दुर्गम भागात यशस्वी आवळा प्रक्रिया उद्योग

कोणतीही गोष्ट ठरवून चिकाटीने काम केले तर यश नक्की मिळते. मला आदिवासी भागात काम केल्याचा फायदा झाला. आवळा प्रक्रिया उद्योगात आता स्थिर झालो आहे. रोजगार निर्माण केला आहे. ॲग्रोवनचा पहिल्या दिवसापासून वाचक आहे. त्यातील माहितीचीही चांगली मदत झाली. -विठ्ठल पाडेकर
पाडेकर यांचा आवळा प्रक्रिया उद्योग व विविध उत्पादने
पाडेकर यांचा आवळा प्रक्रिया उद्योग व विविध उत्पादने

नगर जिल्ह्यात मुथाळणे येथे शेती असलेल्या पाडेकर कुटूंबाने आदिवासी व दुर्गम भागात आवळा प्रक्रिया उद्योग उभारला. सुमारे १८ वर्षे त्यात सातत्य ठेवत कॅंडी, ज्यूस, सुपारी, मुरांबा आदींच्या निर्मितीतून ‘न्युट्रा आमला’ ब्रॅण्ड यशस्वी केला. पाच टनांपासून सुरू केलेल्या या उद्योगाने साडेतीनशे टन प्रक्रियेक्षमतेपर्यंत मजल मारत देशभर विक्रीव्यवस्था उभी केली. विविध फळबागांच्या गवडीतून वर्षानुवर्ष पडीक डोंगरावर समृद्धी आणली आहे.  नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात असलेल्या बहिरवाडीचे मूळ रहिवासी असलेले पाडेकर यांचे पाच भावांचे कुटूंब. कमवा व शिकवा योजनेतून विठ्ठल पाडेकर यांनी पदवीचे शिक्षण घेतले. सन १९७६ ते ७९ या काळात एका संस्थेद्वारे आदिवासी विकासासाठी पालघर येथे तीन वर्षे काम केले. कर्जत (जि. रायगड) तालुक्यातही एका संस्थेत वीस वर्षे अनुभव घेतला. आदिवासी भागात फळझाडांच्या उत्पादनातून विकास करण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. पाडेकर यांच्या पुढाकारातूनच संस्थेने कर्जत येथे फळ प्रकिया उद्योग सुरू केला. पाडेकर यांना संस्थेतर्फे १९९२ च्या काळात प्रशिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली.  प्रक्रिया उद्योग थाटला  सन १९९९ ते २००- च्या सुमारास विठ्ठल संस्थेतील काम थांबवून गावी बहिरवाडीला परतले.  प्रकिया उद्योग व आदिवासी विकासातील २० वर्षांहून अधिकचा अनुभव असल्याने याच क्षेत्रात काम करायचे ठरवले. त्यासाठी बहुपयोगी आवळ्याची निवड केली. आज याच व्यवसायाचे विस्ताररूप  व्हीपी फूडस ॲण्ड हर्बल या कंपनीत करण्यापर्यंत मजल मारली आहे.  व्यवसाय दृष्टिक्षेपात 

  • सुरवातीला वर्षभरात पाच टन आवळ्यावर प्रक्रिया. आज साडेतीनशे टन प्रक्रियेची क्षमता 
  • पूर्वी खादी ग्रामोद्योग अंतर्गत लघू उद्योग. आता त्याचे रूपांतर खासगी कंपनीत. 
  • बहिरवाडीतून कंपनी अकोल्यात स्थलांतरीत. 
  • विठ्ठल आणि सुमनबाई पाडेकर दांपत्यासह उद्योगात ऋषीकेश व राजेश ही उच्चशिक्षित मुले आणि शालिका व नयना या उच्चशिक्षित सुना यांचे सहकार्य. 
  • आवळ्याच्या ३५०० झाडांची लागवड. चार वर्षांची झाडे. सध्या कच्चा माल बाहेरून घेतला जातो. 
  • सर्वाधिक मागणी आवळा कॅण्डी व ज्यूसला. सरबत, मुरंबा, लोणचे, सुपारी, चटणी तसेच कोरफड ज्यूसअशी अन्य उत्पादने 
  • देशभरात १५० वितरक. मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, दिल्लीपर्यंत मार्केट 
  • वार्षिक उलाढाल चार कोटी रुपयांपर्यंत 
  • श्रीलंका, जपान, पोलंड, जर्मनी, इटली आदी देशांत अभ्यास दौरे 
  • डोंगरावरील माळरान केले समृद्ध  विठ्ठल यांनी उद्योग सांभाळताना अकोल्यापासून सोळा किलोमीटरवर आणि उंचावर म्हणजे सर्वोच्च शिखर कळसुबाई डोंगराजवळ शंभर एकर जमीन खरेदी केली. तेथे वीस एकरांत आवळा, वीस एकरांत आंब्याच्या विविध जाती, २२५० डाळिंब, एकहजार पेरु, प्रत्येकी ७०० कागदी लिंबू व सीताफळाची झाडे लावली आहेत. जिद्द व कष्टातून वर्षानुवर्षे पडीक माळरान डोंगर बहुविध पिकांनी समृद्ध केला. स्वखर्चातून प्रत्येकी दोन कोटी लिटर क्षमतेची दोन शेततळी खोदली. सर्व क्षेत्राला ठिबकचा वापर केला. सर्व बाबींसाठी बॅंकेकडून कर्ज घेतले.  स्वखर्चाने रस्ता, बंधारा  या भागात पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. पाणी वाहून जाते, उन्हाळ्यात मात्र पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही समस्या लक्षात घेऊन दोन डोंगरामध्ये असलेल्या घळीजवळ पंचवीस लाख रुपये खर्च करून बंधारा बांधला. पावसाळ्यात त्यात पाणी अडवले जाते. त्याद्वारे शेततळी भरून घेतली जातात. मुथाळणे गावापासून डोंगरावर जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे गरावरील शेती वहितीखाली आणता येत नव्हती.  पाडेकर यांनी स्वखर्चाने रस्ता बांधला. आता परिसरातील दीडशे शेतकरी त्याचा वापर करतात.  डांगी संवर्धनासाठी गोशाळा  डांगी जनावरे या भागाचे वैशिष्ट्य. यंदा दुष्काळ असल्याने या भागातील जनावरे चारा व पाण्याअभावी विकली जाऊ लागली. पाडेकर यांनी आता मुथाळणेच्या डोंगरावर गोशाळा सुरू केली आहे. अनेक लोक आपल्या गायी येथे आणतात. सर्व मिळून सुमारे ८० जनावरे आहेत. सध्या चारा विकत घेतला जातो. गोमूत्र व शेणाचा वापर फळझाडांसाठी होतो.  शंभर मजुरांना रोजगार  पाडेकर यांच्या उद्योगातून अकोला परिसराच्या दुर्गम भागातील ६० हून अधिक जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. कामगारांना भविष्य निर्वाह निधी, आरोग्य विम्यासह कामगार कायद्यानुसार सुविधा दिल्या जातात. महिला कामगारांची विशेष काळजी घेतली जाते.  भावी नियोजन 

  • आंबा, सीताफळ, डाळिंबावरील प्रक्रिया उद्योग 
  • परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन एकच प्रकारचे उत्पादन व त्याला चांगला दर मिळेल यासाठी गटशेतीचे प्रयत्न 
  • आवळा आधारीत उत्पादने जगभर नेणार 
  • संपूर्ण शेती सेंद्रिय पध्दतीने 
  • सध्या बायोगॅसपासून इंधन बचत. येत्या काळात सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती 
  • संपर्क- विठ्ठल वाडेकर - ९४२३४६२३५२     

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com