वाल
काढणी अवस्था
अॅग्रो विशेष
मोठ्या बाजारपेठेचा शोध
वनभाजी महोत्सवापर्यंतच न थांबता पारंपरिक भाज्यांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू व्हावी, हंगामी बाजार सातपुडा पर्वतीय भागातच असावा, यासाठी या महोत्सवासंबंधी कार्यरत संस्था, व्यक्तींचे प्रयत्न सुरू आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम सातपुडा पर्वतीय भागात कंजाला (ता. अक्कलकुवा) येथे वनभाजी महोत्सव २०१४ पासून घेतला जात आहे. यंदा २९ व ३० सप्टेंबर रोजी हा महोत्सव पार पडला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासह सातपुड्यातील नामशेष होणाऱ्या, दुर्मीळ वनभाज्यांचे सादरीकरण या महोत्सवात झाले. कंद व फळांपासून तयार केलेल्या भाकरीदेखील महोत्सवात होत्या. त्यांची चव चाखण्याची संधी महोत्सवात सहभागी मंडळींना मिळाली. टोळंबी, पारंपरिक वाणांच्या शेंगदाण्याचे तेल, भुईमुगाच्या शेंगा आदींची विक्रीही झाली. जालना, नंदुरबार, जळगाव, शहादा, धडगाव भागातील शेतकरी व अभ्यासक महोत्सवात दाखल झाले होते.
नंदूरबार जिल्ह्यात कंजाला (ता.अक्कलकुवा) हे सातपुडा पर्वतातील सहाव्या पर्वतरांगेत वसलेले अतिदुर्गम भागातील गाव आहे. कौलारू लहान झोपडीवजा घरे पर्वतांच्या पायथ्याशी आहेत. वीज व रस्ता या सुविधा अलीकडेच झाल्या आहेत. खरीप हाच मुख्य हंगाम. रब्बीत फारसे काही हाती येत नाही.
कंजाला शिवारातील जीवन
पाऊस या भागात तसा भरपूर असतो. मात्र यंदा एकूण पावसाळा कालावधीपैकी फार कमी पाऊस झाला आहे. ज्वारी, मका ही प्रमुख पिके दिसतात. शेती डोंगरांमधून वसलेली आहे. सपाट जमीन फारशी कुठे नाही. तीव्र उतार, मुरमाड जमीन अधिक. मात्र नद्या व नाले अजूनही ऑक्टोबरमध्येही प्रवाही आहेत. निसर्गसंपदेने नटलेला हा भाग. साग, मोह, सीतापळाची झाडे पदोपदी दिसतात. तसे इथले जीवनही खडतर. सायंकाळी वाहतूक तशी बंद होते. वन्यप्राण्यांचा संचार वाढतो. ‘बीएसएनएल’ वगळता इतर दूरसंचार कंपन्यांचे नेटवर्क नाही. कंजालाची लोकसख्या सुमारे ६६९ एवढी तर शेतीचे क्षेत्र फक्त ५६ हेक्टर आहे. शासनाच्या ताब्यातील वनक्षेत्र ४५२ हेक्टर आहे. सर्व कुटुंबे शेती, गायी-म्हशी, शेळीपालनावर अवलंबून आहेत.
वनभाजी महोत्सवाचे आयोजन
अशा या छोट्याशा कंजाला गाववजा पाड्यावर २०१४ पासून वनभाजी महोत्सव घेतला जात आहे. गावातील रामसिंग व ऋषाताई वळवी यांनी स्थापन केलेले एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ, कोळदा (जि. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्र व डॉ. गजानन डांगे यांची योजक संस्था यांच्या पुढाकाराने हा महोत्सव सुरू झाला. यंदाचे आयोजनाचे पाचवे वर्ष होते. कंजाला येथील वन व्यवस्थापन समिती, शेतकरी मंडळ यांचाही त्यात महत्त्वाचा सहभाग राहिला.
महोत्सवाचा उद्देश व प्रेरणा
सातपुडा पर्वतातील दुर्मीळ वनभाज्या कोणत्या हे सर्वांना माहीत व्हावे, त्यांची कायदेशीर नोंद व्हावी, जैवविविधतेचे संवर्धन व्हावे, शेतकरी एकीकरणाला प्रोत्साहन व नामशेष होणाऱ्या भाज्या किंवा अन्य पिकांच्या वाणांचे जतन हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असतो. सोबतच आदिवासी संस्कृतीतील लोककलांचे सादरीकरण होते. दिलवरसिंग पाडवी, गडचिरोली जिह्यातील लेखामेंदा गावात वृक्षमित्र संघटनेच्या माध्यमातून मोठे काम करणारे मोहनभाई यांच्या विचारांची प्रेरणास्राेत यामागे असतो. शिवाय बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथे २०१२ व १३ मध्ये चैत्राम पवार यांच्यातर्फे आयोजित वनभाजी महोत्सवाला रामसिंग यांनी काही ग्रामस्थांसोबत भेट दिली. तेथूनही महोत्सवासाठी मोठी प्रेरणा मिळाली.
दुर्मीळ वाण समोर आले
या महोत्सवातून दुर्मीळ वाण समोर आले. जैवविविधतेची नोंद झाली. त्यात कंजालासह नजिकच्या डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी, पलासखोब्रा या गावांमध्ये १८०० हेक्टरवर ५२ प्रकारच्या वाणांची पेरणी होते. हे सर्व वाण पावसावरच पेरले जातात. यातील सुमारे ४२ वाणांचे संवर्धन केले जात आहे. हा महोत्सव व्यापक होऊन वनभाज्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी. त्यातून आर्थिक उलाढाल वाढून येथील शेतकऱ्यांचे आर्थिक स्राेत विकसित व्हावेत असाही उद्देश होता. शिवाय सातपुड्यातील कुपोषणाचा प्रश्न वनभाज्या, कंदवर्गीय पिकांद्वारे कायमचा मिटावा हे देखील ध्येय होते. योजक संस्थेने वनभाजी महोत्सव कसा असावा, त्यात कोणत्या बाबींचा अंतर्भाव करावा यासंबंधी आराखडा तयार करून दिला. नंदूरबार कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांचे मार्गदर्शनही मिळाले.
महोत्सवाचे आकर्षण
- फुले, झाडांचा पाला किंवा पाने, कंद व अन्य पारंपरिक भाज्यांचा अतंर्भाव.
- स्वयंपाक करून भाज्यांचे सादरीकरण.
- कंदांच्या भाकरीही तयार करून त्यांची चव चाखायची संधी. उंबराची फळे, कडूकांदा, मोहफुले व आहलो यांच्यापासूनही भाकरी
- कंजालासह डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी, पलासखोब्रा या गावांमधील शेतकरी मंडळ, वन व्यवस्थापन समित्या आदींचा सक्रिय सहभाग.
- झाडवर्गीय भाज्यांमध्ये आंबोडा, हेगवो, हेलरो, मोखो, कुरलियो, कासणो, हावरो, आंबलो, टोणणो यांचे सादरीकरण.
- वेलवर्गीय भाज्यांमध्ये सिरीवारो, देवपेंडी, गोवोवल, वसानो, कुरलो, नेके, खांगो यांचा तर कंदवर्गीय भाज्यांमध्ये आहलो, हेवलो, वेबडो, कुवलो, जंगली कांदो यांचा समावेश.
- नदी किंवा तलावातील पाण्यात आढळणाऱ्या शिलो, गाठेवो, लालीपाजो, सिडीगुड्डू, उंबरेपाजो यांचे सादरीकरण.
- प्रत्येक भाजीनजीक सादरीकरण करणाऱ्या महिलांचे, भाजीचे नाव व अन्य माहिती नमूद करणारे पत्रक
- मोहाच्या झाडाद्वारे उपलब्ध टोळंबीचे तेल, शेंगदाणा तेलाची विक्री. टोळंबी तेलास १५० रुपये तर शेंगदाणा तेलास २०० रुपये प्रति लिटरचा दर होता. खाद्यतेल म्हणून टोळंबीचा या भागात अधिक वापर केला जातो.
- दशपर्णी अर्कही विक्रीसाठी उपलब्ध होता. त्याची १० रुपये प्रतिलिटर दराने विक्री झाली.
- कंजाला येथील बिरसा मुंडा शेतकरी मंडळ व डेब्रामाळ येथील दिलवरसिंग पाडवी शेतकरी मंडळाने विक्रीतून उत्पन्न मिळवले.
- तीळ व राजगिऱ्याचे लाडू, आमचूर, आवळा, गुळवेल, बेहडा, टाकळाकाफी यांची पूड, सोयाबीनच्या दुधापासून तयार केलेला चहा आदींचीही विक्री
- भुईमुगाच्या पारंपरिक वाणांच्या उकडलेल्या, भाजलेल्या शेंगाही विक्रीस उपलब्ध होत्या. शेंगा विक्रेत्यांना एक हजार रुपये नफा मिळाला.
- सुमारे ५०० आदिवासी कुटुंबे या महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागली आहेत. त्यामुळे दरवर्षी नोव्हेंबरमध्ये सातपुड्यातील पारंपरिक वाणांचे प्रदर्शन नोव्हेंबरमध्ये भरविले जाऊ लागले आहे.
प्रत्येक वर्षी वाढतोय प्रतिसाद
पहिला वनभाजी महेत्सव सात ऑक्टोबर २०१४ मध्ये झाला. त्यात ५७ महिलांनी सहभाग घेतला. तेरा महिलांनी १७ प्रकारच्या वनभाज्यांचा स्वयंपाक केला. तसेच त्यांची दृश्य स्वरुपात माहिती व्हावी म्हणून त्या कच्च्या स्वरुपातही आणल्या. डेब्रामाळ, वेलखेडी, सांबर, पलासखोब्रा येथेही त्याच वर्षी हे महोत्सव घेण्यात आले. सन २०१४५ मध्ये १९२ जण सहभागी झाले. यावेळी ४५ महिलांनी ७१ प्रकारच्या भाज्यांचे सादरीकरण केले. सन २०१६ मध्ये ९२ महिला व गटांनी १२५ प्रकारच्या भाज्यांचे सादरीकरण केले. सन २०१७ मध्ये ९० तर यंदा त्याहून अधिक महिलांनी भाज्यांचे सादरीकरण केले.
जैवविविधता केंद्र
वनभाजी महोत्सवात त्याच काळात दुर्मीळ भाज्यांची माहिती उपस्थितांना मिळते. परंतु ही माहिती बारमाही मिळावी यासाठी कंजाला येथे सात फूट उंचीच्या कौलारू लाकडी घरात जैवविविधता केंद्र वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी जैवविविधता व्यवस्थापन समिती, शेतकरी मंडळ, वन व्यवस्थापन समित्या यांनी महत्त्वाचे काम केले. मनोहर पाडवी, विनय वळवी, रामसिंग वळवी, राजेंद्र वळवी, संजय वसावे आदींचा त्यासाठी पुढाकार राहीला. याच केंद्रानजीक महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवानिमित्त या केंद्रातील जैवविविधतेसंबंधीच्या बाबी, वाण, आदिवासी शेतकऱ्यांकडून वापरली जाणारी अवजारे, कपडे, वाद्य, धान्य साठवणुकीचे पारंपरिक साहित्य आदी सुमारे २२० बाबींची माहिती मिळते. ग्रामविकास कार्यात अग्रेसर असलेले पोपटराव पवार (नगर), युनिसेफचे वरिष्ठ अधिकारी, सिफेटचे माजी संचालक डॉ. आर. टी. पाटील आदी अनेक अधिकारी, अभ्यासकांनी या केंद्राला भेट दिली आहे. दिल्ली येथे झालेला किसान मेळा, हैद्रराबाद तसेच वाराणसी येथे आयोजित कृषीविषयक उपक्रमांमध्ये या जैवविविधता संवर्धन कार्यक्रमाचे सादरीकरण रामसिंग वळवी यांनी केले आहे.
मोठ्या बाजारपेठेचा शोध
वनभाजी महोत्सवापर्यंतच न थांबता पारंपरिक भाज्यांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू व्हावी, हंगामी बाजार सातपुडा पर्वतीय भागातच असावा, यासाठी या महोत्सवासंबंधी कार्यरत संस्था, व्यक्तींचे प्रयत्न सुरू आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील तब्बल ९३ गावे सातपुडा पर्वतीय भागात आहेत. तर ३१ ग्रामपंचायती आहेत. या भागातील ग्रामस्थ, आदिवासी मंडळींना बाजारहाटनिमित्त धडगाव, अक्कलकुवा, खापर (ता.अक्कलकुवा), गुजरातमधील डेडियापाडा, सांगबारा येथे जावे लागते. त्यांना सातपुडा पर्वतातच मोलगी (ता. अक्कलकुवा) किंवा परिसरातच वनभाज्या मिळाव्यात, महिला शेतकऱ्यांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मोलगी येथे दररोज ६० क्विंटल भाज्यांची विक्री होते. सुमारे ८० गावे मोलगीशी जुळलेली आहेत. काही हजार ते लाखापर्यंतची उलाढाल होण्याची क्षमता या बाजारपेठेची असल्याचे रामसिंग यांनी सांगितले.
मोहाच्या फुलांच्या प्रक्रियेतून उलाढाल
मोहाची फुले मार्च व एप्रिलमध्ये सुमारे ४० दिवस उपलब्ध होतात. त्यांना एप्रिलमध्ये २० ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळायचा. मात्र तंत्रशुद्ध पद्धतीने त्यांची वाळवणी व साठवणूक केल्यास त्यांना अधिक दर मिळवणे सोपे होते. त्या अनुषंगाने केंद्राच्या अखत्यारितील विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, पुणे येथील रिड्स, योजक संस्था यांच्या मदतीने कंजाला, डेब्रामाळ आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी वाळवणी व साठवणूक यासंबंधीचा प्रकल्प एक वर्षापासून राबविला जात आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे मोहफुले पाच, सहा महिने टिकविणे शक्य झाले. प्रकल्पात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे ७० ते ८० रुपये प्रतिकिलोचे दर मिळवणे शक्य झाले. एका शेतकऱ्याने ९० किलोपर्यंत फुलांची चांगल्या दरात विक्री केली. एकूण चार लाख रुपयांची उलाढाल डेब्रामाळ, कंजाला, सांबर आदी भागात झाली.
सातपुड्यातील अवीट गोडीच्या सीताफळाची विक्री
बांबूूच्या आधारे तयार केलेले सोलर ड्रायर व त्याचा वापर याची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात आली. दोन आधुनिक सोलर ड्रायर डेब्रामाळ व कंजाला येथे देण्यात आले. त्याचा प्रयोग मागील वर्षी यशस्वी झाला. शेतकऱ्यांच्या एकीकरणामुळे सातपुड्याच्या कुशीतील अवीट गोडीच्या सीताफळांच्या विक्रीसंबंधीदेखील पुढाकार घेण्यात आला. सुरत (गुजरात) येथील व्यापाऱ्यांनी सातपुड्यात भेट देऊन सीताफळांची पाहणी केली. दर्जेदार फळांना त्वरीत पसंती दिली. प्रतवारी, पॅकिंग करण्यात येऊन सुमारे सहा टन सीताफळाची पाठवणूक कंजाला व परिसरातील शेतकऱ्यांनी केली. त्यांना प्रति २० किलोस २५० रुपये दर मिळाला. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ३५० क्रेटस उपलब्ध करून दिले. स्थानिक प्रशासनाने या उपकमाचे यश लक्षात घेऊन सातपुडा पर्वत रांगेतील ७०० शेतकरी कुटुंबांना क्रेट, स्टीलचे विळे आदींचे कीट मोफत दिले. पांढरा शुभ्र आमचूर उत्पादनासंबंधीची तयारी डेब्रामाळ, कंजाला, सांबर या भागात आता सुरू आहे.
संपर्क- मानसिंग वळवी-९४०३७६६४५१, ९४०४१८६९०७
फोटो गॅलरी
- 1 of 290
- ››