रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे

वैशाली येडे यांना एग्रोवन प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आले.
वैशाली येडे यांना एग्रोवन प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आले.

पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने अर्ध्यावरच साथ सोडली. दीड वर्षाचा मुलगा आणि एक महिन्याची मुलगी पदरात सोडून पतीने मृत्यूला कवटाळले. तो क्षण डोंगर कोसळल्यासारखाच होता. पुढं खाई आणि मागे विहीर अशा या कठीण संकटकाळात स्वतःतील दुर्गेला साद घातली. रडायचं नाही, लढायचं असा निर्धार प्रत्यक्षात आणणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील राजूर येथील वैशाली येडे या शेतकरी महिलेला यंदाच्या ॲग्रोवन प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात दिमाखदार सोहळ्यात बुधवारी (ता. ८) २०१९ च्या ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कारांचे वितरण झाले .  आपल्याकडील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाची साथ हवीच. पण त्या जोडीला शेतीतील गुंतवणूकही गरजेची आहे. बियाणे, खते आदी निविष्ठांसाठी शेतीला पतपुरवठाही तितकाच महत्त्वाचा आहे. पाऊस पुरेसा पडला आणि हातात पैसा नसेल तर शेतीत पेरणार काय या कल्पनेनेच शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकते. शेतकऱ्यांपुढची ही सार्वत्रिक समस्या आहे. दुर्दैवाने अजूनही शेतीला संस्थात्मक आर्थिक पाठबळाचा अभावच दिसून येतो. त्याचमुळे शेतकरी खासगी सावकाराच्या दावणीला बांधले जातात. एकदा का शेतकरी सावकारांच्या व्याज, चक्रवाढ व्याजात गुरफटला की त्यातून त्याची सुटका होत नाही, जोडीला दुष्काळ-नापिकी असतेच. शिवाय पिकूनही घामाला योग्य दाम मिळाला नाही तरी सगळेच मातीमोल ठरते. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही ही ग्रामीण म्हण शेतकऱ्यांची विदारक आर्थिक स्थिती दर्शविते. शेवटी खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून शेतकरी मृत्यूला कवटाळतात. गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. शेतकरी आत्महत्या करतात, पण प्रश्न तिथेच राहतात. माणूस जातो, मागे कुटुंबाचे काय होते, याचा कोणी विचार करीत नाही.  विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही वेगळाच दिसून येतो. अशा परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील राजूर येथील वैशाली येडे या शेतकरी महिलेने प्रसंगी पुरुषासारखं ताठ मानेने उभं राहत निराश शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. येडे कुटुंबीय ज्या ठिकाणी राहतात ते राजूर आदिवासी बहुल भागात मोडतं. गावात सगळी कोरडवाडू शेती. मजुरीशिवाय पर्याय नाही. अशा ठिकाणी सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने अर्ध्यावरच साथ सोडली. दीड वर्षाचा मुलगा आणि एक महिन्याची मुलगी पदरात सोडून पतीने मृत्यूला कवटाळले. तो क्षण डोंगर कोसळल्यासारखाच होता असे वैशाली येडे सांगतात. पुढं खाई आणि मागे विहीर अशा या कठीण संकटकाळात त्यांनी स्वतःतील दुर्गेला साद घातली. गेल्या आठ-नऊ वर्षांत त्यांनी परिस्थिती संपूर्णपणे बदलवली आहे. हा लढा कधीच न संपणारा आहे. हे ओळखून रडण्यापेक्षा लढायचं असा निर्धार त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणला. वैशालीताईं येडे यांच्या संघर्ष, पहा व्हिडिओ....

सर्वांनाच मिळाली प्रेरणा  ॲग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रेरणा पुरस्कार जाहीर होताच अख्ख्या सभागृहाने अखंड टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला. सभागृहातील वातावरणाने सगळेजण भारावून गेले होते. येडे यांना मिळालेला हा पुरस्कार सर्वांनाच प्रेरणा देणारा असल्याची भावना यावेळी सभागृहात व्यक्त झाली. सभागृहात वैशाली येडे यांच्या कर्तृत्वावर आधारित ध्वनिचित्रफित सभागृहात दाखविण्यात आली. ती पाहून अवघे सभागृह काही क्षण स्तब्ध झाल्याचे भासत होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com