जरंडीच्या पाटलांनी जोपासली देशी संकरित कापूस शेती 

देशी संकरित कापसाचे उत्पादन बागायती स्थितीत व चांगला पाऊस असेल तर एकरी साधारणत: १२ क्विंटल किंवा काहीवेळा त्याहून अधिक उत्पादन मिळते. यावर्षी पाऊस कमी असल्याने ते सात ते आठ क्विंटलच मिळाल्याचे पाटील बंधूंनी सांगितले. हा कापूस खरेदी करण्यासाठी जळगाव येथील व्यापारी जरंडी गावात येतात.कापसाचा भाव हा रुईच्या टक्केवारीवरून ठरत असतो. देशी कापसापासून रुई चांगल्या प्रमाणात मिळत असल्याने त्याला दरही चांगल्या प्रकारे मिळतो असे पाटील बंधूंनी सांगितले. क्विंटलला साडेपाच हजार रुपयांपर्यंतही दर मिळाल्याचे ते म्हणाले.
देशी संकरित कापूस दाखवताना दीपक पाटील
देशी संकरित कापूस दाखवताना दीपक पाटील

राज्यात, देशभरात बहुतांश क्षेत्र बीटी कापसाखाली आहे. असे असताना काही शेतकऱ्यांनी मात्र देशी संकरित वाणांची शेती जोपासली आहे. जरंडी (जि. औरंगाबाद) येथील रवींद्र पाटील सुमारे १० वर्षांपासून या कापसाची शेती बीटी कपाशीसह करीत आहेत. अवर्षणात तगणारा, ताण सहन करणारा, रसशोषक किडींना प्रतिकार व गुणवत्तेही चांगला असा हा वाण असल्याचे त्यांचे अनुभव सांगतात.  जरंडी गावात त्यांच्याप्रमाणे अनुभव घेणाऱ्या शेतकरीही अशाच प्रकारचे फायदे घेताना दिसत आहेत.   औरंगाबाद जिल्ह्यातील जरंडी (ता. सोयगाव) येथील शेतकरी सतत नवनवीन प्रयोग करीत असतात. या गावात शिक्षित व अभ्यासू शेतकऱ्यांची संख्या चांगली असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा ते नेहमीच अवलंब करीत असतात. कापूस हे भागातील मुख्य पीक आहे. अलीकडील काळात बीटी कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने हे तंत्रज्ञान निष्प्रभ ठरले आहे. साहजिकच महागडे बियाणे घेऊनदेखील त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नसल्याचे चित्र आहे.  देशी संकरित वाणाचा वापर  जरंडी भागातील काही शेतकरी मात्र देशी संकरित कापसाची शेती पूर्वीपासून करीत आहेत. यात रवींद्र पाटील यांचा समावेश होतो. कृषिभूषण व शेतीनिष्ठ असे पुरस्कारही त्यांना लाभले आहेत. त्यांचे चुलतबंधू दिलीप अलीकडील दोन वर्षांत हे वाण घेत आहेत. रवींद्र यांचे कपाशीखाली सुमारे २५ एकर क्षेत्र आहे. ते बीटी कपाशी घेतातच. शिवाय दहा वर्षांपासून देशी संकरित वाणातही सातत्य ठेवल्याचे त्यांनी सांगितले. या वर्षी गावातील सुमारे १५ शेतकऱ्यांनी ४० एकर क्षेत्रावर देशी संकरित कापसाची लागवड केली आहे. जवळपास सर्व कापूस ठिबक सिंचनाखाली आहे.  देशी कापसाखालील क्षेत्र घटले  भारत स्वतंत्र झाला त्या काळात देशातील एकूण कापूस लागवडीपैकी ९७.५ टक्के क्षेत्र देशी कापसाखाली होते; परंतु संकरित जातींचा शिरकाव झाल्यानंतर त्याखालील क्षेत्र हळूहळू घटू लागले. बीटी कापूस आल्यानंतरच्या काळातही हे क्षेत्र अत्यंत कमी झाले. असे का घडले यामागील कारण शोधायचे तर आपल्याकडे पूर्वी हातमाग होते. इंग्रजांच्या काळात पॉवरलूम तंत्र आले. त्यासाठी देशी कापूस अनुकूल नव्हता. देशी कापसाची बोंडे लहान, धागा आखूड, कमी मजबूत व जाडाभरडा असतो. त्या तुलनेत अमेरिकन कापसाचा धागा लांब, मजबूत व बारीक असल्याने तो योग्य ठरत होता.  शेतकऱ्यांनी जोपासले देशी कापसाचे महत्त्व  बीटी कापसाचे क्षेत्र वाढले तरी देशी कापसाखालीलदेखील काही प्रमाणात क्षेत्र असले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही शेतकऱ्यांनी मात्र लागवडीच्या सातत्यातून ते निश्‍चितपणे टिकवले आहे. देशी कापूस सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येतो. अमेरिकन कापसाच्या जाती पांढरी माशी किंवा अन्य रसशोषक किडींना मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यासाठी फवारण्यांची संख्याही वाढली आहे; परंतु देशी कापूस या रसशोषक किडींना प्रतिकारक आहे. साहजिकच फवारण्यांची संख्या व त्यांच्या खर्चात बचत होते.  हवामानाला प्रतिकार करण्याची क्षमता  हवामानात अनपेक्षित व वेगाने बदल होत आहेत. मॉन्सून अनिश्चित झाला आहे. मात्र बदलत्या हवामानाला तोंड देण्याची क्षमता देशी कापसामध्ये आहे. देशी कापसाची मुळे अमेरिकन कापसापेक्षा जास्त खोलवर जात असल्यामुळे तो अवर्षणास चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. अमेरिकन कापसापेक्षा देशी कापूस लवकर येतोही.  पाटील यांच्या शेतातील अनुभव  रवींद्र, दिलीप या पाटील बंधूंच्या शेतीचे प्रातिनिधिक उदाहरण घेतले तर हे वाण पाण्याच्या ताणास सहनशील आहे. चांगल्या प्रकारचा त्याचा धागा आहे. तो उभट वाढणारा असून बोंडे लागणाऱ्या फांद्याची ज्यास्त संख्या असणारा आहे. या वाणास ३० ते ३४ दिवसांत कळ्या लागतात. साधारण ५८ ते ६२ दिवसांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाडे फुलावर येतात. या वाणाची बोंडे मध्यम आकाराची असून सरासरी वजन दोन ते अडीच ग्रॅम असते. साधारण १५० ते १७० दिवसांत हा वाण आपला जीवनक्रम पूर्ण करतो.  देशी कपाशीचा फायदाच झाला  रवींद्र म्हणाले की पूर्वी २५ मेच्या आसपास आम्ही या कापसाची लागवड करायचो. आता जूनमध्येच त्याचे नियोजन होते. पाच बाय सव्वा फूट असे लागवडीचे अंतर ठेवतो. एकरी साधारण साडेचारशे ग्रॅम बियाणे लागते. बीटी कपाशीपेक्षा याचे बियाणे थोडे पातळ असते. त्यामुळे त्याची संख्या थोडी जास्त बसत असावी. फुलकिडे, मावा यांचे प्रमाण अत्यंत कमी असते. अलीकडे बीटी कपाशीवर रसशोषक किडींसाठी दोन ते तीन फवारण्या होतात. प्रत्येक फवारणीचा खर्च किमान १५०० ते २००० रुपये धरला तरी साडेतीन ते साडेचार हजार रुपयांचा खर्च वाचतो. बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव होतो. मात्र, तीन अमावत्स्यांच्या आधी न चुकता तीन वेळा कीटकनाशकांची फवारणी केली जाते. दहिया रोग येऊ नये म्हणून सप्टेंबरमध्ये गंधकाची फवारणी केली जाते. देशी वाण हे उभट वाढतात. त्याला जास्त बोंडे लागावीत म्हणून मजुरांमार्फत पाच वेळा फांद्याचे शेंडे खुडले जातात. दिलीप यांचे व्यवस्थापनही थोड्या फार फरकाने याच प्रकारचे आहे.  उत्पादन व उत्पन्न  बागायती स्थितीत व चांगला पाऊस असेल तर एकरी साधारणत: १२ क्विंटल किंवा काहीवेळा त्याहून अधिक उत्पादन मिळते. यावर्षी पाऊस कमी असल्याने ते सात ते आठ क्विंटलच मिळाल्याचे पाटील बंधूंनी सांगितले. हा कापूस खरेदी करण्यासाठी जळगाव येथील व्यापारी जरंडी गावात येतात. कापसाचा भाव हा रुईच्या टक्केवारीवरून ठरत असतो. देशी कापसापासून रुई चांगल्या प्रमाणात मिळत असल्याने त्याला दरही चांगल्या प्रकारे मिळतो असे पाटील बंधूंनी सांगितले. क्विंटलला साडेपाच हजार रुपयांपर्यंतही दर मिळाल्याचे ते म्हणाले.  प्रयोगशाळेत रुईची तपासणी जरंडी गावातील शेतकरी देशी कापसाबरोबरच अमेरिकन संकरित वाणही घेत असतात. देशी कापसास चांगला दर मिळावा म्हणून ते शासकीय प्रयोगशाळेतून त्याची तपासणी करून घेत असतात. यंदाही केंद्रिय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे अशी तपासणी केली आहे. त्यात ‘जिनिंग परसेंटेज’ म्हणजे रुईचा उतारा या घटकात अमेरिकन संकरित कापसापेक्षा देशी कापूस उजवा ठरला. धाग्याच्या लांबीच्या बाबतीत मात्र देशी कापसाचा धागा अन्य संकरित जातींपेक्षा आखूड दिसून आला. असे असले तरी स्पंजप्रमाणे तो मऊ असल्याचे रवींद्र सांगतात. अमेरिकन संकरित कापसाच्या धाग्याला जास्त ताकद यावी म्हणून गाठींमध्ये साधारणत: २० टक्के देशी कापूस मिसळून त्याची ताकद वाढवली जाते. ‘सर्जिकल’ कापसामध्येही तो मिसळला जातो असे सांगितले जाते. हा कापूस जानेवारी महिन्यापर्यंतच विकला जातो. त्यानंतर त्याला मागणी राहात नाही. त्यामुळे तो साठवून ठेवता येत नाही, असे अनुभवी शेतकरी सांगतात.  संपर्क:  रवींद्र पाटील- ९४२३४४९३९५,  दिलीप पाटील- ८२७५३२५७२१  (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com