निवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील शेतकरी...

काळ्या तांदळाचा प्रयोग गांधी यांनी यंदाच्या वर्षी ब्लॅक राईस अर्थात काळ्या तांदळाचा प्रयोग दहा गुंठ्यांत केला आहे. भारतात हा तांदूळ उत्तर पूर्व राज्यांमध्ये होतो. त्यात आरोग्यदायी व पौष्टीक घटकांचा भरपूर समावेश असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गांधी यांनी दहा किलो बियाण्याची रोवणी केली. त्यातून सहा क्‍विंटल उत्पादन मिळाले. कृषी विभागाने छत्तीसगड भागातून या तांदळाचे वाण आणले असून ज्या शेतकऱ्यांना त्याच्या प्रयोगाचा लाभ देण्यात आला त्यापैकी आपण एक असल्याचे त्यांनी सांगितले.
ओमप्रकाश गांधी यांनी काळा तांदळाची शेती केली आहे.
ओमप्रकाश गांधी यांनी काळा तांदळाची शेती केली आहे.

भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झालेले ओमप्रकाश गांधी आपल्या खेडी (रिठ) (जि. नागपूर) येथील गावी आता पूर्णवेळ शेतीत रमले आहेत. यंदा त्यांनी काळ्या तांदळाचा प्रयोग दहा गुंठ्यांत केला. शेती करारावर घेत त्यात भात व कापूस लावला आहे. भाजीपाला पिकांची मुख्य निवड, त्याचबरोबर फळबाग विकासावर भर देत मोसंबी, आंबा, सागवानाची शेती सुरू केली आहे.  नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात उमरेड शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील खेडी हे गाव वसले आहे. या ठिकाणी ओमप्रकाश गांधी राहतात. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेत त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी नोकरी केली. त्यांचा नोकरीतील अधिक काळ नागपूर, गडचिरोली या भागांत गेला.  कनिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीत राबण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच एकर शेती खरेदी केली. त्यासाठी जमीन लागवडयोग्य करण्यास सुरवात केली.  भाजीपाला पिकांना दिले प्राधान्य  पीकपद्धतीचे नियोजन करताना गांधी यांनी सुरवातीपासूनच प्रयोगशीलतेवर भर दिला.  त्यांना डाळिंब शेती करायची होती. परंतु ही शेती खर्चिक असल्याचे लक्षात आले. शेतीतील अनुभव नसल्याने सल्लागार घेऊन काम करणेदेखील परवडणारे वाटत नव्हते. त्यानंतर त्यांनी जवळच्या बाजारपेठा, पिकांचे दर आदींचा अभ्यास केला. त्यानंतर भाजीपाला पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. भेंडी, ढेमसे, गवार, चवळी, टोमॅटो आदी प्रयोगांना सुरवात केली. जमीन मुरमाड असल्याने गादीवाफा पद्धतीचा वापर सुरू केला. बारमाही भाजीपाला करताना ‘रोटेशन’ पद्धतीचा वापर केला आहे. दोन वर्षे वांगी लागवडीचा प्रयोग केला. परंतु किडींचा प्रादुर्भाव, वाढता उत्पादन खर्च, दर आदी मेळ न बसल्याने हे पीक घेण्याचे थांबविले.  तालुक्‍याची बाजारपेठ 

  • उमरेड बाजारपेठ जवळ असल्याने भाजीपाला शेती साेपी झाली. विक्री अडचणही दूर झाली. 
  • यंदा भेंडीला २० ते ३५ रुपयांप्रमाणे प्रतिकिलोचा दर मिळाला. चवळी १५ ते २५ रुपये, गवारदेखील ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकली गेली. यंदा भाजीपाला पिकांनी त्यांना समाधान मिळवून दिले आहे. 
  • करार शेती  कापूस, भात या पारंपरिक पिकांसाठी सुमारे नऊ एकर शेती करारावर घेतली आहे. धान काढणीनंतर गहू लागवड होते. यावर्षी पहिल्यांदाच कांदा, मुळादेखील लावला आहे.  काळ्या तांदळाचा प्रयोग 

  • गांधी यांनी यंदाच्या वर्षी ब्लॅक राईस अर्थात काळ्या तांदळाचा प्रयोग दहा गुंठ्यांत केला आहे. 
  • आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक सी. ए. खंडाईत, कृषी सहायक ए. एम. हारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तांदळाचा हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यात सुमारे ७० एकरांवर राबविण्यात आला. भारतात हा तांदूळ उत्तर पूर्व राज्यांमध्ये होतो. त्यात आरोग्यदायी व पौष्टीक घटकांचा भरपूर समावेश असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गांधी यांनी दहा किलो बियाण्याची रोवणी केली. त्यातून सहा क्‍विंटल उत्पादन मिळाले. कृषी विभागाने छत्तीसगड भागातून या तांदळाचे वाण आणले असून ज्या शेतकऱ्यांना त्याच्या प्रयोगाचा लाभ देण्यात आला त्यापैकी आपण एक असल्याचे त्यांनी सांगितले. 
  • तीनशे रुपये प्रतिकिलो दर  आत्तापर्यंत १० किलोची विक्री केली आहे. कृषी विभागानेच बराच तांदूळ खरेदी केला. अजून विक्रीसाठी बराच शिल्लक ठेवला आहे. या तांदळात औषधी गुणधर्म चांगले असल्याने त्याला ग्राहकांकडून मागणी आहे. साहजिकच किलोला २५० चे ३०० रुपये दर मिळाल्याचे गांधी म्हणाले. ‘आत्मा’ आयोजित येत्या कृषी महोत्सवात या तांदळाची विक्री करण्याचे नियोजन आहे.  भाजीपाल्यासाठी ‘स्टोरेज टॅंक’  गांधी यांना कृषी विभागाकडून अनुदानावर पॅकहाउस मिळाले आहे. त्यात दोन टाक्या बांधल्या आहेत. ज्या वेळी भाजीपाल्याला दर चांगले नसतील त्या वेळी किमान चार दिवस तो सुस्थितीत राहू शकेल असा या टाक्यांचा उद्देश आहे. त्याच्या चारही बाजूंना वाळू भरण्यात आली आहे. त्यामध्ये पाणी सोडण्यात येते. त्यामुळे टाक्या थंड राहतात. यासाठी पाच लाख रुपये खर्च आला. त्यातील दोन लाख रुपये अनुदानाची रक्कम मिळाली. पाण्यासाठी परिसरात प्लॅस्‍टिक टॅंकही बसविण्यात आला आहे.  जनावरांचे संगोपन  शेतीला जनावरांचे साह्य दिले आहे. दोन गायी, चार कालवडी, दोन बैल असे पशुधन त्यांच्याकडे आहे. घरची गरज भागवून उर्वरित दुधाची विक्री थेट व डेअरीलाही केली जाते.  फळबाग व पीकविस्तार  गांधी यांनी पिकांची विविधता जपताना फळपिकांवरही भर दिला आहे. मोसंबीची ३०० झाडे त्यांनी लावली आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून त्यासाठी अनुदान मिळाले आहे. दीड वर्षांपूर्वी सीताफळाची ५०० झाडे लावली. मात्र त्यातील ४०० जिवंत आहेत. आंबा, चिकू तसेच बांधावर सागवानाची ५०० झाडेही लावून भविष्याची सोय केली आहे.  संपर्क- ओमप्रकाश गांधी-७७१९०६९६९१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com