काळानुसार नवी पिके हेच गमक यशाचे 

पंचक्रोशीत डाळिंबाच्या लागवडीत अग्रेसर होतो. आता नवे पीक म्हणून पेरूची भागात प्रथमच लागवड केली. पेरू खालील क्षेत्र वाढू लागले आहे. त्यामुळे जांभळाची निवड केली. पुढील काळात आणखी नवे पीक शोधू. इतरांपेक्षा दोन चार वर्षे पुढे राहून काळानुसार बदल करीत राहिलो तर शेतीत टिकून राहता येते. -महादेव बरळ
बरळ यांनी घेतलेले दर्जेदार पेरू उत्पादन
बरळ यांनी घेतलेले दर्जेदार पेरू उत्पादन

दुष्काळ, पाणीटंचाई, बाजारपेठेतील विविध शेतमालांना असलेली मागणी, दर, उत्पादन खर्च आदी सर्वांचा अभ्यास करून निमगाव केतकी (जि. पुणे) येथील माणिक आणि महादेव या बरळ बंधूंनी आपल्या शेतीत बदल घडवले आहेत. गारपिटीने डाळिंब बागेचे अपरिमित नुकसान झाले. पण खचून न जाता पेरू, जांभूळ,, लिंबू या पिकांची वाट धरत त्यांनी शेती यशस्वी करण्याची कला आत्मसात केली आहे.  पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका डाळिंब पिकासाठी प्रसिद्ध आहे. निमगाव केतकी गावातही पट्टीचे डाळिंब उत्पादक पाहण्यास मिळतात. माणिक व महादेव हे बरळ कुटुंब त्यापैकीच एक होय.  त्यांची वडिलोपार्जित तीन एकर शेती होती. दुष्काळी भागात परिसरातील पानमळ्यांमध्ये मजुरीवर वेली बांधणे, पाने काढणे आदी कामे केली जायची. शिक्षण घेत असतानाच स्वतःची शेतीही करायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माणिक टेलरिंगचा व्यवसाय करू लागले. महादेव बॅटरी मॅकॅनिक झाले. काम सांभाळून शेतीही करीत होते. व्यवसाय तसेच शेतीतील उत्पन्नातून तीन टप्प्यांमध्ये १२ एकर शेती खरेदी केली. माणिक यांना पत्नी सौ. शुभांगी तर महादेव यांना पत्नी सौ. निता यांनी खंबीर साथ दिली.  दुष्काळावर मात  पाइपलाइन केली-  आज अन्य कोणताही व्यवसाय न करता केवळ शेतीवर प्रगती करण्यापर्यंत बरळ यांनी मजल मारली आहे. आपल्या शेतीचा विकास करताना शेळगाव येथून सुमारे सहा किलोमीटर पाइपलाइन करून पाणी आणले.  दोन एकरांत शेततळे-  दोन एकर क्षेत्रात प्रत्येकी सुमारे एक कोटी क्षमतेची दोन शेततळी बांधली. पावसाळ्यात तसेच वीर धरणाच्या कालव्याला पाणी आले की हे पाणी शेततळ्यांमध्ये साठवून ठेवले जाते. कालव्याचे आवर्तन पूर्ण झाले की शेततळ्याचे पाणी पिकांसाठी वापरले जाते. विहीर, बोअरवेलचे पाणीही मिळते. पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळापासून पाटाद्वारे पाणी दिले जात नाही. संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा अवलंब केला जातो.  गारपिटीने बाग झाली उद्‌ध्वस्त  आपल्या पंधरा एकरांपैकी बारा एकरांवर डाळिंबाची बाग पूर्वी घेतली होती. त्यातून आर्थिक स्थिती आणि नावलौकिक मिळवला. अन्य शेतकऱ्यांनी बरळ यांच्या वाटेने मार्गक्रमण केले. मात्र मार्च २०१४ मध्ये झालेल्या तुफानी गारपिटीने डाळिंबाची सर्व बाग उद्‌ध्वस्त झाली. तेसकट डाग व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. झाडांचे वय देखील अधिक झाले होते. पुन्हा उभारी धरणे शक्यच झाले नाही. टप्प्याटप्याने बाग काढून टाकावी लागली.  नवे निवडलेले पर्याय  डाळिंबापेक्षा कमी पाणी लागते. दरही चांगले आहेत. उत्पादनही चांगले मिळते. या तीन बाबींचा विचार करून पेरू व जांभूळ यांची निवड केली. जोडीला लिंबू.  पेरू- 

  • छत्तीसगड येथून मोठ्या आकाराच्या पेरूची रोपे आणली. 
  • दोन एकर जुनी व तीन एकर नवी बाग, १० बाय ७ फुटांवर लागवड 
  • प्रतिएकरी उत्पादन- १० ते १३ टनांपर्यंत 
  • पेरूचा आकार- पाचशे ग्रॅम, पाऊण किलोपासून एक किलोपर्यंत 
  • प्रतवारी करून २० किलोचे पॅकिंग. पुणे येतील बाजारपेठेत विक्री. 
  • दर- सरासरी ६० ते ७० रुपये प्रतिकिलो 
  • गुणवत्ता चांगली असल्याने कमाल दर त्याहून मिळाला आहे. 
  • उत्पादन खर्च- एकरी ८० हजार रुपयांपर्यंत 
  • शेती व्यतिरिक्त पॅकिंगसाठी मजुरीसाठीही खर्च 
  • घरातील सर्वजण काम करत असल्याने मजुरांवरील अवलंबित्व कमी 
  • पेरू बागेचे नियोजन 

  • जुलै, ऑगस्टमध्ये पेरूला चांगला बाजार मिळतो. त्यामुळे मार्चमध्ये नवीन हंगामाचे नियोजन 
  • याच महिन्यात छाटणी 
  • त्यानंतर एकरी प्रत्येकी चार ट्राॅली शेणखत, लेंडीखत, दीड टन गांडूळखत 
  • सेंद्रिय खतांवर भर. काही प्रमाणातच गरजेनुसार रासायनिक खते. त्यामुळे खर्चही कमी झाला आहे. -ठिबकद्वारे दिवसाआड दोन तास पाणी 
  • पावसाचे कमी प्रमाण आणि आणि निचरा होणारी जमीन. त्यामुळे पेरूची गुणवत्ता चांगली मिळते. 
  • उन्हामुळे फळांवर चट्टे पडू नयेत म्हणून कागद, फोम, प्लॅस्टिक पिशवी यांचे आच्छादन. त्यामुळे फळाला चांगली चमक. किडींपासून संरक्षण. 
  • जांभूळ 

  • अडीच एकरांत पाच वर्षांपूर्वी जांभळाची लागवड 
  • चार वर्षांनतर उत्पादन सुरू. सध्या साडेतीनशे झाडे. 
  • पश्चिम बंगाल तसेच दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून बहाडोली वाण आणले. 
  • जांभूळ बागेतून पहिल्या वर्षी दीड टनांपर्यंत उत्पादन. स्थानिक विक्रेत्यांनी १३० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली. 
  • जांभळात अंतरपीक म्हणून सव्वा एकरात सिडलेस लिंबू, उर्वरित सव्वा एकरात पेरू, आंबा 
  • प्रत्येकी एक एकर भगवा डाळिंब व सीडलेस लिंबू 
  • डाळिंबात खरबुजाचे आंतरपीक. 
  • पेरूच्या नव्या बागेत टोमॅटो. मुख्य पिकाचे उत्पादन सुरू होईपर्यंत आंतरपिकातून उत्पन्न. बागेचा खर्च भरून निघतो. 
  • ॲग्रोवनबद्दल कृतज्ञता  बरळ कुटुंबीय ॲग्रोवनचे पहिल्या अंकापासूनचे वाचक आहेत. ॲग्रोवनमधील यशकथा, पीक सल्ले, अत्याधुनिक तंत्रज्ञान याविषयी मिळालेल्या माहितीमुळे शेतीत प्रगती साधता आली. ही वाटचाल करताना पाचटाचे छप्पर असलेल्या घरातून हे कुटुंब बंगल्यात रहायला आले. तेव्हा कृतज्ञता म्हणून दोन्ही भावांनी आपापल्या बंगल्यांना ‘ॲग्रोवन’ हे नाव दिले. त्यांची यशकथा ॲग्रोवनच्या वर्धापनदिनावेळी म्हणजे २० एप्रिल २०१५ रोजी प्रसिद्ध झाली होती.  पंचक्रोशीत डाळिंबाच्या लागवडीत अग्रेसर होतो. आता नवे पीक म्हणून पेरूची भागात प्रथमच लागवड केली. पेरू खालील क्षेत्र वाढू लागले आहे. त्यामुळे जांभळाची निवड केली. पुढील काळात आणखी नवे पीक शोधू. इतरांपेक्षा दोन चार वर्षे पुढे राहून काळानुसार बदल करीत राहिलो तर शेतीत टिकून राहता येते.  संपर्क- महादेव बरळ-९८९०९८३४३५ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com