स्पिरुलिना टॅब्लेट निमिर्तीचा आश्वासक व्यवसाय

कामातील सातत्य, जिद्द व कष्टाची तयारी असेल तरच व्यवसायात यशस्वी होता येते.मी व्यवसायात सुमारे १६ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र त्याहून कमी गुंतवणुकीतहीप्रकल्प सुरू करता येतो. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा माझ्याकडे आहे. मात्र पुरेशा बाजारपेठांचा अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी या व्यवसाचा विचार करावा. -सिध्दांत जाधव
 स्पिरुलीनाच्या पावडरपासून तयार केलेली उत्पादने
स्पिरुलीनाच्या पावडरपासून तयार केलेली उत्पादने

उरुण इस्लामपूर (जि. सांगली) येथील सिद्धांत शंकरराव जाधव या अभियंता तरुणाने नोकरीच्या पाठीमागे न लागता स्पिरुलिना शेवाळापासून टॅब्लेटस निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे. आॅनलाईन पद्धतीने त्याला पाच ते सहा राज्यांत बाजारपेठ मिळवण्यातही जाधव यशस्वी झाले आहेत. आजच्या काळात प्रथिनयुक्त आहाराला असलेली मागणी लक्षात घेऊन त्यानुसार व्यवसायाची आखणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.  उरुण इस्लामपूर (जि. सांगली, ता. वाळवा) येथील सिद्धांत जाधव यांच्या कुटुंबाची सुमारे २५ एकर शेती आहे. मात्र, पाण्याअभावी त्याकडे फारसे लक्ष देणे त्यांना शक्य दिलेले नाही. जाधव यांचा इस्लामपूर येथे मंगल कार्यालयाचाही व्यवसाय आहे. सन २०१५ मध्ये  त्यांनी ‘बीई मॅकेनिकल’ ही पदवी घेतली. घरची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची असल्याने याच क्षेत्रात काहीतरी करावे असे ठरवले होते. अनेक पर्याय शोधून पाहिले. पाॅंडेचेरी परिसरात स्पिरुलीना शेवाळाची शेती त्यांच्या पाहण्यात आली. प्राथमिक माहिती व अधिक अभ्यास करून या व्यवसायात उतरण्याचे ठरवले.  व्यवसायाची पूर्वतयारी  स्पिरुलीना ही शेवाळवर्गीय वनस्पती आहे. तिच्यात प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. प्रक्रिया करून ती वाळवून पावडर तयार करायची व त्याच्या टॅब्लेटस बनवून विक्री करायची असे व्यवसायाचे मुख्य स्वरूप होते. उत्पादनाला सुरवात करण्यापूर्वी बाजारपेठांचाही अभ्यास केला.  उत्पादन कसे तयार होते? 

  • बंदिस्त शेडची उभारणी. प्रकाश परावर्तीत होणारा पत्रा छतावर वापरण्यात आला. 
  • पंचवीस फूट लांब व १० फूट रुंदीचे व साधारण दोन- अडीच फूट उंचीच्या चार टाक्‍यांची बांधणी 
  • मिळालेली माहिती व प्रत्यक्ष कार्यवाही यामध्ये बराच फरक पडू लागला. शेवाळाची हवी तशी निर्मिती होत नसल्याचे निदर्शनास आले. परंतु, चिकाटी न सोडता काम सुरु ठेवले. त्रुटी शोधल्या. मग निर्मितीत यश मिळाले. 
  • यात चारशेच्या आत ‘टीडीएस’ असलेल्या पाण्याचा वापर. हे पाणी टाक्‍यांत आठ इंच उंचीवर ठेवले जाते. खड्याचे मीठ, नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम व खाण्याचा सोडा यांचे योग्य प्रमाणात मिश्रण टाक्‍यांत सोडले जाते. त्यात स्पिरुलीनाचे ‘मदर कल्चर’ सोडले जाते. दररोज पुरेसे ढवळले जाते. पंधरा दिवसांनी पाण्याच्या पृष्ठभागावर शेवाळाची निर्मिती झालेली दिसून येते. 
  • दुधाच्या सायीसारखा शेवाळाचा पापुद्रा तयार होतो. तो वायफरद्वारे एकत्रित करून बाहेर काढला जातो. 
  • तयार झालेले शेवाळ बाहेर काढल्यानंतर ते ड्रायरद्वारे सुकवले जाते. त्यानंतर ग्राईंडरद्वारे पावडर तयार केली जाते. पावडर मधील ‘मॉईश्‍चर बॅलन्स’ केले जाते. यंत्राच्या सहाय्याने टॅब्लेटस तयार केल्या जातात. 
  • मार्केटिंग व विक्री 

  • बॉटल पॅकिंगमधून होते टॅब्लेटसची विक्री. ६० ग्रॅम वजनाच्या बॉटलची किंमत साडेचारशे रुपये असते. 
  • पूरक प्रथिनयुक्त आहार असे त्याचे स्वरूप. यात प्रथिनांचे प्रमाण ६० टक्के. 
  • स्पिरुलाईफ या नावाने त्याचे ब्रॅंडिंग. 
  • सिद्धांत यांनी आॅनलाईन विक्री पद्धतीवर अधिक भर दिला आहे. यात आघाडीच्या खासगी कंपनीची मदत घेतली जाते. 
  • सध्या छत्तीसगड, आसाम, राजस्थान, कर्नाटक, गोवा मिळून सुमारे सहा राज्यांत या पद्धतीने विक्री 
  • राज्यातही विविध ठिकाणी काही व्यक्तींना विक्रीची जबाबदारी. 
  • काही व्यावसायिक या टॅब्लेटस खरेदी करून त्यांच्या नावे मार्केटिंग करतात. 
  • सिद्धांत गरजेनुसार आपल्या ब्रॅंडने ५०० बॉटल्स तर अन्य व्यावसायिकांसाठी १५०० बॉटल्स एवढा पुरवठा करतात. 
  • वर्षाला सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांची उलाढाल होते. 
  • परिसरातील काही व्यक्तींकडूनही स्पिरूलीना पावडर तयार करून घेतली जाते. त्यांना त्याप्रकारचे प्रशिक्षण यापूर्वी देण्यात आले आहे. प्रत्येकाने २५ किलो निर्मिती केली तरी एकूण १०० किलोपर्यंत त्याचा ‘व्हॉल्यूम’ तयार होतो. 
  • बाजारपेठ होती आव्हानाची बाब  सिद्धांत म्हणाले, की निर्मिती माझ्या हातातील गोष्ट होती. परंतु, बाजारपेठ निर्माण करणे कष्टाचे व जिकिरीचे होते. मात्र प्रयत्नपूर्वक व सातत्याने काम करून हे आव्हान पेलले. या उत्पादनासाठी सुशिक्षित वर्ग हा ग्राहक म्हणून नजरेसमोर ठेवला. उत्पादनांविषयी सविस्तर माहिती घेत त्याचा दर्जा चांगला ठेवण्यावर भर दिला. हळूहळू ‘मार्केटींग’ वाढवले. काही ठिकाणी ‘कमीशन बेसीस’वर तरुणांची नेमणूक केली. घरोघरी जाऊन ते विक्री करतात.  व्यवसायाची ठळक वैशिष्ट्ये 

  • स्पिरुलीना निर्मिती बंदिस्त जागेत, स्वच्छतेला प्राधान्य 
  • बहुतेक कामे यंत्राद्वारे केली जातात. 
  • शेवाळ दर्जेदार, किडी-रोगमुक्त ठेवण्यात येते. 
  • पत्नी सौ. स्नेहा व बहिण प्रतिज्ञा यांची या व्यवसायात मदत होते. 
  • अन्न सुरक्षितता (फूड सेफ्टी) विषयातील केंद्र सरकारच्या संस्थेचा परवाना 
  • त्याचबरोबर शॉप अॅक्ट तसेच अन्य आवश्यक सर्व परवाने 
  • ९००१-२०१५ आसएसओ प्रमाणपत्र 
  • स्पिरुलिनाच्या जोडीला शेवगा, शतावरी, बीट, पपई यांची पावडरही मागणीनुसार तयार केली जाते. 
  • संपर्क- सिद्धांत जाधव- ७५०७५१६००६   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com