योग्य व्यवस्थापन ठेवले केळीशेतीत सातत्य जपले

उमाशंकर किनकर यांनी अनेक वर्षांपासून केळीची शेती टिकवली आहे.
उमाशंकर किनकर यांनी अनेक वर्षांपासून केळीची शेती टिकवली आहे.

परसोडी (ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा) हे पाण्याची चांगली उपलब्धता असलेले गाव. यंदाच पाऊस झाला नाही. कापूस, सोयाबीनसारखी पिके घेणाऱ्या या गावात उमाशंकर किनकर यांनी मात्र पारंपरिक पिकांच्या मागे न लागता नऊ वर्षांपूर्वी केळीची निवड केली. गावातील काहींनी हे पीक पुरेशा पाण्याअभावी थांबवले. पण किनकर यांनी योग्य व्यवस्थापनातून व बांधावरच विक्री व्यवस्था राबवून आजपर्यंत या पिकात सातत्य राखले आहे. दुष्काळातही निराश न होता शेतीतील आशा त्यांनी पल्लवीत ठेवल्या आहेत.     यंदा राज्यात अनेक भागात पाऊसच झाला नाही. दुष्काळाच्या झळ्या त्यामुळेच आज शेतकरी सोसताहेत. मध्यमस्तराचा दुष्काळ जाहीर झालेल्या वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्‍यात पाण्याअभावी रब्बी पिके शेतकऱ्यांना घेता आली नाहीत. कपाशी, सोयाबीनचे उत्पादनही अत्यंत कमी आले. अनेक शेतकऱ्यांची शेती भीषण दुष्काळामुळे पडीक राहिली. तालुक्‍यातील परसोडी गावातही यंदा पावसाने पाठ फिरवीत दुष्काळाची स्थिती आणली. या गावातील शेतकरी कापूस, सोयाबीन आदी पिके घेतात.  जिल्ह्यात दोनच गावे दुष्काळग्रस्त  तसे पाहायला गेल्यास वर्धा हा पावसाचाच जिल्हा म्हणून समजला जातो. म्हणूनच भाताचे क्षेत्र अधिक पाहण्यास मिळते. शासनाने या वेळी मात्र कमी पर्जन्यमानासोबतच पीक कापणी प्रयोगाच्या अहवालाच्या आधारे मिळणाऱ्या पीक उत्पादकतेचा आधार घेत दुष्काळ जाहीर केला. त्यानुसार वर्धा जिल्ह्यातील तीन गावांचा दुष्काळी यादीत सुरवातीला समावेश होता. आता दोनच गावे या यादीत आहेत. त्यामध्ये कारंजा घाडगे तालुक्‍यातील दुष्काळ मध्यम स्वरूपाचा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  किनकर यांची शेती पद्धती  किनकर यांची सुमारे चार एकर शेती आहे. पूर्वी मोसंबी हे त्यांचे मुख्य पीक होते. उत्पादन कमी, खर्च जास्त व दरही असमाधानकारक असा ताळेबंद काही केल्या जुळेना. मग हे पीक घेण्याचे थांबवून अन्य व्यावसायिक पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा शोध केळी पिकावर थांबला. नऊ वर्षांपूर्वी त्यांनी केळीची लागवड केली. आज ते तीन एकरांत सुमारे ४००० झाडांचे संगोपन करीत आहेत. सहा बाय पाच फूट अंतरावर ग्रॅंन नैन या वाणाची लागवड ते करतात. एका कंपनीकडून त्यांना रोपे घरपोच मिळतात. यंदा पावसाचा लाभ झाला नसला तरी बोअरवेल व विहिरीचा पर्याय त्यांच्याकडे आहे. सध्या दोन्ही स्राेतांमध्ये पाण्याची मुबलकता आहे. मात्र काटेकोर पाणी नियोजनासाठी ठिबक सिंचनाचा पर्याय अवलंबिला आहे.  दुग्धव्यवसायावर लक्ष केंद्रित करणार  केळीचे अधिक क्षेत्र व्यापलेल्या या शेतीत दुग्धव्यवसायासाठीही जागा राखीव ठेवण्याचे किनकर यांचे नियोजन आहे. सध्या तीन गायी असून संख्या वाढवण्याचा विचार आहे. अर्धा एकरावर नेपीयर जातीचा चारा आहे.  वाघाच्या दहशतीमुळे मजुरांची वानवा  दुष्काळासोबतच या भागात कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्‍नही गंभीर बनल्याचे किनकर सांगतात. वीजपुरवठा कधीही सुरू आणि कधीही बंद होत असल्याने पिकांना गरजेनुरूप पाणी देणे शक्‍य होत नाही. या समस्येवर तोडगा म्हणून पंपासाठी ‘प्रिव्हेंटर’ बसविले आहे. वीजपुरवठा असेल त्या वेळी पंप या तंत्राद्वारे सुरू होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पंप बंद होतो. या भागात वाघाचा वावर आहे. साहजिकच रात्री पाणी देण्यासाठी मजूर मिळत नसल्याचे किनकर यांनी सांगितले.  उत्पादन व विक्री  साधारण तीन एकरांमध्ये ७० टन किंवा एकरी २२ ते २५ टनांच्या आसपास उत्पादन मिळते. उत्पादनाचा हा पल्ला दरवर्षी ठेवण्याचा किंवा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केळीला बांधावरच बाजारपेठ मिळाली आहे. काटोल आणि नागपूर येथील व्यापारी जागेवर येऊन माल खरेदी करतात. यावर्षीच्या नवरात्रात सात हजार रुपये प्रतिटन दराने विक्रीचा करार व्यापाऱ्यांसोबत केला होता. शक्यतो दरवर्षी हुंडी पद्धतीनेच बाग दिली जाते. बाजारातील केळीची आवक, हवामान या परिस्थितीचा विचार केल्यास प्रतिटन १२ हजार रुपये दरदेखील किनकर मिळवतात. हुंडी पद्धतीत घड तोडणीचे कामदेखील व्यापाऱ्याकडे असते. त्यामुळे वाहतूक खर्च करतो. साहजिकच व्यवहार फायदेशीर ठरण्याची संधी असते. गेल्यावर्षी चार हजार झाडावंरील संपूर्ण बाग हुंडी पद्धतीने साडेपाच लाख रुपयांत व्यापाऱ्याला देण्यात आली. एकंदरीत बाजाराची स्थिती लक्षात घेऊन विक्रीबाबत निर्णय घेतला जातो.  जमिनीचा राखला पोत  लागवड केल्यानंतर खोडव्याच्या माध्यमातून दोन वर्षे पीक घेतले जाते. त्यानंतर एक वर्ष सोयाबीन व हरभरा अशाप्रकारे फेरपालट केल्यानंतर पुन्हा केळीची लागवड होते. कन्नमवार ग्राम येथून सहा हजार रुपये प्रतिट्रक या दराने शेणखताची खरेदी होते. दरवर्षी उन्हाळ्यात शेणखत जमिनीत मिसळले जाते. त्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये, पोटॅश, सुपर फॉस्फेट आणि युरिया या खतांची मात्रा देण्यावरही भर राहतो. कोणतेही पीक घेण्यासाठी पाण्यासोबतच जमिनीचा पोत हादेखील घटक महत्त्वाचा ठरतो या संकल्पनेवर किनकर यांचा विश्‍वास आहे. परसोडी गावात दोन ते चार शेतकऱ्यांनी केळीची शेती केली होती. मात्र पाण्याच्या समस्येमुळे त्यांना ती थांबवावी लागली होती. एकीकडे दुष्काळामुळे गहू, हरभरा लागवडदेखील अनेकांना शक्‍य झाली नसताना किनकर यांनी नियोजनबधद्ध पीक व्यवस्थापनाच्या जोरावर केळीसारखे पीक टिकवून धरले. त्यातून शाश्‍वत शेतीकडे जाण्याचा मार्ग शोधला ही उल्लेखनीय बाब आहे.  संपर्क- उमाशंकर किनकर-९९२२४७८४४२  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com