अॅझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्यातून करा जनावरांचे पोषण

जनावरांची चाऱ्याची गरज भागविण्यासाठी अपारंपरिक पद्धतीने चारानिर्मिती करणे गरजेचे आहे.
जनावरांची चाऱ्याची गरज भागविण्यासाठी अपारंपरिक पद्धतीने चारानिर्मिती करणे गरजेचे आहे.

चाराटंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याची साठवणूक, त्याची पौष्टिकता आणि पचनियता वाढविण्यासाठी विविध पर्यायांची आपण याआधीच्या भागांमधून चर्चा केली. परंतु जिथे चाराच उपलब्ध नाही तिथे दुग्धोत्पादनाचा विचार न करता किमान जनावरे जगविण्यासाठी, अपारंपरिक पद्धतीने चारानिर्मिती करणे गरजेचे आहे. फळे व भाजीपाल्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ, रस, पेये, जॅम, जेली तसेच रेडी टू कुक पदार्थ बनविले जातात. ही प्रक्रिया करताना नको असलेल्या वेगवेगळ्या घटकांची निर्मिती होते. त्याचा चारा म्हणून उपयोग होऊ शकतो. १. बटाटा प्रक्रिया उद्योगाचे अवशेष बटाट्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करण्यासाठी वापर होतो. त्यातून बटाट्याच्या साली, त्याचा पल्प, स्टार्च आणि वाया गेलेले बटाटे असे उपपदार्थ मिळतात. त्यात पाण्याचे प्रमाण अधिक आहे तसेच तंतुमय पदार्थ आणि प्रथिने कमी आहेत, त्यामुळे या उपपदार्थांचा जनावरांच्या आहारात १० ते २० टक्केच समावेश करता येऊ शकतो. त्यावर निर्जलीकरण प्रक्रिया केल्यास पाण्याचे प्रमाण कमी करून अधिक परिणामकारकरित्या त्याचा जनावरांच्या आहारात समावेश करता येईल तसेच त्याची साठवणूक करणे सहज शक्य होईल. २. टोमॅटो प्रक्रिया उद्योगातील अवशेष टोमॅटोपासून सॉस व केचअप बनविल्यावर त्यापासून जे उर्वरित पदार्थ राहतात त्यात ५५ टक्क्यांपर्यंत एकूण पचनीय घटक तसेच १५ टक्के प्रथिने असतात. दुधाळ जनावरांच्या आहारात १५ ते २० टक्के समावेश केला जाऊ शकतो. ३. विविध फळ प्रक्रिया उद्योगातील अवशेष संत्री, मोसंबी, आंबा तसेच इतर फळे ज्यांचा रस काढून प्रक्रिया केली जाते त्यांचे उर्वरित अवशेष जसे साली, पल्प, बिया मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होतात, त्याचा वापर जनावरांच्या आहारात करता येऊ शकतो. केळीचे वेफर्स बनवताना त्याच्या साली मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. फळांचे अवशेष ताजे आणि १० ते १५ टक्के पर्यंत जनावरांच्या आहारात वापरता येऊ शकतात. ४. स्टार्च व मद्यनिर्मिती उद्योगातील उपपदार्थ स्टार्च व मद्य बनवताना मका व इतर धान्यांवर किण्वन प्रक्रिया केली जाते. यातून मका हस्क व ब्रेव्हरी वेस्ट (ब्रेवर्स ग्रेन) उपलब्ध होतात. याचा अनेक मोठ्या गोठ्यांवर सध्या चाऱ्याला पर्याय म्हणून पशुपालक वापर करत आहेत. परंतु याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. जनावरच्या एकूण चाऱ्यापैकी याचा वापर २० टक्केपेक्षा अधिक करू नये, याची दोन दिवसांपेक्षा अधिक साठवणूक करू नये. अधिक दिवस साठा केल्यास यात मोठ्या प्रमाणावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यातून जनावरांना विषबाधा होऊ शकते. बाजारातील भाजीपाल्याचे अवशेष शहरातील तसेच अनेक मोठ्या गावांतील आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे अवशेष तसेच विक्री न झालेला व सुकलेला भाजीपाला फेकून दिला जातो. हे योग्य रीतीने जमा केल्यास जनावरांना टंचाई काळात चाऱ्याचा स्वतातील पर्याय ठरू शकेल. झाडांची पाने शेताच्या बांधावर लावलेली सुबाभूळ, शेवरी, दशरथ, तुती यांसारखी झाडांची किंवा बांधावरील, माळरानावरील विविध जंगली झाडांची पाने जनावरांना पर्यायी चारा म्हणून देता येतात. सुबाभूळ व शेवरी यांची पाने सुरवातीला कमी प्रमाणात देण्यात यावी व जशी सवय होईल तसे त्याचे प्रमाण वाढवत न्यावे. अचानक जास्त पाने खाऊ घातल्यास पोटफुगीचा तसेच हगवण लागण्याचा त्रास होऊ शकतो. अनेक झाडांची पाने सहज पचत नाहीत व त्यात पोषक घटकही कमी असतात त्यामुळे भाकड, कमी दूध देणाऱ्या गाई तसेच बैलांना याचा वापर करावा. फळबागांची छाटणी केल्यावर मिळणाऱ्या फांद्या, पानेसुद्धा जनावरांना खाऊ घालता येतील परंतु त्यावर विषारी कीटनाशकाचे घटक शिल्लक नाहीत याची खात्री करूनच त्याचा आहारात समावेश करावा. केळीचे कंद केळीच्या कंदामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्बोदके असतात. हे कंद चांगले स्वच्छ करून ५ ते १० किलो प्रमाणे मोठ्या जनावरांच्या आहारात वापरता येऊ शकतात. त्यात प्रथिनांचे प्रमाण कमी आहे तसेच टॅनीन नावाचा घटक असल्याने त्याचा प्रमाणापेक्षा अधिक वापर करू नये. ॲझोला टंचाई काळात फक्त चारा पिकेच नाही तर पशुखाद्याचेही दर वाढतात, त्यामुळे जनावरांना योग्य प्रमाणात पशुखाद्य देणे परवडत नाही. त्याचबरोबर सकस चारा उपलब्ध नसेल तर प्रथिने, क्षार, खनिजे तसेच जीवनसत्वांची कमतरता होते. यावर पर्याय म्हणून उच्च प्रथिने आणि क्षार खनिजे असलेले ॲझोलाचा वापर दुधाळ जनावरांच्या आहारात करता येईल. दुधाळ जनावरांना एक ते दीड किलोपर्यंत ॲझोला रोज खाऊ घालता येतो. हायड्रोपोनिक्स चारा मका, सातू, गहू व बाजरी यांच्यापासून हायड्रोपोनिक्स चारा तयार करता येतो. मोड आलेले धान्य ट्रे मध्ये पसरवून त्यावर वेळोवेळी पाण्याचा फवारा मारून हायड्रोपोनिक्स चारा दहा दिवसांत तयार करता येतो. असा चारा प्रतिजनावर दहा किलोपर्यंत वापरावा. यात सहज पचणाऱ्या घटकांचे व पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने आहारात इतर वाळलेला चाऱ्याचा समावेश असावा जेणेकरून पचन योग्य रीतीने होईल. यात फुटलेले दाणे वापरू नये, त्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच ज्वारीचा वापर करू नये कारण ज्वारीच्या कोवळ्या अंकुरात हायड्रोसायनिक अॅसिड असते जे जनावरांना अपायकारक असते. पारंपरिक पद्धतीत बी मातीत रुजताना त्यात साठविलेली ऊर्जा ही सुरवातीला जास्तीत जास्त मुळाच्या वाढीसाठी वापरली जाते परंतु हायड्रोपोनिक्समध्ये हीच उर्जा अंकुर वाढविण्यासाठी वापरली जाते त्यामुळे त्याची जोमदार व वेगवान वाढ होते.   संपर्क ः डॉ. सचिन रहाणे, (पशुधन विकास अधिकारी (गट अ), पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com