नर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान 

‘नर्सरी मॅन ऑफ वरुड’ किताब न्यूसेलर मोसंबी व लिंबाचीही जोपासना जावेद यांनी केली आहे. त्यांच्या रोपनिर्मितीतही चांगलाच हातखंडा आहे. तंत्रशुद्ध व्यवस्थापनातून रोपे तयार केली जातात. त्याची दखल घेत नागपूर येथील राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने त्यांना ‘नर्सरी मॅन ऑफ वरुड' असा किताब देत गौरविले आहे. ‘महाऑरेज’ संस्थेकडूनही प्रयोगशीलतेची दखल घेत गौरविण्यात आले आहे.
 जावेद खान यांनी संत्रा रोपनिर्मितीत चांगली अोळख तयार केली आहे.
जावेद खान यांनी संत्रा रोपनिर्मितीत चांगली अोळख तयार केली आहे.

अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध संत्रापट्ट्यात जावेदभाई यांचे नाव माहीत नाही अशी व्यक्‍ती सापडणे विरळच. संत्रा म्हटले की जावेदभाई असे समीकरणच जणू ठरून केले आहे. आणि मंडी सुमारे ४० वर्षांपासून जपलेली संत्रा बागा, त्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन, सोबत रोपवाटिका  अशी त्यांच्या बागेची वैशिष्ट्ये सांगता येतात. सुमारे दीड लाख रोपांची विक्री करताना मोसंबी, कागदी लिंबू यांची शेतीही त्यांनी जपली आहे.    विदर्भातील नागपूरी संत्रा पट्टा म्हटले की वरूडचा भाग अधोरेखित होतो. येथील जावेद खान यांनी संत्रा शेतीत मोठी अोळख कमावली आहे. मिलानपूर (वरुड) येथे सुमारे ५० एकर तर उर्वरित तिवसाघाट, शेंदूरजनाघाट, वाई (बु.) अशा चार शिवारांत त्यांची एकूण १०० एकर शेती आहे.  पैकी सुमारे ६६ एकर क्षेत्र त्यांनी संत्रा पिकाला दिले आहे. जावेद यांनी अनेक वर्षांपासून संत्रा बागेची जोपासना केली आहे. उर्वरित बाग टप्प्याटप्प्याने विकसित केली आहे. खरे तर एकूण क्षेत्रापैकी २५ एकर क्षेत्र डाळिंबासाठी राखून ठेवले होेते. परंतु भागात शेतकऱ्यांना या पिकात आलेल्या समस्या पाहाता त्यांनी हा निर्णय स्थगित केला.  सुरवातीचे प्रयत्न  जावेद सांगतात, की ११ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्यांच्या वाट्याला आठ एकर, आईच्या नावावर चार एकर तर लहान भावाच्या नावावर चार एकर शेती आली. त्या वेळी वरुड येथील वामनराव सुपले यांनी कोहळा शेती केली होती. खान कुटुंबाने मग त्यांच्याकडून पीक व्यवस्थापनाचे धडे तसेच बियाणे घेतले. नदीलगतच्या भागात असलेल्या डोहातून पाण्याचा उपसा करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी एक किलोमीटर पाइपलाइन केली. त्याकाळात सुमारे ७५ हजार रुपयांचा खर्च आला. बॅंकेचे कर्ज घ्यावे लागले. प्रयत्न सुरूच होते.  प्रयत्नांना मिळाले फळ  त्या वेळी आठ एकर कोबी, चार एकर कोहळ्याचे चांगले उत्पादन व दरही चांगले मिळाले. मग कुटुंबाने वांगी, टोमॅटो, मिरची आदी पिकांची लागवड करून भाजीपाला शेतीत सातत्य ठेवले. प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे आठवड्यातील सहा बाजारांत मालाची विक्री व्हायची.  शेतीत थोडे स्थैर्य येते आहे असे वाटताच दोन शेतकऱ्यांसोबत २१ एकरांवर करार शेती सुरू केली.  सरी वरंब्यावर भाजीपाला घेणारे या भागातील आम्ही पहिलेच होतो असे जावेद सांगतात. त्या वेळी १३ एकरांवर टोमॅटो होता. या माध्यमातून आर्थिक प्रगती साधत जमीन खरेदी करण्यास सुरवात केली.  संत्रा शेती  अंबाडा (ता. मोर्शी) येथील जीवन कडू हे संत्रा शेतीत त्या वेळी पुढारलेले होते. त्यांच्याकडून जावेद यांनी संत्रा बागेचे धडे घेण्यास सुरवात केली. पहिल्या उत्पादनात चांगले उत्पन्न मिळाल्यानंतर उत्साह वाढीस लागला. हळूहळू या पिकातील अनुभव व कौशल्य वाढू लागले. आत्मविश्वास आल्यानंतर भाजीपाला पिके घेणे थांबवले. सध्या बागेत उत्पादन देणारी सहाहजार झाडे असल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या बागेत एकरी १५ टनांच्या पुढे उत्पादन मिळते.  रोपवाटिका  जावेद यांनी जेके अॅग्रो या नावाने संत्र्याचा तर जेके नर्सरी या नावाने रोपवाटिका व्यवसाय फुलवला  आहे. दरवर्षी सुमारे एक ते दीड लाख रोपांची विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. जून ते ऑगस्ट हा रोपविक्रीचा मुख्य कालावधी राहतो. रफलेमन रुटस्टॉकचा वापर होत असल्याचे जावेद यांनी सांगितले. रोपांची विक्री २० रुपयांच्या पुढील दराने होते. एका रोपाच्या व्यवस्थापनासाठी सुमारे १२ ते १५ रुपये खर्च होतात. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, मणिपूर, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक अादी विविध राज्यांत रोपांचा पुरवठा होतो.  मोसंबीच्या १० हजार ते ३० हजार रोपांची विक्री ते वर्षभरात करतात.  ठळक बाबी 

  • अर्धा फूट उंच, पाच फूट रुंदीचा बेड तयार केला जातो. वर्षातून एकवेळ त्याखाली हिरवळीचे खत म्हणून बोरुचा वापर. निंबोळी पावडरही 
  • पुनर्लागवड झाल्यानंतर एक महिन्याने प्रती २०० लिटर पाण्यात एक किलो मोरचूद, दोन किलो चूना, ७०० मिली ह्युमीक अॅसिड, एक लिटर क्‍लोरपायरीफॉस या मिश्रणाचे ड्रेचिंग 
  • रोपांसोबतच संत्रा झाडांनाही वर्षातून एकदा याप्रमाणे ड्रेचिंग 
  • संत्रा पिकात फुलावर येण्याआधी ही प्रकिया. जुलैमध्ये दरवर्षी ट्रायकोडर्मा दोन किलो, स्युडोमोनस एक किलो, दोन किलो बेसन, एक किलो गूळ, २५ किलो शेणखत याप्रमाणे नर्सरीसाठी प्रतिएकर ६०० लिटर तर संत्रा झाडांना प्रती झाड याप्रमाणे द्रावण. एक वर्षाच्या झाडाला एक लिटर, पाच वर्षांचे असेल तर पाच लिटर याप्रमाणे 
  • संतुलित अन्नद्रव्यांवर भर 
  • ३५ अंश से. तापमान असेल तर ३० ते ३५ लिटर तर ४० अंशा तापमानास ४० ते ४५ लि. पाणी. झाडाची गरज ओळखूनच पाणी. बागेत पाण्याचा निचरा होणे सर्वात महत्त्वाचे. 
  • संत्र्यात आजवर अनेक लागवड अंतरांचा अभ्यास केला. त्यातून २० बाय १० फूट हे अंतर पूरक ठरले. 
  • संपर्क- जावेद खान- ९३२५१६३८५१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com