ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद 

चव्हाण दांपत्याने पिकवलेली दर्जेदार हळद.
चव्हाण दांपत्याने पिकवलेली दर्जेदार हळद.

शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द, अभ्यासातून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील ज्योती शंकर चव्हाण यांनी जिद्द व अभ्यासातून प्रयोग सुरू केले. पतीच्या मदतीने शेतीची जबाबदारी सांभाळत ऊस, कापसाच्या पट्ट्यात हळद पिकाचा प्रयोग केला. एकरी चांगला उतारा व दर्जा मिळवत हळदीला हिंगोली बाजारपेठही मिळवली आहे. हळदीच्या यशस्वी प्रयोगानंतर त्यांचा शेतीतील उत्साह व आत्मविश्‍वास चांगलाच बळावला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसर पूस प्रकल्पामुळे बागायती झाला आहे. येथील शेतकऱ्यांना त्यामुळे नवनवे प्रयोग करण्याची संधी मिळते. पारंपरिक पिकांऐवजी हळद, केळी, कलिंगड, खरबूज यांसारख्या पिकांना प्राधान्य देत आहेत. पुसद येथील शंकर चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी सहा एकर जमीन वरुड -अश्विनीपूर शिवारात विकत घेतली. त्यांचे पती तहसील कार्यालयात ‘वाईंडर’चे काम सांभाळतात. साहजिकच शेतीकडे पूर्णवेळ लक्ष देणे त्यांना शक्य होत नाही. चव्हाण यांचे दहा सदस्यांचे संयुक्त कुटुंब आहे. शंकर यांचे बंधू अन्य व्यवसायात असतात. त्यामुळे ज्योती यांनीच आपल्या आठ एकरांची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली आहे.  अभ्यासपूर्ण शेतीचा निर्णय  ज्योती यांना पहिल्यापासूनच शेतीची आवड होती. शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. पण शिकण्याची आस असल्याने शेती विषयातील वाचनात त्यांनी रस घेतला. त्यासाठी इंटरनेटचा वापर केला. शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या. चित्रफिती पाहिल्या. त्यातून प्रेरणा घेत अभ्यासपूर्ण शेती करण्याचा निर्णय घेतला. दोन-तीन वर्षे शेती सुधारणेवर भर दिला. शेतात विहीर नव्हती तेव्हा लांबच्या शेतावरून पाणी विकत घेतले आणि क्षेत्र भिजविले. पूस प्रकल्पाचा कालवा शेताजवळून गेला असला तरी विहिरीची गरज भासली. आता विहिरीचे काम पूर्ण झाले असून त्यास मुबलक पाणी आहे. पाणीबचतीचा मंत्र आधीच मिळाल्याने तुषार आणि ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला.  हळद पिकाला प्राधान्य  सुरुवातीची एक-दोन वर्षे कापूस, तूर, सोयाबीन अशी पारंपरिक पिके घेतली. परंतु त्यात अडकून न पडता बाजारात मागणी असलेल्या मात्र वेगळ्या, नगदी पिकांचा विचार केला. विशेषत: हळद पिकावर प्रेम बसले. मग लागवड, मशागत, शास्त्रशुद्ध तंत्र आणि विक्री व्यवस्था याबद्दल माहिती घेतली. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी दोन एकरांत सेलम जातीच्या हळदीची लागवड केली. यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला. कष्ट व घेतलेल्या ज्ञानातून सरी-वरंब्यावरील हळद पीक जोमदार आले. दोन एकरांत २२० क्विंटल ओली हळद उत्पादित झाली. उकळणी आणि वाळवणी या प्रक्रियेनंतर एकरी २४ क्विंटल हळद मिळाली. हिंगोली बाजारपेठेत या हळदीला ६ हजार ८०० रुपये ते ८००० रुपये असा प्रति क्विंटल दर मिळाला.   

पहिल्या प्रयोगातून नियोजनात उत्साह  पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आलेल्या अनुभवाच्या भरवशावर काही सुधारणा करायचे ठरवले. हे क्षेत्र दोन एकरांवरून सहा एकरांपर्यंत नेले. बेणे घरचेच उपलब्ध झाल्याने त्यावरील खर्चाचा प्रश्‍नच नव्हता. मुख्य म्हणजे जैविक व रासायनिक बेणेप्रक्रिया करण्यावर भर दिला. झिग झॅग पद्धत, सरी-वरंब्यावर लागवड, निंबोळी पेंड आदींचाही वापर केला.  ठिबकचा वापर  मागील वर्षी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केला होता. परंतु हळदीसाठी ठिबक पद्धती अधिक फायदेशीर असल्याचे जाणवले. त्यामुळे यंदा सहा एकरांत पूर्णपणे ठिबकचा वापर केला. विहिरीला मुबलक पाणी असूनही पाटाच्या पाण्यामुळे होत असलेला अपव्यय लक्षात घेत यापुढे ठिबकद्वारेच काटेकोर पाणी देण्याचा निर्धार केला आहे.  हळदीची काढणी  साधारणत: डिसेंबर आणि जानेवारीत हळदीची वाढ आणि परिपक्वतेसाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश व फेरस या घटकांची योग्य प्रमाणात मात्रा दिली. त्याआधी मातीचा भर दिला. गुणवत्ता आणि परिपक्वता या दोन्ही बाबींचा मेळ साधला गेला. हळदीचा आकार हाताच्या पंजाएवढा पाहावयास मिळाला. मार्च पंधरवड्यापासून ट्रॅक्टरचलिच यंत्राने टप्प्याटप्प्याने काढणी सुरू करण्यात आली. आत्तापर्यंत सुमारे चार एकरांची काढणी आणि वेचणी आटोपली आहे. चार एकरांत जवळपास ७२० क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळाले आहे. प्रक्रियेनंतरही मागील वर्षांप्रमाणे चांगले उत्पादन हाती येईल अशी अपेक्षा आहे. हळदीचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली आहे. सद्यस्थितीत सात हजार रुपये दर सुरू आहे. दोन्ही वर्षी एकरी ७० ते ७५ हजार रुपये उत्पादन खर्च आला आहे. पुढील हंगामातही अक्षय तृतीयेस पुढील लागवडीचा मानस आहे.  घरधनीचा हातभार  सकाळी सहा वाजताच ज्योती यांचा दिवस सुरू होतो. त्यांचे पती सकाळी तहसील कार्यालयाला जाताना वाटेत ते ज्योती यांना शेताकडे पोचवतात. त्यानंतर शेतीतील विविध कामांचे व्यवस्थापन पाहाता पाहता रात्रीचे आठ कधी वाजतात तेच ज्योती यांना उमगत नाही. त्यांनी शेतात मजुरांसाठी शेड बनविले असून महिला मजुरांसाठी स्वतंत्र शौचालय बांधले आहे. शेतीतील निविष्ठांची खरेदी, शेतमालाची विक्री या जबाबदाऱ्या पती शंकर उत्तमपणे सांभाळतात. ज्योती यांचा एक मुलगा पुणे येथे ‘एमई’ करीत असून दुसरा नागपूर येथे आर्किटेक्चर विषयाचे शिक्षण घेत आहे.  विहिरीचे बांधकाम  चव्हाण दांपत्याने भूजल तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार विहिरीचे काम केले आहे. या विहिरीचा आकार ६० बाय ४० फूट असून खोली ४० फूट आहे. मध्यभागी ३८० फूट सहा इंची बोअर केले असून ८० फूट जाळीदार केसिंग पाइप टाकला आहे. विहिरीत दोन इंची चार आडवे बोअर घेतले आहेत. सध्या विहीर पाण्याने तुडुंब भरलेली आहे. विहिरीचा वरचा भाग सिमेंट जाळीचा असून सभोवती पाच फुटांपर्यंत टोळ गोट्यांचा वापर केला आहे. त्यामुळे जमिनीत मुरलेले पाणी विहिरीत प्रवाहित होते. या विहिरीसाठी बँकेच्या अर्थसाहाय्यातून साडेचार लाख रुपये खर्च करण्यात आले. 

संपर्क- ज्योती शंकर चव्हाण- ९८५०५०७२२५  शंकर चव्हाण- ९४२१८४६२९४ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com