जनावरांच्या संतुलित आहार व्यवस्थापनासाठी पशुपोषण अॅप

संतुलित आहार व्यवस्थापनासाठी पशुपोषण अॅप
संतुलित आहार व्यवस्थापनासाठी पशुपोषण अॅप

जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो संतुलित कसा करायचा याचा हिशोब सामान्य पशुपालकाला करणे शक्य नाही यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आनंद यांनी सामान्य पशुपालकांना वापरता येण्याजोगे व दूध उत्पन्नानुसार आहार संतुलित करण्यासाठी “पशुपोषण” हे अॅप तयार केले आहे.   पारंपरिक दुग्धव्यवसाय हा स्वतःच्या शेतातील उपलब्ध चारा व पिकांचे उर्वरित अवशेष यावर अवलंबून होता, त्यामुळे चाऱ्यावर किती खर्च होतो आणि उत्पन्न किती मिळते याचा विचार आजवर केला गेला नाही. व्यावसायिक तत्त्वावर फायदेशीर दुग्धव्यवसाय करायचा झाल्यास प्रत्येक गोष्टीवर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा हिशोब ठेवला पाहिजे. दुग्धव्यवसायात ७० ते ८० टक्के खर्च हा जनावारांच्या आहारावर होत असतो. त्यामुळे आहार व्यवस्थापनात झालेली छोटीशी चूक दुग्धव्यवसायातील फायदा कमी करू शकते. सध्या सर्वत्र चाऱ्याची उपलब्धता कमी झालेली आहे त्याचबरोबर चाऱ्याचे आणि पशुखाद्याचे दर वाढलेत. अशावेळेस जनावरांना कमी चारा खाऊ घातल्यास त्याचा दुग्धोत्पादनावर व आरोग्यावर विपरीत परिणाम होईल आणि गरजेपेक्षा अधिक चारा खाऊ घातल्यास तोट्यात वाढ होईल. म्हणून टंचाईच्या काळातच नव्हे तर कायमच जनावराला त्याच्या वजनानुसार व दुग्धोत्पादनानुसार आहार संतुलित करून दिला पाहिजे. संतुलित आहार जनावरांना त्यांच्या शरीर वाढीसाठी आणि दुग्धोत्पादनासाठी विवध अन्न घटकांची गरज असते. जनावराचा प्रकार, वय, दुग्धोत्पादन तसेच गाभण काळ यानुसार उपलब्ध चारा आणि पशुखाद्य यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करून आवश्यक अन्नघटक कमीत कमी खर्चात उपलब्ध करून देणे म्हणजे संतुलित आहार देणे होय. संतुलित आहाराचे फायदे

  • उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर होऊन, प्रतिलिटर दूध उत्पादनाचा खर्च कमी होतो.
  • दूध उत्पादन व त्यातील फॅट, एस.एन.एफ. मध्ये वाढ होते.
  • जनावरांच्या शरीराची वाढ व एकूणच आरोग्य उत्तम राहते.
  • गाई म्हशीची प्रजनन क्षमता सुधारते.
  • वेतातील अंतर कमी होऊन प्रतिवर्षी एक वासरू ही संकल्पना साध्य करता येते.
  • - वासरांची योग्य वाढ होऊन लवकर वयात येण्यास मदत होते.
  • पशुपोषण अॅप जनावरांना दिवसभरात किती चारा दिला पाहिजे आणि तो संतुलित कसा करायचा याचा हिशोब सामान्य पशुपालकाला करणे शक्य नाही यासाठी नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्ड, आनंद यांनी सामान्य पशुपालकांना वापरता येण्याजोगे व दूध उत्पन्नानुसार आहार संतुलित करण्यासाठी “पशुपोषण” हे अॅप तयार केले आहे. अॅप वापरून आहाराचे संतुलन पशुपोषण हे वापरायला एक अतिशय सोपे असे अॅप आहे. अँड्रॉईड मोबाईल वर प्ले स्टोअरमधून हे मोफत डाऊनलोड करता येते. भारतातील विविध ११ भाषेमध्ये हे अॅप काम करते. हे ॲप वापरण्यासाठी गाई म्हशींना १२ अंकी विशिष्ठ ओळख क्रमांक असलेला बिल्ला असणे गरजेचे आहे. हे बिल्ले बसविण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून गेले वर्षभर सुरू आहे. हे अॅप पुढील प्रमाणे वापरावे. १. साईन अप व लॉगिन करणे - सुरवातीला एकदाच नवीन युझर नेम व पासवर्ड बनवून साईन अप करावे. नंतर ते वापरून लॉगिन करावे. २. पशू नोंदणी - अॅप वर लॉगिन केल्यानंतर “पशू नोंदणी” हा ऑप्शन निवडून त्यात जनावराची माहिती जसे जनावराचा बिल्ला क्रमांक, प्रकार, जात, वय, वेतांची संख्या इत्यादी माहिती भरावी. भरलेली माहिती जतन अर्थात सेव्ह करावी. ३. आहार संतुलन - आहर संतुलन हा ऑप्शन निवडून त्यात जनावरांचे दैनंदिन दूध उत्पादन, दुधातील फॅट इत्यादी माहिती भरून पुढे गेल्यावर सध्या उपलब्ध असलेला व जनावरांना दिला जाणारा चारा याची माहिती भरावी. त्यात चाऱ्याचा प्रकार, दर, चाऱ्यातील प्रमाण या गोष्टी दिवसभरात दिल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या चाऱ्यासाठी भराव्यात. सर्व माहिती भरून झाल्यावर “आहार संतुलन करा” हा ऑप्शन निवडल्यावर आपल्याला जनावराला प्रत्येक प्रकारचा चारा किती दिला पाहिजे, त्याची किंमत किती होते व दूध उत्पादनासाठी प्रतिलिटर किती खर्च होतो हे कळते. खनिज मिश्रण अतिरिक्त द्यावे लागत असेल तर त्याबाबत माहिती यात उपलब्ध होते.   पशुपोषण अॅप वापरण्याचे फायदे

  • जनावरांना त्यांच्या दुग्धोत्पादन अथवा गाभण काळानुसार कोणत्या पोषक घटकांची किती आवश्यकता आहे हे ठरवले जाते.
  • स्थानिकरीत्या उपलब्ध असलेल्या अनेक चारा पिकांचे रासायनिक पृथक्करण करून त्यात उपलब्ध असलेल्या पोषक घटकांची संपूर्ण माहिती या अॅप मध्ये आहे.
  • पशुपोषण अॅप वापरून उपलब्ध चाऱ्याचा वापर करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन उत्पन्नात वाढ करता येते.
  • मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे पशुपोषण अॅप वापरायला ही सोपे आणि मोफत आहे.
  • संपर्क ः डॉ. सचिन रहाणे, (पशुधन विकास अधिकारी (गट अ), पशुवैद्यकीय दवाखाना, कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com