मत्स्यविक्रीसाठी इंदापूर बाजारपेठेची सर्वदूर ओळख 

मत्स्य व्यवसायाचे ‘मार्केट’ म्हणून ‘इंदापूर’ची राज्यभर ओळख आहे.आगामी काळात प्रक्रिया उद्योग उभारणीचा मानस आहे. त्या दृष्टीने पाऊले टाकण्यास सुरवात केली आहे. -अप्पासाहेब जगदाळे सभापती, बाजार समिती, इंदापूर,
इंदापूर बाजार समिती व तेथे विक्रीस येणारे मासे
इंदापूर बाजार समिती व तेथे विक्रीस येणारे मासे

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती दर्जेदार मत्स्यविक्रीची राज्यातील सर्वांत प्रसिद्ध बाजारपेठ आहे. काही कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या व विविध सुविधा दिलेल्या या बाजारपेठेत विविध प्रकारच्या माशांची आवक-जावक होते. परिसरासह राज्य-परराज्यातील शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांना त्याचा मोठा लाभ घेणे शक्य झाले आहे.  सोलापूर आणि पुणे जिल्हयाच्या हद्दीवर उजनी जलाशय आहे. साहजिकच या परिसरातील अनेक शेतकरी मत्स्यपालन व्यवसाय करतात. हाच विचार करून इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदिस्त व सुरक्षित बंदिस्त खुली मत्स्य बाजारपेठ संकल्पना राबविली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजारपेठ तयार झाली. इंदापूर व भिगवण येथील बाजारपेठेत त्यातून माशांची मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागली. मासळी अडते तसेच व्यापारी म्हणून अनेक बेरोजगार तरुणांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध झाले.  इंदापूर मत्स्य बाजारपेठ- वैशिष्ट्ये 

  • सहा ते सात जिल्ह्याचे मुख्य केंद्र 
  • होलसेल व किरकोळ व्यापाऱ्यांची मुख्य बाजारपेठ 
  • महाराष्ट्रातील एकमेव मत्स्य मार्केट म्हणून ओळख 
  • बाजार समितीतर्फे मत्स्य व्यावसायिक शेतकऱ्यांसाठी सर्व सोयी उपलब्ध. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर 
  • माढा, करमाळा, दौड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, सोलापूर, हैदराबाद, सांगोला, म्हसवड तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील आलमट्टी धरणातील मासेही विक्रीस येतात. 
  • पावसाळ्यात धरणाला अधिक पाणी. त्यामुळे माशांची उपलब्धता कमी 
  • पाण्याची पातळी कमी होत जाते तशी माशांची उपलब्धता वाढत जाते. 
  •  अडत्यांची संख्या- २५ 
  • खरेदीदार- ३०० ते ४०० 
  • पुणे, मुंबई तसेच अन्य ठिकाणी पुरवठा 
  • परराज्यांतही बाजारपेठ लोकप्रिय 
  • सुविधा- मोठे व सुसज्य गाळे, ‘फ्लॅटफार्म, ‘इटीपी प्लँन्ट, तारांचे कुंपण, बर्फनिर्मिती, पाण्याची सुविधा, पँकिग युनिट व खराब मासे प्रक्रिया प्रकल्प 
  • स्वच्छतेवर अधिक भर  स्वच्छ, निरोगी वातावरणात माशांची विक्री व्हावी यासाठी परिसराची नियमित स्वच्छता केली जाते.  त्यामुळे खरेदीदारांच्या संख्येत वाढ होत आहे. व्यापारीदेखील स्वच्छतेवर अधिक भर देतात.  विक्री, दर व उलाढाल 

  • वीस ते पंचवीस प्रकारचे मासे विक्रीसाठी उपलब्ध 
  • प्रतिकिलो २० ते १०० रुपये किलो दर 
  • श्रावण महिन्यात कमी दर. दिवाळीनंतर वाढण्यास सुरवात. 
  • वार्षिक सुमारे २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल. 
  • मत्स्यव्यवसायासाठी पुरेशी जागा. दळणवळणाची सोय. 
  • भविष्यात आधुनिक मासे प्रक्रिया युनिट उभारणी करण्याचा बाजार समितीचा मानस 
  • भिगवणला बाजारपेठ उभारणीचे काम  इंदापूर बाजार समितीस राष्ट्रीय मत्स्यिकी विकास यांच्या अर्थसाह्यातून व महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळाच्या सहकार्याने अनुदान मिळाले आहे. त्यातून इंदापूर येथे तीन कोटी १५ लाख रुपयांची ठोक (होलसेल) व उपबाजार भिगवण येथे एक कोटी ३१ लाख रूपयांच्या किरकोळ बाजारपेठेची उभारणी झाली. भिगवण येथे ‘एमएफडीसी’अंतर्गत बांधकामासाठी ६३ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.  प्रतिक्रिया 

    अनेक वर्षांपासून पळसदेव येथे मत्य व्यवसाय करतो. दररोज वीस ते पंचवीस किलो मासे पकडतो. इंदापूर बाजारात दररोज १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यावर पाच व्यक्तीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.  -आजिनाथ भोई, पळसदेव, ता. इंदापूर ,     इंदापूरतील मार्केटमध्ये टिलापिया माशांना अधिक मागणी आहे. दररोज ५० ते ६० किलो मासे विक्रीसाठी आणतो. चांगला दर मिळतो. काही वेळा कमी दरांवरही समाधान मानावे लागते.  -नितीन नगरे, मत्स्य व्यवसायिक, डाळस क्र. तीन, ता. इंदापूर 

    इंदापुरात १९८५ पासून तर बाजारसमितीत २००३ सालापासून मत्स्य व्यवसाय करतो.  दररोज एक ते दोन टनांपर्यंत विक्री होते.  -बाळासाहेब गाडेकर, मत्स्य व्यापारी     दररोजची विक्री करून शिल्लक माल मुंबईजवळील तळोजा येथील कंपनीस पाठवितो. त्यातून चांगला दर मिळतो.  -शिवाजी रामचंद्र बोई, मत्स्य व्यापारी  माझ्याकडे रोहू, कटला, मृगल, शिंगाडा असे मासे विक्रीसाठी येतात. किरकोळ ग्राहकांसह, पुणे, मुंबई, सोलापूर, हुबळी (कर्नाटक) येथे पाठवितो.  -अंगद गायकवाड, मत्स्य व्यापारी,  कटला, रोहू, शिंगाडा यांना माझ्याकडे सर्वाधिक मागणी असतो. दररोज दीड ते दोन टन विक्री होते.  -शरद गलांडे, मत्स्य व्यापारी,    मी उस्मानाबाद येथे २००३ पासून किरकोळ मासे विक्री व्यवसाय करते. इंदापुरातील माशांना आमच्याकडे सर्वाधिक मागणी असते. दोन ते तीन दिवसांमागे ४००-५०० किलो खरेदी होते.  -त्रिमाला जगन्नाथ शेरखाने, खरेदीदार, उस्मानाबाद    अलीकडील वर्षांतील इंदापूर मत्स्य मार्केट उलाढाल  

    वर्ष  मासे विक्री (क्विंटल) किंमत (रुपये) 
    २००५-०६ १०,८८५ ३,९७,०२,५०० 
    २०११-१२ १९,७५२ - १२,५८,३८,५०० 
    २०१३-१४ २५,०३०  १३,६५,७२,५०० 
    २०१५-१६ ३०,३९५ १६,७१,७७,२१० 
    २०१६-१७  ४६,५९७ २०,९६,८७,४०० 
    २०१७-१८ ६३,४७२ २६,३२,२८,५८५ 

    विक्री होत असलेल्या काही मत्स्यजाती  टिलापिया, राहू, कटला, मृगल, वाम, गुगळी, शिंगटा, चालट, सायप्रनस, काणस, चोच, कोळंबी, झिंगा, आमळी, बोधवा, सीलन व रुपचंद (हैदराबाद), वाम, सुरमई, पापलेट व बोंबील (मुंबई ), मांगूर, भाती, खेकडा (दुर्मिळ)  संपर्क- जीवन फडतरे-९४२२०७८४४८  सचिव, बाजार समिती इंदापूर   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com