मातीला गंध पुदीन्याचा....

मुलांनो, शेती सोडू नका मुल्ल्शेला सांगतात की शेती केवळ मजुरांच्या हवाली करून यशस्वी करता येत नाही. आपण कष्ट करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. घरातील सर्व मिळून शेती करीत असल्याचा आनंद वेगळाच असतो. पुदिना पिकातून कायम ताजा पैसा हाती येत राहतो. माझे शिक्षण बीएपर्यंत झाले असून कुठे नोकरी करता आली नाही. पण माझ्या मुलांना शिक्षण देऊन उच्चशिक्षित करण्याचा मानस आहे. त्यांनी पुढे नोकरी केली तरी शेती सोडू नका, अशी शिकवण त्यांना दिली आहे
पुदिना शेतीत काम करताना मुल्ला पिता पुत्र
पुदिना शेतीत काम करताना मुल्ला पिता पुत्र

सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात राहणारे मुल्ला कुटुंब वीस वर्षांपासून पुदिना शेतीत पारंगत समजले जाते. आपल्या दोन एकर शेतीतील एक एकर कायम याच सुगंधी पिकाला दिले जाते. वर्षभर मागणी असलेले पीक लावणीपासून तीन वर्षे उत्पादन देत राहते. त्यातूनच मुल्ला यांनी वर्षाला एकरी दोन ते पावणेतीन लाख रुपये मिळवत आपले अर्थकारण स्थिर केले आहे.     सांगली जिल्ह्यातील मिरज हे महत्त्वाचे शहर व तालुक्याचे ठिकाण आहे. द्राक्ष, ऊस व भाजीपाला यांची शेती या भागात होते. मिरज शहरापासून काही अंतरावरच मुल्ला मळा आहे. या मळ्यात वास्तव्य करणारे अख्तर मुल्ला यांनी नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. काही ठिकाणी  त्यासाठी रकमेची मागणीही झाली. मग विचारांती शेतीतच भरीव काही करण्याचा निर्णय घेतला.  पाण्याची कमतरता नाही. पण पाणी क्षारयुक्त असल्याने जमिनीचे आरोग्य धोक्यात येईल या कारणाने रासायनिक खतांचा वापर कमी केला आहे. सेंद्रिय शेतीवर भर आहे. यामुळे जमिनीचे आरोग्य सांभाळणे सोपे जात असल्याचे ते सांगतात.  पुदिन्याचा मिळाला पर्याय  पूर्वी मुल्ला यांची द्राक्ष शेती होती. परंतू मजुरांच्या समस्येमुळे ती थांबवली. दररोज पैसे देणाऱ्या पिकाची शोधाशोध सुरू झाली. ऊस घेणे शक्य होते. परंतू ते १४ ते १८ महिन्यांचे पीक. त्यातही उशिरा पैसे मिळणार. मग अन्य अनेक पर्यायांच्या शोधातून पुदिन्याचे पीक पसंतीस उतरले. पुदिन्याची वृद्धी करण्यासाठी मुळे असलेल्या रोपांचीच लागवड करावी लागते. कर्नाटकातून मिरज मंडईत पुदिना मोठ्या प्रमाणात विक्रीस येतो. त्यातील काही पेंड्या घेऊन रोपे वाफ्यात लावली. दहा गुंठ्यांत प्रयोग सुरू झाला. कायमस्वरूपी रक्कम हाती पडू लागली. मग या पिकातून आत्मविश्‍वास येत त्याचे क्षेत्र एक एकरांपर्यंत वाढवले. मुल्ला सांगतात की वाटण्या झाल्यानंतर दोन एकर वडिलोपार्जित शेती वाट्याला आली. आज त्यातील एक एकर कायम पुदिन्यासाठी राखीव असते.  बाजारपेठेनुसार पेरू  सातत्याने बाजारपेठेशी संपर्क असल्याने कोणत्या फळांना मागणी आहे याचा अभ्यास झाला.  त्यातून पुदिनाव्यतिरिक्त एक एकरात सहा महिन्यापूर्वी जी विलास वाणाच्या पेरूची लागवड केली आहे.  घरच्यांची मदत  पत्नी आलमास, मुलं महंमदजैद, महंमदसैफ, मुलगी शिफा असं अख्तर यांचं कुटुंब आहे. सर्व जण शेतीत राबतात. पुदिना कात्रीने कापून घेण्याचं कौशल्य वडिलांनी शिकवले असल्याचे महंमदजैदने नमूद केले. त्यामुळे त्याच्या मुळ्या जमिनीतच राहून त्यांची पुन्हा वाढ होत राहते.  पुदिन्याची शेती- वैशिष्ट्ये 

  • लागवड हंगाम- जूनचा पहिला आठवडा 
  • एकरी ३० सारटी (वाफा) 
  • एक पीक लावल्यानंतर तीन वर्षे उत्पादन देत राहते. 
  • पहिली कापणी दीड महिन्याने 
  • वर्षातून सुमारे चार कापण्या. प्रति कापणीत एक हजार पेंड्या 
  • सकाळी आणि सायंकाळी होते काढणी 
  • या पिकाला पाणी भरपूर लागते. उन्हाळ्यात दर चार ते पाच दिवसांनी पाणी 
  • तुषार सिंचन फायदेशीर 
  • पाणी जास्त झाल्यास मूळ कूज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता 
  • या पिकात किडी-रोगांचा प्रादुर्भावही कमी 
  • बाजारपेठा - सांगली, मिरज, इचलकरंजी, रत्नागिरी, जयसिंगपूर, तासगाव 
  • दर- मिरज, इचलकरंजी, रत्नागिरी, जयसिंगपूर, तासगाव बाजारपेठ -तीन रुपये प्रति पेंढी 
  • सांगली बाजारपेठ- दोन रुपये 
  • मुल्ला सांगतात की मागणी कमी असो वा जादा, एकच दर मी ठेवल्याने व्यापारी सातत्याने खरेदीसाठी माझ्याकडेच येतात. वर्षाकाठी मिळणाऱ्या नफ्यातून त्याचा फायदा दिसून येतो. 
  • लग्नसराई, जत्रा, ऊरुस, खुदबा, दसरा, दिवाळी या दिवशी मागणी अधिक 
  • वर्षभरातील नफा- सव्वा लाख रुपये ते पावणेतीन लाख रु.  मुलांनो, शेती सोडू नका  शेती केवळ मजुरांच्या हवाली करून यशस्वी करता येत नाही. आपण कष्ट करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. घरातील सर्व मिळून शेती करीत असल्याचा आनंद वेगळाच असतो. पुदिना पिकातून कायम ताजा पैसा हाती येत राहतो. माझे शिक्षण बीएपर्यंत झाले असून कुठे नोकरी करता आली नाही. पण माझ्या मुलांना शिक्षण देऊन उच्चशिक्षित करण्याचा मानस आहे. त्यांनी पुढे नोकरी केली तरी शेती सोडू नका, अशी शिकवण त्यांना दिली आहे. महंमदजैद कला शाखेत दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. महंमदसैफ आठवीत शिकत आहे. मुलगी शिफा बारावीपर्यंत शिकली आहे.  संपर्क- अख्तर इम्राहिम मुल्ला- ९७६६२३२३३२, ७५५८७३७४२१  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com