दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा अंगीकार; प्रसार करणारे जत्र्याबाबा

विविध बाबींमध्ये पारंगत जत्र्याबाबा जत्र्याबाबांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षणात सहभाग घेतला आहे. राणाप्रताप तंत्रज्ञान हस्तांतर मंडळ तसेच नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राच्या कृषक मंडळाचे ते सदस्य आहेत.कडूजिरा, जंगलीकांदा, जिन्या, बुकली, नगऱ्या, सागाच्या बिया आदी वनौषधी त्यांच्याकडे पाहण्यास मिळतात. सातपुडा पर्वतातील नर्मदाकाठ व अतिदुर्गम भागातील वृक्षांचा अभ्यास तसेच ब्रिटिश व प्राचीन नाण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे.
कापसाच्या पिकात चिकट व कामगंध सापळ्यांचा वापर
कापसाच्या पिकात चिकट व कामगंध सापळ्यांचा वापर

नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे खुर्द येथील पासष्टवर्षीय जत्र्या लिंबा पावरा ऊर्फ जत्र्याबाबा यांनी आपल्या अडीच एकरांत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. देशी कापूस, सुधारित वाणांचा वापर, बीजोत्पादन आदी प्रयोग यशस्वी केले आहेत. भागात ठिबकचा वापर करणारे ते पहिले शेतकरी असावेत. कडकनाथ कोंबडी, शेळी व पशुपालनाची जोड देत आर्थिक स्रोतही वाढवले आहेत .  नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतात दुर्गम भागात धडगाव तालुका ठिकाणापासून दोन किलोमीटरवर ७०० लोकसंख्येचे धनाजे गाव उदय नदीकाठी वसले आहे. येथील बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू. खरिपातीलच शेती करतात. एक-दोन दूरसंचार कंपन्या वगळल्या तर अन्य कंपन्यांचे ‘मोबाईल नेटवर्क’ या भागात नाही. डोंगरदऱ्या, तीव्र उतार, मुरमाड अशा इथला प्रदेश आहे. ज्वारी, भुईमूग, बाजरी, सोयाबीन, त्यात तुरीचे आंतरपीक दिसते. कापसाचे क्षेत्र नगण्यच. उन्हाळ्यात स्थलांतर करण्याची वेळ अनेकांवर येते.  पंचक्रोशीत प्रसिद्ध जत्र्याबाबांची शेती  धनाजे येथील जत्र्याबाबा यांची पंचक्रोशीत ओळख आहे. त्यांची अडीच एकर शेती आहे. घरामागील शेतीत कच्च्या विहिरीतून तीन अश्‍वशक्तीचा पंप बसवून सिंचनाची सुविधा केली आहे. या क्षेत्रात बीटी कापूस व ठिबकचा वापर, कीड नियंत्रणासाठी चिकट तसेच कामगंध सापळे लावलेले दिसतात. दीड एकर शेती उदय नदीकाठी आहे. तेथेही पंप बसवून सिंचनाची सुविधा केली आहे. नदीला बारमाही पाणी असते. सन १९८५ पासून सिंचनाची सुविधा करून घेतली. तेव्हा डिझेल इंजिनचा वापर केला. त्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य रूपसिंग पराडके यांनी मदत केली. सन १९९० पर्यंत या भागात वीज नव्हती.  जपलेली प्रयोगशीलता  जत्र्याबाबा अत्यंत मेहनती. वयाच्या पासष्ठीतही प्रयोगशील वृत्ती त्यांनी जपलेली आहे. आपल्या क्षेत्रात घराला लागणारे सर्व धान्य जत्र्याबाबा घेतात. त्यात भात, उडीद, मका, चवळी, ज्वारी तसेच कापसात तूर असते. रब्बीत लसूण, कांदा व मेथी, कोथिंबीर, कोबी, वांगी आदी भाजीपाला असतो. नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने लसूण व कांदा बीजोत्पादन ते घेतात.  विविध वाणांचे प्रयोग  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे टॅग २४ हे भुईमुगाचे वाण तर दिग्विजय व विजय या हरभरा वाणांचे बीजोत्पादन त्यांनी घेतले. याच विद्यापीठाच्या फुले बसवंत या लसूण वाणाचा प्रसार आपल्या भागात केला. राजगुरुनगर (जि.पुणे) येथील कांदा संशोधन संचालनालयातर्फे विकसित भीमा शुभ्रा व भीमा श्‍वेता या कांदा वाणांच्या प्रसाराराठी आपल्या शेतात त्याचे उत्पादन घेतले. यामुळे भागात अनेक शेतकऱ्यांना सुधारित वाणांविषयी माहिती मिळाली. रसायन अवशेषमुक्त देशी कापूस उत्पादन मागील वर्षी अर्ध्या एकरात घेत सात क्विंटल उत्पादन घेतले.  जत्र्याबाबांच्या शेतीची वैशिष्ट्ये 

  • २००५-०६ व ०७ मध्ये परिसरातील २० ते २२ गावांमध्ये केसाळ अळीचा मोठा प्रकोप झाला. चवळी, उडीद ही पिके हातून गेली. अळी नियंत्रणाविषयी प्रसार करण्यासाठी तज्ज्ञांसोबत जत्र्याबाबा गावोगावी फिरले. आदिवासी बोलीतून संवाद साधत शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाच्या बाबी समजावून सांगितल्या. यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. 
  • २०१५ पासून कापूस, मका, कांदा, हरभरा यांचे ठिबकवर उत्पादन. 
  • दहा गुंठ्यांत दोन वर्षे बटाट्याची यशस्वी शेती. एकरी १२ क्विंटल उत्पादन. 
  • थेट विक्री  दर सोमवारी धडगावचा बाजार भरतो. तेथे जत्र्याबाबा व कुटुंबीय भाज्या, कांद्याची स्वतः विक्री करतात. दरवर्षी उन्हाळ्यात कच्च्या कैरीचे आमचूर तयार करून दोन क्विंटलपर्यंत विक्री स्वतः करतात. घरच्या जनावरांचे दूधही दररोज पाच ते सहा लिटर विक्रीसाठी धडगावात पाठविण्यात येतात.  पूरक व्यवसायाला चालना  जत्र्याबाबांकडे चार म्हशी, एक गाय, एक बैलजोडी असे पशुधन आहे. सुमारे २५ कडकनाथ कोंबड्या व १२ शेळ्या आहेत. दर महिन्याला चार ते पाच कोंबड्या विकतात. कडकनाथ कोंबडीला प्रतिजोडी किमान १८०० रुपये दर मिळतो. अंड्याला प्रतिनग किमान १० रुपये दर घरबसल्या मिळतो. दर पाच महिन्यांला चार-पाच शेळ्या विकतात. घरातील महिलाच कोंबड्यांचे तर मुले शेळ्या व पशुधनाचे संगोपन करतात. पूरक व्यवसायातून महिन्याला १० ते १२ हजार रुपये उत्पन्न मिळते. चारा घरच्याच शेतात उपलब्ध होतो.  एकत्र परिवाराचे बळ  वसंत, दिलवर, ईश्‍वर व अर्जुन व विजय अशी पाच मुले, एक मुलगी आणि पत्नी असा जत्र्याबाबांचा परिवार आहे. विजय नवापूर तालुक्‍यात चिंचपाडा येथे राहतो. घरात सोळा जणांचे कुटुंब एकत्र नांदते. मजुरीचा कोणता खर्च नाही. पंपांना कमी दाबाने वीज मिळते. तीदेखील चार ते पाच तासच असते. मध्येच बंद होते. अशा स्थितीत सिंचन करून घ्यावे लागते.  विविध बाबींमध्ये पारंगत जत्र्याबाबा  जत्र्याबाबांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षणात सहभाग घेतला आहे. राणाप्रताप तंत्रज्ञान हस्तांतर मंडळ तसेच नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राच्या कृषक मंडळाचे ते सदस्य आहेत. कडूजिरा, जंगलीकांदा, जिन्या, बुकली, नगऱ्या, सागाच्या बिया आदी वनौषधी त्यांच्याकडे पाहण्यास मिळतात. मळमळ, खोकला, जुलाब अशा अनेक विकारांवरील रामबाण उपाय त्यांच्याकडे आहे. सातपुडा पर्वतातील नर्मदाकाठ व अतिदुर्गम भागातील वृक्षांचा अभ्यास तसेच ब्रिटिश व प्राचीन नाण्यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे.  संपर्क- ईश्‍वर पावरा - ९४०४५६८८३२  छोटू पावरा - ९४२०१००६५६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com