agriculture story in marathi, agrowon, village development, vadgaon haveli, karad, satara | Agrowon

कृष्णाकाठच्या वडगाव हवेलीने हळदीतून मिळवली समृद्धी  
हेमंत पवार
गुरुवार, 3 जानेवारी 2019

आमच्या गावाला मोठा राजकीय वारसा लाभला आहे. गावाने शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकास साधला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विकासात लोकसहभाग महत्त्वाचा राहिला आहे. 
-सौ. सुनीता जयवंतराव जगताप,  सरपंच, वडगाव हवेली,  जि. सातारा

कृष्णाकाठ परिसरातील बागायती गाव म्हणून कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली (जि. सातारा) गावची ओळख आहे. सिद्धेश्वराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव हळदीचे म्हणूनही ओळखले जाते. आधुनिक तंत्रज्ञान, पाण्याचे नियोजन, यांत्रिकीकरण व कृषी विभागाची मदत, बाजारपेठेत नाव या सर्वांमधून गावातील शेतकऱ्यांनी हळद पिकात समृद्धी मिळवली आहे. शेतीव्यतिरिक्त विकासाच्या विविध योजना लोकसहभागातून राबवूनही गावाने प्रगतीतही एक पाऊल पुढे ठेवले आहे. 
 

वडगाव हवेलीविषयी 
सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखले जाते. माजी मंत्री दादासाहेब जगताप यांचे गाव म्हणूनही ते परिचित आहे. गावची लोकसंख्या सुमारे सात हजारांच्या जवळपास आहे. मोठे गाव असल्याने विकासाची घोडदौड कायम सुरूच असते. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, दलित वस्ती सुधार योजना, हागणदारीमुक्त गाव अशा विविध शासकीय योजना राबवण्यात आल्या आहेत. वृक्षारोपणही मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. गावच्या प्रवेशद्वारापासूनच त्याची साक्ष दिसते. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांमुळे गावच्या सौंदर्यात भर पडली आहे. जिल्हा परिषद आणि खासगी शाळेद्वारे मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील लोकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गावात सिध्देश्वराचे प्रसिद्ध मंदीर आहे. त्यामुळेही गावची दूरवर ओळख आहे. 

हळदीचे गाव अशीही ओळख 
वडगाव हवेली हे कऱ्हाड-तासगाव राज्यमार्गावरील बारमाही पाणी असणारे गाव आहे. उपसा सिंचन योजना आणि विहिरींद्वारे गावातील शेतशिवारांना पाणी देण्याची व्यवस्था आहे. गावच्या एकूण क्षेत्राच्या पन्नास टक्क्याहून अधिक क्षेत्रावर दरवर्षी हळदीचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळेच गावाला हळदीचे गाव म्हणूनही ओळखले जाते. उर्वरीत क्षेत्रामध्ये ऊस, मका, सोयाबीन, गहू आदी पिके घेतली जातात. गावातील शेतकऱ्यांचा पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे शेती करण्याकडे कल वाढला आहे. सध्या शेतीत मजुरांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा आधार घेत यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, कऱ्हाड तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात व अन्य अधिकाऱ्यांची त्यांना साथ आहे. 
त्यातूनच अवजारे बॅंक तयार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. हळद उकडणी, हळद पाॅलिश अशी यंत्रे त्यांनी घेतली आहेत. गावातील ५० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी अति पाणी व खते यामुळे क्षारपड होणाऱ्या जमिनीचा धोका ओळखून ठिबकव्दारे पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. 

हळदीतून समृद्धी 
सातारा जिल्ह्यात ऊस हे महत्त्वाचे पीक. पण त्याबरोबरच हळदीकडेही नगदी पीक म्हणून पाहिले जाते. उसापेक्षा थोडी जास्त काळजी घेतली की एकरी हमखास चांगले उत्पादन मिळत असल्याने शेतकरी हे पीक घ्यायचे सोडत नाहीत. हळदीसाठी बेणे सेलमहून आणले जाते. या भागात सेलम जातीचे बियाणे चांगले उगवत असल्याने आणि किडी-रोगांना ते बऱ्यापैकी काटकही असल्याचे शेतकरी अनुभवातून सांगतात. एकदा आणलेले बियाणे साधारण चार ते पाच वर्षे चांगले उत्पादन देते. साहजिकच चार ते पाच वर्षांनी बियाणे पालट होते. या कालावधीत बियाणांवरील मोठ्या खर्चात बचत होत असते. एकरी सरासरी उत्पादन २५ ते ३० क्विंटल मिळते. प्रतवारीनुसार क्विंटलला सहा हजारांपासून ते दहाहजार रुपये दर मिळतो. नांगरणी, सरी सोडणे या कामांपासून ते काढणी, शिजवणी, पाॅलीशिंग असा एकरी खर्चही काही कमी नसतो. साधारण नऊ महिन्यांत एकरी सुमारे सव्वा लाख रुपये किंवा काहीवेळा त्यातून अधिक उत्पन्न हे पीक येथील शेतकऱ्यांना मिळवून देते. अर्थात दर व हवामान हे घटक त्यामागे फार महत्त्वाचे असतात. हळदीची उत्तम शेती व उत्पादन घेत गावातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरी समृध्दी आणली आहे. 

जमिनीचाही गुणधर्म 
हळदीला पोषक असलेली जमीन वडगाव हवेलीच्या शिवारात आहे. त्यामुळे हळदीच्या चांगल्या उत्पादनासाठी ही बाब पोषक ठरते. साहजिकच गुणवत्ताही दर्जेदार मिळत असल्याने हळदीसाठी प्रसिध्द सांगलीच्या बाजारपेठेतही वडगाव हवेलीच्या हळदीला व्यापाऱ्यांकडून मागणी होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

विकासकामांतही गावाची आघाडी 
वडगाव हवेली गावची स्मशानभूमी ही सातारा जिल्ह्यातील आदर्श स्मशानभूमींपैकी एक आहे. तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले असून स्वच्छता, रंगरंगोटी, नीटनेटकेपणा, पाण्याची सोय यामुळे गावच्या वैभवात भर पडली आहे. शासनाच्या जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायीतने येथील परिसर सुशोभीत केला आहे. 

पुरस्कारांचे मानकरी असलेले गाव 
कऱ्हाड तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी हे गाव आहे. गावाने लोकसभागातून अनेक उपक्रम राबवले आहेत. शासनाच्या अनेक स्पर्धांमध्येही भाग घेत बक्षिसेही पटकावली आहे. त्यामध्ये निर्मल ग्रामपुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना यासह अन्य पुरस्कारांचा समावेश आहे. 

प्रतिक्रिया 

गावात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल त्यातून गावात होते. त्यामुळे हळद उत्पादकांचे गाव म्हणूनही त्याची ओळख आहे. हळद औषधी असल्याने त्यास चांगली मागणी असते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, ठिबक सिंचन, नव्या यंत्रांचा वापर, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून हळदीची सुधारीत शेती कली जात आहे. 
-राजेंद्र थोरात, ९५२७८५६४७० 

कचऱ्यापासून गांडूळखत निर्मिती 
कचऱ्यावर प्रक्रिया करून गावच्या कचऱ्याची गावातच विल्हेवाट लावण्याची सोय ग्रामपंचायतीने केली आहे. यात जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. कैलास शिंदे, गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन गांडूळखत निर्मिती केली जात आहे. त्याद्वारे ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होणार आहे. 
-पी. एस. केंगार 
ग्रामविकास अधिकारी 

  
कच्च्या हळदीचीही होतेय विक्री 

‘सोशल मीडिया’च्या आधारे कच्या हळदीचेही औषधी महत्त्वही सांगितले जात आहे. त्यामुळे लोणचे, भाजी व अन्य ‘रेसीपीज’ करण्यासाठी कच्च्या हळदीला मागणी वाढत असल्याने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवण्याची संधी तयार झाली आहे. किरकोळ बाजारातही कच्च्या हळदीची विक्री होत आहे. 
-बाळासाहेब जगताप - ९७३०२७६४७५

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची...वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती ...
गीर गायींच्या संगोपनासह पॅकेटबंद दुधाची...अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हा संत्रा पिकासाठी...
अथक प्रयत्न, संघर्षातून  प्रयोगशील...पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून २० एकरांत...
मुंबईतील नोकरी सांभाळून गावी विस्तारली...मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात...
नंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...
बहुवीध पीक पद्धतीद्वारे जोखीम कमी...लातूर जिल्ह्यातील हेर येथील प्रयोगशील शेतकरी...
पाण्याचे महत्त्व ओळखूनच सुधारले पीक...सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उभे ठाकलेले संकट व...
दुष्काळातही बहरलेली बेलखेडेेंची...अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
केशर आंबा बाग, मिश्रपिके,  अन...लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज...
शेततळ्याच्या जोरावर फुलली २५ एकरांत...संत्रा शेतीत अग्रेसर म्हणून वाशिम जिल्ह्यातील...
देशी गोपालन व्यवसायातून घेतली नव्याने...इमूपालन व्यवसायात काही लाख रुपयांचा आर्थिक फटका...
दुर्गम भागात यशस्वी आवळा प्रक्रिया...नगर जिल्ह्यात मुथाळणे येथे शेती असलेल्या पाडेकर...
प्रयोगशील शेतीतून थांबविले कुटुंबांचे...देवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी...