केळी पीक सल्ला

उष्ण हवेपासून संरक्षण होण्यासाठी खोडाच्या भोवती लोंबकळणारी रोगविरहीत वाळलेली पाने कापू नयेत.
उष्ण हवेपासून संरक्षण होण्यासाठी खोडाच्या भोवती लोंबकळणारी रोगविरहीत वाळलेली पाने कापू नयेत.

उन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी वारे या घटकांचा केळी पिकावर प्रत्यक्षरित्या परिणाम होतो. महाराष्ट्रात दोन प्रमुख हंगामात केळीची लागवड केली जाते. मृगबाग म्हणजेच जून लागवड तर कांदे बाग म्हणजेच आॅक्टोबर लागवड. उन्हाळ्यात मृगबाग ही घड निसवणीची अवस्था पूर्ण करून घड पक्वतेच्या अवस्थतेत असते तर कांदे बाग ही मुख्य शाखीय वाढीच्या आवस्थेत असते. ठिबक सिंचनाचा वाढता वापर, उतीसंवर्धित रोपांची उपलब्धता, ठिबक सिंचनातूनच विद्राव्य खते देण्याची व्यवस्था, अधिक उत्पादन देणाऱ्या जातीचा वापर करून अधिक उत्पन्न मिळविण्याचा वाढता कल यामुळे जळगाव जिल्ह्यासह, धुळे, नंदुरबार, परभणी, नांदेड, वर्धा, बुलडाणा, सांगली, सातारा, नगर व अकोला या जिल्ह्यातही केळी लागवडीचे प्रमाण वाढत आहे. केळी व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी

  • बाग तणमुक्त करावी. मुख्य खोडालगत आलेली पिले धारदार विळीने जमिनीलगत कापावी. तण व कापलेली पिले खोडाजवळ ठेवून त्याचा आच्छादन म्हणून वापर करावा.
  • खोडाच्या भोवती लोंबकळणारी रोगविरहित वाळलेली/पिवळी पाने कापू नये, त्यामुळे खोडाचे उष्ण हवेपासून संरक्षण होण्यास मदत होईल.
  • केळीच्या पानातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी उन्हाळ्यात १५ दिवसांच्या अंतराने केओलीन बाष्परोधक पावडरची ८० ग्रॅम प्रती लिटर (८ टक्के) प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे केळीच्या पानावर पांढरा थर तयार होतो. तो पानातील छिंद्राना अंशतः बंद करतो.
  • केळी लागवडीच्या वेळी बागेभोवताली सजीव कुंपण (उदा. शेवरी, बांबू, गजराज गवत) किंवा हिरव्या शेडनेटचे वारा प्रतिरोधक उभारावे. त्यामुळे केळी बागेचे उष्ण हवेपासून संरक्षण होते व बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.
  • केळीची वाळलेली पाने (रोग विरहीत), उसाचे पाचट, गव्हाचा भुसा, सोयाबीन भुसा यांचा वापर करून सेंद्रिय अाच्छादन करावे. केळीच्या दोन ओळीतील मोकळ्या जागेत ३० मायक्रॉन जाडीचे चंदेरी काळ्या रंगाचे पॉलीइथिलीन कापड पसरविल्यास जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, जमिनीचे तापमान नियंत्रित राहिल्याने मुळांना इजा पोचत नाही, तसेच तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • घड पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या मृग बागेस ५ किलो म्युरेट आॅफ पोटॅश प्रतिहजार झाडांसाठी प्रतिआठवडा पाण्यातून सोडावे.
  • मुख्य वाढीच्या अवस्थेत असलेल्या कांदे बागेस हजार झाडांसाठी १२ आठवड्यापर्यंत प्रतिआठवडा ५.५ किलो युरिया आणि ७ किलो म्युरेट आॅफ पोटॅश प्रतिआठवडा फर्टीगेशनद्वारे देण्याची शिफारस केलेली आहे.
  • फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या केळी बागेस हजार झाडांसाठी १ ते १६ आठवड्यापर्यंत प्रतिआठवडा ६.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनोअमोनियम फाॅस्फेट व ३ किलो म्युरेट आॅफ पोटॅश, फर्टीगेशनद्वारे देण्याची शिफारस केलेली आहे.
  • उन्हाळ्यात मृग बागेची केळी घड निसवण्याच्या तसेच घड पक्वतेच्या अवस्थेत असते. केळीचा घड पूर्ण निसवल्यानंतर तसेच केळ कमळ तोडल्यानंतर १० लिटर पाण्यात ५० ग्रॅम पोटॅशियम डायहायड्रोजन फाॅस्फेट अधिक १०० ग्रॅम युरियाची स्टीकर सोबत घडावर फवारणी केल्याने घडातील केळीची जाडी, लांबी वाढून केळीच्या घडाच्या वजनामध्ये वाढ होते.
  • तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी केळीचे घड स्कर्टिग बॅग किंवा वाळलेल्या केळीच्या निरोगी पानांनी झाकावेत.
  • घड निसवण होऊन दोन महिने झालेल्या झाडांची पाने पूर्ण फाटून गेली असली तरी अशा घडांना पक्वतेसाठी फक्त पाण्याची गरज असते. म्हणून अशा झाडांचे योग्य पाणी व्यवस्थापन करावे.
  • संशोधन केंद्राने संशोधनाअंती ठिबक सिंचन पद्धतीने मार्च महिन्यात मृगबाग केळीला १४-१६ लिटर, एप्रिल महिन्यात १८-२० लिटर तर मे महिन्यात २१-२४ लिटर प्रतिझाड/दिन पाणी देण्याची शिफारस केली आहे.
  • कांदेबागेसाठी ५ ते ९ महिने या कालावधीत ९ ते ११ लिटर प्रतिझाड पाणी / दिन, तर १० व्या महिन्यासाठी १४ ते १६ लिटर प्रतिझाड पाणी / दिन देण्याची शिफारस केली आहे.
  • उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी २.५ ग्रॅम मॅंकोझेब प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • संपर्क ः प्रा. नाझीमोद्दीन शेख, ०२५७/२२५०९८६ (केळी संशोधन केंद्र, जळगाव.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com