपर्क- भानुदास चोपडे - ९५२७०९८१०६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com