थोरातांची राजगिऱ्याची व्यावसायिक शेती

राजगिऱ्याची शेती उपवासासाठी तसेच आरोग्यासाठी राजगिरा लाडू, चिक्की यांचे मोठे महत्त्व असते. हे ओळखून पंडित यांनी राजगिऱ्याची शेती करायचे ठरवले. त्यात ते यशश्वी झाले आहेत.
पंडित थोरात यांच्या शेतातील राजगिरा पीक.
पंडित थोरात यांच्या शेतातील राजगिरा पीक.

परभणी जिल्ह्यातील खानापूर (ता. परभणी) येथील तरुण, अल्पभूधारक, प्रयोगशील शेतकरी पंडित थोरात बारमाही विविध भाजीपाला उत्पादनातील ‘मास्टर’ आहेत. गेल्या तीन वर्षांपासून राजगिरा पिकाची शेती व थेट विक्री यातून आणखी एक वेगळेपण त्यांनी जोपासले आहे. दुष्काळात पाण्याचे चांगले नियोजन करीत चांगला आर्थिक आधार देण्याचे काम या पिकातून साधले आहे.     अलीकडील काही वर्षांपासून परभणी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती उद्भवत आहे. अशावेळी उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून वैविध्यपूर्ण पीक पद्धतीतून परभणी तालुक्यातील खानापूर येथील पंडित थोरात यांनी उत्पन्नाचे विविध पर्याय शोधले आहेत. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या पंडित यांची तीन एकर जमीन आहे. इतरांची तीन एकर शेतीही कसण्यास घेतली आहे. सिंचनासाठी विहिर तसेच बोअरची सुविधा आहे.  मार्केटच्या अनुषंगाने शेती पद्धती  काही वर्षापूर्वी पंडित शेती बटाईने देत असत. त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसे. परभणी शहरातील बाजारपेठ शेतापासून जवळ असल्यामुळे त्यांनी भाजीपाला शेती विकसित करण्याचा निर्णय घेतला. मार्केटचा अभ्यास करून पिकवण्यास सुरवात झाली. व्यापाऱ्यांना माल न देता स्वतःची विक्री व्यवस्था तयार केली. त्यातून नफ्याचे मार्जिन वाढू लागले. गेल्या दहा ते १२ वर्षांपासून वर्षभर भाजीपाला उत्पादन घेत त्यात हातखंडा तयार झाला आहे. सुमारे दोन एकर क्षेत्र ते भाजीपाला पिकांसाठी राखीव ठेवतात. उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन, कापूस, ज्वारी, गहू, हरभरा, चारा पिकांचे उत्पादन घेतात.  राजगिऱ्याची शेती  उपवासासाठी तसेच आरोग्यासाठी राजगिरा लाडू, चिक्की यांचे मोठे महत्त्व असते. हे ओळखून पंडित यांनी राजगिऱ्याची शेती करायचे ठरवले. या भागातील सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी राजगिऱ्याची गहू पिकात मिश्र पीक म्हणून किंवा दांडामध्ये लागवड करतात. त्यातून वर्षभरातील उपवासांसाठी घरच्या घरी उपयोग व्हावा एवढाच उद्देश असतो. व्यावसायिक दृष्टिकोनातून फारशी लागवड केली जात नाही. मात्र पंडित यांच्या वाचनात ॲग्रोवनमध्ये राजगिरा लागवड तंत्रज्ञान विषयावरील लेख आला. त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य पांडुरंग सत्वधर, कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. उद्धवराव आळसे, डॉ. दिगंबर पटाईत, सेंद्रिय शेती संशोधन केंद्राचे मुख्य संशोधक डॉ. आनंद गोरे यांच्याशी चर्चा केली. राजगिरा लागवड तंत्रज्ञानाची माहिती घेतली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले फुले कार्तिकी वाणाचे बियाणे मागवून घेतले.  राजगिरा शेतीची वैशिष्ट्ये 

  • पंडित तीन वर्षांपासून रब्बी हंगामात राजगिरा घेत आहेत. सोयाबीनच्या काढणीनंतर रब्बीत राजगिरा लागवडीसाठी शेत तयार केले जाते. 
  • राजगिऱ्याची वाढ झपाट्याने होते. तणकटाची वाढ होऊ देण्यास ते प्रतिबंध करते. त्यामुळे खुरपणी वा निंदणीसाठी खर्च लागत नाही. राजगिऱ्यामुळे लव्हाळा देखील आटोक्यात राहतो असा पंडित यांचा अनुभव. 
  • या पिकास जमिनीच्या प्रकारानुसार पाणी. लागवड मध्यम जमिनीवर. त्यामुळे दर १५ दिवसांनी पाणी. 
  • पाच ते सहा पाणी पाळ्यांत पीक परिपक्व होते. 
  • सोयाबीनचा बेवड चांगला असल्यामुळे खतांची कमी गरज 
  • पीक कालावधी- सुमारे साडेतीन ते चार महिने 
  • भाजीची विक्री  राजगिऱ्याची उगवण दाट होते. त्यामुळे दाण्यांच्या चांगल्या उत्पादनासाठी उगवणीनंतर तीन आठवड्यांनी विरळणी करावी लागते. या विरळणी केलेल्या भाजीची महिनाभर दररोज २० पेंड्या या प्रमाणे काढणी होते. दहा रुपये प्रति पेंडी दर मिळतो. एकरभरातील भाजी विक्रीतून सुमारे सहा हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. मुख्य दाणे काढणीसाठी मजुरांची गरज भासते. हाताने चोळून दाणे मोकळे केले जातात.  उत्पादन 

  • पहिल्या वर्षी (२०१६-१७)- ३३ गुंठे- साडेपाच क्विंटल 
  • दुसऱ्या वर्षी- २० गुंठे - पावणेतीन क्विंटल 
  • यंदा एक एकर क्षेत्र- काढणीच्या अवस्थेत- पाच ते सहा क्विंटल अपेक्षित 
  • थेट विक्री  परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ पंडित भाजीपाला विक्री करतात. त्यासोबत राजगिऱ्याचीही हंगामात दररोज पाच किलो या प्रमाणात तीन महिन्यापर्यंत विक्री होते. पहिल्या वर्षी किलोला ८० रुपये, पुढील वर्षी ९० रुपये दर त्यांना मिळाला. यंदा १०० रुपये दर त्यांनी अपेक्षित धरला आहे. राजगिरा दुधात घालून खाणेदेखील पौष्टीक असते. त्या दृष्टीने औरंगाबाद येथील एका डॉक्टर व्यक्तीने ६० किलोची खरेदी केल्याचे पंडित यांनी सांगितले.  भाजीपाला शेतीत हातखंडा  पालक, शेपू, मेथी, अंबाडा, गवार, कारले, दोडके, डांगर (भोपळा), कांदा, लसूण, मूळा तसेच अन्य भाजीपाला अशी विविधता पंडित यांनी जपली आहे. परभणी येथील बाजारात येणारा भाजीपाला व ग्राहकांची मागणी यावर त्यांचे नेहमी लक्ष असते. त्यानुसार हंगामनिहाय नियोजन करुन विविध भाज्यांची लागवड ते करतात. अलिकडेच खानदेशी भरीताच्या वांग्याची लागवड केली आहे. सध्या ६० रूपये प्रति प्लॅस्टिक टिफीन या दराने भरीताची ‘होम डिलीव्हरी’ करण्याचा उपक्रमही राबवला आहे. त्यास ग्राहकांची चांगली पसंती आहे.  थेट विक्रीचा फायदा  पंडित दररोज मोटारसायकलद्वारे सकाळी अकरा वाजेपर्यंत आणि दुपारी दोन ते तीन या वेळेत कृषी विद्यापीठाचे प्रवेशद्वार व दर बुधवारी परभणीतील संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजारात विक्री करतात. व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुकच्या माध्यमातून आपल्या मालांचा प्रचार करतात.  शेती उत्पन्नातून जमीन खरेदी  क्षेत्र कमी असल्यामुळे मशागत, लागवडीची कामे भाडेतत्त्वावरील बैलजोडीद्वारे किंवा ट्रॅक्टरद्वारे करून घ्यावी लागतात. शेतीत पंडित यांना आई व पत्नी यांची मदत होते. त्यांची वडिलोपार्जित दीड एकर जमीन होती. भाजीपाला शेतीतील शिल्लक रकमेतून त्यांनी दीड एकर जमीनही खरेदी केली आहे.    संपर्क- पंडित थोरात- ८०८७९४४३६१, ८६६८३५३५२०    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com