संघर्ष, चिकाटीतून साकारलेला प्रक्रियायुक्त दुग्ध व्यवसाय 

रोजगार क्षमता निर्माण केली जीवनातील अति संघर्षपूर्ण काळात वैराळ दांपत्य रोहयोअंतर्गत मजुरी करून आपली गुजराण करायचे. आता दूध उद्योग स्‍थिरस्थावर झाल्याने दहा जणांना वर्षभर कायम रोजगार देण्याची क्षमता या दांपत्याने तयार केली आहे.
वैराळे यांचा दुग्ध व्यवसाय व दर्जेदार पेढा निर्मिती
वैराळे यांचा दुग्ध व्यवसाय व दर्जेदार पेढा निर्मिती

जालना जिल्ह्यात कायम दुष्काळी शिरनेर येथील देवराव व सौ. शारदाबाई या वैराळ दांपत्याने एका म्हशीपासून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय ४० जनावरांच्या संख्येपर्यंत नेत मोठ्या नेटाने विस्तारला ही विशेष बाब आहे. अथक कष्ट व संघर्ष, संघटनवृत्ती, उद्योजकतेचे गुण या जोरावर प्रक्रिया उद्योगही सुरू केला. त्या आधारे स्वतःबरोबरच इतरांचे कौटुंबिक जीवन परिपूर्ण करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न प्रशंसनीय आहे.    जालना जिल्हा कायमच दुष्काळी आहे. अंबड तालुक्यातील शिरनेर गावालाही कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गावातील वैराळ दाम्पत्याने पाण्याशी व परिस्थितीशी संघर्ष करीत शारदा डेअरी उद्योग विकसीत केला. कधी काळी मोलमजूरी करून जीवन जगणाऱ्या या दांपत्याला आधार मिळाला तो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या चौदा हजार रुपये कर्जाचा. त्यासाठी बाप्पासाहेब पाटील गोल्डे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या कर्जातून वैराळ यांनी २००१ च्या सुमारास म्हैस अन्‌ दुधाची पोच करण्यासाठी सायकल घेतली.  दुग्ध व्यवसाय विस्तारला  चिकाटी व जिद्दीतून वैराळ यांनी सर्व संकटांशी सामना करीत दुग्ध व्यवसायात सातत्य ठेवले. त्यातूनच आजघडीला जनावरांची संख्या ४० पर्यंत नेण्यात ते यशस्वी झाले.  दुग्ध व्यवसायातील ठळक बाबी 

  • एकूण जनावरे - सुमारे ४०, पैकी म्हशी - सुमारे ३०, संकरित गायी - ३, देशी गायी - ५ 
  • प्रशस्त गोठा. 
  • जनावरांची पाण्याची सोय होण्यासाठी दोन विहिरी व एक बोअर. बोअरला लागलेल्या बऱ्यापैकी पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. 
  • जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील साडेतीनशेवर दूध उत्पादक जोडले. 
  • (त्यातील दीडशे औरंगाबाद जिल्ह्यातील). 
  • दहा वर्षांच्या खडतर प्रवासात दररोजचे दूध संकलन सद्यःस्थितीत २२०० ते २५०० लिटरपर्यंत पोचवले. 
  • घरचे दूध - १५० ते १८० लिटरपर्यंत 
  • हायड्रोपोनिक्स तंत्राने चाऱ्याची निर्मिती सुरू करणार 
  • प्रक्रिया उद्योगाविषयी  २०१२-१३ मध्ये उद्योजक विकास अभियानांतर्गत रतनलाल बाफना (जळगाव) यांच्या गोशाळेत वैराळ यांना तीस दिवसांचे दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर ते प्रक्रिया उद्योगाकडे वळले. केवळ गोठा संगोपन व दूधनिर्मिती हा व्यवसाय अलीकडील काळात परवडत नाही. प्रक्रियेद्वारे नफा वाढवावा या हेतने त्यांनी ही वाट निवडली.  ठळक बाबी 

  • सुमारे ३०० ते ४०० लिटर दुधापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. 
  • यात पेढा, खवा, तूप, दही, मसाला ताक आदींचे मागणीनुसार उत्पादन होते. 
  • अंबड शहर तसेच औरंगाबाद शहरात या उत्पादनांना मागणी असते. 
  • दिवसाला सुमारे २० किलो पनीर, पाच ते सात किलो पेढा, ४० किलो खवा, १०० लिटरपर्यंत दही, १० ते १५ किलो तूप अशी साधारण विक्री होते. उन्हाळ्यात मसाला ताकाला मागणी असते. 
  • पनीर खरेदीसाठी सुमारे ३० व्यावसायिक ग्राहक जोडले. 
  • घनसावंगी, तीर्थपुरी भागात पोचते पनीर 
  • दूध संकलनासाठी स्वतः घेतले टॅंकर 
  • महत्त्वाची वैशिष्ट्ये  चार एकरांत चारा व्यवस्थापन  वैराळ यांची चार एकर शेती आहे. त्यात कपाशी व्यतिरिक्त चारापिके घेण्यावर कटाक्ष असातो. त्यामुळे विकत चारा घेण्याची गरज व त्यावरील खर्च कमी होतो. प्रसंगी ऊसही विकत घेण्यात येतो.  गांडूळखताची निर्मिती व बायोगॅस  सुमारे ४० ते ४२ जनावरांपासून दररोज चार बैलगाड्या मुबलक शेण मिळते. वर्षाला सुमारे ५० ट्रॉलीज शेणखत प्रति ट्रॉली तीन हजार रुपये दराने विकणे त्यामुळे शक्य होते. पालापाचोळा व उपलब्ध शेणखताचा वापर करून गांडूळखताचीही निर्मिती करतात. घरचा स्वयंपाक व अन्य कामांसाठी लागणारे इंधनही गोबरगॅसच्या माध्यमातून उपलब्ध केले जाते. त्यामुळे गॅसवरील खर्चात कायम बचत होते. शिवाय गोबर गॅसमधून निर्माण होणाऱ्या स्लरीचा वापर पिकांसाठीही होतो.  दुष्काळातही दूध संकलन  दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना वैराळ यांचे दूध संकलन थांबलेले नाही. शेतकऱ्यांना ते चांगला दर देण्याचा प्रयत्न नेहमी करतात. शासनाने ठरवून दिलेल्या फॅटनुसार दर लावून खरेदी होते.  जालना जिल्ह्यातील शिरनेर येथे ३०० लिटर, अंबड येथे एक हजार लिटर, औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथे ५०० लिटर तर जालना जिल्ह्यातील किनगाव चौफुली येथे जवळपास ४०० ते ५०० लिटर दूध संकलन होते. सकाळी साडेसहा ते आठ व सायंकाळी साडेपाच ते सात वाजेदरम्यान प्रत्येक संकलन केंद्रावर ही क्रिया पार पाडली जाते.  व्यवसायाला जोड जल केंद्राची  अलीकडे दोन महिन्यांपासून बोअरला लागलेल्या चांगल्या पाण्यामुळे शिरनेर येथील शारदा डेअरी फार्मवरच हरिओम ॲक्‍वा जल विक्री केंद्र सुरू केले आहे. सुमारे ५० जारएवढे पाणी प्रतिजार २० रुपये दराने दररोज विकण्यात येते. त्यातून अर्थार्जनाला हातभार लागतो आहे.  संपर्क- देवराव वैराळ- ७०२०४७१५१९, ९७६५९०४८९० 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com